आणखी किती काळ बह्याडबेलणेच राहणार?

हिंदूंना जर पराभूत करावयाचं असेल, तर प्रत्यक्ष लढाईला प्रारंभ करण्याअगोदर अफवा पसरवा. त्यांच्या मंदिरावरचा फक्त झेंडा पाडा. परमेश्वराचा कोप झाला म्हणून अध्र्यापेक्षा जास्त हिंदू लढाईपूर्वीच हादरून जातात. त्यांना पराभूत करणं नंतर फारच सोपं असतं. – महम्मद बिन कासीम (भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लीम आक्रमक)


—————————–

सोमनाथच्या प्रसिद्ध मंदिरात 3 लाख यात्रेकरू दरवर्षीप्रमाणे एकत्रित जमले होते. एक हजार ब्राह्मण मंदिराची सेवा करत होते. तेथील मौल्यवान संपत्तीचे रक्षण करीत होते. मंदिराच्या प्रवेशव्दारासमोर शेकडो लोक नाचगाणी म्हणत होते. 
मध्यभागी दागिन्यांनी सुशोभित केलेले लिंग होते. चकाकणार्‍या दागिन्यांचे प्रतिबिंब छतावर टांगलेल्या झुंबरावर पडत होते. जणू काही आकाशातील चांदण्या लुकलुकत असल्याचे जाणवत होते.. त्याचवेळी परकीय आक्रमक आल्याची बातमी पसरली. बातमीची कुठलीही खातरजमा न करता लोक पळायला लागले. ब्राह्मण मंदिराच्या भिंतीवरून उडय़ा मारून जाऊ लागले. एकच पळापळ झाली. त्यानंतर बर्‍याच वेळाने महम्मद गझनीचे सैनिक आले. न घाबरता ते मंदिराच्या भिंतीवर चढले. केवळ काही हजारात असलेल्या त्या सैनिकांनी मंदिर उद्ध्वस्त करायला सुरूवात केली. 3 लाख भक्तांच्या विनंतीला देव धावून गेला नाही. भक्तांचा आक्रोश त्याला ऐकू आला नाही. लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भव्य शिवलिंगाचे तुकडे करण्यात आले. लाखो पौंड संपत्तीची लूट करण्यात आली. आपसात ती वाटून घेण्यात आली. मंदिरात जमलेल्या 3 लाख भक्तांनी एकत्रितपणे मुकाबला केला असता, तर गझनीच्या सैनिकांना पळतीभुई थोडी झाली असती. पण गझनीचं आक्रमण म्हणजे परमेश्वराचा कोप आहे, या समजुतीने भक्तांनी पळ काढण्यातच धन्यता मानली – इतिहासकार लेन पूल.

—————————–

1666 मधील हिंदुस्थानातील सूर्यग्रहणाचं दृष्य मी कधीच विसरणार नाही. त्यावेळी मी दिल्लीत होतो. प्रत्यक्ष ग्रहणापूर्वीच लोकांमध्ये अशी भिती पसरली होती की, या ग्रहणानंतर लगेच पल्रय होणार आहे आणि पृथ्वी नष्ट होणार आहे. ग्रहण लागण्याच्या वेळेस लोकांचं वागणं अतिशय विचित्र होतं. माझं घर यमुना नदीच्या किनार्‍यावरच असल्याने मी घराच्या छतावरून सारं पाहत होते. स्त्री-पुरूष, लहान मुलं, शहरातील मोठं मोठे सरदार, व्यापारी, उमराव सारे यमुनाच्या पात्रात गोळा झाले होते. ग्रहण सुरू होताच भितीमुळे त्या सार्‍यांनी आरडाओरड सुरू केली. आयुष्यातील हा अंतिम क्षण असल्यासारखं त्यांचं वागणं होतं. सर्व जण पाण्यात बुडी घ्यायला लागले. नंतर आकाशाकडे पाहून काहीतरी जप करायला लागले. कधी ते यमुनेचं पाणी हातात घेऊन सूर्याकडे फेकत होते. तर कधी कान पकडून, डोकं खाली झुकवून डुबक्या घेत होते. बराच वेळ झाल्यानंतर काहीच होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्यात नाणे फेकायला सुरूवात केली. तेथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांना दान देण्यास सुरूवात केली. त्यादिवशी संपूर्ण उत्तर भारतात असंच वातावरण होतं- फ्रॅक्विस बर्नियर (17 व्या शतकात मुगलांच्या दरबारात नोकरी करणारा फ्रेंच लेखक)

—————————–

पहिलं निरीक्षण आठव्या शतकातलं आहे. नंतरचे दोन अनुक्रमे अकराव्या व सतराव्या शतकातले आहे. या तीनही निरीक्षणातील एक गोष्ट कॉमन आहे. अफवा आणि चुकीच्या समजुतींमुळे भारतीय समाज लगेच गर्भगळीत होतो आणि पराभूत मानसिकतेत पोहोचतो. महम्मद बिन कासिम, लेन पूल आणि बर्नियर वेगवेगळ्या शब्दात हेच आपल्याला सांगतात. इतिहासाच्या पानात डोकावलं, तर असे प्रसंग जागोजागी दिसतात. इतिहासापासून काहीही शिकायचं नाही, हे भारतीय समाजाचं सर्वात मोठं वैशिष्टय़ असल्याने आता 21 व्या शतकातही अफवांचा बाजार लागणं सुरूचं आहे. शुक्रवारी रात्री ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरातील मूर्तीच्या डोळ्यातून कुठे अश्रूच्या, तर कुठे रक्ताच्या धारा वाहत असल्याची अफवा पसरली आणि लाखो लोकांनी ती रात्र जागून काढली. देवीचा कोप झाल्याने पोळ्यानिमित्त दारासमोर असलेल्या मेंढय़ा ताबडतोब फेकून द्या, नाहीतर झोपेतच मृत्यू होईल. वाशीम जिल्ह्यातील उमरीची सामकी माता, केळापूरची जगदंबा, चंद्रपूरची महाकाली संतापल्याने आज रात्री कोणी झोपलं, तर सकाळी तो उठणारच नाही, अशा वेगवेगळ्या अफवा होत्या. प्रकाशाच्या वेगापेक्षाही या अफवांचा वेग अधिक असल्याने शुक्रवारच्या रात्री विदर्भ आणि मराठवाडय़ातील महसूल व पोलीस प्रशासनाची दमछाक झाली. त्या रात्री प्रत्यक्षात काहीही घडलं नसलं तरी दुसर्‍या दिवशी शनिवारी देवीचा कोप शांत करण्यासाठी वेगवेगळ्या मंदिरामध्ये हजारोंची गर्दी जमा झाली. वाशीम जिल्ह्यातील सामका देवीच्या मंदिरात त्यादिवशी किमान दीड लाख लोक जमा झाले होते. हा सारा प्रकार हतबद्ध करणारा तर आहेच, सोबत लोकांच्या भोळसटपणाचा संताप यावा असाही आहे.

या अशा अफवा आपल्या देशात वारंवार पसरतात. ‘भारतात सर्वात जास्त वेगात जर कुठल्या गोष्टीचा प्रसार होत असेल, तर तो अफवांचा होतो. अनेकदा हा देश हवा-पाण्यापेक्षा अफवांवरच चालतो की काय? असा प्रश्न पडतो’, असे बीबीसी या जगविख्यात वृत्तसेवेचे भारतात अनेक वर्ष प्रमुख असलेल्या मार्क टुलींनी लिहून ठेवलं आहे. त्यांचं ते म्हणणं खरं वाटावं अशीच परिस्थिती आहे. काही वर्षापूर्वी गणपती दूध पिल्याची घटना अजूनही महाराष्ट्र विसरला नाही. तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरचाही गणपती तेव्हा दूध पिला होता. या अशा भोळसटपणात इतर धर्मीयही मागे नाहीत. माता मेरी वा येशू ºिस्ताच्या प्रतिमेच्या डोळ्यातून रक्त बाहेर आल्याच्या अफवा अधूनमधून पसरत असतात. मागे मुंबईच्या हाजी अलीच्या दग्र्याजवळ समुद्रातील पाणी गोड झाल्याची अफवा पसरल्याने लाखो लोकांनी समुद्रकिनार्‍यावर धाव घेतली होती. मुस्लीमधर्मीयांच्या ठिकठिकाणच्या दग्र्यावर चमत्कार होत असल्याच्या अफवाही नेहमीच पसरविल्या जातात. जैनधर्मीयही यात मागे नाही. 2006 मध्ये अमरावतीत एका जैन साध्वीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी आपल्या देहाचं भस्म झाल्याचं नाटक केलं होतं. त्या नाटकाला जैनधर्मीय फसले. दोन दिवसपर्यंत शेकडो जैनधर्मीय ज्या खोलीत स्मशानातील राख आणून पसरविण्यात आली, तेथे दर्शनासाठी गर्दी करून होते. त्या अस्थिंच्या विसर्जनाचा कार्यक्रमही त्यांनी भक्तीपूर्वक पार पाडला होता. नंतर साध्वीची लव्ह स्टोरी बाहेर आल्यानंतर त्यांचे चेहरे पाहण्याजोगे झाले होते. थोडक्यात अफवांना बळी पडण्याचा भोळसटपणा सर्वधर्मीयांमध्ये सारखाच आहे. गाडगेबाबांच्याच शब्दात सांगायचं झाल्यास याविषयात सारेच ‘बह्याडबेलणे’ आहेत. सारासार विवेकबुद्धी गहाण ठेवून सारेच अशा अफवांवर विश्वास ठेवतात. डोक्याला कुठलाही ताण न देता, विचारशक्ती गुंडाळून ठेवून अफवेचे शिकार होतात. सारेच समाज हे देवभोळे, धर्मभोळे आहेत., हे त्याचं प्रमुख कारण. देव-धर्माच्या विषयातील कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करायची नाही, अशी शिकवण सार्‍याच धर्मातील धर्ममार्तडानी दिली असल्याने याविषयात कोणीही चिकित्सा करत नाही. शिकले-सवरले म्हणणारेही याविषयात डोकं आणि डोळे बंद करून ठेवतात. झापडं बांधलेल्या बैलांसारखी सार्‍यांची स्थिती आहे.

उगाच देवाचा कोप नको, अशीच सार्‍यांची मानसिकता असते. माणूस चंद्रावर पोहोचला, मंगळावर जायची तयारी सुरू आहे. तरीही भारतीय माणूस मध्ययुगीन मानसिकतेतच जगतो आहे. विज्ञान हा फक्त शाळेत शिकायचा एक विषय आहे, एवढीच त्याची समजूत आहे. विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या साधनांचा मनुष्याला कमजोर करण्यासाठी कसा वापर करायचा, यात आपला हातखंडा आहे. (परवाच्या प्रकरणात मोबाईलव्दारे गावोगावी अफवा पसरविण्यात आली.) ही अशी कमजोर मानसिकता समाजस्वास्थासाठी तर घातक आहेच, पण देशासाठीही नुकसानदायक आहे. सातशे वर्ष मुस्लीम आक्रमकांच्या आणि नंतर दोनशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत राहायला, ही मानसिकताच कारणीभूत आहे. अफवांना सहज बळी पडण्याच्या या प्रवृत्तीमुळे भविष्यातही आपल्या वाटय़ाला गुलामी आली, तर आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत)

मो. 8888744796

Previous articleद ग्रेटेस्ट इंडियन!
Next articleआमदाराने नाचावं की, नाचू नये?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.