अरे, ते मोदी कुठे आणि तुम्ही कुठे!

 

– संजय आवटे

———————————————

सत्तरीतले मोदी, रशियातील इकॉनॉमिक फोरमची मीटिंग गाजवून शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीत आले.
***
दिल्लीत दिवसभर महत्त्वाच्या बैठका घेत राहिले.
***
शुक्रवारी रात्रीच ते बंगळुरूमध्ये दाखल झाले.
‘चांद्रयान-२’ च्या यशोगाथेचे साक्षीदार होण्यासाठी पहाटेपर्यंत शास्त्रज्ञांसोबत थांबले.
हे मिशन अपयशी होणार, हे काही त्यांना माहीत नव्हते. पण, अपयशी झाले, तेव्हा त्याच उत्स्फूर्तपणे त्यांनी वैज्ञानिकांना धीर दिला. देशाला धीर दिला.
अप्रतिम मोटिव्हेशनल भाषण केले.
***
शनिवारी पहाटेपर्यंत मिशनच्या ताणासह जागे असलेले मोदी सकाळी मुंबईत होते. तिथे गणरायांचे दर्शन घेत, तडाखेबंद भाषण ठोकत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रचाराचा नारळ फोडला आणि शिवसेनेला जाहीरपणे ‘धाकटा भाऊ’ करून टाकले.
***
दुपारी मोदी औरंगाबादेत होते. तिथे त्यांनी हजारो महिलांची मने जिंकणारे भाषण दिले. हवामानाचा अंदाज पावसाचा होता, नाहीतर नागपुरात त्यांचा असाच चमकदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला असता!
***
कुठल्या तरी प्रसंगी ते थकलेले, वाकलेले जाणवले?
***
मोदींच्या विरोधातील तुमचे सगळे मुद्दे खरे असतीलही, पण फेसबुकवर मोदींच्या नावाने दर दोन मिनिटांनी पोस्टी टाकून, Yes, we can, नामंजूर, आम्ही लिबरल्स, फ्रेंड्स ऑफ डेमोक्रॅसी, दक्षिणायन, वी द चेंज असल्या व्हाट्सॲप ग्रुप्सवर लिंक (वा पिंक) टाकून काही होणार नाही. हे पूरक गृहउद्योग ठरू शकतीलही, पण आधी मुळातून काही उभे करावे लागेल!
(विरोधी पक्षांबद्दल तर मी बोलणारही नाही.अशा लोकांना इतके दिवस आपण सत्ता कशी दिली, हाच प्रश्न पडावा, असे थोर नमुने आहेत एकेक!)
***
मोदींची एनर्जी बघा.
त्यांचे भीषण हेतू, ध्येय, इरादे, रस्ते याविषयी मी वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यासाठीच तर विरोध आहे.
पण, या एनर्जीचं काय करणार?
तुम्ही भले ‘सैतानी’ म्हणा, म्हणजे ती त्या अर्थाने ‘सैतानी’च आहे, पण या ‘असाधारण’ एनर्जीचं काय करायचं?

पुणे – मुंबई प्रवासाच्या ताणानं आजारी पडणा-या तरुणांना, सिग्रेटी फुंकत वा तंबाखू मळत मोदींना ठोकणा-यांना, दुपारी बारा वाजता उठून चहा ढोसणा-यांना, निवृत्तीचा काळ मजेत जावा म्हणून अथवा सिरियल्सशिवाय किंवा महिला मंडळांशिवाय आणखी टाइमपास हवा म्हणून, लोकलमध्ये वेळ घालवण्यासाठी ‘मोदी- मोदी’ खेळणा-यांना मोदींना विरोध करता येणार नाही.
अरे, शास्त्रज्ञांसमोर मोदींनी आज जे भाषण केले ना, तसे २३ मेनंतर करू शकणारा कोणी माय का लाल आहे का तुमच्याकडे?
***
मरगळ आणि फ्रस्ट्रेशनमधून येत असणारे ‘सोशल झटके’ म्हणजे तुमची ‘भूमिका’ आहे का?

अरे, इथंच तर एक उघडा म्हातारा अवघ्या ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उभा ठाकला होता. काहीही वाह्यात बडबड न करता!
मुद्दा आहे, तुमच्या पॅशन नि कमिटमेंटचा.
आदरवाइज, या ज्या टपल्या आणि टिवल्या-बावल्या सुरू आहेत, तो तुमचा फावल्या वेळेतला चाळा आहे. (या ‘तुमचा’मध्ये मीही आहे!)
बेसिक ऊर्जा आणि झपाटलेपण, कृतिकार्यक्रम नसेल तर या चाळ्याने काही होणार नाही. स्वातंत्र्ययुद्धाहूनही अधिक परीक्षा पाहाणारी अशी ही लढाई आहे!

(-लेखक दैनिक दिव्य मराठीचे संपादक आहेत )

98812 56009

 

Previous articleगणेशोत्सव : कांही ( अधार्मिक ) नोंदी 
Next articleजेव्हा महाराष्ट्र महाराजांचाच पराभव करतो
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

3 COMMENTS

  1. माफ करा, पण फारसं काही पटलं नाही.
    उलट पाताळयंत्री लोक नेहमीच सतर्क असतात. त्यांना तसे असावेच लागते. कुणावरही त्यांचा विश्वास नसतो. सदैव संशयाच्या नजरेतून जगाकडे बघत असतात. कुठल्याही क्षणी आपला घात होऊ शकतो, अशी भीती त्यांना सतत भेडसावत असते. प्रसद्धीचा हव्यास हा अशाच प्रकारच्या असुरक्षित भावनेतून जन्मास येतो. ते कुठल्याही मंत्र्याला काहीही बोलू देत नाहीत, ह्यामागील भूमिका तीच आहे. सदैव असुरक्षित असल्याची भावना ही मोदींची मानसिक बिमारी आहे. ती नैसर्गिक आहे. हुकुमशहा मनाने नेहमीच असुरक्षित आणि भित्रे असतात. त्यामुळे प्रत्येक क्षण आपल्या आणि फक्त आपल्याच मुठीत असावा, अशी केविलवाणी धडपड त्यांची जिवाच्या आकांताने सुरू असते.
    हा त्यातलाच प्रकार आहे. एकदा जर ही सत्ता गेली किंवा जराशी पकड जरी ढीली झाली, तरी आपले काही खरे नाही, किती हाल होणार आहेत, याची जाण मोदी – शहा यांना आहे. त्यामुळे प्रत्येक काम ते जिवाच्या आकांतानेच करणार..! त्याशिवाय दुसरे ते काय करू शकतात ?

    मात्र..
    विरोधकांनी निव्वळ पोपटपंची आणि भंकसबाजी सोडून मैदानात उतरणे गरजेचे आहे, या मताशी सहमत आहे.
    राजकीय परिपक्वता, दूरदर्शी पणाचा अभाव, चळवळीच्या नावावर चाललेले बाळबोध उपक्रम, अव्यवहार्य अपेक्षा आणि चमडी बचाव प्रवृत्ती यामुळे मोदी आणि कंपनीचे फावते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. नव्या पर्यायाचा विचार करण्याची हिंमतही जे विचारवंत दाखवू शकत नाहीत, ते कसली क्रांती करणार ?

    अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याकडेच आशाळभूत होऊन बघणारे विचारवंत किती तकलादू भूमिका घेवून जगतात, याची.मोठी गम्मत वाटते. असो.
    चूक भूल देणे घेणे !

  2. अत्यंत मार्मिक…. वास्तव परिस्थिती.
    मनःपूर्वक धन्यवाद आवटे सर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here