आराधना: मेरे सपनों की रानी कब आयेगी तू..

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

…………………………….

मी पार १९५० च्या दशकात इतकी वावरले की वाचकांना माझं वय शंभर वगैरे असावं असं वाटायला लागलं असावं. त्यामुळे यावेळी ‘आराधना!’ माझ्या अगदी तेरा-चौदाच्या नवथर वयातला हा सिनेमा. पण तेव्हाही मला अक्कल होती. मी राजेश खन्नाच्या प्रेमात पडले नाही, अमिताभची वाट पाहत राहिले! पण तरी ‘आराधना’च्या मात्र प्रेमात पडलेच.

पुन्हा ‘आराधना’ पाहतांना त्याची कारणं कळतायत. तरुणांच्या मनाला भावेल असं सगळं होतं ‘आराधना’मधे. खळीदार काजूकतलीसारखी शर्मिला, ताजगी असलेला स्टाईलभाय राजेश खन्ना, मधुर गाणी, आलोक दासगुप्ता यांचं देखणं छायाचित्रण आणि या सगळ्यावर फिरलेला शक्ती सामंतांचा हात.

‘मेरे सपनों की रानी’मधे एकमेकांचं ओझरतं सुभग दर्शन झाल्यावर, प्रत्यक्ष भेटीच्या वेळी वंदनाने (शर्मिला) अरुणवर (राजेश खन्ना) बालदीभर पाणी टाकणं, त्याच्या डाव्या हाताला खरचटलेलं असतांना उजव्या हाताला बँडेज बांधणं, त्याच्या कोटाला इस्त्रीने सुकवून देणं, मग अचानक फळबाजारात भेटणं, हे सारं गोड वाटायचं. ‘सरकायले खटीया’ म्हणणारी ‘डायरेक्ट मेथड’ची नायिका अजून यायची होती. त्या काळात नायिका, ‘जरा देखो सजन, बेईमान भंवरा कैसे मुस्काये’ असे आडूनआडून सिग्नल द्यायच्या.

‘आराधना’ ही पूर्णपणे प्रेमकहाणीच. प्रियकराच्या मृत्युनंतर त्याचं स्वप्न उराशी कवटाळून, टक्केटोणपे खात, उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या एका वफादार प्रेयसीची, प्रेमळ मातेची, त्यागमूर्ती स्त्रीची कहाणी. या तिन्ही रूपात शर्मिलाने गहिरे रंग भरले. तिची तरुण प्रेमिका जशी भुरळ घालते, तशी तिने साकारलेली वयस्कर आई पण आतड्याला पीळ पाडते. किंबहुना, बंगालीतून हिंदीत आलेली ही सुस्वरूप अभिनेत्री फक्त शो-पीस नाहीये, हे दाखवणाऱ्या भूमिका शर्मिलाला तरुण वयात फार कमी मिळाल्या, त्यातली ही ‘वंदना’ महत्त्वाची. सचिन भौमिक यांनी लिहिलेल्या या सिनेमात ‘Magic Moments’ ची रेलचेल होती. पूर्वार्धात नायक-नायिकेचा प्रणय जेवढा बहारदार होता, उत्तरार्धात कथेला आलेलं नाट्यपूर्ण, करुण वळण तेवढंच चटका लावणारं होतं. त्या काळात तरुण वयात डोक्यावर पांढऱ्या केसांचा विग चढवायला भलेभले नाराज असायचे, (अपवाद संजीव कुमार!) पण शर्मिलाने ते आव्हान स्वीकारलं आणि यशस्वी करून दाखवलं. तरुण नायिका साकारतांना तिच्या खळ्या जितकं मोहात पाडायच्या, तितक्याच तिच्या वयस्कर रूपातल्या सुरकुत्या बोलल्या.

उपेक्षितेचं जीवन जगणारी कारूण्यमूर्ती वंदना, प्रियकराच्या आठवणीने विकल झालेल्या चेहऱ्यावरचे थरथरणारे ओठ, डोळ्यात थिजलेले अश्रू आणि आसमंतातून झिरपणारा किशोरकुमारचा आलाप. सारं काही त्या काळातल्या छापाचं, पण तरी हवंहवंसं वाटणारं. शर्मिलाच्या मानाने राजेशला (दुहेरी भूमिका असूनही) वाव कमी होता. नंतर हास्यास्पद झालेले त्याचे ठुमके ‘आराधना’त बरे वाटत होते. त्याचा वक़ूब तितपतच होता, तो त्याने उत्तम वठवला. सुभाष घई एकदा म्हणाला होता, “अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी तुमच्याकडे नव्वद टक्के नशीब आणि दहा टक्के कष्ट असले तरी पुरतात. पण एकदा शिरकाव झाला की मग मात्र टिकण्यासाठी नव्वद टक्के कष्ट करावे लागतात, नशीब दहा टक्के पुरतं!” त्या नव्वद टक्के नशिबाच्या जोरावर राजेश खन्ना सिनेमात आला. पण त्याचा एक काळ होता, त्याने एक जमाना गाजवला हे अमान्य करून नाहीच चालणार. त्याची सुरुवात ‘आराधना’त झाली. पहाडी सन्याल, सुजीतकुमार, मदनपुरी अमुकतमुक आपापल्या हातखंडा भूमिका करून गेले. अरे हो, सुभाष घईने पण ‘आराधना’त एक छोटी भूमिका केलीये.

विशेष उल्लेख करायचा तो अशोक कुमार आणि फरीदा जलाल यांचा! “पहली बात, बिवीसे वादा करो तो वो पूरा करो और दुसरी बात, बिवीसे वादा ही न करो” असे नामचीन सल्ले देणारा, एअरफोर्समधला जिंदादिल अधिकारी अशोक कुमारने बड्या इत्मिनान से रंगवलाय. काही कलावंत पडद्यावर नुसते आले तरी, नटराजाने त्यांच्याभोवती रेखलेल्या वलयात प्रेक्षक ओढला जातो. अशोक कुमार त्यातला! तो प्रेक्षकाचं बोट न धरता त्याला आपल्यामागे चालायला भाग पाडतो. ‘आराधना’त त्याची भूमिका लहानशी आहे, पण बडी प्यारी आहे.

दुसरा उल्लेख फरीदा जलालचा. दुसऱ्या राजेश खन्नाची, म्हणजे सूरजची अल्हड आणि चुरूचुरू बोलणाऱ्या प्रेयसीच्या रुपात ठेंगणीठुसकी फरीदा जलाल, बागों में बहार है, गात बहार आणते.

‘आराधना’विषयी लिहायचं म्हणजे त्यातल्या संगीताबद्दल खूप लिहायला हवं. आजही ‘आराधना’ आठवतो तो त्यातल्या गाण्यांमुळेच. माझा कल अभिनयापेक्षा संगीताकडे जास्त असल्यामुळे, मला पहिल्यापासून रफी अतिशय आवडायचा. पण किशोरकुमार आवडत नव्हता असा त्याचा अर्थ नाही. किशोरचा पहाडी बेस असलेला आवाज खर्जात गेला की काळजात मिठी कळ येते हे मी त्याच्या जुन्या गाण्यात अनुभवलेलं होतं. पण ‘आराधना’पर्यंत किशोर गुम झालेला होता. पूर्वी त्याने एसडीबरोबर खूप काम केलं होतं. ‘आराधना’मधे एसडीचा प्रमुख सहाय्यक आणि साऊंड रेकॉर्डीस्ट असलेल्या पंचमचा तर तो लाडकाच होता. राजेश खन्नासाठी नवीन आवाज हवा होता. तिथे किशोरची वर्णी लागली. किशोरकुमारने ‘हे.. हे..’ अशी लकेर हवेत फेकत ‘आराधना’मधून जे पुनरागमन केलं ते इथं टिकण्यासाठीच. ‘कोरा कागज था ये मन मेरा’ त्याच्यासाठी शुभलक्षणी ठरलं. स्वत: पंचमने तर्ज बांधलेलं ‘गुनगुना रहे हैं भंवरे’ मात्र व्यावसायिक सुरक्षेचा विचार करून रफीकडून गाऊन घेतलं. तेही अतिशय गोड आहेच. पण लोगों की जुबान पे चढलं किशोरने गायलेलं ‘कोरा कागज’ आणि ‘रूप तेरा मस्ताना!’ ही दोन गाणी किशोर कुमारच्या ‘सेकंड इनिंग’च्या पहिल्या दोन पायऱ्या ठरली. ‘कोरा कागज था ये मन मेरा’मधला सुरुवातीचा नर्ममुलायम आलाप खास किशोरदाचा ‘टच’ घेऊन आला आणि रसिकांच्या मनात घुमत राहिला. ‘मेरे सपनों की रानी’मधला पंचमने वाजवलेला माऊथ ऑर्गन आणि ‘रूप तेरा मस्ताना’मधला सेक्साफोन गाजला. (‘आराधना’च्या आधी शक्ती सामंतांच्याच ‘काश्मीर की कली’मधे ‘है दुनिया उसीकी जमाना उसीका’ या गाण्यात ओ.पी. नय्यरने सेक्साफोनचा बेहतरीन इस्तेमाल केला होता. हे सांगण्याचा मोह आवरलाच नाही, कारण, ‘है दुनिया उसीकी’ म्हणजे रफीच्या अप्रतिम Romantic Sad Songs पैकी एक आहे!) ‘रूप तेरा मस्ताना’ हे गाणं कुठेही ब्रेक न घेता, एका टेकमधे सलग चित्रित केलं होतं, ही पण एक कमालच.

 मणिपूर राज्यातल्या एका छोट्या रियासतीचा हा राजकुमार, सचिनदेव बर्मन, आपलं भटियाली आणि बाऊल संगीत घेऊन १९४७ साली मुंबईत आला आणि शेवटच्या दिवसापर्यंत सात सुरांतून अनगिनत मदिरमधुर तर्ज बांधत राहिला. वैविध्यपूर्ण, सुश्राव्य संगीताचं एक भव्य दालन त्याने सिनेसंगीताच्या चाहत्यांसाठी खुलं केलं. वार्धक्याने खारकेसारखा खंक झालेला एसडी, त्या वयात देखील तरुणांना खुळं करणारं संगीत देत होता ही कमालच! ‘दिया टूटे तो है माटी, जले तो वो ज्योती बने’सारखे साधे, समर्पक आणि चर्रकन चटका लावणारे शब्द वापरणारा आनंद बक्षीसारखा गीतकार ‘आराधना’ला लाभला आणि ‘चंदा है तू, मेरा सूरज है तू’ हे त्यामानाने कमी महत्त्वाचं गाणंही, त्यातल्या गोडव्यामुळे लोक पुन्हापुन्हा ऐकू लागले. खोल दरीत घुमणाऱ्या, व्यथित मनाच्या गहराईत घुसमटणाऱ्या, वादळासारख्या घनगंभीर आवाजात स्वत: एसडीने गायलेलं, ‘सफल होगी तेरी आराधना, काहे को रोये’ हे गाणं आजही डोळ्यात पाणी उभं करतं.

‘आराधना’ म्हणजे किशोरदाचं प्रसन्न पुनरागमन..

‘आराधना’ म्हणजे पावसाळी रात्री ब्लँकेट नेसलेल्या शर्मिलासाठी राजेशने गायलेलं ‘रूप तेरा मस्ताना…’ आणि त्यातले मनाची तार झन्नकन छेडणारे सेक्साफोनचे सूर..

‘आराधना’ म्हणजे शर्मिलाने साकारलेली तरुणी आणि वृद्धा ही दोन परस्परविरोधी रूपं..

आणि हो, ‘आराधना’ म्हणजे राजेश-शर्मिलाच्या चोरट्या प्रेमाच्या अफवा..

 या साऱ्यासह ‘आराधना’ निहायत खूबसूरत होता! हिंदी सिनेमा अजून मांसल झालेला नव्हता. नायक-नायिका जवळ आले की दोन फुलंच दाखवली जायची. पण म्हणूनच त्या रोमान्समधे फुलांचे रंग, सुगंध आणि नजाक़त असायची.. असं मानणारा एक वर्ग आजही हयात आहे.

‘आराधना’ला बेस्ट फिल्म, बेस्ट हिरॉईन आणि किशोरदाला बेस्ट पुरुष गायकचं अवार्ड मिळालं. त्या काळात पुरस्कार विकत नाही मिळायचे, त्यासाठी चांगलं कामच करावं लागायचं.

एका विशिष्ट वर्गाला खेचून थेटरात आणण्याची किमया शक्ती सामंतांना साधली होती. ‘आराधना’ हा त्यांच्या किमयेला लाभलेला सुगंधच!

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleकोबाड गांधींच्या तुरुंगातील आठवणी
Next articleफडणवीसांचा रात्रीस खेळ चाले…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.