आसाम आणि प. बंगालमधे सत्तापालट  ?

-प्रवीण बर्दापूरकर  

लोकशाहीतले विरोधाभास सध्या आपला देश अनुभवतो आहे . कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं देशात उच्छाद मांडला आहे . औषधं  , ऑक्सिजन , बेडसचा तुटवडा आहे . बेड न मिळाल्यामुळे लोक रस्त्यावर , रिक्षात , कारमध्ये प्राण सोडत असल्याची दृश्य प्रकाश वृत्त वाहिन्यांवर पाहायला मिळत  आहेत . अंत्यसंस्कारसाठी रांगा लागल्या आहेत…एकाच सरणावर ४०-५०-७० पार्थिवांवर अंत्यसंस्कार होत असल्याचं देशातल्या अनेक शहरात पाहायला मिळत आहे . परिस्थिती , शब्दांत व्यक्त  करता येणार नाही  अशी अतिशय  भयावह आहे आणि दुसरीकडे देशातल्या पाच राज्यात निवडणूक प्रचार जोरात आहे . देशाच्या अन्य भागातच कशाला महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभा  पोट निवडणुकीचाही प्रचार जोरातच आहे . तृणमूल काँग्रेस , आसाम गण परिषद , राष्ट्रवादी आणि भाजप आशा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . हा धुरळा उडवताना तोंडाला मास्क बांधणं  , सोशल डिस्टटिंग पाळणं अशा एक ना अनेक सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचा पंढरपूर पासून ते गुवाहाटीपर्यन्त नेत्यांनीच फज्जा उडवलेला आहे . असा हा फज्जा उडवण्यात कोणताही राजकीय पक्ष मागे नाही आणि हे म्हणतात लोकांनी नियम पाळावेत , हाही  विरोधाभासच आहे !

सध्या किमान महाराष्ट्रात तरी जवळजवळ एकआड घरटी किमान एक तरी कोरोनाचा रुग्ण आहे ; दर दिवशी कुणी जीवाभावाचा कोरोनाला बळी पडल्याच्या वरता येतात . लोक मरणाच्या छायेत जगत आहेत . हे कमी की काय  म्हणून कोरोनाची तिसरी लाट देशाचे  दरवाजे ठोठावत आहे . तिसरी लाट किती भयानक असेल याचा अंदाज अजून आलेला नाहीये पण , हे सगळं वातावरण अतिशय सुन्न करणारं आहे . महाराष्ट्रात संचारबंदी जारी झालेली आहे आणि रस्ते बर्‍यापैकी ओस पडलेले आहेत , श्रवत्र सन्नाटा आहे . दर पंधरा-वीस मिनिटांनी रुग्णवाहिकेच्या सायरनचे शांतता चिरत येणारे आवाज जीवाची कालवाकालव करतात . हे असं एकीकडे वातावरण आणि दुसरीकडे म्हणे लसीकरणाचा उत्सव ( हे तर मरणाचे सोहळेच नाहीत का ? ) काय आणि निवडणुकांचा प्रचार काय…किती विरोधाभासी सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत आपण जगतो आहोत , हे अनुभवतांना काळीज अक्षरश : कुरतडतं…जीव तीळतीळ तुटतो…या निवडणुका पुढे ढकलता आल्या नसता का हा प्रश्न गैरलागू आहे कारण ‘निवडणुका आवडती सर्व राजकारण्यांना’ अशी स्थिती आहे .

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची  रणधुमाळी आता बहुतेक संपत आलेली आहे . देशाचं लक्ष प्रामुख्यानं आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांवर आहे . तीन आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालवर लिहितांना ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेस सत्तेत येईल आणि भाजप प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पश्चिम बंगालमध्ये उदयाला आलेला असेल असं मत मी व्यक्त केलेलं होतं  पण , ती परिस्थिती आता तशी राहिलेली नाहीये हे  स्पष्टपणे तसं सांगून टाकायला हवं . माझे जे काही स्त्रोत आहेत त्यापैकी काही अगदी स्पष्टपणानं सांगताहेत की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव निश्चित आहे . नंदिग्राम मतदार संघातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत . नंदिग्राम मतदार संघातलं मतदान संपल्यावर एका ज्येष्ठ स्नेह्याचा एसएमएस आला , “Nandigram fort is grounded today ! “ . तिकडे असलेले अनेक  मित्र , स्नेही आणि स्त्रोत अशाप्रकारचे संकेत देत आहेत . वरिष्ठ राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात “TMC can lose Bengal” असे एसएमएस फिरायला लागले आहेत . त्यात आणखी एक बाब म्हणजे मतदानाची टक्केवारी अतिशय वाढलेली आहे . कदाचित पश्चिम बंगालच्या आजवरच्या निवडणुकांच्या इतिहासात मतदानाची टक्केवारी इतकी वाढलेली नसावी . अर्थात आमच्या मतदारांना मतदान करु दिलं जात नाही , असं ममता बॅनर्जी तरी म्हणतायेतच पण , त्यांचं म्हणणं तितकसं खरं नसावं किंवा त्यात मुळीच तथ्य नसावं , हेच ही मतदानाची आकडेवारी सांगतेय . ( ममता बॅनर्जी यांचा तो कांगावाही असू शकतो कारण ती त्यांची सवय आहे ! )  हे वाढलेलं मतदान कुणीकडे जाणार तसंच पश्चिम बंगालमध्ये अतिशय विस्कळीत असणारे डावे पक्ष आणि काँग्रेसचं मतदान कुणाकडे वळणार याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झालेली आहे .

ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने थयथयाट करताहेत त्या काही तृणमूल काँग्रेससाठी शुभ संकेताच्या ओल्या रेषा नाहीत , हे स्पष्टच आहे . तरीही जी काही माहिती अन्य काही स्त्रोतांकडून  पश्चिम बंगालमधून मिळते आहे त्यानुसार आताच्या घटकेला असं वाटतं की , ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेसला निसटतं का होईना बहुमत मिळेल आणि भाजप प्रमुख विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात आलेला असेल . जे स्त्रोत तिकडून माहिती देताहेत त्यात भाजपचा हा आकडा शंभर अधिक–उणे असा आहे . हे जरा लक्षात घेतलं तर पश्चिम बंगालमध्ये स्थिर सरकार येणं कठीण आहे . म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचं सरकारवर सत्तारुढ झालंच तरी त्यावर अस्थिरतेचं सावट राहिल . भाजप ‘ऑपरेशन लोटस’ करुन पश्चिम बंगालमधील सत्ता ताब्यात घेईल , अशी शक्यता दिसते आहे .

ते काहीही असो एक मात्र खरं , निवडणुकीच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत जे वातावरण पश्चिम बंगालमध्ये होतं ते आता तसं राहिलेलं नाही . ममता बॅनर्जी या तशा एकट्या पडलेल्या आहेत किंवा त्यांनी स्वत:ला एकटं पाडून घेतलेलं आहे असंही म्हणता येईल . देशातल्या विविध भागातल्या , ज्या सुभेदारांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलेला होता त्यापैकी कुणीही त्यांच्या मदतीला गेललं नाही . मी मागच्या लेखातच म्हटलं होतं त्यापैकी कुणी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला  जाणारच नाही कारण त्यापैकी  कुणाचीही किंचितही ताकद त्या राज्यामध्ये नाहीये आणि ते तसंच घडलेलं आहे . या प्रतिपादनाला अपवाद शरद पवार अपवाद आहेत . शस्त्रक्रिया आणि प्रकृती अस्वास्थ्यमुळे ते काही महाराष्ट्र सोडू शकले नाहीत . परंतु , आपल्या ‘मूहं बोल्या’ बहिणीच्या मदतीलाही न जाणारे महाराष्ट्रासकट अन्य राज्यातील नेते यानिमित्ताने किती तोंडदेखला व तकलादू पाठिंबा देतात ते समोर आलेलं आहे . ईकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांनी मात्र अतिशय जोरदार मोर्चेबांधणी पश्चिम बंगालमध्ये केलेली आहे . ही मोर्चेबांधणी सत्तेमध्ये परावर्तित होते की नाही हे आता लवकरच समजेलच . काही  लोक म्हणतात त्याप्रमाणे , वारे फिरु लागलेले आहेत . ते कोणाच्या तंबूत जाणून स्थिरावतात ते बघायला हवं .

दुसरं राज्य आसाम . आसाममध्येही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापर्यंतचा जो अंदाज होता त्याप्रमाणे भाजप आणि आसाम गण परिषदेची युती सहज पुन्हा सत्ता प्राप्त करेल असं म्हटलं जात होतं . विविध पाहण्यांचे अंदाजही तसेच येत होते पण , आता त्या परिस्थितीत बराच फरक पडलेला आहे . जी काही माहिती हाती येत आहे त्यातून भाजप बहुमताच्या किंचित का असेना जवळपास असेल किंवा निसटतं असं बहुमत भाजपाला मिळालेलं असेल असं दिसतयं . याचं कारण कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील महाजोत आघाडीनं आसाममध्ये मोठं आव्हान भाजपासमोर उभं केलंलं आहे पण , इथेही लढाई विषम आहे . भाजपच्या तुलनेत महाजोत आघाडीकडे निवडणूक  लढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘साधन  सामग्री’ची कमतरता आहे . काँग्रेसकडून राहुल गांधी आणि एक दोन मोजके नेते पूर्व भारतातल्या निवडणुकांत सक्रिय आहेत .आसाममध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत महाजोत या आघाडीत एकूण दहा पक्ष आहेत . त्यापैकी बोडो लॅण्ड पीपल्स फ्रंट आणि ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट हे दोन प्रमुख आहेत . यापैकी बोडो लॅण्ड पिपल्स फ्रंट गेल्या निवडणुकीत भाजपसोबत होता . यावेळेस तो काँग्रेससोबतच्या आघाडीसोबत सहभागी झालेला आहे . तो एक भाजपाला झटकाच आहे . कारण आसामच्या काही भागांमध्ये बोडो लॅण्ड पिपल्स फ्रंटचं चांगल्यापैकी वर्चस्व आहे . त्यामुळे सध्या महाजोत आघाडी जरा जोरात दिसते आहे . ही आघाडी ५० ते ६० च्या दरम्यान जागा मिळवू शकेल तर भाजप आघाडीला ६० ते ७० जागा मिळतील असे अंदाज व्यक्त केले जाऊ लागले आहेत .  हेच कल दाखवत सट्टा मार्केटही तेज आहे . असं हे एकंदरीत वातावरण आसामात आहे .

या निवडणुकांचे निकाल भाजपाच्या पुढील निवडणुकीच्या रणनीतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत म्हणून  येनकेन प्रकारे भाजपा तेथे सत्ता राखण्याचा प्रयत्न करेल याबद्दल शंकाच नाही . ईशान्य भारतात ज्या २५ लोकसभेच्या जागा आहेत , त्यापैकी एकही जागा एकेकाळी भाजपाच्या ताब्यात नव्हती . २०१४ च्या निवडणुकीत लोकसभेच्या १० जागा भाजपानी जिंकल्या . २०१९  च्या निवडणुकीत ती संख्या १८ वर पोहोचली . पश्चिम बंगालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं असंच नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे . त्यामुळे पश्चिम बंगालवर एकदा जर भाजप वर्चस्व प्रस्थापित करु शकला तर देशाच्या राजकारणाची बरीच समीकरणं बदलतील , भाजपची मुळं आणखीन मजबूत होतील हे नक्की .

आत्ताच्या म्हणजे एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात मिळणार्‍या माहितीनुसार सत्ता बदलाचा कौल मतदारांनी दिला तर ममता बॅनर्जीं यांचं काय होणार हा प्रश्न राहील . नंदिग्राममधून त्या निवडणूक हरल्या तर तो फार मोठा धक्का त्यांना , त्यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या सर्व विरोधकांना असेल यात शंकाच नाही ; तृणमूलला लागलेली गळती आणखी वाढेल हे निश्चित . पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची सत्ता गेली तर देशातल्या भाजप विरोधकांचं तर अवसानच गळेल . पश्चिम बंगालमधलं पत्रकार मित्र सांगतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री झाल्यावर जो एक समजंसपणा आणि जे प्रौढत्व यावं लागतं , जो एक व्यापक दृष्टिकोन यावा लागतो त्याचा ममता बॅनर्जींमध्ये अभाव आहे . ममता बॅनर्जी अजूनही युवक काँग्रेसच्या नेत्या असल्यासारख्या उतावीळ किंवा डाव्या आघाडीविरुद्ध रस्त्यावर उतरुन लढणाऱ्या ( Street  fighter ) नेत्या असल्याच्या आविर्भावात मुख्यमंत्री झाल्यावरही  वावरत असतात . त्यांचं नेतृत्वही तसं एकारलं आणि एककल्लीच आहे . याचं उदाहरण देतांना भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत एक मोट बांधायला पाहिजे होती , हे दिलं जातं . ममता बॅनर्जी यांनी ती मोट बांधण्यास  बांधण्यास नकार दिला आणि ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली . त्याची फळं त्यांना भोगावी लागतील असं दिसतंय का , या प्रश्नांच्या उत्तरासाठी आता फार काळ  वाट पहावी लागणार नाहीये .

कोरोनाचं प्रत्येकाच्या उरावर बसलेलं भूत एकीकडे मृत्यूचे अशुभ संकेत सातत्यानं देत आहे आणि दुसरीकडे राजकीय पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत गर्क असं हे विद्यमान चित्र आहे . लोकशाहीतला हा अतिशय विदारक विरोधाभास आहे ; तो नाकारणं ही  प्रतारणाच ठरेल  .

  | लेख चित्र- क्रिस्टल ग्राफिक्स  , औरंगाबाद |  

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

Previous articleसंगीत मन को पंख लगाये, गीतों से रिमझिम रस बरसाये..!
Next articleबदामी: इतिहासातील सोनेरी पान
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.