आसारामसारख्या भोंदूच्या स्त्रिया शिकार का होतात?

 

-अविनाश दुधे

बलात्कारी आसारामला  परमेश्‍वर मानणार्‍या लाखो भाबड्या भक्तांसाठी त्याला झालेली जन्मठेप  प्रचंड धक्कादायक आहे. दहा वर्षापूर्वी त्याला झालेली अटकही भक्तांना अशीच धक्का देवून गेली होती .अलौकिक शक्तीचा दावा करणार्‍या आपल्या बापूची कुठलीही शक्ती त्यांना मदत करु शकत नाही, हे पचविणं भक्तांना चांगलंच जड जात असेल. सत्संग आणि प्रवचनांमध्ये ‘निर्भय बनो’ चा उपदेश करणारे बापू न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर ओक्साबोक्सी  रडतात, हे पाहून हाही आपल्यासारखाच सामान्य माणूस आहे , हे भक्तांच्या आता लक्षात आलं असलं. तसं दहा वर्षापूर्वी बापूने अटक टाळण्यासाठी केलेली पळापळ, डीआयजी, कलेक्टर अशा वरिष्ठ अधिकार्‍यांना केलेली विनवणी ज्यांनी पाहिली होती, त्यांना हा बापू किती भेकड आहे , हे तेव्हाच लक्षात आलं होतं. मात्र तरीही बापूंची दैवी शक्ती काहीतरी चमत्कार दाखवेल  आणि बापू निर्दोष सुटतील अशी आशा अनेक जण बाळगून होतेच . प्रभू रामचंद्रांनाही १४ वर्ष वनवास भोगावा लागला या आशयाच्या  टीव्हीवरील भक्तांच्या प्रतिक्रिया पाहिल्या की अजूनही या बलात्कार-याला देव मानणाऱ्यांची कमतरता नाही हे लक्षात येते .

    दहा वर्षापूर्वी आसारामला अटक झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी या बापूचे सारे कारनामे समोर आणले होते . ‘मोह-मायासे दूर रहो’ सांगणारे बापू आणि त्यांचे चिरंजीव अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत, शेकडो स्त्रियांना, तरुणींना ते एकांतात भेटत होते , अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण खुलेआम शोषण करत होते , आदी अनेक पराक्रम माध्यमांनी ठोस पुराव्यांसह उघडकीस आणले होते . मात्र तरीही तेव्हा आसारामच्या  अटकेनंतर देशभरातील त्याच्या परमभक्तांनी संपूर्ण देशात  तमाशे केले होते . करोडो रुपयांच्या सार्वजनिक संपत्तीची नासधूस केली होती . यावेळी सरकारने खबरदारीचे उपाय केल्याने भक्त धुडगूस घालू शकले नाहीत . मात्र ते संतापले आहेच . आतापर्यंतचा इतिहास आहे  तुम्ही कुठल्याही बाबा , बुवा , महाराजांच्या कुकर्माचे हजारो पुरावे भक्तांच्यासमोर टाका , त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. श्रद्धेच्या नावाखाली डोकं गहाण ठेवून बसलेली ती माणसं असतात. त्यामुळेच आसारामच काय, या देशातील कुठल्याही बुवा महाराजांचा भंडाफोड करा, त्याला अटक करा, पुराव्यासह त्याचे कारनामे उघडकीस आणा… त्यांची दुकानदारी कधीही थांबत नाही. आसारामबापूंच्या विषयातही तेच आहे. यदाकदाचित सर्वोच्च न्यायालयात त्याची सुटका झाली आणि तो  तुरुंगातून बाहेर आला की पुन्हा एकदा  हजारो-लाखो माणसं त्याच्यापुढे रांगा लावून गर्दी करतील.

माणसांचं डोकं ताब्यात घेण्याची यंत्रणा निर्माण केलेल्या आसारामसारख्या बुवा-महाराजांचं सर्वात मोठं हत्यार हे असे भाबडे भक्तच असतात. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘देऊळ’ या चित्रपटात एक छान वाक्य होतं. गावात देऊळ उभारणीच्या नावाखाली दुकानदारी सुरू झाल्यामुळे अस्वस्थ झालेलं दिलीप प्रभावळकर एक दिवस कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचतील, असा इशारा नाना पाटेकरला देतात. तेव्हा तो म्हणतो, ”अण्णा, असं होणार नाही. कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये भक्तांची भलीमोठी रांग आहे. ती रांग त्यांना माझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही.” मोठं बोलकं वाक्य आहे हे. आपल्या परंपरेने श्रद्धेच्या नावाखाली भक्तांचं डोकं जायबंदी करणारं हत्यारचं धर्माचा-देवाचा वापर करणार्‍यांच्या हाती दिलं आहे. त्याचा वापर करून आसारामसारखे अनेक बुवा-महाराज विवेकबुद्धी आणि विचारशक्ती गमावलेल्या माणसांचे जत्थेच्या जत्थे निर्माण करीत असतात. ही अशी माणसं स्वत:ला त्या महाराजांचे परमभक्त म्हणवितात.

सारं काही डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असूनही सामान्य माणसं या महाराजांच्या नादी का लागतात, याचं कोड भल्याभल्यांना उलगडत नाही. या प्रश्नाचं मानसशास्त्रीय विश्लेषण अनेकदा झालं आहे. ‘अँटलास श्रग्ड’ या जगप्रसिद्ध कादंबरीची लेखिका आयन रँड हिने आपल्या कादंबरीत यामागची नेमकी कारणं मांडली आहेत. ती म्हणते, ”लोकांना विचार करायला नकोच असतो आणि त्यांच्यापुढे जगण्याचे प्रश्न वाढले की, त्यांची विचार करण्याची वृत्ती आणखी कमी कमी होत जाते, पण विचार येणं थांबत नाही. शेवटी ती सहजप्रवृत्ती आहे. त्यांना वाटू लागतं की, त्यांनी विचार करायला हवा, मग त्यांना अपराधी वाटायला लागतं. त्यामुळे जे कोणी त्यांची विचार करण्याच्या गरजेतून सुटका करतील त्यांच्यावर ते खूश असतात. विचार न करण्याचं सर्मथन करणार्‍यांच्या मागे ते जातात. कच्छपी लागतात. आपलं पाप हेचं आपलं सत्कर्म, आपल्या चुका हेच आपले सद्गुण, आपलं दौर्बल्य हीच आपली शक्ती असं कोणी सांगणारा त्यांना भेटला की ते विश्‍वासानं त्याच्या भजनी लागतात.”

आपल्याकडील सार्‍या बुवा-महाराजांची कार्यपद्धती तपासली, तर सामान्य माणसांच्या याच कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्यांनी आपली दुकानं थाटली असल्याचं लक्षात येईल. माणसाची विचार करण्याची आणि मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता या दोन्ही क्षमता हे बुवा-महाराज श्रद्धेच्या नावाखाली अलगद काढून घेतात. ‘गुरू की चिकित्सा नही’ हेच त्याच्या मनावर सातत्याने बिंबविलं जातं. त्यामुळे आपले गुरू, बापू, महाराज चुकीचं वागूच शकत नाही, अशी त्यांची ठाम समजूत होऊन जाते. त्यामुळे त्यांच्या शेकडो भक्तांच्या डोळ्यासमोर एखादा महाराज एकट्या स्त्रीला एकांतात घेऊन जातो. तिला दीक्षा देण्याच्या नावाखाली तासनतास बंद दाराआड राहतो. यात कोणालाच चुकीचं काही वाटत नाही. एखाद्यावेळी प्रत्यक्ष डोळ्यांना काही दिसलं तरी बाबा, महाराज आपल्या श्रद्धेची परीक्षा घेत असतील एवढा प्रगाढ विश्‍वास त्यांचा बाबांवर असतो. आसाराम ज्या प्रकरणामुळे तुरुंगात गेले आहेत, त्यात तक्रार करणारी ती मुलगी कुटिया सेवेच्या नावाखाली आपल्यासोबत बापूंनी काय-काय केलं हे जिवाच्या आकांताने सांगत असतानाही  बापूंचे भक्त त्यामुळेच तिच्यावर  विश्‍वास ठेवायला तयार नव्हते . उलट हा बापूंविरुद्ध कट आहे, त्यांना फसविण्याचा प्रयत्न आहे, असेच ते सांगत होते. एक सर्वसामान्य १६ वर्षांची पोरगी सर्वशक्तिमान बापूविरुद्ध कट कसा रचेल, हा साधा विचारही त्यांच्या डोक्यात आला नव्हता . याचं कारण गुरूची चिकित्सा करायची नाही, ही डोक्यात भिनवलेली चुकीची मानसिकता आहे. आपली श्रद्धा तपासली पाहिजे. किमान काही पुरावे समोर आले, नवीन माहिती मिळाली की, त्याची तपासणी केली पाहिजे हेसुद्धा न कळण्याइतपत झापडं भक्तांनी लावून घेतली असतात.

हे असे अनुभव सार्वत्रिक आहेत.कुठल्याही स्त्रीवर, तरुणीवर हात टाकण्याचं बुवा, महाराज, तांत्रिकांचं निर्ढावलेपण आणि त्यातून सहीसलामत सुटण्याची किमया विदर्भाने, महाराष्ट्राने अनेकदा अनुभवली आहे. काटोलचा गुलाबराव महाराज, बुलडाण्यातला शुकदास महाराज, स्वामी विद्यानंद ऊर्फ आनंदस्वामी, वाघमारेबाबा, व्यंकटनाथ महाराज, मांत्रिक डी. आर. राऊत, कधीकाळी नागपुरात येऊन अनेक स्त्रियांचं शोषण करून गेलेला सुंदरदास महाराज, कृपालू महाराज, दिल्लीचा सदाचारी साईबाबा, अगदी अलीकडचा अमरावतीचा बाल ब्रह्मचारी महाराज  अशी असंख्य नावं घेता येईल. यांचा भंडाफोड झाल्यानंतर त्या त्या वेळी त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेला तात्कालिक असंतोष सोडला, तर त्यांचं काही फारसं बिघडलं नाही. काहींनी शहर बदलून, कार्यपद्धतीत काहीसा बदल करून आपला शोषणाचा धंदा पूर्वीसारखाच सुरू ठेवला आहे. हे शोषण सर्वस्तरातील स्त्रियांचं होतं. यामध्ये श्रीमंत स्त्रियांपासून, मध्यमवर्गीय, कष्टकरी व अगदी महाविद्यालयीन तरुणी सार्‍याच फशी पडतात. या सगळ्या विषयाचा सखोल अभ्यास केल्यानंतर जी कारणं समोर येतात ती अतिशय धक्कादायक आहेत. आपल्या नैतिक कल्पनांचा चकनाचूर करणारी आहेत.(जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी श्याम मानव यांचं ‘बुवाबाजी : बळी स्त्रियांचा’ हे पुस्तक अवश्य वाचावं) काही वर्षांपूर्वी अमरावतीच्या  ब्रह्मचारी महाराजाने आपल्याच तरुण शिष्यांसोबत केलेल्या शरीरसंबंधाच्या व्हिडीओ क्लिप सगळीकडे फिरल्या . पण अजूनही हा महाराज मोकाट आहे . एवढंच नव्हे तर जवळपासच दडून बसला आहे . कोणाची तक्रारच नसल्याने पोलीसही हात बांधून बसले आहेत . काही वर्षांपूर्वी  बुलडाण्यातील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राजूरच्या पारस नंदागिरी महाराज ऊर्फ इंजेक्शनबाबाचा भंडाफोड केला होता, तेव्हा अपत्यप्राप्तीसाठी अनेक चांगल्या घरातील स्त्रिया तेथे नियमित येत असल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले होते. नामवंत लेखिका कविता महाजन यांनी पाच वर्षापूर्वी आसारामबापू प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या फेसबुक वॉलवर एक कॉमेंट्स टाकली होती. ती अजूनही आठवते . त्यांनी लिहिले होते – ‘सगळे आश्रम बंद करू नयेत. पुरुषांसाठी रेड लाईट एरिया असतो, तशी समांतर व्यवस्था जोवर बायकांसाठी होत नाही, तोवर ते राहू द्यावेत.’ या कॉमेंट्समधला गर्भितार्थ लक्षात घेतला, तर तो अतिशय धक्कादायक आहे, पण दुर्दैवाने तो खरा आहे. अतिरेकी श्रद्धा, नैतिकतेच्या चुकीच्या कल्पना, लैंगिक शिक्षणाचा अभाव, बंदिस्त समाजजीवन, स्त्रियांना समान दर्जा नसणं, योनिशुचितेचा पराकोटीचा आग्रह अशा अनेक गोष्टींमुळे अनेक स्त्रिया बाबा-महाराजांची शिकार होतात. त्यामुळेच पुढे महाराजांची हिंमत वाढते. हे असे प्रकार थांबवायचे असतील त्यामागची नेमकी कारण समजावून घेण्यासोबत सत्य पचविण्याची ताकद आपण ठेवली तरच काही बदल होऊ शकतो. नाहीतर आसारामसारखे भोंदू  परमपूज्य, स्वामी, बापू, महाराज या आवरणाखाली आपल्या स्त्रियांचं शोषण करतच राहतील.

हेही वाचायला विसरू नका –आसारामबापू आणि त्यांचे भाबडे व आक्रमक भक्त-https://bit.ly/3HrKibw

अखेर आसाराम बलात्कारीच!-bit.ly/3jhr9kS

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत) 

8888744796

 

Previous articleअखेर आसाराम बलात्कारीच!
Next articleआसारामबापू आणि त्यांचे भाबडे व आक्रमक भक्त
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

3 COMMENTS

  1. परखड वास्तव अधोरेखित केलं आहे आपण…अगदी धक्कादायक!!

  2. पांडुरंग गुलाबराव सवडदकर चिखली ता.चिखली जि.बुलडाणा पांडुरंग गुलाबराव सवडदकर चिखली ता.चिखली जि.बुलडाणा

    नामवंत लेखिका कविता महाजन यांनी व्यक्त केलेले मत योग्य असून हेच महत्त्वाचे मानसिक कारण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here