आज गीतों को बाजार में ले आया हूँ…!

(साभार: कर्तव्य साधना)

-लक्ष्मीकांत देशमुख

कहते हैं इसे पैसा बच्चों यह चीज़ बड़ी मामूली है
लेकिन इस पैसे के पीछे सब दुनिया रस्ता भूली है 
इन्सां की बनाई चीज़ है यह, लेकिन इन्सान पे भारी है 
हल्की सी झलक इस पैसे की, धर्म और ईमान पे भारी है 
यह झूठ को सच कर देता है, और सच का झूठ बनाता है 
भगवान नहीं पर हर घर में भगवान की पदवी पाता है’

आपली लोकप्रियता एन्कॅश करण्यासाठी एकेक गीतासाठी साहिरनं जेव्हा दहा हजार रुपये मानधन घ्यायला सुरुवात केली तेव्हा एकदा मित्रांच्या मैफलीत सिगरेटचा धूर काढत तो म्हणाला होता… ‘बर्नार्ड शॉ फक्र से कहते है कि, मैं अपने एक-एक लफ्ज़ की कीमत एक-एक पाउंड लेता हूँ। अगर मैं एक-एक गीत के दस हजार लेता हूँ तो सिगरेट की एकही कशमें गाना पूरा भी कर देता हूँ। इसका मतलब है, मेरे एकेक कश की कीमत दस हजार रुपये है।’

‘प्यासा’, ‘नया दौर’ आणि ‘साधना’ यांच्या यशानंतर साहिर एकेका गीतासाठी पाच हजार रुपये मानधन घ्यायला लागला होता… पण तो आपल्या गीतांचा दर्जा उच्च राहावा म्हणून मोजकेच सिनेमे… तेही कथानक आवडली तरच स्वीकारायचा. त्या काळातला हा प्रसंग आहे.

ज्याला उर्दू ओ की ठो समजत नव्हतं… असा एक मारवाडी शेठ… एका चित्रपटात साहिरनं गीतं लिहावीत यासाठी निर्माता म्हणून साहिरकडे प्रस्ताव घेऊन आला आणि म्हणाला, ‘हमारे फिल्म के लिए हम आपके गीत माँगता।’

त्याला टाळण्यासाठी साहिर म्हणाला, ‘सेठऽ जाने दो। तुम हमारे गीत की कीमत नही दे सकते।’

तो सेठ म्हणाला, ‘कितनी लोगे? एक हजार, दो हजार?’

‘मैंने कहा नाऽ मेरी कीमत देना आपके बस की बात नही।’

‘ऐसा…? कितना लोगे एक गीत का? दस हजार?’

‘हां… दस हजार। दोगे?’

सेठ इरेला पेटला होता. तो म्हणाला, ‘डन…’

…आणि त्या प्रसंगानं साहिरला अंदाज आला की, जो निवळ व्यापारी आहे आणि सिनेमा काढण्याला धंदा समजतो… त्यालाही चित्रपटाच्या यशासाठी माझी गीतं हवी आहेत, त्यासाठी मूहमाँगी कीमत तो देऊ शकतो म्हणजेच मी माझी लोकप्रियता आणि शायरी ‘एनकॅश’ करू शकतो आणि त्या दिवसापासून प्रत्येक गीतासाठी दहा हजार मानधन घ्यायला साहिरनं सुरुवात केली.

मित्रांच्या बैठकीत चारदोन पेग व्हिस्की पोटात गेली की साहिर हळुवार व्हायचा. मग उदास सुरात म्हणायचा…

‘अक्सर मुझे यह एहसास होता रहता है कि, मैंने शायरी को रोजी-रोटीसे जोडकर एक ऐसे बाजार में बिठा दिया है, जहाँ हर शख्स इसका जिस्म नोचता है, जिसे इसकी कोई परख नही है। बरसों पहले मैंने जो लिखा… वह आज मैं वैसाही मेरी शायरी का व्योपार कर रहा हूँ।’

‘मैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे
आज उन गीतों को बाजार में ले आया हूँ।’

१९५१ मध्ये ‘बाजी’ हीट झाला आणि साहिरची गरिबी संपली. जेव्हा त्याची अम्मी सरदार बेगम आपल्या ऐय्याश,  स्त्रीला पायातली वहाण समजणाऱ्या आणि पीडा देणाऱ्या नवऱ्यापासून अलग झाली तेव्हा साहिर नऊदहा वर्षांचा होता. तेव्हापासून सुमारे वीस वर्षं त्याचं आणि अम्मीचं जीवन गरिबीच्या आणि जगण्याच्या संघर्षात गेलं होतं. लाहोरला परीक्षा फी वेळेवर भरता आली नाही म्हणून त्याला बी.ए. होता आलं नव्हतं. मुंबईलापण आधी १९४६-४७ या काळातलं वर्ष-सव्वा वर्ष आणि पुन्हा १९४९ ते १९५१ अशी दोन वर्षं चित्रपटसृष्टीत काम मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.

आपली गीतं इतर गीतकारांना त्यांच्या नावानं सिनेमात वापरण्यासाठी शे-पाचशेला विकणं, प्रसंगी अम्मीचे दागिने मोडून घरखर्च चालवणं हा जगण्याचा संघर्ष किती जीवघेणा आणि त्रासदायक असतो हे सिनेसृष्टीत झगडणाऱ्यांनाच कळू शकेल. पुन्हा फिल्म निर्मात्यांनी मानहानी करणं आणि ताटकळत ठेवणंपण साहिरनं अनुभवलं होतं. ज्यांना तो मानायचा ते प्रतिभावंत कवी जोश मलाहाबादी आणि मजाज लखनवी या संघर्षाला आणि अवहेलनेला कंटाळून मुंबई सोडते झाले होते.

साहिरचा आत्मसन्मानाचा आणि अहंकाराचा पीळ या काळात किती जखमी झाला असेल! पण त्याचा स्वतःवर विश्वास होता… त्यामुळेच नाउमेद न होता तो संघर्ष करत राहिला. त्याला उपभोगासाठी पैशाची गरज नव्हती… तर जगण्यासाठी आणि भविष्यातल्या संकटकाळासाठी पैसा हवा होता… त्यामुळे यशस्वी झाल्यावर त्यानं मानधनाच्या बाबतीत कुणाशीही तडजोड केली नाही.

एकदा त्याला पी.एन. अरोरानं वेळ देऊनही, त्याची तत्कालीन माशुका हेलन आली म्हणून तिच्यासह दार बंद करून साहिरला मजाजसह बाहेर कितीतरी वेळ ताटकळत ठेवलं होतं. तसंच एका निर्मात्यानं त्याच्याकडून आगामी सिनेमासाठी एक गीत लिहून घेतलं होतं… पण त्याचं मानधन संगीतकाराला ते गीत पसंत पडल्यानंतर मिळणार होतं. त्या वेळी साहिरला पैशांची खूप तंगी होती… म्हणून तो वारंवार निर्मात्याकडे जात होता. प्रत्येक वेळी निर्माता म्हणायचा, ‘ओहऽ माफ कीजियेगा। आज संगीतकार नही आया। फैसला हो जाएगा।’ पण तो निर्णयाचा दिवस येतच नव्हता… तेव्हा वैतागून साहिरंन आपलं लिहिलेलं गीत फाडून टाकत म्हटलं, ‘क्या आप मेरा गीत युनो में फैसला करवाने के लिए भेज रहे हो?’

जगण्यासाठी पैसा हवाच हे साहिरच्या मनात पक्कं रुजलं गेलं होतं. जरी त्यानं ‘यह दौलत के भूके रिवाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…’ असं ‘प्यासा’मध्ये लिहिलं असलं तरी या मुंबईच्या मायानगरीत, जिथं फक्त पैशाला किंमत आहे आणि बाकी सारं झूठ आहे अशा वातावरणात राहण्यासाठी पैसा मिळवायला हवा हे त्यानं पक्कं ठरवलं होतं. गेली दोन तपं त्याची अम्मी त्याच्यासाठी, त्याला वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी करत होती. तिला आता सुखाचे दिवस आणि आरामाचं जगणं द्यायचं होतं… म्हणून त्याला यशस्वी व्हायचं होतं आणि मिळणारं यश जमेल तेवढं एनकॅश करायचं होतं.

‘फनकार’ नज्ममध्ये लिहिल्याप्रमाणे बाजारात गीत आणल्याची खंत असली तरी ती आता त्यानं मनाच्या आत खोलवर दाबून टाकली होती. त्याला यशस्वी व्हायचं जणू वेड लागलं होतं. ‘पैसा खुदा नही, पर खुदा कसम खुदा से कम तो नहीं’ अशी धारणा असणाऱ्या फिल्मी दुनियेत, कलेच्या नावानं धंदा करणाऱ्या मायानगरीत पैसा कमवून यशस्वी व्हायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं असं रोज तो संघर्षाच्या काळात स्वतःला बजवायचा.

ज्यानं त्याला काम न देता दोन वेळच्या जेवणाची ऑफर दिली होती त्या शाहीद लतीफच्या घरी साहिरला स्वतःची कार घेऊन जायचं होतं आणि शाहीदनं केलेल्या अपमानाला सणसणीत उत्तर द्यायचं होतं. तसंच निरर्थक गीतं उदाहरणार्थ ‘एक थी लैला, एक था मजनू, हो गयी फिर दोनों में यूं यूँ’ असं लिहिण्यात वावगं काही नाही असं समजावणाऱ्या डी. एन. मधोकला… त्याचं बँकेचं पासबुक हे अशा गीतांनी भक्कम आहे हे सांगण्यात अभिमान वाटायचा त्या मधोकला… दर्जेदार गीतं लिहूनही पासबुकमध्ये चांगली रक्कम येते हे आपलं भारी रकमेचं पासबुक दाखवून दाखवून द्यायचं होतं!

मुंबईच्या सिनेजगतात मित्र व नातेसंबंध कःपदार्थ असतात, खरं एकच असतं यश… आणि ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करा आणि यश-पैसा मिळाल्यावर संघर्षाच्या काळातल्या मित्रांना विसरून जा. न जाणो… उद्या संधी मिळताच तो आपला प्रतिस्पर्धी होऊन पुढे जाईल आणि आपल्याला मागे टाकेल या विचारानं प्रत्येक जण आपले जुने दिवस माणसांसह मागे टाकायचा. इंडस्ट्रीमधून बाहेर फेकण्याचा हा दस्तूरही साहिरनं जवळून पाहिला होता. त्याच्याबरोबर संघर्ष करणाऱ्या, पुढे यशस्वी गल्लाभरू चित्रपट काढणाऱ्या मोहनकुमार सहगलनं ब्रेक मिळून यशस्वी झाल्यावर संघर्षात सोबत असणाऱ्या गुणी संगीतकार सरदार मलिकला जराही मदत केली नाही. त्याला साहिरचा मित्र कृष्ण अदिबनं याबाबत टोकलं तेव्हा मोहन सहगलनं थंडपणे उत्तर दिलं, ‘यह फिल्मलाईन है भय्याऽ जहाँ हर आदमी दौड लगा रहा है। जो इस दौड में अपने गिरे हुए साथी को उठाने की कोशिश करेगा, वह खुद भी गिर जायेगा।’

…म्हणून साहिरला सिनेसृष्टीत यशस्वी व्हायचं होतं. चिक्कार पैसा मिळवायचा होता… पण तो त्याला स्वतःसाठी नको होता तर अम्मीला आणि मामे बहीण अन्वरला सुख-आराम देण्यासाठी नि मित्रमंडळींचं खाणंपिणं आणि त्यांना मदत करण्यासाठी हवा होता. साहिरनं तो मिळवला आणि मित्रमंडळींवर सहजतेनं उधळूनपण टाकला. कैफी आझमीनं साहिरवरच्या एका लेखात असं लिहिलं होतं की, साहिरनं खूप पैसा मिळवला… पण तो टॅक्सी, मित्रमंडळींच्या खाण्यापिण्याची आणि मद्याची सोय करण्यात खर्चण्यासाठी.

मुंबई ही खऱ्या अर्थानं मोहनगरी आहे आणि तिला फक्त पैशांची छनछन कळते हे सत्य साहिरनं मित्रांना सांगताना एकदा सिनीकपणे म्हणलं होतं…

‘बंबई में कोई किसी का नही है और बंबई में हर चीज बिकावू हैं, फिर वह काबिलियत ही क्यो न हो. यहाँ अपना सामान हो या फन, बेचने के लिए माहिर सेल्समन होना जरुरी है।

संघर्षकाळातल्या अवहेलनेमुळे साहिरच्या मानसिकतेत यशाची चव चाखायला मिळताच फरक पडला. त्याच्या स्वाभिमानाचं आता अहंकारात रूपांतर झालं होतं. आपलं हे बदललेलं रूप त्याला समजत होतं… पण पटत असलं तरी समजत नव्हतं. ‘माझ्या गीतांनी चित्रपट यशस्वी करण्याची क्षमता माझ्यात आहे.’ असं मानत त्यानं १९६० च्या दशकात संगीतकारापेक्षा जास्त मानधन, किमान वीस हजार रुपये जास्त मागायला सुरुवात केली असं चंदर वर्मा आणि डॉ. सलमान आबिद यांनी ‘मैं साहिर हूँ’ या उर्दू पुस्तकात नमूद केलं आहे. तसंच अनुपसिंग संधूंनी ‘लाईक अँड लव्ह्ज ऑफ साहिर लुधियानवी’ या पुस्तकात ‘मला संगीतकारांपेक्षा आणि गायकांपेक्षा एक रुपया जास्त मानधन हवं’ अशी अट साहिर घालायचा, असं सिनेजगतातील अनेकांशी चर्चा करून अंतःस्थ माहिती मिळवून लिहिलं आहे… पण हिंदी चित्रपटगीतावर अनेक पुस्तकं लिहिणारा इंग्लीश लेखक राजू भारतन यानं ही सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. साहिरला इतर गीतकारांपेक्षा थोडं अधिक मानधन मिळत असलं तरी संगीतकाराला त्यापेक्षा खूप अधिक मिळायचं… कारण संगीतामुळेच चित्रपट हीट होतात याला शंभर वर्षांचा इतिहास साक्षी आहे आणि आजही हे सत्य आहे की, संगीतकारांच्या तुलनेत गीतकारांना व गायकांना नेहमीच कमी मानधन मिळतं. त्यांचं स्थान संगीतकारांच्या तुलनेत दुय्यमच असतं!

…पण साहिरचं डोळ्यांत भरणारं यश आणि त्याला निर्मात्यांकडून मिळणारी मानाची वागणूक या पार्श्वभूमीवर साहिरच्या आर्थिक यशाकडे पाहिलं पाहिजे.

साहिरनं आपल्या स्थानाचा आणि यशाचा फायदा घेत सर्व फिल्मी गीतकारांसाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी घडवून आणल्या. त्याबद्दल साऱ्या गीतकारांनी साहिरप्रति कृतज्ञ राहिलं पाहिजे.

एक म्हणजे चित्रपटांच्या कॅसेटच्या (आता सीडीज्‌च्या) विक्रीतून आणि सॅटेलाईट प्रक्षेपणाच्या मानधनातून यापूर्वी फक्त संगीतकारांना रॉयल्टी मिळायची. मग लता मंगेशकरांच्या पुढाकारानं गायक-गायिकांनाही रॉयल्टी मिळणं सुरू झालं. कोणत्याही गीताच्या यशात गीतकाराचाही महत्त्वाचा वाटा असतो म्हणून त्यालाही चित्रपटाच्या संगीताच्या कॅसेट/सीडीविक्रीतून रॉयल्टी मिळालीच पाहिजे यासाठी ‘फिल्म रायटर्स असोसिएशन’च्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून त्यानं आग्रह धरला आणि तो अखेरीस संगीत कंपन्यांना मान्य करावा लागला.

साहिरनं दुसरं काम केलं… ते म्हणजे रेडिओ विविधभारती, रेडिओ सिलोन (आता रेडिओ श्रीलंका) या आणि अन्य संगीताच्या केंद्रांवर जेव्हा फिल्मी गीत वाजलं जातं तेव्हा संगीतकार आणि गायक यांच्यासोबत गीतकाराचं नावही सांगणं बंधनकारक असावं अशी सफल शिष्टाई साहिरनं ‘ऑल इंडिया रेडिओ’ला भेटून केली… त्यामुळे आज गीताच्या संदर्भात प्रेक्षकांच्या मनावर गीतकाराचंपण नाव ठसलं जातं.

साहिरच्या आग्रहामुळे की मी आधी गीत लिहीन व मग संगीतकारानी चाल बांधावी आणि संगीतकाराएवढंच किंबहुना एक रुपया तरी जास्तीचं मानधन मिळावं या अटीमुळे ज्यांना साहिर गीतकार म्हणून हवा होता त्या चित्रपटनिर्मात्यांनी लोकप्रिय आणि अधिक मानधन घेणाऱ्या संगीतकाराऐवजी गुणी पण नव्या किंवा काहीशा कमी लोकप्रिय असलेल्या संगीतकारांना साहिरसोबत घ्यायला सुरुवात केली. एन. दत्ता, रवी आणि खय्याम यांना त्याचा खूप फायदा झाला. साहिरचे जवळपास पन्नास टक्के चित्रपट या तिघांच्या संगीतानं नटलेले आहेत. यातच सर्व काही आलं.

साहिरमुळे गीतकारांचं महत्त्व सिनेसृष्टीला समजलं… तसंच संगीतकारांनाही… कारण गीताचे शब्द आणि त्याचा आशय चांगला नसेल तर धून कितीही वेधक असली आणि आवाज कितीही सुरेल असला तरी ते गीत रसिकांच्या मनात फार काळ घर करून राहत नाही. एका अर्थानं फिल्मी संगीत हे मराठी भावगीतांसारखं आहे. इथे गीताचे शब्द आणि भाव यांना प्राधान्य असतं. यालाच यशवंत देव ‘शब्दप्रधान गायकी’ म्हणतात. त्यातच गीतकाराचं महत्त्व किती आहे हे लक्षात येतं.

साहिरनं फिल्मी गीतकाराचा व्यवसाय का निवडला याचं सोपं उत्तर आहे. ते ही की, इथं चांगला पैसा होता आणि भारतात तरी चित्रपटगीतांना खऱ्या अर्थानं लोकगीतांचा दर्जा प्राप्त झाला आहे… त्यामुळे शायर म्हणून मिळणाऱ्या लोकप्रियतेपेक्षा कितीतरी अधिक रसिकप्रियता आणि मानसन्मान मिळतो. पुन्हा केवळ शायरी लिहून आणि मुशायरे गाजवून मिळणाऱ्या मानधनावर नीटसं जगता येत नाही. तिसरं कारण म्हणजे फाळणीनंतर भारतात उर्दू भाषेत लेखन वा अध्यापन करून जगणं तिच्या कमी होत गेलेल्या महत्त्वामुळे शक्य नव्हतं… त्यामुळे साहिरनं प्रगतिशील लेखक चळवळीतले कट्टर कमिटेड कम्युनिस्ट सिनेगीत लिहिणं म्हणजे तत्त्वांशी तडजोड मानत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून सिनेमात स्वतःला रुजवून घेतलं. मुख्य म्हणजे त्यानं प्रलेसचं तत्त्वज्ञान, समाजवाद आणि डावा पुरोगामी विचार अत्यंत जोरकस प्रभावीपणे सिनेगीतांतून मांडत सामान्य रसिकांना अंतर्मुख आणि विचारप्रवण केलं. हे त्याचं मोठं यश म्हटलं पाहिजे.

मराठीतले प्रसिद्ध गझलकार आणि शायर सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी दैनिक सकाळमधून १९९१मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मैं हर एक पल का शायर हूँ’ या लेखाच्या माध्यमातून साहिरच्या भेटीचा एक रंजक किस्सा सांगितला आहे… जो त्याच्या गीतलेखनावर प्रकाश टाकणारा आहे.

१९५६ मध्ये नाडकर्णी प्रा. दस्तगीर ‘शिहाब’सोबत साहिरला भेटायला गेले होते तेव्हा त्यांचं स्वागत साहिरच्या अम्मीनं केलं. पूर्वपरिचय असल्यामुळे ती दस्तगिरांना तक्रारीच्या सुरात म्हणाली की, ‘अब्दुल बेटा पूर्वी बऱ्यापैकी शायरी करायचा… पण आता चित्रपटव्यवसायात शिरल्यापासून ‘वह पूरी तरह गिर गया है।’ तिचा रोख हा त्याच्या सिनेसृष्टीतल्या पैसे कमावण्याच्या धुंदीत शायरीकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे होता.

काही वेळानं साहिर आला आणि त्यांच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या. चहापानानंतर पानसुपारीचं तबक आलं. त्यात तीन भिन्न प्रकारच्या सिगरेट होत्या. एक ‘स्टेट एक्स्प्रेस 555’, दुसरी ‘गोल्डफ्लेक’ आणि तिसरी चक्क ‘विडी’ होती. त्याबाबत छेडलं असता साहिर हसून म्हणाला, ‘जब कोई अच्छी गझल या गीत लिखता हूँ तो स्टेट सिगरेट पिता हूँ… जब ठीकठाक लिखता हूँ तो गोल्डफ्लेक’ सुलगाता हूँ और जब साधारण फिल्म के लिए मामूलीसा गीत लिखता हूँ तो बिडी का कश मारता  हूँ… वह भी बाये हाथ से।’ त्या वेळी त्याच्या डाव्या हातात पेटलेली विडी होती.

साहिर त्याच्या लेखनाबाबत कमालीचा प्रामाणिक होता. दर्जा राहावा म्हणून तो वर्षाला तीनचार चित्रपटांपेक्षा अधिक चित्रपट गीतलेखनासाठी स्वीकारत नसे… त्यामुळे त्याच्या धूम्रपानाच्या उदाहरणाचा दाखला देत असं म्हणता येईल की, त्याची पन्नास टक्के गीतं ही स्टेट एक्स्प्रेस पिण्याच्या लायकीची उत्तम होती, तीस ते पस्तीस टक्के चांगल्या दर्जाची – गोल्ड फ्लेकचा झुरका मारावा अशी वाटणारी होती. उर्वरित पंधरा ते वीस टक्के गीतं तडजोडीसाठी वा पैशासाठी विडीसह त्यानं डाव्या हातानं लिहिली होती म्हणजेच त्याच्या दर्जेदार गीतांची संख्या ऐंशी टक्क्यांपर्यंत आहे असं म्हणता येईल… त्यामुळे तो निर्विवादपणे नंबर वन होता आणि राहिला. त्याच्या जवळ फक्त शैलेंद्र पोहचू शकला होता.

साहिरचा कविमित्र नरेशकुमार ‘शाद’नं एका उर्दू पत्रिकेसाठी साहिरची मुलाखत घेतली होती. त्याच्या प्रामाणिक आणि अंतर्मुख होऊन दिलेल्या उत्तरांनी त्या वेळी ती बरीच गाजली होती. या मुलाखतीत शादनं त्याला एक प्रश्न असा विचारला होता की, ‘फिल्म शायरी, खास तौर पर फिल्मी शायरी के बारे में आपकी अपनी क्या राय है?’

वाचकांनाही अंतर्मुख करणारं साहिरचं प्रांजळ उत्तरं असं होतं…

‘अदबी शायरी के लिए भी शुरुआत में रवायती शायरी करनी पड़ती है। उस के बाद शायर अपने मनपसंद तरीके से शायरी करता है। शायरी के उसूल शायर की पुख्ता शायरी से बनाये जाते हैं, रद्द-ओ-बदल का दायरा थोड़ा बड़ा करना पड़ता है। मैंने भी शुरुआत में फिल्मी दुनिया की रवायत से मेल खाती शायरी की। लेकिन जब मैंने अपने लिए इस दुनिया में जगह बना ली तो अपनी शर्तों पर ही काम किया और खुद इंतेखाब की फिल्मों के लिए ही लिखा। इस तरह मैं आसानी से अपनी शायरी के ज़रिये अपने खयालात और जज़्बात भी कह पाया। फिल्मों के इस पहलू को भी नज़रअंदाज़ नहीं किया जा सकता, कि यह अपने खयालात और जज़्बात को जाहिर करने का सबसे ताकतवर तरीका है।’

त्यानं पैशांसाठी गीतं जरूर लिहिली… पण दर्जाबाबत फारच कमी तडजोड केली. मुख्य म्हणजे आपले विचार मांडण्याचं आणि ते फार मोठ्या रसिकवर्गापर्यंत सहजतेनं पोहोचवण्याचं फिल्मी गीतं हे सर्वात सशक्त माध्यम होतं याचं त्याला योग्य भान होतं… म्हणून ‘प्यासा’ ते ‘कभी कभी’ व्हाया ‘बरसात की रात’, ‘शगुन’, ‘दिल ही तो है’ इत्यादी सिनेमांच्या गीतांतून त्यानं जशी विशुद्ध प्रेमकविता रसिकांना दिली, विरहाची आणि उदासीची गीतं दिली तशीच पुरोगामी डाव्या विचारांची क्रांतिगीतंही दिली.

त्यानं पैसा मिळवला तो सिनेसृष्टीच्या रितीला धरून आपलं स्थान मिळण्यासाठी आणि ते मिळताच मनासारखं लिहिता यावं यासाठी… त्यामुळे ‘आज उन गीतों को बाजार में ले आया हूँ’ हे त्याचं म्हणणं आपण वाच्यार्थ्यानं घ्यावं. प्रकरणाच्या प्रारंभी ‘दीदी’मधलं गीतही लोकांच्या लेखी पैशाचं समाजातलं काय स्थान आहे हे सांगणारं आहे… पण ‘पैसा या प्यार’ या तद्दन गल्लाभरू सुमार चित्रपटात त्यानं पैशापेक्षा ‘प्यार’ महत्त्वाचं सांगताना प्रभावीपणे लिहिलं आहे…

‘इन्सानों ने पैसे के लिए आपस का प्यार मिटा डाला
हँसते-बसते घर फूंक दिये, धरती को नरक बना डाला
प्यार अपनी जगह खुद दौलत है, ये बात न समझी इन्सानों ने
कुदरत की बनाई दौलत का, सिक्कों में मोल लगा डाला’

(लक्ष्मीकांत देशमुख यांचे ‘हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी (जीवन आणि शायरी)’ हे पुस्तक फेब्रुवारी 2021मध्ये प्रकाशित होत आहे. त्यातील एक प्रकरण.)

[email protected]

(प्रशासकीय अधिकारी व सर्जनशील लेखक अशी दुहेरी ओळख असलेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांनी कथा, कादंबरी व अन्य ललित लेखन केले आहे. 2017 मध्ये बडोदा येथे  झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.)

Visit- https://kartavyasadhana.in

Previous articleपाणबुडीमध्ये लढाऊ विमाने
Next articleभुलाबाई आली पाच दिवसांच्या माहेरपणाला…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.