आठवणीतील विद्यार्थी: उद्धव ठाकरे

जेजे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट चे तेव्हाचे डीन श्री मं. गो. राजाध्यक्ष सरांनी त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्या विषयी म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या विषयी अंतर्मुख करणारा लेख लिहला आहे… एक कलावंत, एक माणूस म्हणून…

……………………………….

मं.गो.राजाध्यक्ष

शिक्षकी पेशातील लोकांना एक गोष्ट फायद्याची असते. त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या पुढे सरकत असतात. त्यापैकी कित्येक विद्यार्थी त्यांच्या भावी आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत नावारूपाला येतात. चित्रकलेसारख्या नैपुण्य क्षेत्रात असलेलं विध्यार्थी कलेच्या निरनिराळ्या दालनात आपले प्रावीण्य दाखवितात. यातले काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे ऋण मानतात. कारण शिक्षकांनी त्यांच्यावर संस्कार घडवलेले असतात, त्यांना ज्ञानदान केलेलं असते. काहीवेळा एखादा विद्यार्थी नावारूपाला आला की तो आपला विद्यार्थी होता असे एखादा शिक्षक त्याचे गुणगान गात असतो. पण कांही विध्यार्थी मात्र त्यांच्या शिक्षकांच्या आयुष्यात केवळ अविस्मरणीय असतात.

आजच्या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा अथवा मुलगी शाळेत अथवा महाविद्यालयात असेल तर तेथील काही विद्यार्थी व शिक्षकच त्यांना त्यांच्या मोठेपणाची जाणीव करून देत असतात, आणि त्या विद्यार्थ्याला देखील आपल्या घराण्याच्या मोठेपणावर त्याला मिळणाऱ्या मानाची कल्पना येते, आणि तो विद्यार्थी सुद्धा त्याप्रमाणे वर्तन करू लागतो.
पण यालाही अपवाद असलेले कैक विद्यार्थी आपल्या आयुष्यात येतात, आणि त्यांच्या सद्वर्तनाने व साधेपणाने कायमचे आपल्या स्मरणांत रहातात. त्यांचे एक प्रकारचे नातेच आपणाशी जडते.

मी सर जे.जे. उपयोजीत कला संस्थेत अध्यापक म्हणून कार्यरत असतांना माझ्या कानांवर आले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आपल्या महाविद्यालयात शिकतो आहे. बहुदा ते १९७६ साल असावे. शिवसेना त्या काळात अत्यन्त प्रभावी अशी संघटना होती. सेना प्रमुखांच्या एखाद्या लहानश्या गोष्टीचे पडसादही सर्वत्र उमटत असत. पण त्यांचा मुलगा आपल्या संस्थेत दोन वर्षे असूनही माझ्या प्रत्यक्ष पहाण्यात आला नव्हता. किंवा तो तसा बाकीच्या विद्ध्यार्थ्यात तसा मिरवत नव्हता. अर्थात आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, विशेष करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वर्गकामातून डोके वर काढण्याचीही फुरसद मिळत नसते. त्यामुळे तो बाहेर दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नंतर कधीतरी गेट-टू -गॅदरच्यावेळी अचानक दिसला तेव्हां मला कळले की हाच तो बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव! शरीरयष्टीने बारीक, उंचापुरा, वर्णाने गोरापान, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर सतत एक हास्य बाळगणारा असे त्याचे व्यक्तीमत्व होते.

दुसऱ्याच वर्षी म्हणजे द्वितीय वर्षाला उद्धव माझ्या वर्गात आला. त्याच्या मित्रमंडळीत आजूबाजूला होते ते सर्व विध्यार्थी कामात तसेच माहीर होते. आणि उद्धव देखील त्याच प्रवृत्तीचा होता. संजय सुरे, भूपाल रामनाथकर, अजीत जयकर, भास्कर हांडे, हे उद्धवचे मित्र होते. पण या सर्वामध्ये चुरस असे ती कामाची. उपयोजीत कलेमध्ये केवळ चित्रे काढून भागत नाही तर त्यामध्ये संवाद साधण्याची कल्पकता असावी लागते. त्यासाठी कलेसोबतच वाचन, निरीक्षण, काव्य, लेखन अश्या सर्वच बाबीवर विचार करावा लागतो व येथेच विद्यार्थ्यांना शिक्षक मार्गदर्शन करतो. उद्धव माझ्या संपर्कात आला तेव्हां सर्वात महत्वाची बाब माझ्या लक्ष्यात आली ती म्हणजे त्याचे बोलणे. एरवी अत्यंत अबोल वाटणारा उद्धव एखाद्या विषयावर बोलू लागला अथवा वादविवाद करू लागला, की संपूर्णपणे वातावरण बदलून टाकत असे. त्याचा गंभीर वाटणारा चेहरा नर्म विनोद पेरत असे तेव्हां त्याच्या चेहऱ्यावर एक मिस्कील हास्य पसरत असे. शांतपणे त्याचे संभाषण चालू असे. आमच्या महाविद्यालयात संपूर्ण आठवडाभर बहुदा प्रात्यक्षिकच चालू असत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला खाली मान घालूनच काम करावे लागे. त्याच प्रमाणे उध्दवाचेही काम चालू असे. सर्वांशीच मनमोकळेणाने वागणारा उद्धव प्रत्येक शिक्षकालाही अदबीने मान देत वागत असे. आपण केलेल्या कामावर शिक्षकांशी सांगोपांग चर्चा करून किती निरनिराळ्या तऱ्हेनी त्या कल्पना चित्रांकीत केल्या जातील याची तो चर्चा करें. शिक्षकही त्याला कधीच वेगळी वागणूक देत नसत. व उद्धवची तशी अपेक्षाही नसे. शिक्षक जवळ आले की उठून उभे राहून तो नम्रपणे बोलत असे.

उद्धवचा वाखाणण्याजोगा गुण म्हणजे त्याचा वक्तशीरपणा व कामातील बैठक. कलानगर ते व्ही.टी. तो नेहमी हार्बरने येत असे. मग भरधाव पाऊस असला तरी छत्री सावरत तो वेळेवर वर्गात हजर असे. वर्गात आल्यानंतरही आपली कामे पूर्ण करण्यातच त्याचा वेळ जात असे. राज्य कला प्रदर्शनाची वेळ असे, तेव्हां आम्ही सर्वच विद्यार्थ्यांना झटून कामाला लावत असू. यावेळी महावियालयीन वेळेव्यतिरिक्त आम्ही रोज विद्यार्थ्यांसोबत उशीरापर्यंत काम करीत बसत असू. उद्धवचा याबतीत पुढाकार असे. इलस्ट्रेशन हा उद्धवचा खास आवडीचा विषय. त्यात त्याची गतीही चांगली होती. पण आपले इलस्ट्रेशन केवळ कामचलाऊ असू नये, तर ते सर्वांगदृष्ट्या परीपूर्ण व्हावे याकडे त्याचा कटाक्ष असे. त्यासाठी त्याची सतत मेहनत, जोपासना व तापशर्या ही सुरूच असे. उन्हाळ्याच्या संपूर्ण सुटीत तो दादरला सुप्रसीध्द चित्रकार श्री रवी परांजपे यांच्याकडे जाऊन उमेदवारी करत असे. विध्यार्थ्यांच्या कामाची बैठक पक्की असेल तरच परांजपे यांच्याकडे काम काम करण्याचा लाभ मिळत असे. अन्यथा तेथे कोणालाही थारा नसे. तेथे उद्धवने स्वतःचे ड्रॉईंग अधीक उठावदार, निर्दोष कसे करावे याचे पुरेपूर शिक्षण घेतले. एक वर्ष पुढे सरकले व तृतीय वर्षात हीच सर्व मुले पुन्हां माझ्याकडे आली. पुन्हां कामाची स्पर्धा सुरू झाली.

छायाचित्रण हा देखील उद्धवचा आवडीचा विषय. किंबहूना ड्रॉईंग चांगले असूनही छायाचित्रणाच्या आवडीने उद्धवने ती कलाही आत्मसात केली. त्यासाठी तो तासनतास कॉलेजच्या डार्करूम मध्ये व नंतर दादरला जतकर सरांच्या डार्करूम मध्ये घालवीत असे. छायाचित्रणामध्ये निरनिराळे प्रयोग करणे, बाह्यचित्रण करणे, निसर्ग व प्राणी जीवनाचे चित्रण करणे हे उद्धवच्या खास आवडीचे असे विषय. पशू आणि पक्षांच्या सान्नीध्यात तो रमून जात असे. वर्गामध्ये अथवा बाहेरही त्याची चर्चा सतत या छ्यायाचित्रण विषयावरच! फिल्टर, अपार्चर, डायफ्रॅम, लाईट असे विषय त्याचे जिव्हाळ्याचे असत. तो केवळ कॅमेऱ्याने चित्रण करीत नसे, तर त्याची सर्जनशील दृष्टी ही सौंदर्य शोधून त्यातून तो चित्रनिर्मिती करीत असे. त्यामुळे त्याची छायाचित्रे बोलकी होत असत. आपल्याशी संवाद साधत. ही त्याची फोटोग्राफी बाळासाहेबानाही मोहवून टाकीत असे. ते त्याच्या कडून अधून मधून वेगवेगळ्या लेन्सिस व त्यातील फरक यातील बारकावे समजून घेत. त्याने गच्चीवर बाळासाहेबांचा काढलेला फोटो मी माझ्या एका बाळासाहेबनवरील लेखासाठी वापरला होता. माझी बाळासाहेबांशी आधीची ओळख होतीच! पण उद्धवने त्यांना आपले शिक्षक म्हणून माझी जेव्हां खास ओळख करून दिली, तसेच माझ्या उपक्रमाविषयी तो अनेकदा त्यांच्याकडे बोले त्यामुळे मी साहेबांशी जास्तच जवळ आलो. त्यामुळे माझी कोणाशीही ओळख करून देतांना ‘ माझ्या उद्धवचे सर’ म्हणून ते करून देत असत. एकदा ते म्हणाले, माझा त्या आर्ट स्कुलवर अजीबात विश्वास नाही. पण माझ्या मुलांना मात्र मी त्यांच्या आवडीची क्षेत्रे निवडण्याची मोकळीक दिली आहे.

बघता बघता अंतीम वर्ष आले. परीक्षा आटोपल्या. अंतीम वर्षाच्या परीक्षेत विशेष गुणवत्तेने उद्धव उत्तीर्ण झाला. परीक्षा होताच सर्व विद्यार्थी मोठमोठ्या जाहीरात संस्थेमध्ये काम करण्यास उत्सूक असतात. गुणवत्तेच्या जोरावर उध्दवालाही हे सहज शक्य होते. पण तेथेही त्याने अचूक निर्णय घेतला. कोठेतरी नोकरी करण्यापेक्षा त्याने स्वतःची जाहीरात संस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला. ‘ चौरंग’ हे समर्पक नांव तिला दिले. व तेथे स्वतः कामे करत त्याने ती चालविली. जोडीला होता अजीत जयकर. स्वतःच्या हाताने कला निर्मीती करणे आणि तिचा आस्वाद घेणे ह्याचा कांही वेगळाच आनंद असतो, तो केवळ कलाकारच जाणे! या कामाच्या फुरसतीच्या क्षणी उद्धवचे छ्यायाचित्रण सुरूच होते. वन्य जीवनाचे चित्रण करतांना त्याला आलेले अनुभव ऐकतांना अंग थरारून येत असे. वाघ पाण्यामधून जाताना त्याच्या शेपटीच्या फटकाऱ्याने उडवलेल्या पाण्याचे चित्रण करतांना किती वेळ दबा धरून बसावे लागले व अश्या कैक गोष्टी ऐकतानाही सर्वांगावर रोमांच उठत असत.

पुढे शिवसेनेचे विचार इतर वृत्तपत्रे मांडत नाहीत म्हणून बाळासाहेबांनी स्वतःचे मुखपत्र काढायचे ठरवले. ‘सामना’ हे नामकरणही झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पत्रकार म्हणून कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकार अशोक पडबिद्री यांना संपादक म्हणून नियुक्त केले. ‘प्रबोधन प्रकाशन’ तर्फे हे दैनिक शिवसेनेच्या विचारसरणीचा प्रसार करू लागले. बघता बघता ‘सामना’ घरोघरी पोचला. आणि येथे बाळासाहेबांना गरज वाटू लागू लागली ती एका विश्वासू अन हक्काच्या माणसाची. आणि उद्धवशिवाय त्यांच्यापुढे कोण होते? आणि उद्धवला सामनामध्ये जावे लागले. एक दिवस मी रवी परांजपे यांच्या घरी बसलो असता उद्धव व राज हे दोघेही बंधू तेथे आले अन आम्हांला घेऊन सामना कार्यालय दाखवायला घेऊन गेले. तेथेच राज ठाकरे व्यंगचित्रे काढीत असत. दोघेही बंधू अतीशय प्रेमाने वागत. त्यानंतर माझे ‘सामना’मध्ये जाणे नित्याचे झाले. बाळासाहेबांनी त्यावेळी सामना तर्फे आयोजीत करण्यात येणाऱ्या गणपती स्पर्धेत आम्हांला त्याचे परीक्षक म्हणून काम पाहण्यास सांगीतले होते. त्यात मी, कमल शेडगे व मोहन वाघ अनेक वर्षे ती जबाबदारी सांभाळत होतो. पण पुढे माँ साहेबांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर साहेबांचा जणू देवावरचा विश्वासच उडाला व त्यांनी ती स्पर्धाही बंद केली. आता उद्धव हळूहळू समाजकारणात शिरू लागला. एक दिवस त्याने सांगीतले, काल मी एका महीला मंडळाच्या समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. तेथे प्रथमच मला जाहीर असे भाषण करावे लागले. त्यात मी मधेच त्यांना नळावरती जश्या बायका भांडतात तश्या मात्र भांडू नका, असा विनोदही केला. हळूहळू सवय होते आहे.

दरम्यान अशोक पडबिद्री यांचा सौम्य स्वभाव, लिखाण, एक दोन वेळा सामनाला मागावी लागलेली माफी या कारणाने त्यांना संपादकपदावरून दूर करण्यात आले. व तेथे माधवराव गडकरी यांच्या हाताखाली लोकप्रभा मध्ये काम करणारे संजय राऊत याना त्या पदावर नेमण्यात आले. मुळात मनाने शिवसैनिक असलेल्या संजय राऊतांनी शिवसैनिकांची नाडी बरोबर ओळखली. व त्याप्रमाणे त्यांनी झंझावाती पणाने सामना चालवला. व बाळासाहेबांसोबतच उद्धवशीही ते एकनीष्ठ राहीले. मलाही उद्धवने दर आठवड्याला सामना मध्ये लिखाण करण्यास सांगीतले. पण यापुढे हळूहळू उद्धवच्या राजकारणाच्या वाटेने प्रवास सुरु झाला. बाळासाहेबांनी त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकण्यास सुरुवात केली. त्या सर्व निभावत उद्धवने स्वतःमधील सर्जनशील कलावंत जपून ठेवला. कामाच्या रगाड्यातही त्याची छ्यायाचित्रण कला बहरत होती. पुढे शिवसेना राज्यात सत्तेवर आली, तेव्हां उद्धवचा दिनक्रम एकदमच बदलला. त्याला स्वतःचे असे खासगी जीवन राहिलेच नाही. त्याचा मुक्काम सेनाभवनवर सुरु राहीला. सतत लोकांचा गराडा, त्यांचे प्रश्न सोडवणे, यामध्ये उजाडलेला दिवस कसा मावळला जाई याची खुद्द त्यालाच कल्पना नसे. त्यातूनही आम्ही कांही खास अशी प्रदर्शने भरवत असू, त्यावेळी उद्धवने त्यांना भेटी देऊन अगदी मार्मिकपणे त्याचा आस्वाद घेतला आहे. कांही प्रदर्शनांना त्याने बाळासाहेबानाही सोबत आणले आहे. सततच्या राजकारणाच्या व्यापात अश्या चित्रमय श्रुष्टीत कांही निवांत क्षण घालविले की दोघांचीही मने प्रफुल्लीत होत असत.

आपल्या छायाचित्रीत केलेल्या वन्य प्राणीजीवनाच्या छ्यायाचित्रांचे प्रदर्शन उद्धवने जहांगीर आर्ट ग्यालरी मध्ये भरवले. जेव्हां आपण प्रदर्शन भरवणार असल्याचे उद्धवने जेव्हां बाळासाहेबांना सांगीतले त्यावेळी बाळासाहेबमधील कलावन्त जागा झाला. त्यांनी उद्धवला सांगीतले की, ज्यावेळी आपण केलेल्या कलाकृती लोकांना दाखवीण्यायोग्य तुला वाटतील त्याचवेळी त्यांचे प्रदर्शन कर. पण उद्धवने खरोखरीच आपले सर्व कौशल्य, सर्जनशीलता, कॅमेऱ्यामागील त्याचा डोळा या गोष्टींनी परीपूर्ण असे ते प्रदर्शन साकार केले. आणि तेही रणथम्बोर सारख्या ठिकाणी जाऊन केलेल्या वन्य प्राण्यांचे छायाचित्रण. सुरेख आणि मनोहर.
यातील कलाकृती पहातांना त्याच्यातील कलासाधनेचे प्रत्यन्तर ठाई ठाई येत होते. त्यानंतरही त्याने आपले प्रदर्शन भरवले, त्यावेळी संजय सुरे व भूपाल रामनाथकर यांनी उद्धवने मुद्दाम त्यासाठी बोलावल्याचे मला कळवले. मी म्हटले की प्रदर्शनाच्या उदघाटनाच्या वेळी आलो तर त्याची भेट होणे तसेच त्याच्या कलाकृती पहाणे दुरापास्त होईल तर मी दुसऱ्या दिवशी येईन. व दुसऱ्या दिवशी ते छायाचित्रांचे प्रदर्शन पाहताना उद्धवच्या कल्पक अश्या सर्जनशीलतेची जाणीव सतत होत होती. पुढे २००४ मध्ये उद्धवने आपले गड किल्ल्यांचे प्रदर्शन भरविले. आपल्या शेवटच्या प्रदर्शनात उद्धवने हाताळलेला एक नवा प्रकार म्हणजे ‘इन्फ्रारेड’ छायाचित्रण. इन्फ्रारेड हा नेहमीचा प्रकाश नसून हा कॅमेराबद्ध होतो. यामुळे छायाचित्रांची रंगसंगती अधीक खुलून येते. छायाचित्रात टायमींग हे अचूक आणि महत्वाचे असते असे त्यांचे म्हणणे आहे. जेंव्हा उद्धव सारखा कलावन्त आपले कौशल्य वापरतो, तेव्हां त्याचे पेंटींग बनते. याशिवाय लतादीदी, सनई वादक बिस्मिल्लाखान, संतूरवादक शिवकुमार शर्मा, पाठमोरे जाणारे रतन टाटा यांच्या भावमुद्रा तितक्याच विलोभनीय त्यांनी टिपल्या आहेत.

एकदा मी टॅक्सीने जात असताना बी के सी च्या सिग्नलजवळ आमच्या टॅक्सी शेजारीच उद्धव ठाकरे यांची गाडी थांबली. मला पहातच त्यांनी सांगीतले की उद्या नेहरू सेंटर मध्ये या. तेथे राजेंद्र गोळेचे पेपर स्कल्पचरचे प्रदर्शन आहे. तसेच माझे नवीन पंढरपूरच्या वारीवरील पुस्तक देखील तुम्हांला द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी मी तेथे गेलो तेंव्हा अनेक चॅनलवाले उद्धवची वाट पहात उभे होते. पण उद्धवने नम्रपणे त्यांना जाणीव करून दिली कीं आज मी फक्त कला प्रदर्शनासाठी आलो आहे. राजकारणावर मी चुकूनही बोलणार नाही. व त्यांना माघारी पाठवले. आम्ही आत गेलो. सर्व प्रदर्शन पाहून झाल्यावर उद्धवने मला पुस्तक दिले व म्हणाला, चला ना जरा माझ्या सोबत सामना मध्ये. कॉफी घेत जरा गप्पा मारू. व मी त्याच्या सोबत गेलो. बऱ्याच गप्पा झाल्या त्यावेळी. उद्धवचे जुने वर्गमित्र संजय सुरे व भूपाल रामनाथकर देखील तेथे होते. मी मध्ये कला विषयावर बरेच लिखाण करीत असे ते बाळासाहेबांपासून उद्धवला माहीत होते. त्याने मला विचारले, सध्या कांही नवीन लेख लिहीले आहेत का? त्यावर मी कांही वर्षे चंद्रकांत च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या कांही कलाकारावर लिहीलेलं त्यांना सांगीतले. त्यावर उद्धवने सांगीतले की मी तुमचे नवीन पुस्तक प्रसीद्ध करतो. आता आमचे ‘प्रबोधन प्रकाशन”सुरु झाले आहे, त्यांच्या तर्फे हे पुस्तक प्रसीद्ध होईल. व त्याप्रमाणे आपले सचीव हर्षल प्रधान यांना त्यांनी सूचना दिल्या. या पुस्तकासाठी भूपाल रामनाथकारांनीही खूप मेहनत घेतली व सेनाभवन चे कलाकार, लेखक व कवी अमोल मटकर यांनी या माझ्या ‘कलाईडोस्कोप’ या पुस्तकाची देखणी रचना केली व उद्धवसहीत शिवसेनेच्या अनेक मान्यवरांनी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी – मराठी दिनानिमित्त वांद्र्याच्या रंगशारदामध्ये या ‘कलाईडोस्कोप’ चा भव्य प्रकाशन सोहोळा केला.

आज उद्धवजी राजकारणात खूप पुढे गेले आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले आहेत. आता तर ते या भारतातील एका संतांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र भूमीचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आहेत, हा आम्हां सर्वांचा गौरवाचा, मानाचा आणि मांगल्याचा क्षण आहे. आता भेटीगाठी देखील दुर्मीळ होतील. त्यांच्या व्यस्त कामातून त्यांना स्वतःलाच वेळ देता येणार नाही. पण येवढे अमाप यश मिळवूनही उद्धव ठाकरे या प्रसिद्धीच्या कळसावर पोचलेल्या व्यक्तित्वात तोच उद्धव आहे. त्याच्या नम्र, विनयशील स्वभावाला अन शालीनतेला त्यानी किंचीतही मुरड घातलेली नाही. अथवा अहंकाराचा दर्प येऊ दिला नाही.स्वतःचे कर्तृत्व, चारीत्र्य याचे त्यांनी जतन केले आहे. स्वतःतील माणूस अन कलावंत यांची जपणूक केली आहे. असे म्हणतात की प्रत्येकजण आयूष्यात विद्यार्थीच असतो. उद्धव ठाकरे अजूनही ती भूमिका बजावत असतात. हे केवळ कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय आहे. उद्धवजी, आपल्याला आठवतच असेल, सर जे.जे.उपयोजीत कला महाविद्यालयात अच्युत पालव यांच्या सुलेखनाच्या प्रदर्शनावेळी उदघाटनाला आपण दोघेही होतो. त्यावेळी आपण एक आश्वासन सर्वाना दिले होते. ‘जर का आमची सत्ता आली, तर या जे.जे.चं नांव मी जगाच्या नकाशावर नेईन’. उद्धवजी ती वेळ आता आली आहे, आपण मूलतः कलाकार आहात. जे.जे. आपली मातृसंस्था आहे. तिचे आधुनिकरण आपल्याच हाताने व्हावे ही कदाचीत नियतीची इच्छा असेल! आज केवळ आपल्या हात सत्ताच नाही तर सत्ताधीश होण्याचे भाग्य आपणास लाभले आहे. महाराष्ट्र आपण सुधारणार याची खात्री आहेच! पण आजवर प्रत्येकानी दुर्लक्षलेल्या सर जे.जे. कला संस्थांना उर्जीतावस्था आपणच प्राप्त करून देऊ शकता. आपल्या पुढील यशस्वी आणि नेत्रदीपक वाटचालीसाठी आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा!

Previous articleगांधीजी आणि मीम
Next articleराष्ट्रवादीची लेडी डॉन ; हरियाणाची वाघीण !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.