आणखी किती वर्षे मनुस्मृती जाळणार?

-संदीप सारंग

25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 25 डिसेंबरला राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबईत पुरोगामी-परिवर्तनवादी-डाव्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी एक मोठा मोर्चा काढला होता. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यातल्या बर्‍याचजणींनी तिथे भाषणे केली. काहींनी परिवर्तनाची जोशपूर्ण गाणी म्हटली. तर काहींनी पथनाट्ये सादर केली. स्त्रियांवर शेकडो वर्षांपासून अन्याय-अत्याचार होत आलेत, ते थांबले पाहिजेत, महिलांशी सन्मानाचा, समतेचा, न्यायाचा व्यवहार झाला पाहिजे, असा या भाषणांचा आशय होता. (जो रास्तच होता.) या सर्व भाषणांमध्ये स्त्रियांनी मनुस्मृतीवर सडकून टीका केली. (जी योग्यच होती.) शेवटी, मनुस्मृतीचे प्रतीक तयार करण्यात आले आणि त्याचे संतापदग्ध अभिनयासह दहन करण्यात आले.

विद्रोही, क्रांतिकारी लोकांच्या संमेलनांमध्येही हटकून मनुस्मृतीदहनाचा समावेश असतो. बर्‍याचदा हा ‘धगधगता’ प्रसंग साजरा करूनच कार्यक्रम सुरू केला जातो. मंचावर चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे प्रतीक म्हणून एकावर एक चार मडकी ठेवून ती उतरंड दातओठ खात रागारागाने लाकडाच्या दांडक्याने फोडणे, हा पुरोगामी कार्यक्रमाचे उदघाटन करण्याचा आणखी एक ‘अभिनव’ प्रकार अलीकडे रूढ होऊ पाहतो आहे. खरोखरच काय साधतो आपण हे सारे करून? कितीही प्रयत्न केले तरी समाजात परिवर्तनच होत नाही, अशी तक्रार जवळजवळ सगळेच पुरोगामी करत असतात. सगळ्याच गोष्टी इतक्या उथळ पातळीवर चालल्या असतील तर कसे होईल परिवर्तन?

विषमता, शोषण यासारख्या समाजविघातक तत्त्वांचा अर्क असणारा मनुस्मृती हा धर्मग्रंथ बाबासाहेबांनी एकदाच जाळला आणि नवा विचार करायला सुरुवात केली. त्यांनी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ ही केशवसुतांची तुतारी फुंकली आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही. सावध होऊन पुढच्या हाका ते ऐकू लागले. अलीकडच्या काळात मात्र मागे वळून पुन्हा मनुस्मृतीबद्दलच जास्त विचार करणार्‍यांची, फिरून फिरून तिच्याभोवतीच घुटमळणार्‍यांची, तिला जाळून टाकणार्‍यांची संख्या फार वाढू लागली आहे. हे लोक भूतकाळात इतके रमू लागलेले आहेत की, त्यापायी ते दरवर्षी आठवणीने 25 डिसेंबरची वाट पाहतात आणि त्यादिवशी साग्रसंगीत, वाजतगाजत, त्वेषपूर्ण आविर्भावात मनुस्मृती जाळतात!

मनुस्मृती हा अत्यंत वाईट धर्मग्रंथ होता. त्याने समाजावर विकृत संस्कार केले. स्त्री-शूद्र-अतिशूद्र यांना हीन, तुच्छ, अपमानास्पद वागवावे, जनावरांसारखे मानावे असे आदेश या धर्मग्रंथाने दिले. इतर कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा या धर्मग्रंथाचा सर्वात जास्त पगडा समाजावर होता. त्यातूनच इथले समाजमन विषम व्यवस्थेला प्रमाण मानू लागले आणि स्त्री-शूद्र-अतिशूद्रांना गुलाम समजू लागले. स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र यांची लोकसंख्या 85 टक्क्यांच्या घरात जाते. इतकी मोठी लोकसंख्या अशा प्रकारे माणुसकीपासून वंचित ठेवून, लाचार आणि गुलाम ठेवून समाजाचे कोणते भले होणार आहे, हा विचार करून महात्मा जोतिबा फुले यांनी मनुस्मृती जाळली पाहिजे, असे उदगार काढले. पुढच्या काळात मद्रास प्रांतात रामस्वामी पेरियार आणि महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले.

हे सर्व खरे असले आणि त्या त्या वेळी करणे आवश्यक असले तरी आजही पुन्हा हेच केले पाहिजे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली त्याला आता 90 वर्षे उलटून गेली आहेत. हिंदू समाजात 1927 नंतरची तिसरी किंवा चौथी पिढी आज हयात आहे आणि तिचाही मनुस्मृती जाळण्यावर भर आहे! अशा किती पिढ्या आपण मनुस्मृती जाळणार आहोत? जे जाळून टाकायच्या लायकीचे आहे ते दरवर्षी आठवणीने जाळत बसण्यात काय अर्थ आहे? या सगळ्या प्रक्रियेत मनुस्मृती हा शब्द आपण इतक्या वेळा उच्चारतो की ती तिरस्काराची नसून प्रेमाची विषयवस्तू आहे की काय अशी शंका वाटायला लागते. जो तिरस्काराचा विषय असतो त्याचा उच्चारसुद्धा टाळला जायला हवा. पण आपण तर रात्रंदिवस मनुस्मृतीचा एखाद्या प्रेयसीसारखा आठव करत राहतो. हे मनुस्मृतीबद्दलचे छुपे आकर्षण तर नाही ना? पुरोगामी/डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अजूनही मनुस्मृतीच का आठवते? ती एकदा जाळून टाकलीय ना?

बाबासाहेबांनी मनुस्मृती जरूर जाळली, पण तो त्यांच्या चळवळीचा प्रारंभबिंदू होता, दरवर्षी करायचा उत्सव नव्हे आणि अंतिम टप्पा किंवा डेस्टिनेशन तर नव्हेच नव्हे! मनुस्मृती नष्ट केल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि नव्या पिढीच्या हातात बुद्धिझम नावाचा समर्थ पर्याय दिला. एखादी गोष्ट मुळापासून संपुष्टात आणायची असेल, कायमची विस्मरणात टाकायची असेल तर तिच्या जागेवर नवे बॅनर, नवी तत्त्वमूल्ये, नव्या निष्ठा आणि धारणा निर्माण कराव्या लागतात, हा ‘पोकळी-पर्याय’ सिद्धान्त आहे. पुरोगामी-डावी मंडळी असा पर्याय कधी देणार आहेत? का आणखी पाचपंचवीस वर्षांनीही त्यांचा कार्यक्रम मनुस्मृती जाळण्याचाच असणार आहे? चांगले पीक घ्यायचे असेल तर प्रथम त्या शेतातील तण काढावे लागते. उत्तम पीक घेण्याचा हा पहिला भाग असतो. त्या शेतात उत्कृष्ट प्रतीचे बीजारोपण करून त्याची मशागत करणे हा दुसरा भाग असतो. मनुस्मृती जाळणे हा बाबासाहेबांच्या क्रांतीचा नकारात्मक पूर्वार्ध होता. त्या क्रांतीचा सकारात्मक उत्तरार्ध 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर अवतरला. पुरोगामी लोक मात्र केवळ पूर्वार्धावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत! उत्तरार्धाचे काय? तण काढल्यानंतर ती शेतजमीन (नवे बीज न पेरता) तशीच मोकळी ठेवली तर तीत पुन्हा तणच उगवून येते. वारंवार मनुस्मृती जाळणे म्हणजे वारंवार तण उपटून काढणे! चांगले पीक कधी घेणार? त्यासाठी चांगले बीज कधी शोधणार?

यासंदर्भातला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग हा गोळीबंद पॅकेजसारखा आहे. त्याचा फक्त पहिला अर्धा भागच अनुसरला तर ‘काय नको आहे’ एवढेच समजेल. ‘काय हवे आहे’ हे समजून घ्यायचे असेल तर दुसरा अर्धा भाग लक्षात घेणे आणि तो निष्ठेने, डोळसपणे अनुसरणे आवश्यक ठरते. समाजजीवन किंवा लोकरहाटी केवळ नकारावर चालत नाही. स्वीकारावर चालते. स्वीकाराचा अपरिहार्य टप्पा म्हणून प्रारंभी काही नकार द्यावे लागतात. मनुस्मृतीला नकार हा त्यातला एक भाग आहे.

इथे एक मूलगामी प्रश्न उपस्थित करावासा वाटतो तो म्हणजे, मुसलमान किंवा ख्रिश्चन लोक मनुस्मृती जाळतात का? (वरकरणी हा प्रश्न भलताच बालिश वाटेल. पण तो तसा मुळीच नाही.) या प्रश्नाचे उत्तर सोपे असले तरी तेच फार महत्त्वाचे आहे. मुसलमान हे मुसलमान आहेत किंवा ख्रिश्चन हे ख्रिश्चन आहेत म्हणून ते मनुस्मृती हा काय प्रकार आहे आणि त्यात काय लिहिले आहे, याचा विचार करत नाहीत! त्यामुळे ते मनुस्मृती जाळण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते हिंदू नसतात, त्यामुळे त्यांनी हिंदूंच्या धर्मग्रंथांबद्दल काही भूमिका घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मनुस्मृतीबद्दल कसलीच भावना त्यांच्या मनात नसते. तिच्याशी त्यांचा संबंधच नसतो! मनुस्मृती हा विषय त्यांच्या निष्ठेच्या कक्षेबाहेरचा असतो. नेमके हेच मर्म लक्षात घेऊन पुरोगामी मंडळींनी जाळण्याच्या पातळीवर नव्हे, तर निष्ठेच्या पातळीवर मनुस्मृतीशी असलेला संबंध संपुष्टात आणला पाहिजे. एकदा का निष्ठेच्या पातळीवरचा संबंध तोडला की मग मनुस्मृतीची आठवण होण्याचे काहीच कारण असणार नाही आणि उठसूठ तिचे दहन करून तिला अकारण प्रसिद्धी देण्याची आवश्यकता उरणार नाही.

मनुस्मृतीला संविधान हा संपूर्ण-समग्र पर्याय नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. मनुस्मृती ही एकाच वेळी व्यक्तीजीवन आणि समाजजीवन नियंत्रित करत होती. त्यातल्या समाजजीवनाच्या भागापुरता आज संविधान हा पर्याय उपलब्ध झाला आहे. व्यक्तीजीवनाच्या भागाला पर्याय काय? संविधान व्यवस्थित अंगीकारले की मग बाकी काहीही करण्याची आवश्यकता नाही, असा विचार अनेकजण करतात. मात्र हा विचार अपूर्ण आहे. संविधानापलीकडेही माणूस आणि माणसाचे विश्व असते. त्याला धार्मिक-सांस्कृतिक-कौटुंबिक-खाजगी विश्व म्हणतात. या विश्वातील मनुस्मृतीच्या प्रतिगामी उच्छादाला पर्याय काय? बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला संविधान दिले आणि त्यानंतर सात वर्षांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्म दिला. संविधानाद्वारे त्यांनी उत्तम सार्वजनिक जीवनाची तत्त्वप्रणाली दिली. धम्माद्वारे उत्तम व्यक्तिगत जीवनाची मूल्यसरणी दिली. व्यक्तीला, समाजाला, देशाला फक्त संविधान पुरेसे आहे, असे त्यांनी मानले नाही. त्यापलीकडेही माणसाला धर्माची, संस्कृतीची गरज आहे हे त्यांनी जाणले आणि त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी सर्वोत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्याची खबरदारी घेतली.

मनुस्मृतीदहन केल्यानंतरची ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी डावे-पुरोगामी पार पाडणार आहेत काय? मनुस्मृती जाळल्यानंतर त्याऐवजी काय स्वीकारायचे आणि जीवननिष्ठा कशाशी जोडून घ्यायची हे ठरविणार आहेत काय? जोपर्यंत ही गोष्ट ते ठरविणार नाहीत तोपर्यंत त्यांना मनुस्मृतीच जाळणे भाग आहे. आणि मनुस्मृतीदहन ही आता कसलीही रिस्क नसलेली सोपी गोष्ट होऊन बसली आहे. आजकाल कुणीही उठतो आहे आणि मनुस्मृतीदहन करतो आहे. आम्ही अजूनही पुरोगामी आहोत, हे दाखविण्यापुरताच आता या कृतीचा उपयोग उरला आहे. पुरोगामीत्त्व हे नकारात्मक गोष्टीतून सिद्ध करण्यापेक्षा सकारात्मक कृतीतून सिद्ध केले पाहिजे. त्यात खरे शौर्य आहे. त्यात खरी जबाबदारी अंगावर घेण्याची धमक आहे. ते खरे भविष्याभिमुख होणे आहे. मनुस्मृतीदहन करून आपण भारतीय संस्कृतीमधली सर्वात वाईट गोष्ट निदर्शनास आणतो आणि तसे करण्याची आवश्यकताही आहे. परंतु जितकी ही आवश्यकता आहे, त्यापेक्षा जास्त आवश्यकता आपल्या संस्कृतीमधला बुद्धिझम नावाचा सर्वात उज्ज्वल ठेवा अधोरेखित करून तो स्वीकारण्याची आहे आणि हे मात्र आपण कटाक्षाने टाळतो. हा एक प्रकारचा अप्रामाणिकपणा आणि पक्षपातीपणा नव्हे काय? ही स्वत:चीच केलेली फसवणूक नाही काय? हा संभाव्य जबाबदारीपासून पळ काढण्याचा कातडीबचाऊ पवित्रा नाही काय? 25 डिसेंबर ही तारीख कसली आहे हे आपण बरोबर लक्षात ठेवतो, परंतु 14 ऑक्टोबर या तारखेला काय झाले, हे मात्र आपल्या ध्यानात राहात नाही, हे आपल्या विस्मरणशक्तीचे, अल्झायमरचे लक्षण आहे की बेजबाबदार दांभिकपणाचे? मागच्या काही वर्षांपासून 25 डिसेंबर रोजी मनुस्मृतीदहन करण्याऐवजी 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी जे काही घडले तो आदर्श समोर ठेवून संस्कृतीमधले सर्वात सुंदर संचित आपल्या मन-मेंदू-मुठीत सामावून घ्यायला असंख्य लोक नागपूरच्या दीक्षाभूमीवर उत्स्फूर्तपणे येत आहेत, ही खरी प्रामाणिक भूमिका आणि विधायक कृती म्हटली पाहिजे. मनुस्मृतीच्या आजारावरचा हाच कायमचा इलाज आहे…

(संदीप सारंग हे लेखक, पत्रकार आहेत)

9969864685

Previous articleसूर्यापेक्षा तब्बल २१५० पट मोठा तारा
Next articleमाध्यमांची फोकनाडबाजी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here