आयआयटीयन्सचे असेही लग्नसोहळे!

संतोष अरसोड

     आयआयटीसारख्या उच्च शिक्षणाची शिदोरी जवळ असलेले दोन तरुण. वडिलांचं मन सामाजिक क्रांतीने अभिमंत्रित झालेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा पक्का पगडा मनावर असलेलं हे देवरे कुटुंब. अवतीभवतीचा कुरूप पसारा पाहून अस्वस्थ होणारा एक बाप आपल्या दोन्ही मुलांच्या मनाची मशागत करतो आणि मग सामाजिक भूमीतून तरारून येते परिवर्तनाचे पिक. वडिलांच्या मनात असलेल्या सामाजिक करुणेला मग कृतीशीलतेची जोड लाभते अन साकार होतात अनोखे विवाह सोहळे समाजाला प्रकाश फुलं वाटणारे. अमरावतीच्या देवरे परिवारात मागील दोन वर्षात पार पडलेले दोन्ही विवाह समारंभ समाजाला परिवर्तनाच्या प्रकाश वाटेवर नेऊन ठेवणारे ठरले आहेत.
मूळचे उंबरडा बाजार येथील सिद्धार्थ देवरे हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या संस्कारातून मोठे झालेले. त्यांचे वडील विश्वनाथ  हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कट्टर समर्थक. त्यांच्या रक्तारक्तात आंबेडकरी चळवळीचे अंकुर पसरलेले होते. वडीलांचा  हा वारसा सिद्धार्थ देवरे यांनी पुढे नेला. वनविभागात उच्च पदावर नोकरी करत असताना त्यांनी उमर्डाबाजार या आपल्या गावात सामाजिक कार्यास प्रारंभ केला. गावातील विहाराच्या बाजूस असलेल्या समाज मंदिरात वीस वर्षापूर्वी ‘नालंदा अभ्यासिका’ सुरू केली. या अभ्यासिकेमुळे गावामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होऊ लागलं. ही अभ्यासिका गावातील होतकरू मुलांसाठी आशेचा किरण ठरली. परिसरातील अनेक मुलं या ठिकाणी रात्रंदिवस अभ्यास करू लागली. सिद्धार्थ देवरे यांनी आपल्या वडिलांची तेरवी रद्द करून व सर्व अनावश्यक खर्च टाळून या अभ्यासिकेत पुस्तक व इतर सोयी करून दिल्यात. परिणामी 18 मुलांना शासकीय सेवेत जाण्याची संधी या अभ्यासिकेमुळे उपलब्ध झाली. दरवर्षी या ठिकाणी २६, २७ व २८ नोव्हेंबरला सिद्धार्थ देवरे विविध बौद्धिक उपक्रम घेत असतात.
या सर्वच उपक्रमांना सामाजिक पदर आहेत, वंचितांविषयीची एक वेगळी तळमळ आहे या उपक्रमांमध्ये. सिद्धार्थ देवरे इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी शिक्षण व सामाजिक कार्याला अधिक पुढे नेण्यासाठी आपल्या दोन्ही मुलांच्या विवाहाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रपुढे एक अनोखा आदर्श घालून दिला. मागील दोन वर्षात पार पडलेल्या त्यांच्या दोन्ही मुलांच्या विवाह सोहळ्याला त्यांनी ‘सामाजिक कृतज्ञता समारोह ‘ असे समर्पक नाव दिले होते. मोठा मुलगा अभय व छोटा स्वप्निल यांचे विवाह 3 जुलै 2016 व 8 एप्रिल2018  ला पार पडले. अभय हा आयआरएस असून स्वप्निल हा भारतीय रिझर्व बँक मुंबई येथे प्रबंधक आहे. दोन्ही मुलं आयआयटी झालेले आहेत.
आयटी दिल्ली येथून अभयने B. Tech. ची पदवी घेतली मात्र त्याला इंजिनियर ऐवजी प्रशासकीय सेवेत जाऊन सोशल इंजिनियरिंग करायची होती. B Tech च्या दुसऱ्या वर्षाला असताना अभयने यूपीएससीची तयारी केली अन सन २०१५  ला त्याने हा कठीण गड सर केला. अभय हा मुंबई येथे सहाय्यक आयकर आयुक्त आहे तर त्याची पत्नी प्रीती आयडीबीआय मध्ये सहाय्यक प्रबंधक आहे. दिनांक ३ जुलै २०१६  ला अभय व प्रीती कुंभारे नोंदणी पद्धतीने परिणय सूत्रात बांधले गेले. विवाह समारंभाच्या निमित्ताने देवरे कुटुंबियांनी सर्व परंपरांना फाटा देत खर्चाची बचत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला कुंभारे कुटुंबीयांनी सुद्धा पाठिंबा दिला. बचत झालेला खर्च आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दहा विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्महत्येच्या आगीत जळणाऱ्या शेतकरी कुटुंबांना आधार देऊन खर्‍या अर्थाने परिवर्तनाचे चक्र गतिमान करण्याचा हा निर्णय होता. या विवाह समारंभाच्या निमित्ताने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. सोबतच गाव खेड्यामध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून वाचनालयांना पुस्तक सुद्धा भेट देण्यात आली.
विवाह सोहळे सुद्धा आर्थिक षडयंत्र आहे, ते बहुजन समाजाने ओळखले पाहिजे हा विचार या सामाजिक कृतज्ञता समारोहाने अधिक उजागर केला. बँड ,फटाके , स्वरूची भोज ,रुसवे-फुगवे याला दूर सारत वंचितांच्या वेदनेवर फुंकर  घालणारा हा सोहळा अनेकांसाठी संस्मरणीय ठरला नव्हे प्रेरणादायी ठरला. शेतकऱ्यांच्या मनात आत्मविश्वासाचे बीजारोपण करणारा हा पेरणी समारंभ होता. आय आय टी चे उच्च शिक्षण घेतलेल्या आणि प्रशासकीय अधिकारी असलेल्या एका तरुणामध्ये हे सामाजिक भान यावे हीच खऱ्या अर्थाने नव्या सामाजिक क्रांतीची गर्भधारणा आहे. अमरावती येथील शेगाव नाक्यावर दिनांक ३ जुलै २०१६ ला पार पडलेल्या या सामाजिक कृतज्ञता समारोहात शेतकरी चळवळीचे अभ्यासक व आंदोलक चंद्रकांत वानखडे यांचेसह प्रा.डॉ.रवींद्र मुंद्रे, मधू उके , रमेश कटके ,डॉ.आशिष लोहे ,अर्जुन ठोसरे यांचेसह सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील तथा शेतकरी चळवळीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत वानखडे यांनी उपस्थितांसमोर या विवाह सोहळ्याचे सामाजिक बंध व शेतकरी प्रश्न उलगडून दाखवले. अनेकांना नवी प्रेरणा देणारा हा विवाह सोहळा होता.

      सप्नीलचा विवाह अनाथालयात
………………………………………….
सिद्धार्थ देवरे यांचे द्वितीय चिरंजीव स्वप्निल यांचा विवाह सुद्धा समाजासाठी एक अनोखा आदर्श ठरला आहे. रविवार दिनांक ८ एप्रिल २०१८ ला अमरावती परतवाडा रोड वरील नया अकोला येथील बाल अनाथाश्रमात स्वप्नील व शीतल यांचा विवाह पार पडला. अभय च्या लग्नात शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यात आली तर स्वप्नील च्या लग्नात अनाथांचे दुःख कवेत घेण्यात आले. नया अकोला येथील हे बाल अनाथ आश्रम म्हणजे वंचित लेकरांचा हक्काचा आधार. या ठिकाणी जवळपास सव्वादोनशे अनाथ मुलं राहतात. मायच प्रेम अन बापाचे छत्र हरवलेली ही मुलं या अनाथाश्रमात आपल्या भविष्याची सोनेरी किरण शोधत असतात. या अनाथाश्रमात पार पडलेला हा विवाह सोहळा त्या अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा होता. आपल्याही दुःखावर फुंकर घालणारा कोणीतरी आहे ही भावना त्या अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. क्षणभरासाठी सर्व अनाथ बालके आपलं दुःख विसरली होती. यावेळी या बालकांना दप्तर, कंपास ,कपडे , वही आणि  पुस्तके यांचे वाटप करण्यात आले. दोन हजार लोकांच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला डॉ. दिलीप काळे, वारांगनाच्या मुलांसाठी काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक राम इंगोले, मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक  अविनाश दुधे, सत्यशोधक फाउंडेशनचे डॉ.मनोहर आंडे, वैभव बिजोरीकर ,रमेश कटके यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते. या अनाथ आश्रमाला डॉक्टर आंडे यांनीसुद्धा मदतीचा हातभार लावला. तसेच देवरे कुटुंबीयांतर्फे रामभाऊ इंगोले च्या समाजकार्याला हातभार म्हणून 25 हजाराची मदत ही देण्यात आली. हा विवाह सोहळा अनाथांच्या आयुष्यामध्ये आनंदाची पेरणी करणारा होता. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना अर्थसंपन्न लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे संदेश देणारे हे दोन्ही विवाह सोहळे होते. या विवाह सोहळ्याने अनाथ दुःखाला आपल्या संवेदनेची कूस दिली. माणुसकीचा गहिवर ओसंडून वाहणाऱ्या या  दोन्ही विवाह सोहळ्यानी सोवळेप्रधान संस्कृतीला जबरदस्त हादरा दिला आहे. ज्या परंपरांनी समाजाला आंधळेपण येत असतं त्या परंपरा शिक्षित माणसांनी नाकारल्या पाहिजे हाच तर खरा शिक्षणाचा हेतू असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटले होते. या दुधाला प्राशन करून त्याचा  सकारात्मक वापर करणारे देवरे कुटुंबीय आणित्यांचे दोन्ही सुपुत्र आणि सुना एका प्रबोधन कार्याचे मात्र साक्षीदार ठरले.

(श्री सिद्धार्थ देवरे यांचा मोबाईल-9970847391 अभय देवरे -08698513979)

(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे असोसिएट एडिटर आहेत)

9623191923

Previous articleभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही!
Next articleपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here