असिफा, मी अन माझी लेक

प्रज्वला तट्टे

मी माझा प्रोफाइल फोटो ‘जस्टीस फॉर असिफा’ केल्याबरोब्बर तो मला कॉल करणार हे मला माहीतच होतं. टोमणा मारण्याची एकही संधी तो सोडत नाही. त्याने काही बोलण्याआधी मी त्याच्याच शब्दात म्हटलं, ‘मेणबत्ती सांप्रदायाची दिंडी आहे आज ६ वाजता संध्याकाळी. ये टाळ कुटायला!’
तो येणार नाही, माहीत होतं. कारण त्याच्या कंपूत त्याच्यावर शिक्का बसला असता. ‘त्यांच्या पोरींसाठी तुम्हाला हे करता येतं, आपल्या पोरींसाठी नाही काही करता येत!’ पिअर प्रेशर किती असतं पहा! ‘निर्भयाच्या वेळी पण मी निषेध मोर्चात गेलो होतो’, हे तथ्य मांडणं म्हणजे सुद्धा मन दुखावणारी मुजोरी मानली जाते हल्ली. शेवटी धंदा पाण्याचाही प्रश्न असतो ना! मेणबत्ती मोर्चात आला असता तर चार-दोन कॉट्रॅक्टस गेले असते हातचे, काहींनी त्याचा कॉन्टॅक्ट नंबरच डिलिट मारला असता. नाही आला.असो.

पण निषेध मोर्चात युवक मोठ्या प्रमाणात आलेले होते. ही मुलं अशा गुन्ह्यांना ‘जाऊ द्या, होतंच असतं’ म्हणणाऱ्यांपैकी नव्हती. आपला आणि आपल्या समाजाचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून करण्याची त्यांची कुवत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाची सध्या या तरुण तुर्कांमध्ये खूप चर्चा आहे. त्यापूर्वी युवाल हरारी या इस्रायली इतिहासकाराला युवा पिढीनं चांगलंच मनावर घेतलंय. हारारीच्या मांडणीला पूरक असं आता हे DNA परीक्षणाच्या आधारे हार्वर्ड, डेक्कन कॉलेज पुणे, बिर्ला-साहनी कॉलेज लखनौ येथील संशोधकांसहित ९२ प्रतिष्ठित संशोधकांनी केलेलं संशोधन प्रसिद्ध झालंय. अमुक अमुक बाहेरून आले, ते आक्रमक होते, त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार जबरदस्ती हिंसेच्या आधारे केला, म्हणून त्यांची पुण्यभू बाहेरची आहे, म्हणून त्यांची या देशावर निष्ठा असत नाही, म्हणून त्याना बाहेर काढा, त्यासाठी त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार केला तरी चालेल म्हणणार्यांची पंचाईत करणारं हे संशोधन आहे. आता सिद्ध हे झालंय की भारतातल्या सर्वांचेच पूर्वज बाहेरूनच आलेत. अन त्यामुळं त्या आधारे एकेकाला बाहेर काढायची होड लागली, तर इथं कुणी उरणारच नाही. कारण, ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी…’

म्हणजे मग गोष्ट थेट आजपासून नऊ हजार वर्षांपर्यंत मागे जाईल, जेव्हा इराण मधून सिंधू खोऱ्यात गहू-बार्लीची शेती कारणारे शेतकरी समुदाय कुटुंब काबिल्यासोबत शिरले. त्यापूर्वी भारतात शिकारी टोळ्या राहत होत्या ज्यांची नाळही जुळते ती थेट आफ्रिकेत उत्क्रांत झालेल्या मानवाशी! सिंधू खोऱ्यात इराणमधून अलेल्यांकडून कृषी तंत्राची माहिती इथल्या शिकारी टोळ्या घेऊ लागल्या. दोन्हींमध्ये पुढच्या पाचेक हजार वर्षांत जी घुसळण झाली त्यातून यथावकाश इंडस वॅली सीव्हीलयझेशन ज्याला सिंधू संस्कृती म्हटलं जातं, जी गंगेच्या खोऱ्यात पसरली ती आकाराला आली. कृषी संस्कृती रुजली. दोघांच्या मिलाफातून द्राविडी भाषा उदयाला आल्या. इराणी, बलुची आणि तामिळी भाषांत साम्य म्हणून आढळतं. मोहंजोडदो हराप्पा ही पाच हजार वर्षांपूर्वीची गावं सिंधू संस्कृती किती प्रगत होती त्याची साक्ष देतात. इराणच्या दुसऱ्या टोकाकडे असलेल्या अनतोलीयन भागातून कृषक युरोपातही गेले.

त्यानंतर पाच हजार वर्षांनी युरेशियाच्या ‘स्टेप’च्या कुरणांमधून हिंदकुश पर्वत पार करत आले आर्य पुरुष. आर्य घोड्यांवरून, घोडे जुंपलेल्या रथांवरून आले. हेच आर्य दुसऱ्या बाजूने युरोपात गेले. म्हणून यूरोपीय भाषा आणि उत्तर भारतातल्या संस्कृतजन्य भाषांमध्ये समानता आढळते. याच इंडो-यूरोपीय भाषांच्या आधारावर यापूर्वीही आर्य बाहेरून आल्याची मांडणी केली गेली होती. आर्य भारतातून बाहेर गेले ही मांडणी आता या DNA च्या आधारे केलेले संशोधन पूर्णतः खारीज करते.

ही स्थलांतरं हजारेक वर्षांपर्यंत चालली. आर्यांचं स्थलांतर घोड्यांवरून झाल्यामुळं वेगानं झालं. वेग, भाषा आणि घोडे हे आर्यांचं वैशिष्ट्य ठरलं. द्रविड दक्षिणेकडे ढकलले गेले. आर्यांची आणि उत्तर भारतात पसरलेल्या द्रवीडांचा संघर्ष- घुसळण होता होता वर्णाश्रम पद्धतही उदयाला आली. त्यामुळे वर्णपरत्वे आर्यांच्या DNA चं प्रमाण कमी अधिक आहे असं हे संशोधन सांगतं. उच्च वर्णीयांत आर्य अंश जास्त, तर निम्न समजल्या जाणाऱ्या वर्णीयांत कमी. आपल्या या पूर्वजांची विभागणी संशोधकांनी ANI (अँशिएन्ट नॉर्थ इंडियन्स) म्हणजे आर्य DNA असलेले आणि ASI( अँशिएन्ट साऊथ इंडियन्स) म्हणजे शिकारी टोळ्यांचे DNA असलेले अशी केली आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या भारतीयांमध्ये ANI आणि ASI चे अंश कमी-अधिक प्रमाणात आहेतच आहेत. यांच्यातली मिलाफ-घुसळण चार हजार वर्षेपूर्वी पासून तर दोन हजार वर्षे पूर्वी पर्यंत होत गेली. त्यानंतर जाती व्यवस्था दृढ झाल्यामुळं ती थांबली.

या संशोधनात भारतीय म्हणून समजून घेण्यासारखी आपल्या कामाची गोष्ट ही की
१) ‘आम्ही इथले मूळचे आणि ते बाहेरून आले’ या म्हणण्याला अर्थ नाही, कारण आपण सर्वच मागे-पुढे बाहेरूनच आलो आहोत.
२) ANI आणि ASI चे अंश आपल्या सर्वांमध्ये आहेतच, त्यामुळं रक्तशुद्धीच्या सिद्धांताची ऐशी तैशी केव्हाच झालेली आहे. पुढची पिढी शुद्ध ‘आपल्याच’ रक्ताची निपजावी म्हणून जात पाहून लग्न करण्याचा फायदा शून्य!
३) इथल्या सर्वच जातीयांनी वेगवेगळ्या कारणांसाठी तथाकथित ‘पुण्यभू’ बाहेर असलेले धर्म स्वीकारले. पण जातींची संरचना तशीच राहिली. त्यामुळं भारतातल्या सर्व धर्मीयांमध्ये आर्य-द्राविडी अंश आहेतच.
४) आर्य पुरुष बाहेरून आले. आर्य स्त्रिया नाही. म्हणून Y chromosome च्या आधारेच आर्य अंश ठरवता येतात. त्यामुळं काश्मीर असो वा तामिळनाडू, इथल्या सर्वांमधला X chromosome/ mitochondria एकच आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, आपण सर्व ‘एकाच आईची’ लेकरे आहोत! इथं ‘त्यांच्या पोरी’ आणि ‘आपल्या पोरी’ हा मुद्दाच गैरलागू आहे. असिफा, मी अन माझ्या लेकीचा mitochondria एकच आहे.

असिफा साठी आणि उन्नाव पीडितेसाठी न्याय मागणाऱ्यांना हे माहीत नसेलही की आपण आपल्याच लेकीसाठी न्याय मागत आहोत. पण त्यांच्या या एका प्रयत्नामुळे अशा भारताची उभारणी करणं शक्य आहे ज्यात जाती-धर्माच्या लढाया स्त्रीच्या शरीरावर खेळल्या जाणार नाहीत.
त्यासाठी तरी पिअर प्रेशर झुगारून रस्त्यावर ये, असं मी त्याला सांगत होते.

(लेखिका शेतकरी व महिला चळवळीतील कार्यकर्त्या आहेत )

७७६८८४००३३

Previous articleहरवलेल्या भावना..मी एक स्त्री.
Next articleजेनेरिक औषधांचे वास्तव आणि धोके..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.