नरसिंह राव काँग्रेसचे अध्यक्ष असताना साडेचार वर्षे अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीसपद भूषविणारे अहमद पटेल यांना सीताराम केसरी पक्षाचे नवे अध्यक्ष बनताच बढती मिळाली. इंदिरा गांधींच्या काळात पक्षाचा कोष समर्थपणे सांभाळणाऱ्या चाचा केसरींच्या मुरब्बी नजरेने अहमदभाईंची गुणवत्ता हेरली होती. स्वतः अध्यक्ष होताच त्यांनी पक्षाच्या खजिन्याची चावी अहमदभाईंकडे सोपविली. खुद्द केसरींना सोनिया गांधींसाठी मार्च १९९८ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. पण अहमदभाई सोनियांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या नव्या रचनेतही कोषाध्यक्षपदी कायम राहिले. जवळजवळ आठ वर्षे गांधी घराण्याचे छत्र नसतानाही अहमद पटेल नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांच्या काळात पक्षात आपले स्थान बळकट केले होते. सोनियांनी त्यांना कोषाध्यक्षपदी कायम ठेवल्यानंतर पक्षात त्यांचा दबदबा वाढू लागला होता. पण जुलै २००० मध्ये अहमद पटेल यांच्या कर्तृत्वाला अचानक दृष्ट लागली. त्यावेळी सोनिया गांधी यांचे स्वीय सहायक व्हिन्सेंट जॉर्ज सर्वशक्तीमान होते. पक्षनिधीच्या संदर्भात त्यांच्याशी झालेल्या वादाला गुजरातमध्ये माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसजनांनी अहमदभाईंविरुद्ध ‘जिहाद’ पुकारल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचे शस्त्र उगारले. सोनिया गांधींशी चर्चा न करताच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. प्रसिद्धी माध्यमांशीही त्याचवेळी ते प्रगटपणे शेवटचे बोलले असावे. पण झाले भलतेच. अहमदभाईंनी तावातावाने दिलेला कोषाध्यक्षपदाचा राजीनामा सोनियांनी तेवढय़ाच तत्परतेने स्वीकारला. त्यांना फेरविचाराची संधीही न देता. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर प्रथमच काँग्रेस पक्षात अहमदभाई पुन्हा विजनवासात गेले होते. माधवसिंह सोळंकी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून व्हिन्सेंट जॉर्ज यांनी अहमदभाईंची १०, जनपथची दारे बंद केली होती.