अर्ध आकाश मिळवलेल्या राजपूत स्त्रिया

-नम्रता भिंगार्डे

‘राजपूत समाजाचं गाव आहे. इथल्या बायका कायम डोक्यावर पदर घेऊन असतात. गेल्या वर्षी वॉटर कपसाठी या गावातून फक्त पुरूषच ट्रेनिंग घ्यायला आले होते. यंदा मात्र गावातून ६ महिलांचा ग्रुप ट्रेनिंग घ्यायला आला.’ नंदूरबारमधल्या बलदाने गावाशी माझी झालेली ही पहिली तोंडओळख.

राजपूत समाज, राजपूत स्त्रियांवरची बंधनं, पदरात राहण्याची सक्ती, कमी
वयात प्रसंगी शिक्षण थांबून लागणारी लग्न वगैरे अनेक गृहीतकं मनात घेऊन
मी बलदानेमध्ये पोहोचले. गावाच्या मधोमध असलेल्या घराच्या दारातून वाकून आत गेले आणि स्वयंपाकघरातून डोक्यावर पदर घेतलेल्या आशादेवी राजपूत “अर आम्ही कधीची वाट बघत होतो” म्हणत सामोऱ्या आल्या. पुढच्या काही मिनिटांतच आशादेवींचं मोकळं ढाकळं हसणं आणि गावांमध्ये क्वचितच ऐकू येणाऱ्या मोठ्या आवाजाचं बोलणं यांमुळे माझ्या मनातली राजपूत समाजाविषयी आणि खासकरून राजपूत स्त्रियांविषयीची गृहीतकं धडाधड कोसळायला लागली.

“माझं लग्न ठरलं तेव्हा मी बारावीत होते तर कोमलसिंग इंदोरमध्ये M.Sc.
करत होते. लग्न होऊन मी ७० जणांच्या एकत्र कुटूंबात आले. पदरात राहणं,
कुटूंबाचं करणं हे सगळं तर ओघाने आलंच. लग्न ठरल्यानंतर माझ्या वडिलांनी मला कधी शिक म्हणून आग्रह केला नाही पण कोमलसिंग यांनी मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. घरात अभ्यास करायचा आणि परिक्षा आली की चुलत सासरे मला त्यांच्याकडे घेऊन जायचे. असं करत मी शिकत गेले.” घराच्या दारात टाकलेल्या बाजेवर बसलेल्या आशादेवी डोक्यावरचा पदर सावरत धबधब्यासारख्या बोलत होत्या.

एम. ए. बीएड झालेल्या आशादेवी आणि जिओलॉजीमध्ये M.SC.केलेले कोमलसिंग राजपूत हे दोघेही बलदाने गावात शेती करतात. तशी त्यांची केवळ अडीच एकर जमीन आहे मात्र त्या दोघांनी अनेक शेतीपुरक प्रयोगांची जोड देत उत्पन्नाचे विविध स्त्रोत जोखाळले आहेत. आशादेवी गावात बचत गट चालवतात. गावातल्या सर्व स्त्रियांचा सहभाग घेऊन त्या त्यांना एकेक गोष्ट शिकवतात. गावात नवीन लग्न होऊन आलेली बहू असो की सासूच्या वयाच्या बायका सगळ्यांसाठी आशादेवी आदर्श आहेत. टप्प्याटप्प्यानं आशादेवींनी हे स्थान मिळवलंय. गावात महिलांचा बचतगट स्थापन करायचा होता तेव्हाचा अनुभव आशादेवी सांगत होत्या.

“२०१३ ला बचतगट स्थापन केला तेव्हा गावात चर्चा झाली. असे बरेच बचत गट आले आणि गेले, या काय करणार वगैरे. पहिल्या वर्षी आम्ही बचतगटाने ICICI बॅंकेतून ६०,००० रुपयाचं कर्ज घेतलं.त्यातून कोणी शेळी घेतली तर कोणी कोंबड्या… त्यातून उत्पन्न वाढलं. शिलकीतले पैसे गोळा करत कर्जही वेळेत फिटलं. आमच्या महिलांमध्ये आत्मविश्वास आला की स्त्री असलो, कमी शिकलेलं असलो तरी आपण कर्ज घेऊ शकतो आणि ते फेडूही शकतो.” आशादेवींच्या सोबत बसलेल्या इतर मुली मन लावून ऐकत होत्या.

“नंतरचं कर्ज आम्ही १ लाख रुपयांचं घेतलं. प्रत्येक महिलेला १०,००० रुपये
आले. जून जुलैचा सिझन होता. आम्हाला युरिया खताची कमी जाणवत होती. मग आम्ही विचार केला की ‘बांधावर खत’ या योजनेअंतर्गत आपण जर या पैशाचं खत मागवलं तर? निर्णय झाला. ज्या दिवशी महिलांनी मागवलेला खतांचा ट्रक या गावात आला आणि गावातल्या शेतकऱ्यांना बाहेर ३५० रुपयांनी मिळणारी खताची एक बॅग आम्ही नफा कमवून ३३० रुपयांना विकली. तेव्हा गावातल्या पुरूषांना बचतगट आणि आम्हा महिलांच्या क्षमता मान्यच कराव्या लागल्या. मग काय महिलांना एक वेगळंच वारं भरलं….आत्मविश्वासाचं!”

तेव्हापासून बलदानेच्या बचतगटाच्या सदस्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
आशादेवींच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना, ट्रेनिंग्स, वर्कशॉप, कृषि
प्रदर्शन असं सगळीकडे येणं जाणं सुरू झालं. आशादेवींच्या या धडाडीत, त्या घेत असलेल्या प्रत्येक निर्णयात एक हसरा शांत चेहरा कायम सावलीसारखा सोबत राहिला…. पती कोमलसिंग राजपूत.

“आम्ही दोघांनी जळगावला राहून नोकरी शोधण्याचा खुप प्रयत्न केला. पण
म्हणावी तशी नोकरी मिळाली नाही. २००८ मध्ये आम्ही पुन्हा गावी आलो. शेती हा एकमेव पर्याय होता आमच्यापुढे. पण आता असं वाटतंय की त्यावेळी आम्हाला नोकरी मिळाली नाही हे खुप बरं झालं कारण नोकरी करत असतो तर एकच एक करत बसलो असतो. आता शेतीमुळे आम्ही सतत प्रयोग करत राहतो. फायदे, तोटे, आनंद, टेन्शन, कुटूंबाचा सहवास, काटकरीचं जगणं असं परिपूर्ण आयुष्य आहे आमचं!”
कोमलसिंग त्यांच्या या सुखी आयुष्याचं सगळं श्रेय त्यांच्या बायकोला
देतात.

“पुरूषांकडून आजवर अनेक चुका झाल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे स्त्रीला त्यातल्या त्या बायकोला कोणत्याही निर्णयांचे सल्ले
विचारणं तर सोडाच पण त्यांना गृहीत धरून निर्णय घेत राहिले. शेतीविषयक फायदे तोटे बायकोसोबत शेअर करत राहिलो तर मानसिक ताण कमी येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आशादेवीच्या योग्य निर्णयांमुळे आम्हाला अनेकदा फायदा झाला आहे. एक उदाहरण सांगतो. तुम्हाला माहितीच आहे दरवर्षी पाऊस कमी कमी होत चालला आहे. मागच्या वर्षी हीने शेळीपालन करण्याचा हट्ट धरला.
सुरूवातीला पुरूषी खाक्यात मला आवडत नाही म्हणून मी थेट नकार दिला. मग तिने तिच्या पद्धतीने मला समजावलं आणि एका शेळीपासून आम्ही सुरूवात केली आज ५६ शेळ्या झाल्या आहेत. यंदा पाणी नाही त्यामुळे शेतीत काम नाही पण आम्ही रिकामं बसलेलो नाही. पाणीटंचाई, बी-बियाणांमध्ये फसगत अशा सगळ्या कारणांमुळे शेतकरी म्हणून जगणं कठीण झालंय. अशा परिस्थितीत या शेळ्यांनीच आम्हाला उत्पान्नाचा आधार दिला. मी कधीच करू शकलो नसतो तिच्यामुळेच हे शक्य झालं.” कोमलसिंग यांच्या बोलण्यात आशादेवींबद्दलचा आदर स्पष्ट होता.

तेव्हापासून आजतागायत या दोघांनी एक पायंडा पाडला आहे. कोणी कोणत्याही ट्रेनिंगला गेलं की त्याने येऊन घरातल्या सगळ्यांना त्याविषयी इत्थंभूत माहिती द्यायची. या दोघांमध्ये सतत होणारा संवाद आणि एकमेकांविषयी असलेला विश्वास हा त्यांच्यातल्या नात्याइतकाच घट्ट आहे.

गेल्या काही वर्षांपासून आशादेवींनी महिला बचतगटाच्या सदस्यांना घेऊन कधी जैविक शेतीच्या ट्रेनिंगला तर कधी कृषी केंद्राच्या कार्यक्रमांना हजेरी
लावत आहेत. बलदाने गावातल्या पदरात राहणाऱ्या स्त्रिया आशादेवींमुळे
गावाची वेस ओलांडून तीन चार दिवस दुसऱ्या गावात जाऊन शेतीविषयी अधिक काहीतरी शिकत आहेत. शाळेतलं शिक्षण संपल्यानंतर लगेच लग्नाच्या बंधनात अडकलेल्या या सर्व तरुण मुली यानिमित्ताने पुन्हा एकदा शिक्षणाच्या वाटेवर गेल्या आहेत. आशादेवींच्या भाषेत सांगायचं तर, “सातबाऱ्यावर आमची नावं नाही पण ती शेती आमची आहे ही भावना तर आहे त्यामुळे मी माझ्या शेतीसाठी काहीतरी वेगळं शिकतेय. काहीतरी वेगळं करू शकतेय. ही जाणीव त्यांच्यात यावी यासाठी ट्रेनिंग्सना महिलांनी जाणं फार गरजेचं आहे.”

पानी फाउंडेशनचं पाणलोट विकासाच्या ट्रेनिंगबाबत जेव्हा नंदूरबारचे
तालुका समन्वयक गावात गेले तेव्हा आशादेवींनी त्यात पुढाकार घेतला.
गेल्या वर्षी गावातल्या पुरूषांनी ट्रेनिंग घेतलं पण यावर्षी आम्ही
महिलाच जाणार हा निर्धार करूनच आशादेवींसह ६ जणी प्रशिक्षण घ्यायला
आल्या. “अहो ताई एकजण आलेला प्रशिक्षणाला तो म्हणला मी माझ्या बायकोला शिकवलं तर ती पळून जाईल. त्यांचं ऐकून मला आश्चर्यच वाटलं. असा कसा विचार करतात हे लोकं?” सगळ्यांच्या मध्ये बसलेली गोड चेहऱ्याची शितल पाटील बोलली. सासऱ्याच्या मृत्युनंतर खऱ्या अर्थाने शितल बचत गटांमध्ये सहभागी होऊ शकली. तेव्हापासून मिटींग्स, ट्रेनिंग्स असं काहीही तिने चुकवलेलं नाही. ट्रेनिंग्सविषयी ती भरभरून बोलते. “ट्रेनिंगच्या निमित्ताने गावाबाहेर चार दिवस राहतो. घर, मुलं, स्वयंपाक यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करतो. काहीतरी नवं शिकतो. इतर गावांतल्या बायकांना भेटतो, त्यांच्याविषयी जाणून घेतो, मला स्वतःसाठी वेळ मिळतो. त्यामुळे
ट्रेनिंगवरून परत येताना मला सासरी येत असल्यासारखं वाटतं.”

बलदाने गावातल्या या राजपूत स्त्रियांनी पदराची परंपरा सांभाळत स्वतःचं
अर्ध आकाश मिळवलंय. आशादेवी आणि कोमलसिंग यांच्यात असलेल्या
समजुतदारपणाचा, विश्वासाचा आणि संवादाचा परिणाम अप्रत्यक्षरित्या
त्यांच्या आसपास असलेल्या नव्या जोडप्यांवरही पडतोय. या सगळ्यांची भेट
घेतल्यानंतर बलदाने गावाची एक नवी ओळख मला झाली.

‘राजपूत समाजाचं गाव आहे. इथल्या बायका कायम डोक्यावर पदर घेऊन असतात. पण त्या रुढीत अडकलेल्या नाहीत. गावातल्या पुरूषांनाही या स्त्रिया करत असलेल्या विविध कामांचं अप्रूप आहे. चूल आणि मूल सांभाळून त्या स्वतःचा वेळही मिळवत आहेत. पंख पसरत आहेत. गेल्या वर्षी वॉटर कपसाठी या गावातून फक्त पुरूषच ट्रेनिंग घ्यायला आले होते.मात्र जलसंधारणाचा विषय आम्हालाही समजला पाहिजे म्हणून यंदा गावातून ६ महिला स्वतः हट्टाने ट्रेनिंग घ्यायला आल्या.’

(लेखिका ‘पानी फाउंडेशन’ ला सोशल मीडिया व्यवस्थापनाचे काम पाहतात)

9619672768

[email protected]

 

Previous articleयुरोपातील भेटीगाठी
Next articleराज ठाकरेंच्या छायेत…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.