अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम

-प्रमोद मुनघाटे

 ‘‘आता राजनीतीचा अखेरचा, परंतु महत्त्वाचा, मूलभूत पाठ समजून घे लक्ष्मणा!’’ रावणाने लक्ष्मणावर नजर रोखली.

‘‘सांगावे महाराज!’’ लक्ष्मणाने मस्तक थोडेसे झुकवले.

‘‘राम आणि सुग्रीव यांच्या मैत्रीला धर्म, न्याय, आणि नीतिचे अधिष्ठान होते असे म्हणणे म्हणजे

राजनीतीबद्दल अनभिज्ञ असणेच आहे.’’

‘‘थोडे विस्ताराने समजवाल का लंकाधिपती?’’

‘‘विशेष विस्ताराने सांगण्याची गरजच नाही लक्ष्मणा! समजा सीतेच्या शोधात हिंडत असताना रामाला सुग्रीवाऐवजी वाली प्रथम भेटला असता आणि त्याने रामाला सहाय करण्याचे वचन दिले असते, तर

सुग्रीवाऐवजी वालीचा पक्ष धर्म, न्याय आणि नीतीचा वाटला असता. मग कदाचित वालीने केलेल्या सहायाच्या बदल्यात रामाने सुग्रीवाचा वध केला असता. प्रश्न न्यायाचा आणि नीतीचा नव्हताच. प्रश्न परस्परांचे हित जपण्याचा होता. राजनीती म्हणतात ती हीच लक्ष्मणा! राजनीतीमध्ये स्वहितपलीकडे दुसरे काहीच नसते आणि त्या हिताच्या रक्षणासाठी जे काही केले जाते, तोच धर्म, तोच न्याय आणि तीच नीती ठरते.’’

‘अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम’ या दिनकर जोषी या गुजराती लेखकाच्या कादंबरीतील हा उतारा. ( मराठी अनुवाद: सुषमा शाळिग्राम, मेहता पब्लिशिंग, पुणे, ऑक्टो. २०११ )

कादंबरीची सुरवातच रावण-लक्ष्मण संवादाने होते. युद्धानंतर रावण मरणासन्न स्थित पडलेला असतो. राम लक्ष्मणाला आदेश देतो की, सकल विश्वातील समग्र ज्ञान एकत्रित करून जी गुटिका तयार होईल, तशी गुटिका रावणाने सेवन केली होती. रावण वेदवेदांगांचा आणि शास्त्रांचा प्रकांड ज्ञाता होता. तू लगेच रावणाकडे जाऊन ते ज्ञान आत्मसात करून घे. कारण रावणाच्या मृत्यूबरोबर त्या ज्ञानाचाही आता अस्त होणार आहे. लक्ष्मण रावणाजवळ जाऊन विनंती करतो. रावण लक्ष्मणाला त्याच्या आयुष्यातील घटनांची उदाहरणे देत राजनीती, अर्थनीती, धर्मनीती आणि मनुष्यनीती सांगतो. पण रावण हेही सांगतो की, जीवनाचे परम ज्ञान प्राप्त केल्या नंतरही माणसाला जाणवत राहते की, त्याच्या पुढयात अद्यापही केवळ निस्सीम अज्ञानच पडले आहे. आपल्याला जे माहीत असते, त्यापेक्षाही जे माहीत नसते, ते अति-विशाल, अफाट असते.’’

भारतीय लोकजीवनावर आजही रामायण-महाभारतातील नैतिक व सांस्कृतिक बंधांचा प्रभाव आढळतो. ( म्हणूनच आजही भारतात बायकांची अग्निपरीक्षा केली जाते आणि रामजन्मभूमी, रामाच्या विटा आणि रामसेतू यांचा राजकारणात वापर केला जाऊ शकतो.) पण ‘अयोध्येचा राम’ हा खरोखरच मर्यादा पुरुषोत्तम होता का आणि ‘लंकेचा रावण’ हा खरोखरच क्रूर राक्षस होता का असे प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर अलीकडचे लेखक विचारू लागले आहेत. हे प्रश्न भारताच्या प्राचीन इतिहास व भूगोलातील वस्तुस्थितीच्या आधारावर फार गंभीरपणे उपस्थित केले जात आहेत. असाच एक प्रयत्न म्हणजे, प्रस्तुत कादंबरी. या कादंबरीत राम-रावणाच्या भूमिकांमध्येच जी अदलाबदल केली आहे, ती केवळ एक टूम नव्हे, तर आर्य आणि अनार्य, वैदिक आणि अवैदिक व जन आणि सामंतवादी अशा अशा अतिप्राचीन संघर्षाला नवा अन्वयार्थ देऊन त्या संघर्षाला वर्तमान प्रश्नांपर्यत घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

या कादंबरीत रावणाचा वंश कोणता, परंपरेने त्याच्यावर अन्याय कसा झाला, रावणाच्या लंकेवरव दंडकारण्यावरील त्याच्या सत्तेवर साम्राज्यवादी तथाकथित आर्यांनी कसे अतिक्रमण केले, ऋषींच्या यज्ञाच्या संरक्षणार्थ राम-लक्ष्मणाला आमंत्रित करून, मग शूर्पणखेचा अपमान व सीताहरण या निमित्ताने आर्य-द्रविड यांच्यातील युद्ध कसे पेटले, आणि या युद्धात रामाने कुटील कारस्थान करून कसा विजय मिळविला, याचे वर्णन महाकाव्याच्या रसाळ शैलीत केलेले आहे. सीता, उर्मिला आणि वालीची पत्नी तारामती या स्त्रियांवरील अन्यायाच्या निमित्ताने रामायणात स्त्रीत्वाच्या अपमानाची किती परिसीमा गाठली आहे, याचे अत्यंत तार्किक विवेचन मुळातून वाचण्यासारखे आहे. प्रारंभीचे रावण-लक्ष्मण संवाद तर स्तिमित करणारे आणि धर्म व नीतीच्या संदर्भात तर्कबुद्धी हेलावून टाकणारे आहेत.

रावणाच्या मते, कधीही कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो. हाच राजनीतीचा पहिला पाठ आहे पिता,पुत्र, भ्राता…येथे एकही नाते विश्वास ठेवण्याजोगे नसते. अर्थनीती सांगताना रावण म्हणतो, लंकेचा राजा रावण राक्षस होता; अधर्म, अन्याय आणि अनीतीचा साक्षात अवतार होता; त्याउलट राम, दशरथ, वसिष्ठ, विश्वामित्र हे सगळे अयोध्येचे होते, तरी तुम्ही अयोध्येला लंकेप्रमाणे सुवर्णाने जाऊ दे, पण एखाद्या सामान्य धातूनेही मढवू शकला नाहीत. कारण लक्ष्मी अतिशय चंचल असते. ती कुठे केव्हा वास करेल आणि तेथून केव्हा निघून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. आपल्या बुद्धिकौशल्यामुळे आणि अविश्रांत परिश्रमांमुळेच लक्ष्मीची प्राप्ती झाली असे जे मानतात, ते निव्वळ बुद्धिहीन, गर्विष्ठ असतात. हîा उलट आपल्या दुर्भाग्यामुळे लक्ष्मी प्राप्त झाली नाही, असे म्हणणारे आपली निष्फलता झाकण्याचा दुबळा प्रयत्न करीत असतात.

धर्मनीती कथन करताना रावण लक्ष्मणाला सांगतो, निर्भेळ असा धर्म कधीच नसतो. समर्थ व्यक्ती स्वतःचा प्रत्येक हेतू न्याय्य ठरवण्यासाठी आणि आपल्या उद्दिष्टाला न्यायाचे अधिष्ठान मिळवण्यासाठी वेदवेदांगासहित सर्व शास्त्रांतून स्वतःला अनुकूल मंत्र आणि अर्थ शोधून काढते. वृक्षाआडून वालीचा वध करणाऱ्या रामाला वालीनेच म्हटले होते,

‘‘रामा, हा धर्म नव्हे!’’ त्यावेळी रामाने उत्तर दिले होते,

 ‘‘मृगया हा रामाचा धर्मच आहे!’’ वनवासाला निघालेल्या रामाला अनुसरणे, हा जर सीतेचा धर्म असेल, तर पतीपासून म्हणजे तुझ्यापासून दूर राहून वृद्ध सासू-सासऱ्याची सेवा करणे हा तुझ्या पत्नीचा, उर्मिलेचा धर्म कसा म्हणता येईल?”

 या संवादातून गुरू विश्वामित्रांकडून धर्माचे पाठ घेणाऱ्या लक्ष्मणाला धर्माचा एक नवाच अर्थ जाणवतो. अखेरची मनुष्यनीती सांगताना रावण म्हणतो, ‘‘या विश्वातील सर्व सजीव प्राण्यांच्या वर्तनाचे निश्चित असे प्राकृतिक नियम आहेत. मनुष्य हा असा प्राणी आहे की, ज्याच्या वर्तनाबद्दल निश्चित असे विशिष्ट नियम सांगता येत नाहीत. एक व्यक्ती एकाच माणसाशी एकदा जशी व्यवहार करते, ती दुसऱ्या वेळीही तसाच व्यवहार करेल, असे मानणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे.’’

या कादंबरीतील राम-रावणाच्या भूमिका बदलून टाकणाऱ्या प्राचीन संघर्षामागे केवळ तर्क आणि कवीकल्पना नाहीत. त्याला शोषित आणि उपेक्षितांच्या मोठ्या जनचळवळींचा आणि त्यासाठी यापूर्वीही अनेक  अभ्यासकांनी केलेल्या संशोधनाचा आधार आहे. या संशोधनानुसार रावण वर्णव्यवस्थेचा बळी आहे. पण तो उपेक्षा आणि तिरस्कारावर मात करून त्र्यैलोक्याने हेवा करावा अशी ऐश्वर्यशाली लंका निर्माण करतो. दक्षिणेकडील या समृद्ध परिसरावर उत्तरेकडून चाल करून येणाऱ्या आर्यांची नजर असते. शूर्पणखेचा अपमान हे एक निमित्त घडते. आणि राम रावण युद्ध पेटते. शूर्पणखेची अत्यंत नैसर्गिक भावना, रावणाचे नैतिक सामर्थ्य, वालीहत्येनंतर तारामतीचे सुग्रीवासोबत आणि रावणहत्येनंतर मंदोदरीला बिभीषणासह जीवन कंठण्याची केलेली आज्ञा, आणि सीतेची अग्निपरीक्षा या सगळ्या घटनांकडे जर वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहिले तर या कादंबरीला ‘लंकेचा राम आणि अयोध्येचा रावण’ हे शीर्षक किती सार्थ आहे ते पटते. एकप्रकारे प्रस्थापित संहितेचे हे ‘विपरीत वाचन’ आहे. पण त्यामागे एक तात्त्विक आणि सांस्कृतिक भूमिका आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

   वस्तुतः‘रामायण’ ही एक पुराणकथाच आहे. वाल्मिकीपासून तुलसीदासापर्यंतची काव्ये प्रसिद्ध असली तरी वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या भाषेत तीनेकशे रामकथा प्रचलित आहेत. तरीही दिनकर जोषी यांनी रेखाटलेला रावण हा अभूतपूर्व आहे. अर्थात रावणाच्या राक्षसत्वाच्या संकल्पनेविषयीची चिकित्सा भारतीय प्राच्यविद्या संशोधकांनी फार पूर्वीपासून केली आहे. मात्र वाल्मिकी-तुलसीच्या परंपरागत रामकथेच्या प्रभावामुळे त्या संशोधनाला समाजमान्यता कधीच मिळाली नाही. ‘अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम’ अशा कादंबरीतून मात्र त्याच संशोधनातील तथ्ये वाचकांपुढे येऊन नवे पुरोगामी सांस्कृतिक भान जागृत करते.

मराठीत अशा प्रकारच्या व्यवस्था-विद्रोहाची जाणीव शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीपासूनझाली. त्यानंतर विद्रोही कर्णावर अनेक कादंबऱ्या-नाटके आली. १९६० नंतर हिंदी चित्रपटात असाच विद्रोही ‘ अंग्री यंग मॅन’ आला. त्यानंतर ‘एकलव्या’सारख्या बंडखोर व्यक्तिरेखांना मराठी साहित्यात निर्माण झाल्या नागपूरच्या नाना ढाकुलकर यांची रावणावरील ‘रक्षेंद्र’ आणि ‘श्यामिनी’ ही तारा वनारसे यांची शूर्पणखेवरील कादंबरी वस्तुनिष्ठ संशोधनातून प्रचलित रामायणाची उलटतपासणी करणारी आहे.

१९४९ मध्ये प्रसिद्ध संशोधक डॉ. वि. भि. कोलते यांनी एक खळबळजनक निबंध लिहिला होता. ‘महात्मा रावण!’ डॉ. कोलते यांच्या मते राम-रावण संघर्ष म्हणजे आर्य आणि दंडकारण्यातील आदिम जमाती  (तथाकथित राक्षस) यांच्यातील संघर्ष होय. दंडकारण्यावर त्यावेळी वस्तुतः रावणाचेच राज्य होते. हा भाग अनार्यांच्या मालकीचा होता आर्य व राक्षस या जमातीतील संघर्षाचे मूळ असे की, आर्यांना दक्षिणेकडील दाट अरण्यात राक्षसांच्या प्रदेशात जाऊन, त्यांच्यावर प्रभुत्व गाजवावयाचे होते. आर्य व राक्षस या जमातींचे जे वारंवार संघर्ष होत, त्यांचे स्थान म्हणजे दंडकारण्याचा परिसर होता. तत्कालीन आर्यावर्ताच्या राजकीय रंगभूमीवर रामाचे पदार्पण झाले आणि या आर्य-राक्षस संघर्षाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले. तथाकथित ‘नरभक्षक राक्षसांच्या’ जाचाला भ्यालेल्या दंडकारण्यातील ऋषि समाजाला रामाच्या येण्याने आनंद झाला. लक्ष्मणाने शूर्पणखेला दिलेली क्रूर शिक्षा आणि कठोर वागणूक आणि त्याचा परिणाम म्हणून रावणाने केलेले सीतेचे अपहरण या घटना म्हणजे आर्य व राक्षस या जमातीतील संघर्षाचा कळस होय. आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी म्हणून रामाने लंकेवर केलेली चढाई व रावणाशी झालेले भीषण युद्ध या घटना त्या संघर्षाचा उत्तरभाग होत. ( संदर्भ: डॉ. सिंधू डांगे, ‘भारतीय साहित्याचा इतिहास, भाग-1’ महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ, नागपूर, १९७५)

‘राक्षण कोण होते?’ या प्रश्नाचा शोध घेताना प्राच्यविद्या संशोधक असा सिद्धांत मांडतात की, भारतीय संस्कृती ही आर्यांची देणगी आहे, हा अपसमज आहे. हा देश ऋग्वेदकाळापूर्वीच समृद्ध होता. याचा पुरावा म्हणजे हरप्पा संस्कृतीचे सापडलेले अवशेष. हरप्पा संस्कृती निर्माण करणारे आर्यच होते, हे खरे नाही. कारण  तेथे सापडलेल्या नाण्यांपैकी एकावरही इंद्र किंवा अग्नि-वरुणाचे ठसे नाहीत. मात्र, द्रविड लोकांचा देवस्थानी असलेला शिव हा पशुपतिनाथाच्या रूपाने दिसतो.

याचा अर्थ, हरप्पा संस्कृती ही आर्येतरच होती. आजही भारताच्या अनेक भागात रावणाचे दहन केले जात नाही, उलट रावणाची मंदिरे असून त्याची पूजा केली जाते. आर्यांना भारतात पाय रोवण्यासाठी किरात व द्रविड यांच्यापेक्षा निषादांबरोबर लढावे लागले. (निषाद म्हणजे आजचे छोटा नागपूर, बस्तर, ओरिसा, आंध्रात राहणारे मुंडा, गोंड, संताळ, कोरवा वगैरे) ज्यांना वंशच्छेद करून त्यांचा प्रांत गिळंकृत करायचा आहे, त्यांच्या वंशाबद्दल समाजमनात निरस्कार उत्पन्न करण्यासाठी आर्यांनी नीच मानव म्हणून अनार्यांची भरपूर निंदा केली, ज्याचे प्रतिबिंब आज पुराणातील कथा-कहाण्यात दिसते. या निंदेतूनच नरभक्षण करणारे काल्पनिक राक्षस जन्माला आले. त्यातून दहा तोंडाचा भयानक रावण उभा केला गेला. आर्यांच्या आक्रमणामुळे पराभूत आदिम जमातींना पर्वतराजीत, अरण्यात आश्रय घ्यावा लागला. त्यामुळे त्यांना आपल्या प्रगत विद्यांचाही विसर पडत गेला. ( संदर्भ: नार्ला वेंकटेश्वर राव ‘सीता जोस्यम’ (सीतेचे भाकीत) मराठी अनुवाद: नलिनी साधले, मराठी साहित्य परिषद, हैदराबाद, १९९०)

रामायणातील राक्षस हे खोंड जमातीच्या जवळच्या जमातीतील असावेत असेही संशोधकांना वाटते. मध्यप्रदेश आणि दक्षिणेत आजही काही आदिवासी जमातींकडून रावणाचे पूजन केले जाते. गोंड लोक रावणाचे भक्तिपूर्वक स्मरण करतात. तो त्यांचा प्राचीन राजा म्हणून आजही त्याच्या पराक्रमाचे गोडवे गातात. गोंड लोक कोणत्याही महत्त्वाच्या स्थानाचा उल्लेख ‘लक्का’ असा करतात. याचेच रूपांतर ‘लंका’ असे रामायणात झाले आहे. आदिवासींना पौराणिक साहित्यात राक्षसी रूप मिळाले, तर इंग्रजी राजवटीत ते गुन्हेगार ठरले. या आदिवासींनी आपल्या धनुष्यबाणांनी एक शतकभर इंग्रजांशी लढा दिला, परिणामी इंग्रजांनी १८७१ साली त्यांना ‘गुन्हेगार जमात’ म्हणून घोषित केले. याचा अर्थ दक्षिणेकडील अनार्य म्हणजे मूलनिवासी आदिमांना त्यांच्या मायभूमीवरून हुसकावून लावण्यासाठी आर्यांनी त्यांचा संहार केला. लक्ष्मणाने शूर्पणखेला दिलेली क्रूर शिक्षा आणि परिणामी रावणाने केलेले सीतेचे अपहरण ही त्या संहाराची केवळ तात्कालिक कारणे होत.

या प्राचीन इतिहासाची पुनरावृत्ती झाली ती ब्रिटिश राजवटीत. इंग्रजांनी नैसर्गिक संपत्तीचे दोहण करण्यासाठी जंगलातील आदिवासींना जल-जंगल-जमिनी पासून वंचित केले. आज पुनःश्च भारत जागतिक महासत्तेचे स्वप्न पाहत आहे. भारतातील ‘नांगरल्याविण भुई’ जेथे जेथे सापडेल तेथे तेथे विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्यात येत आहे. हे ‘सेझ’ कशासाठी आहे? तर अत्याधुनिक-बलवान महाभारतासाठी! पण या महत्त्वाकांक्षेच्या आड स्थानिक आदिवासी आड येत आहेत. त्यांच्या विस्थापनाच्या प्रश्नावरून सिंगुर-नंदिग्राम सारखी हत्याकांडं घडत आहेत. थोडक्यात रामायणातील सत्ता संघर्षाची व आदिवासींच्या विस्थापनाची ही तिसरी आवृत्ती आहे, आणि व्यापक अर्थाने ‘अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम’ कादंबरीच्या केंद्रस्थानी हेच आशयसूत्र  आहे.

-(लेखक नामवंत समीक्षक आहेत)

7709012078

[email protected]

Previous articleआद्य शिवचरित्रकार : महात्मा जोतीराव फुले
Next articleकोरोना संकटात मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.