आदिम मातेचे स्तन आणि अस्मितांचे पान्हे…

-मुग्धा कर्णिक

आदिम मानवी समाजांत स्त्री ही जन्म देण्याची शक्ती असलेली म्हणून विशेष स्थान मिळवून होती. मदर गॉडेस किंवा मातृदेवता या सर्व खंड-उपखंडांतील प्राचीन इतिहासांतून, लोककथांतून दिसतात. या आदिम मातृदेवतांच्या प्रतिमांमध्ये त्यांच्या वत्सल पान्हा देणाऱ्या मोठ्या स्तनांचेच चित्रण असते. सहज जन्म देऊ शकणाऱ्या रुंद, मोठ्या मांड्या, जन्मदाती योनी आणि नवजातांचे पोषण करणारे स्तन हे सारे स्त्रीच्या मातृत्वशक्तीचा आविष्कार म्हणून ठिकठिकाणी सापडलेल्या प्रतिमांतून शिल्पित झाले आहे. स्तन हा मादीचा अवयव केवळ पुरुषाला आकर्षित करणारा असे मानणारे, स्तनांची पोषक शक्ती ही नवजन्म फुलण्यासाठी मूलभूत आहे हे विसरणारे मूर्खच सगळ्याच समाजांत आहेत. ते आदिवासींच्या पुढारपणाचे दावे करणाऱ्यांतही आहेत हे पाहून विषण्ण वाटते. कोणत्या मुद्द्यांवरून आदिवासी समाजाला जागवावे याचे भान सुटलेले हे सारे नेतृत्व आहे.
दिनकर मनवरांची ती कविता, एका नव्या अस्मितेच्या भडक बटबटीत राजकारणाचा कोंभ फुटायला निमित्तमात्र ठरली आहे इतकेच. न पेक्षा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात काय शिकवले जाते आणि काय शिकवले जात नाही याचा राजकारणी संघटनांचा फारसा संबंध नसतो. मुंबई विद्यापीठाने मागेही असल्याच संघटनात्मक हडेलहप्पीपुढे मान तुकवून रोहिंटन मिस्त्री यांचे ‘सच अ लॉन्ग जर्नी’ हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळले होते. आता पायंडा पडला म्हटल्यानंतर दिनकर मनवर यांची कविताही वगळली गेली यात नवल नाही. मनवर म्हणतात ते खरे आहे- सारा काव्यसंग्रहच वगळायला हवा होता… वेगळे लेखन पचवायची आमची क्षमताच नसेल तर फुळकवणी लेखनच वाढून द्यायला हवे ना. आमच्या मानेत मणके नसून रबर आहे म्हणू… आमच्या पोटात जठर नसून पिशवी आहे म्हणू आणि आमच्या मेंदूत मज्जाकेंद्रे नसून नुसतीच चरबी आहे म्हणू आणि मोकळे होऊ…
ही कविता वगळण्याच्या विषयावर जेवढे लिहिले गेले, त्याहून अधिक त्या विषयासंदर्भात रेणुका खोत नावाच्या लेखिकेने एका नग्न स्त्रीचे चित्र असलेली जुनी फेसबुक पोस्ट वर काढल्यावर तिचे खाते रिपोर्ट झाल्याचा विषय काही वृत्तपत्रांनी उचलला. तर फेसबुकवरच्या काही झोंडांनी तिच्यावरील वैयक्तिक राग ओकला ही एक गंमतच. एका बारीकशा घटनेने आपल्या समाजापुढे, आपल्या वैचारिकतेकडे, नैतिकतेकडे किती स्पष्ट स्वच्छ आरसा धरला जातो याचेच निरीक्षण करावे. किती क्षुद्र, हिणकस दिसतो आहोत आपण…
आता या निमित्ताने मुख्य राजकीय-सामाजिक विषयाकडे जाऊ या. आदिवासी. भारतभरातील तीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण ७०५(+) विभिन्न आदिवासी गट आहेत. या गटांमधील लोकसंख्या बारा कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. एकंदर लोकसंख्येच्या सुमारे ९ टक्के. अर्थातच हा गट एका निशाणाखाली आला तर प्रभावी मतपेढी म्हणून काम करू शकतो.
आदिवासींना- ज्यांचे या देशाचे मूळ नागरिकत्व किंवा प्रथम अधिकार नाकारण्यासाठी- वनवासी हे गोंडस फसवे नाव देण्याची चलाखी कोणी केली ते आपण जाणतोच. मालमत्तेच्या अधिकाराची संकल्पनाच नसणे, मौल्यवान धातू, रत्ने यांची फारशी फिकीर नसणे हे विशेष जगभरातील आदिवासी गटांत थोड्याफार फरकाने दिसतात. पण त्यांच्यात सामाजिक रचना-संरचना आहे, त्यांना सांस्कृतिक परंपरांचा इतिहास आहे. सामाजिक सत्ता, स्त्रीपुरुष संबंधांतील सत्ताकेंद्रे त्यांच्यातही आहेत. आणि संसदीय लोकशाहीतही त्या अंतर्गत रचना इतर गटांप्रमाणेच टिकून राहिल्या आहेत.
अनेक प्रांतांतून अलिकडे आदिवासी गटांचे ध्रुवीकरण किंवा एकत्रीकरण सुरू झाल्याची माहिती कळत रहाते. संसदीय लोकशाहीतून मिळालेल्या काही फायद्यांमुळे आदिवासी लोकसमूहांतील काही लोक मुख्य प्रवाहात येतात. त्यांना नागर संस्कृतीचे फायदे दिसतात. त्यातले काही आपल्यातल्या मागे राहिलेल्यांकडे वळून पाहातात, तर काही अजिबात ढुंकूनही पाहात नाहीत. एकंदर हलाखी, मागासलेपणा पाहून यातील काहींना समाजकारणाचे हेतू खुणावतात तर काहींना राजकारणाचे दरवाजे किलकिले झाल्याचे दिसतात. हे जसे इतर कुठल्याही धर्म, जात, पंथ गटांत होते, तसेच ते आता आदिवासी समूहांत होऊ लागले आहे. ही प्रक्रिया आदिवासींमध्ये इतरांपेक्षा उशीरा सुरू झाली आहे, पण सुरू झाली आहे हे नक्की.
अशा वेळी मागास वर्गांच्या बाबत जे आजवर बोलले गेले तेच आदिवासी समूहांच्या बाबतीतही बोलले जाऊ लागेल हे ओघानेच आले. म्हणजे उदाहरणार्थ- बघा आम्ही त्यांच्यासाठी इतके केले, त्यांना एवढी संधी दिली, सुविधा दिल्या तरी हे आता पुन्हा आमच्या विरुद्ध गेले. हा सूर स्वाभाविकतःच आळवला जाणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. ते काही अंशी योग्य वाटले तरीही आम्ही त्यांच्यासाठी केले ही भावनाच मुळात त्रुटित आहे. त्यांच्यात आपल्यावर अन्याय होत आल्याची भावना जागृत होत असेल, तर ते आपण आजवर केलेल्या कामाचे मोठे यशच मानावे लागेल. या भावनांचा अर्थच असा की आता त्यांना कुणीतरी हाताला धरून मुख्य प्रवाहात आणण्याची गरज उरली नसून ते स्वतःच्या पावलांनी मुख्य प्रवाहात येत आहेत. केवळ नोकऱ्या, इस्पितळे, अन्नपुरवठा, घरे त्यांना देणे आणि जगवणे म्हणजे त्यांना माणूस म्हणून जागे करणे नसतेच कधी. माणूस म्हणून आदिवासी समूह जागे होणे म्हणजे त्यांना आपल्या सामाजिक आणि राजकीय हक्कांची जाणीव होणे.
ही मनवरांची कविता मी वाचली. ती काही फार जागतिक दर्जाची थोर नाही. किंवा तिला तसे स्थान मिळण्याची सुतराम शक्यताही नाही. यात एक स्तनाचा उल्लेख आहे. तो कोणत्याही सावळ्या स्त्रीबाबत येऊ शकला असता. आदिम रंगाशी पाण्याचे आदिरंग जोडताना कवीने हे रचले. अनेक लेखक-कवी स्तनांच्या उपमा वापरतात, चित्रकार, शिल्पकार स्तन चित्रित करतात, शिल्पित करतात… कारण स्त्री-पुरुष अशा सर्वच मानवांना सृजनाच्या, कामप्रेरणेच्या या पोषणकर्त्या इंद्रियाचे आदिम आकर्षण आहे. अनेकदा कला-साहित्य प्रांतातील त्याचा शाब्दिक उल्लेख, रंगोल्लेख हा कुणाला अनावश्यक वाटेल, कुणाला सुंदर वाटेल -हा दृष्टीकोनातील फरक असू शकतो. पण स्त्री-स्तनाचा उल्लेख आला की अश्लीलअश्लील, अस्मिता अस्मिता म्हणून डुरक्या मारणे हे आपण स्वच्छ दृष्टीचे नसल्याचेच द्योतक आहे. किंवा मग आपले अंतस्थ होतू वेगळे आहेत याची साक्ष आहे.
या कवितेतील आदिवासी पोरीच्या उल्लेखाने आदिवासी लोकसमूह स्वयंप्रेरणेने उठून उभा ठाकला की सतत मतांसाठी चालबाजी करणाऱ्या, आणि वेचक घटना गळाला लावणाऱ्या इतर प्रस्थापित राजकीय संघटनांनी त्यांना यात जाणीवपूर्वक ओढले हे पाहायला हवे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने- ही काही फारशी अखिल भारतीय दिसत नाही- महाराष्ट्रातील काही दोनपाच आदिवासी समूहांपुरतीच ती मर्यादित आहे. पण त्यांनी या कवितेचे निमित्त करून कुठल्याही बनचुक्या हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षणवादी संघटनेच्या पठडीतली आऱोळी ठोकली आहे. स्तनाचा उल्लेख हा आदिवासी समाजात अश्लील समजला जात नाही, एवढे मला तरी नक्कीच माहीत आहे. मला हेही माहीत आहे, की कुठल्याही हायवेजवळच्या आदिवासी खेड्यांतल्या आदिवासी मुली सुरक्षित नाहीत. पण या ठोस विषयाभोवती कधी वादळ उठले नाही. मात्र कवितेतील काव्यात्म अशा शरीराच्या उल्लेखातून आदिवासी अस्मितेचे किंवा संस्कृती रक्षणाचे पान्हे फुटले.त्या पान्ह्यांतून भिजून निघायला हिंदुत्ववादी युवासेना तयारच होती. विद्यापीठे आणि साहित्य हे कोत्या बुद्धीच्या संस्कृतीरक्षकांचे कायमच सोपे लक्ष्य असते, तसेच ते इथेही ठरले.
अ.भा. आदिवासी विकास परिषद, छात्रभारती, श्रमजीवी या संघटनांनी या विषयावरून शक्तीप्रदर्शन केले पण मुख्यतः युवासेनेच्या दंग्याच्या भीतीने विद्यापीठाने मान टाकली हे त्यांनी विसरू नये. आणि आपण आदिवासी अस्मितेचा, अस्तित्वाचा गंभीर विषय असल्या पचपचीत मुद्द्यांवरून ऐरणीवर आणू नये हे लक्षात घ्यायला हरकत नाही. नाही तर अखेर आदिवासीही प्रस्थापित संस्कृतीरक्षकांच्या टाचांखालची गांडुळे बनतील.
आदिवासी लोकसंस्कृती अधिक मोकळी आहे… छाती भरभरून श्वास घेताना त्या संस्कृतीला अश्लीलतेच्या साखळदंडांत जखडण्याचा, भय दाखवण्याचा नतद्रष्टपणा करू नका.

(लेखिका इंडियन स्टडी सेंटर ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत)

[email protected]

Previous articleMe Too !बायकांनी बोललं तरी प्रॉब्लेम, नाही बोललं तरी प्रॉब्लेम.
Next articleहिंसा अहिंसा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.