महेश भट्ट यांच्या व्यक्तिगत आयुष्यावरचा हा चित्रपट आहे, असाही प्रचार त्या काळी झाला. ‘मैनें प्यार किया’च्या फ्रेश जोडीने केलेल्या ‘रेकॉर्डब्रेक’ कमाईमुळे ‘आशिकी’साठी फ्रेश चेहराच महेश भट्ट यांना हवा होता. युनिसेफकरिता काम करीत असलेल्या इंदिरा राय यांच्या घरी कामानिमित्त गेलेल्या महेश भट्ट यांनी दरवाजा उघडणारा त्यांचा पुत्र राहुल रायला ‘हीरो’ म्हणून फायनल केले. कुठल्यातरी पार्टीत गाठभेट झालेली अनू अगरवाल त्यांची ‘नायिका’ ठरली. सिनेमाचे फ्रेश चेहरे अशा अचंबित करणाऱ्या प्रसंगातून पडद्यावर आले. सिनेमा रिलीज करताना नवोदित हीरो-हीरोइनचे चेहरे पोस्टरसाठी योग्य वाटत नव्हते, म्हणून त्यावर ‘कोट’ (जॅकेट) टाकून त्यांना लपविण्यात आले. त्यालाही प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. चेहरे लपलेल्या या ‘कोट’ पोझवरही रसिकांनी भरभरून प्रेम केले. प्रेक्षकांना आवडलेल्या डायलॉग वा गाण्यासाठी पडद्यावर पैसे फेकण्याचा तो सुवर्णकाळ होता. प्रेक्षकांचे प्रेम मोजण्याचे ते एक मापन होते. प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या, चीत्कार व पडद्यावरील फेकलेले चिल्लर पैसे सिनेमाचे यश-अपयश ठरवायचे. ‘आशिकी’ या फेकाफेकीच्या बाबतीत ‘श्रीमंत’ चित्रपट ठरला.
‘आशिकी’ सिनेमाने प्रेक्षकांच्या अंतरंगात प्रवेश केला होता. प्रेक्षकांना भावविश्वात घेऊन जाण्याची यशस्वी कामगिरी चित्रपटाने केली होती. चित्रपटांशी समरस होण्याचा तो काळ होता. आपल्या आयुष्यातील व्यथा, वेदना, दु:खे विसरून चित्रपटात स्वत:ला बघणारी ती पिढी होती. भावना, संवेदनांचे माहात्म्य सांगणारा काळ होता. चित्रपट नावाचे गारुड डोक्यावर बसलेले जनताजनार्दन होते. चित्रपटांच्या कथा व त्यातील ‘सीन’ तोंडपाठ असण्याचे ते दशक होते. चित्रपटाच्या कथेवरील भाष्य व चर्चा हा आवडीचा विषय होता.‘आशिकी’मधील राहुल रायच्या विचित्र हेअर स्टाइलची त्या काळी मोठी क्रेझ होती. सगळ्या सलून दुकानदारांकडे या हेअर स्टाइलची प्रचंड मागणी वाढली होती. ‘आशिकी’ या सिनेमाविषयी अनेकांकडे किस्से व कहाण्यांचा भरमार मसाला निश्चित असावा. मागील आनंददायी आठवणींना उजाळा देताना चेहºयावर फुललेले हसूसुद्धा आजच्या कोरोनाकाळातील अस्वस्थेवर औषध ठरू शकेल. सिनेमा जगणारी ती पिढी आता वार्धक्याकडे झुकू लागली आहे; परंतु ‘आशिकी’ची तिशी साजरी करताना आपल्या तारुण्याचा प्रवास मनमुरादपणे लुटून येईल, एवढे मात्र निश्चित!