‘इंडिया’ आणि ‘भारत’ यातील अंतर कमी करण्याची गरज

श्याम मानव
समाजाच्या सर्वच क्षेत्रांत भारत देश प्रगती करतो आहे. भारत महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतोindia vs Bharat आहे असं मानणारा एक मोठा इंडियन वर्ग या देशात आहे. इंडिया शायनिंग अशी आरोळी या देशात ठोकली गेली. खरंच इंडिया शायनिंग होताना दिसतो आहे?
तर समाजाच्या सर्वच क्षेत्रांत मूल्य -हास होताना दिसतो आहे. सर्वच क्षेत्रांतला दर्जा खालावताना दिसतो आहे. समाज मूल्यात्मकरीत्या नीचांकी पातळी गाठतो आहे. सगळ्याच क्षेत्रांत भ्रष्टाचार माजतो आहे असे मानणारा, त्यामुळे कासावीस होणारा एक संवेदनशील वर्गही या देशात आहे.
खरं काय आहे?
भारतासारख्या देशात या सत्याचा शोध घेणं वाटतं तितकं सोपं नाही. आपण कोणत्या दृष्टिकोनातून भारताकडे पाहतो त्यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे.
सुरुवात आजच्या सद्य:स्थितीपासून आपण करू या! आज शहरी भागात चकचकीत मॉल संस्कृती दिसते आहे. भरपूर पैसे असणारा, पैसे उधळणारा, चकचकीत दिखाऊ राहमीमान जगणारा, पण ‘आंग्लाळलेला’ एक मोठा वर्ग ‘शायनिंग इंडिया’चं आभासी सत्य प्रदर्शित करतो आहे. उच्च राहणीमान आणि आंग्लाळलेपण हे सिनॉनिमस-स्थितिदर्शक शब्द बनले आहेत. ग्लोबलायजेशनचा, जागतिकीकरणाचा सगळ्यात मोठा फायदा मिळवणारा हा इंडिया आहे.
याच चंगळवादी वर्गाचं, इंडियाचं चित्रण टीव्ही आणि इतर प्रसिद्धिमाध्यमांमधून सारखं ग्रामीण भागातील सामान्य आणि शहरी भागातील निम्न मध्यमवर्गीय व झोपडपट्टीतील गरीब माणसांपर्यंत, भारतापर्यंत पोहोचतं आहे. हा ६०-६५ टक्के असणारा भारत रोज शहरात भटकताना गावात टीव्हीवरून शायqनग इंडिया पाहतो आहे. काही प्रश्नांची उत्तरं देऊन माणसांना करोडपती बनताना पाहतो आहे. वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोमधून पाहता पाहता काही माणसांना, मुलांना स्टार बनताना पाहतो आहे. कोट्यवधी रुपये कमावणाèयांच्या यशोगाथा ऐकतो, पाहतो आहे आणि कोट्यवधी रुपये अनैतिक मार्गाने इकडचे तिकडे होताना पाहतो आहे. रोज नवीनवी रंगीत स्वप्ने पाहतो आहे. येनकेन प्रकारे धनप्राप्ती करणे म्हणजेच यश प्राप्त करणं होय हे सप्रमाण शिकतो आहे. त्यामुळं चकचकीत रंगीन टीव्हीवरील स्वप्नरंजनामुळं त्याला स्वत:च्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं जमतं आहे. पण महागाईमुळं जगणं असह्य झालंय. दोन वेळच्या जेवणाची सोय करता करता नाकीनऊ येतंय. मुलांचं शिक्षण करणं अशक्यप्राय बनतं आहे. आजूबाजूला राहणीमान उंचावणाèया साधनांनी बाजारपेठ ओसंडून वाहते आहे; पण ती साधनं विकत घेण्याची क्षमता नाही. मुलांना चकचकीत स्वप्नांपासून दूर करता येत नाही आणि त्यांचे हट्ट, आकांक्षाही पुरवता येत नाहीत. अशा जीवघेण्या कात्रीत जगणारा, पण आज नाही उद्या आपणही या शायनिंग इंडियाचा भाग बनू या स्वप्नरंजनात, आशेत जगणारा फार मोठा निम्न मध्यमवर्गीय भारत आहे.
पण अशाच मन:स्थितीत-स्थितीत जगणारा, स्वप्न-आशा पूर्ण होण्याविषयी साशंक असणारा, शेतीआधारित जीवन जगणारा, शेतकरी, शेतमजुरांचा एक भारत आहे. हा ग्रामीण कृषीआधारित बहुसंख्य भारत मात्र निराशेच्या काळोख्या आवर्तनात अडकला आहे. त्याला स्वत:ला कोणताही आशेचा किरण दिसत नाही. पण त्याला एक अंधूक आशा वाटते. आपली मुलं उद्या इंग्रजी शिकतील. इंडियामध्ये प्रवेश मिळवतील. कदाचित आपली आजची स्थिती निराशा- गरिबी-हताशा बदलेल.
आज टीव्ही, मोबाईलमुळं सारा देश जवळ आल्यासारखा वाटतो आहे. पण या देशामधील इंडिया आणि भारत यामधील अंतर मात्र खूप वाढलं आहे. आपल्या देशात दोन देश आहेत. एक इंडिया आणि दुसरा भारत. स्वातंत्र्यानंतर या दोहोंमधलं अंतर कमी करण्याचा वादा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारनं, महात्मा गांधींच्या वारसदारांनी केला होता. नव्हे, इंडिया, भारत हे दोन्ही देश एक होतील असा आशावाद स्वातंत्र्य आंदोलनाच्या घुसळणीतून नवनीतासारखा (लोण्यासारखा) निर्माण झाला होता. नेहरू सरकारनं तसा प्रयत्नही केला. म्हणूनच पूर्ण भांडवलशाही (अमेरिका, इंग्लंडसारखी) वा कम्युनिस्ट, शास्त्रीय समाजवादी अर्थरचना न स्वीकारता लोकशाही समाजवादी ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यांच्या (नेहरूंच्या) हयातभर प्रामाणिकपणे राबण्याचा प्रयत्न केला. अर्थात, हे गांधींचं स्वप्न नव्हतं. गांधींना ग्रामस्वराज्य हवं होतं. स्वयंपूर्ण खेडी असणारी विकेंद्रित अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत सगळ्यांना काम मिळेल, सगळ्यांचं पोट नीट भरेल, सगळ्यांच्या किमान गरजा पूर्ण होतील अशी अर्थव्यवस्था. पण गांधींचं स्वप्न, इच्छा कधीच पूर्ण झाली नाही.
३० जानेवारी, १९४८ साली नथुराम गोडसेनं त्यांना संपवलं नसतं, आणखी दहा वर्षे गांधी जिवंत राहिले असते तर या देशात वेगळी अर्थव्यवस्था निर्माण झाली असती. कदाचित त्यासाठी गांधी-नेहरू संघर्ष निर्माण झाला असता. कदाचित दोघं एकदुसèयांविरुद्ध उभे ठाकल्याचं दृश्य जगाला पाहायला मिळालं असतं. पण त्यातून भारताची अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था जन्माला आली असती.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रामाणिकपणाबद्दल, देशप्रेमाबद्दल, देशभक्तीबद्दल त्यांचा शत्रूही शंका घेऊ शकणार नाही. तरीपण ते खूप आंग्लाळलेले होते. कळत-नकळत ते इंडियाचं प्रतिनिधित्व करत होते. महात्मा गांधींच्या सहवासात स्वातंत्र्य आंदोलनात ते खूप भारताळले. पण महात्मा गांधींसारखे निखळ भारतीय कधीच बनू शकले नाहीत.
भारत आणि इंडिया ही टर्मिनॉलॉजी, संकल्पना शेतकरी आंदोलनाचे प्रणेते शरद जोशी यांनी लोकप्रिय केली. त्यामुळं ती अलीकडच्या काळात म्हणजे १९७८-८२च्या काळात निर्माण झाल्याचं आपल्याला वरपांगी दिसतं. पण त्याची मुळं या भूमीत हजारो वर्षांपासून रुजली आहेत.
इंडिया म्हणजे ‘आहे रे’ वर्ग. जो सधन आहे. ज्यांच्या हातात सारी सूत्रं आहेत, साèया सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय नाड्या आहेत आणि जो इतरांच्या शोषणावर जगतो आहे, पुष्ट-बलिष्ट झाला आहे.
भारत म्हणजे ‘नाही रे’ वर्ग. जो रात्रंदिवस राबराब राबतो, कष्ट करतो, संपत्ती निर्माण करतो; पण धड जगण्यासाठी आवश्यक त्या गरजा पूर्ण करता करताच ज्याच्या नाकीनऊ येतं. पण इतरांना ‘आहे रे’ वर्गाला मात्र संपन्न करतो. इतरांकडून स्वत:चं शोषण करवून घेतो आणि ही सारी परिस्थिती दैवाचा भोग म्हणून निमूटपणे स्वीकारतो.
भारतात दीर्घकाळापासून हे दोन वर्ग होतेच. तसे ते जगभरच होते; पण भारतात मात्र ते जातिआधारित होते. वर्णव्यवस्थेच्या नावाखाली होते.
उच्च तीन वर्ण. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा ‘आहे रे’ वर्ग. म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर इंडिया. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक नाड्या या तीन वर्णांच्या हातात हजारो वर्षे होत्या, आजही आहेत.
‘नाही रे’ वर्ग हा शूद्रांचा, शेतकèयांचा व बारा बलुतेदारांचा. राबराब राबणारा, संपत्ती निर्माण करणारा; पण त्याचा उपभोग घेण्याची संधी वरील तीन वर्णांना देणारा हा भारत. बहुसंख्यांचा खरा भारत.
एके काळी म्हणे, भारतात सोन्याचा धूर निघत असे. पण किमान जेव्हापासून या देशात शंकराचार्यांच्या चार पीठांनी ‘मनुस्मृती’ राबवायला सुरुवात केली असेल त्या १५०० ते २५०० वर्षांपासून तरी या देशातल्या बहुसंख्य शूद्र, अतिशूद्रांना शोषित जीवनच जगावं लागलं आहे.
खरा भारत समजून घ्यायचा असेल, तर प्रत्येक देशप्रेमी, समाजप्रेमी, धर्मप्रेमी माणसानं ‘मनुस्मृती’ किमान एकदा तरी वाचली पाहिजे. त्याशिवाय त्याला खरा भारत कळणार नाही, खरा धर्म कळणार नाही; भारतातील खèया समस्या कळणार नाहीत.
भारतातील वर्णव्यवस्थेचे काही फायदेही झालेत; पण तोटे मात्र अगणित झालेत. अनेक धर्मप्रेमी असं मानतात, की आधी या देशात आदर्श वर्णव्यवस्था होती. गुणांनुसार, माणसाच्या कर्तृत्वानुसार त्याला कोणत्याही वर्णात प्रवेश करता येत असे. नंतर काही हितसंबंधीयांनी या वर्णव्यवस्थेचं जातिव्यवस्थेत रूपांतर केलं. ती बंदिस्त केली.
एके काळी मलाही असं वाटत असे. याचे पुरावे मिळविण्यासाठी खूप अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. वर्णव्यवस्था ही चांगली व्यवस्था आहे असं मानणाèयांशी खूप चर्चा केली; पण पुरावे मिळू शकले नाहीत. तरी त्या सनातन वादात न पडताही समाजशास्त्राचा, मानववंशशास्त्राचा अभ्यास आपल्याला या प्रश्नाचं नि:संदिग्ध उत्तर देऊ शकतो. अ‍ॅबसोल्युट पॉवर करप्ट्स अ‍ॅबसोल्युटली, निरंकुश सत्ता, निरंकुश भ्रष्टाचारी बनवते.
वर्णव्यवस्थेत ब्राह्मणवर्णाला निरंकुश सत्ता मिळाली. परिणामत: ब्राह्मणवर्ण निरंकुश भ्रष्टाचारी बनला. त्याचा ‘मनुस्मृती’ हा जिताजागता पुरावा आहे.
याचा परिणाम अपरिहार्य होता. गुलामगिरी हा देश तब्बल तेराशे वर्षे परकीयांच्या आक्रमणाखाली होता. ८००-९०० वर्षे तर सरळ सरळ दुसèयाच्या शासनाखाली गुलामगिरीत जगत होता.
जो समाज स्वत:तील बहुसंख्य कष्टकरी श्रमानं संपत्ती निर्माण करणाèया हातांचं बळ वापरणाèया माणसांना गुलाम बनवतो, त्यांना अस्मिताहीन बनवतो तो समाज गुलाम बनणारच ना? या देशातही तसंच झालं.
पुरातन काळात लढताना संख्या फार महत्त्वाची असे. कारण एकासोबत एक लढाई होत असे. अशा काळात बाहूत खरी शक्ती असणारा मोठा वर्ग होता तो शूद्रातिशूद्रांचा. पण त्याला लढण्याचा अधिकार नाही. शस्त्र परजण्यासाठी आवश्यक ती धार्मिक मान्यता नाही, अस्मिता नाही. ब्राह्मणांनी लढायचं नसतं. मूठभर वैश्यांचं ते काम नाही. लढाईत सतत मरणाèया क्षत्रियांची संख्या मर्यादित. ५-१० टक्के लोक कसं ९० टक्के लोकांचं संरक्षण करणार?
चातुर्वण्र्य संकल्पनेतच गुलामगिरीची मुळं दडली आहेत. म्हणूनच भारत एवढा दीर्घकाळ गुलाम राहिला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या पुस्तकात याचे अनेक पुरावे मांडले आहेत. त्यातलं एक उदाहरण – काशी, बनारस मुस्लिम राजाच्या ताब्यात होती. अटकेपार झेंडे रोवणारे मराठे सरदार काशीभोवताली तळ ठोकून बसले. काशीला घेराव, वेढा घातला. सारी रसद तोडली. हिंदूंचं सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र धार्मिक अस्मितेचं केंद्रqबदू असणारी काशी ताब्यात घेण्याचा त्यांचा निश्चय होता. मुस्लिम राजा हुशार. त्यानं पेशव्यांना निरोप धाडला. तुमच्या सरदारांनी काशीवर स्वारी केली तर काशीमधील साèया गाई आणि सारे ब्राह्मण मी मारून टाकीन. त्यांचा शिरच्छेद करेन. त्यांना वाचवायचं असेल तर मराठे सरदारांना परत बोलवा. पेशव्यांचा दूत तातडीनं दौडला. मराठ्यांना वेढा उठवून माघारी फिरण्याचा आदेश तत्काळ पोहोचला.
मूठभर ब्राह्मणांना व गायींना वाचविण्यासाठी काशी मुस्लिम राजाच्याच ताब्यात राहिली. लढाईत हजारो मरतच होते. अशा लढाईत स्थानिक ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी उद्ध्वस्त होत मारले जात, बलात्कार होत. पण मूठभर ब्राह्मण मरता कामा नयेत हा राजदंडक, धर्मदंडक, वर्णव्यवस्था प्रबंधन.
समोर गायींचा तांडा दौडवून कितीदा तरी हिंदूंचा त्या काळात मुस्लिमांनी पराभव केला आहे. त्याची अनेक उदाहरणं स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रबोधनकार ठाकरेंनी मांडली आहेत. पण एवढ्या सगळ्या आक्रमणानंतरही, वारंवार बेचिराख झाल्यावरही निसर्गाच्या भूकंप, दुष्काळ, पूर इत्यादी आपत्तीनंतरही पुन्हापुन्हा भारतीय खेडी उभी राहत असत. जिवंत राहत असत. खेडी दीर्घकाळ टिकली यामागचं रहस्य येथे स्वयंपूर्ण ग्रामरचना होती यात आहे. शेतकरी आणि बारा बलुतेदार मिळून बनलेली एक स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था.
साèया गावाच्या गरजा पूर्ण करणारी व्यवस्था गावातच होती. सारं कौशल्य, कारागीर गावातच तयार होत. सारी तरबेज माणसं मारली गेली तरी त्यांच्या नातेवाइकांना दुसèया गावातून सहज आयात केलं जाऊ शकत असे. पुन्हा गाव सरसरून उभं राहत असे. हे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बलस्थान म. गांधींच्या आधी जाणता राजा शिवाजीराजेंनी बरोबर ओळखलं. जातिव्यवस्था व वर्णव्यवस्थेमुळं होणारं नुकसानही जाणत्या राजानं नेमकेपणानं ओळखलं. म्हणून त्यांनी अठरापगड जातींच्या माणसांना, बारा बलुतेदारांना, शेतकèयांना शिपाई बनवलं. त्यांना शस्त्र चालवणं शिकवलं, सन्मान दिला. ज्या काळात शिपाईगिरी हा पूर्णवेळ व्यवसाय होता त्या काळात, शेतीच्या काळात शेतीची कामं करा. नंतर ती आटोपली, की सैनिक बना. असं अर्धवेळ सैन्य निर्माण केलं.
‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. मूल्याधारित अभ्रष्ट राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताला अस्मिता देण्याचा प्रयत्न केला.
गेल्या दोन हजार वर्षांतील हा पहिला प्रयोग होता. राजाच्या लहरीनुसार, मर्जीनुसार नव्हे, तर कायद्यानुसार राज्य चालावे अशी व्यवस्था केली. सामान्य माणसाचा, स्त्रीचा सन्मान राखला जाईल अशी नैतिक मूल्यव्यवस्था, मानवी मूल्यव्यवस्था रुजविण्याचा प्रयत्न केला. सैन्यानं लुटावे अशी प्रथा असण्याच्या काळात सैन्यानं काहीही प्रजेकडून फुकटात घेऊ नये असे आदेश दिले. नव्हे, ते कडकपणे अमलात येतील यासाठी दक्ष राहिले. ब्राह्मणी वर्ण, शोषण व्यवस्थेला शह दिला. तटस्थ न्यायव्यवस्था उभी केली. म्हणून मी नेहमी म्हणतो, ‘भारतीयांची अस्मिता सर्वांगीणरीत्या उंचावणारा पहिला खरा ‘भारतीय’ हा शिवाजी राजा होता.’ किमान जो इतिहास आज आपल्याजवळ उपलब्ध आहे त्यानुसार तरी दुसरे उदाहरण नाही अन्यथा या देशात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांत अराजकच होते. स्वतंत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे हा देश विपरीत परिस्थितीतही जिवंत होता. पण जातिव्यवस्थेमुळे ही ग्रामीण अर्थव्यवस्था शोषणाचं प्रकट हत्यारही बनली होती म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी या व्यवस्थेला विरोध केला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णत्रयीचंचं सारं राज्य होतं. (शिवाजी राजे क्षत्रिय नव्हते.) राज्य कुणाचंही असो, राजा कोणत्याही धर्माचा असो, या वर्णत्रयीचं सारं सुखनैव चालत असे. अधूनमधून एखादा झक्की मुस्लिम राजा जिझिया कर (इतर धर्मीयांना कर) लावत असे. त्याचा जेवढा त्रास होत असे तेवढाच. एखाद्या क्षत्रिय राजाचं राज्य जात असे एवढंच. पण तो एखाद्या बादशहाचा मांडलिक वा सरदार बनून सारे स्वत:चे फायदे राखत असे.
या अशा गुलामगिरीच्या वातावरणात काही धार्मिक, कर्मठ आचार वगळता फारशा नीतिमूल्यांची बूज राखली जात नसे. नैतिक मूल्यांना तशी फारशी प्रतिष्ठा नसे. काही विशिष्ट जाती, काही लोक ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ हा सिद्घान्त पाळायचे. दिलेल्या शब्दाखातर जीव द्यायलाही सज्ज असायचे. पण ‘वचन पाळणे’ म्हणजे नीतिमूल्ये पाळणे नव्हे.
दानदक्षिणा प्रकरण तर इतकं बोकाळलं होतं, की जगातल्या सगळ््या प्रकारची पापं धुण्याच्या यंत्रणा ब्राह्मणांनी निर्माण केल्या होत्या. मुळात ‘पापक्षालन’ ही फार चांगली प्रक्रिया आहे. एखादी चूक झाली. पश्चात्ताप करा. पुन्हा ही चूक करणार नाही असं ठरवून टाका आणि पश्चात्तापाच्या अग्नीत शुद्घ होऊन, अधिक उत्तम माणूस बनून पुढची पाऊलवाट पूर्ण करा. अशी ही एक उत्तम मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. ख्रिश्चन धर्मात ही प्रक्रिया ‘कन्फेशन’ नावानं ओळखली जाते. पण निरंकुश सत्तेनं, ब्राह्मण वर्णानं, दानदक्षिणेच्या लोभानं या ‘पापक्षालना’चा पार व्यापार करून टाकला. ते पाप दूर करण्याचे कंत्राट घेऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला, की वाट्टेल तेवढं पाप करा, पापक्षालन करा, दानदक्षिणा द्या. पुन्हापुन्हा पाप करा. नो प्रॉब्लेम. फक्त दानदक्षिणा द्या. त्यामुळं या पुरोहित पापक्षालन प्रक्रियेनं अपराधीपणाची टोचणीच काढून टाकली. माणसांनी पापी बनण्यास प्रोत्साहित करणारी ही यंत्रणा बनली. आजही हे दृश्य सर्व धर्मस्थळी आढळतं. हजारो कोटी रुपये दानधर्मात येतात. हे सरळ, प्रामाणिक मार्गानं आलेले पैसे असतात का? बहुतांशी वाममार्गाची कमाई असते.
ज्या धर्मानं उच्च माणुसकीपूर्ण, नैतिक मूल्ये रुजवावी अशी अपेक्षा असते तोच धर्म या देशात भ्रष्ट, निरंकुशांच्या हातचं बाहुलं बनल्यामुळं नैतिक मापदंड निर्माण करण्यात अपुरा पडू लागला. जातिव्यवस्थेमुळं, अस्पृश्यतेमुळं साधा मानवी सन्मानही न मिळणारा मोठा शूद्र वर्ग मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करू लागला. वरपांगी बरोबरीच्या नात्यानं वागवणारा, सर्वांना किमान जेवणात समानता देणारा, जेत्यांचा मुस्लिम धर्म या देशात वाढू लागला. पुढे इंग्रजांच्या प्रवेशानंतर ईसाई धर्मप्रसार पावू लागला. पण या वर्णत्रयीला ना त्याची खंत ना दु:ख होतं. अशा काळात अख्ख्या जगावर साम्राज्य निर्माण करणाèया इंग्रजांचं बस्तान या देशात बसू लागलं. एकोणिसाव्या शतकात ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती रुजू लागली होती.
मशीनच्या साहाय्यानं हजारो मानवी हातांइतकं काम वेगानं करता येणं शक्य होऊ लागलं. हा माल जगभर विकता येणं गरजेचं होतं. शिवाय चिमुकल्या ब्रिटनजवळ कच्चा माल अपुरा होता. पण भारत, आफ्रिका इंग्रजांच्या ताब्यात होते. दोन्ही देशांत कच्चा माल मुबलक उपलब्ध होता. मानवी मजूरही मुबलक उपलब्ध होते. पण भारताची स्वतंत्र आर्थिक खेडीरचना या इंग्रजांच्या विकासाच्या, औद्योगिक प्रगतीच्या आड येत होती.
इंग्रजांनी पहिलं काम केलं ही स्वतंत्र आर्थिक रचना मोडीत काढण्याचा निश्चय केला. भारतातला कच्चा माल इंग्लंडला पाठवणं व तेथून निर्माण झालेला पक्का माल भारतीय बाजारात विकणं ही यंत्रणा सुरू केली. तो खेड्यात निर्माण होणाèया मालापेक्षा स्वस्तात निर्माण व्हावा व स्वस्तात गावोगाव पोहोचावा म्हणून टड्ढाम, रेल्वे, बस इत्यादी दळणवळणाची साधनं निर्माण केली. यासाठी लागणारी यंत्रणा सुरळीत चालावी म्हणून या देशात नव्या ‘इंडिया’ची निर्मिती सुरू केली. त्यासाठी लॉर्ड मेकॉलेनं गुलामी मनोवृत्ती निर्माण करणारी शिक्षणव्यवस्था निर्माण केली. सरकारी नोकरदारवर्ग निर्माण केला. अर्थातच, या ‘इंडिया’ यंत्रणेत सर्वांत पहिले उत्साहानं या देशातील आधीचे ‘आहे रे’ असणारा वर्ग, ‘वर्णत्रयी’ सामील झाला. काही क्षत्रिय मांडलिक होतेच. ब्राह्मण शिक्षणव्यवस्थेत सरकारी कारभारात सामील झाले. व्यापारउदिमात असणारे वैश्य कारखानदारीचा भाग बनले. म्हणजे या देशातील ‘आहे रे’ ‘इंडियन’ बनले.
गुलामी मनोवृत्ती शिक्षणानं त्यांच्यात रुजवली. ‘आंग्लाळलेपण’ सुरू झालं. पण याच इंग्रजी भाषेनं स्वातंत्र्य, समता, बंधुता या युरोपात प्रतिष्ठित झालेल्या. मानवी सर्वश्रेष्ठ मूल्यांचा परिचय करून दिला. युरोपमध्ये वाहणाèया स्वातंत्र्याचा परिचय झाला. बहुसंख्याकांनी या ‘ज्ञानाचा’ उपयोग अधिक उत्तम गुलाम बनण्यासाठी, अधिक उत्तम पोटार्थी बनण्यासाठी केला. पण काही संवेदनशील ‘इंडियन्स’साठी ही इंग्रजी भाषा वाघिणीचं दूध ठरली. कायद्याचा अभ्यास करणाèया काही वकिलांनी काही जुजबी हक्क मिळविण्यासाठी एकत्र येऊन काँग्रेस काढली. जुजबी हक्कांविषयी बोलणारी काँग्रेस हळूहळू या देशाच्या मर्यादित स्वातंत्र्याविषयी बोलू लागली. ‘स्वराज्य’ वगैरे शब्द उच्चारू लागली. तिकडे आफ्रिकेत एका इंडियन वकिलाला तो काळा आहे म्हणून रेल्वेच्या फस्र्ट क्लासच्या डब्यातून, फस्र्ट क्लासचं तिकीट असूनही खाली प्लॅटफॉर्मवर
फेकलं. या इंडियन वकिलाचा प्रचंड अपमान झाला. पण यानं तो व्यक्तिगत अपमान न मानता मानवी अस्मितेचा अपमान मानला आणि सर्वतोपरी बलिष्ठ असणाèया, सारं जग पादाक्रांत करणाèया इंग्रजांविरुद्घ लढाई सुरू केली.
बंदूक, तोफांनी लढणाèयाला कसं हरवायचं ते इंग्रजांना चांगलंच माहीत होतं. पण अहिंसेनं, सविनय कायदेभंगाचं हत्यार वापरणाèयाशी कसं लढायचं ते उच्च सैन्याधिकारी असणाèया, अनेक लढाया जिंकलेल्या द. आफ्रिका प्रमुखाला कळेना. तो या नव्या हत्यारापुढे बिचकू लागला. दबकू लागला. मोहनदास करमचंदची सरशी होऊ लागली. त्यातून महात्मा मोहनदास करमचंद गांधींचा उदय होऊ लागला. या प्रक्रियेत ‘इंडियन’ गांधी खूप धार्मिक व आध्यात्मिक असल्यामुळं वेगळा विचार करू लागला. ‘इंडियन’पण सोडून माणुसकीचा विचार करू लागला.
१९१४ साली भारतात आला. भारतात एका छोट्या गावात जन्मलेला हा इंडियन भारत समजण्यासाठी ‘भारत यात्रा’ करू लागला. त्याला ‘खरा भारत’ इथला शूद्रातिशूद्र समाज कळू लागला. या साèया प्रक्रियेत तो ‘भारतीय’ बनत गेला. १९२० सालापासून कळत-नकळत त्यानं न मागता देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व त्याच्या हातात आलं. अत्यंत धार्मिक व आध्यात्मिक असणाèया, भारतीय बनलेल्या गांधीनं आपल्या सगळ््या कृतीला, कार्याला, स्वातंत्र्य आंदोलनाला एक नैतिक अधिष्ठान दिलं. प्रामाणिकपणाचे, सत्याचे, साधनशुचितेचे मापदंड रुजवले. उत्तम साध्य साधण्यासाठी ते प्राप्त करण्याचा मार्गही उत्तम नैतिक असला पाहिजे असा आग्रह धरला.
ही सारी नीतिमूल्ये खरं म्हणजे समाजात, धर्मस्थळांत कुठेच दिसत नव्हती. धर्मस्थळं तर भ्रष्टाचाराची, अनाचाराची केंद्रस्थानं झाली होती. अगदी इंग्रजांचं राज्य रुजेपर्यंत तीर्थयात्रेला आलेल्या श्रीमंत भाविकांचे, पूजेच्या दरम्यान मुडदे पाडून त्यांची सारी संपत्ती लुटण्याची परंपरा निर्माण झाली होती. दिलीपकुमार, संजीवकुमार, वैजयंतीमाला यांनी काम केलेल्या ‘संघर्ष’ चित्रपटात याचं अत्यंत विदारक व प्रभावी चित्रण केलं आहे. काशीचं हे चित्रण आहे. पण हिंदू धर्मात ही सारी नीतिमूल्ये आहेत असं मानणाèया, श्रद्घा असणाèया गांधींनी समाजकारणात, अर्थकारणात, राजकारणात, जीवनातल्या सगळ््याच अंगांत उच्च मानवी नीतिमूल्ये जोपासण्याचा, रुजविण्याचा आग्रह धरला.
गांधींचं स्वातंत्र्य आंदोलन हे केवळ स्वातंत्र्य आंदोलन राहिलं नाही. ते सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अंगांनी
फुलत गेलं. बहरत गेलं. पत्रकार असणाèया गांधींनी आणि अनेक स्वातंत्र्य आंदोलनांतील इतर नेत्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही नीतिमूल्यांचे मापदंड निर्माण केले. सार्वजनिक क्षेत्रात नीतिमूल्यांचा आग्रह व मापदंड निर्माण करण्याचा प्रयत्न करणं व त्याबाबत यशस्वी होणं ही देशातील ‘खरी पहिली क्रांती’ होती आणि तिचा पिता होता महात्मा गांधी.
हिंदू धर्मात जन्मलेला हा माणूस सगळ््याच धर्मांचा अभ्यासक व चाहता असल्यामुळं सर्वच धर्मांतील उच्च नीतिमूल्ये अंगीकारणारा व रुजविणारा ठरला. त्यांनी आपल्या प्रार्थनेत सर्वच धर्मांच्या चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव केला. सर्वधर्मसमभाव पहिल्यांदा राष्टड्ढीय धर्म बनविला. परिणामत: स्वातंत्र्य आंदोलनात घुसळून निघालेल्या पिढीत मानवी मूल्यांचा व सगळ््याच क्षेत्रांत नीतिमूल्यांचा आग्रह रुजला. त्याचा परिणाम भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता या सगळ््याच क्षेत्रांवर झालेला दिसतो. स्वातंत्र्य आंदोलनापासून सक्रिय असणाèया मध्यमवर्गाची ही कळत-नकळत नीतिमूल्ये बनली. केवळ स्वत:चा, स्वत:च्या हिताचा विचार करण्यापेक्षा इतरांच्या हिताचाही विचार करून जगणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे उत्तम जगणं आहे नव्हे, माणूस म्हणून खरं जगणं हेच आहे अशी मान्यता निर्माण झाली. याप्रमाणं जगणारी, दुसèयांसाठी झटणारी अशी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसं झाली. अगदी ७०-८० सालापर्यंत अशी माणसं मोठ्या प्रमाणावर दिसत होती.
खरं म्हणजे मी स्वातंत्र्यानंतर जन्मलो १९५१ साली. माझे वडील विनोबांचे शिष्य. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, कॉलेज शिक्षण सोडून ते भूदान चळवळीत सामील झाले. पूर्णवेळ काम करू लागले. त्याचे खूप आर्थिक चटके आम्हांला लहानपणी भोगावे लागले. म्हणून मी ठरवलं होतं, ‘मी कधीही सार्वजनिक काम, समाजसेवा करणार नाही. पूर्णवेळ कार्यकर्ता तर कधीच बनणार नाही.’ खरं म्हणजे तसा मनोमन निश्चय केला होता. पण वर्धा शहरात राहणं आणि विनोबा, जयप्रकाश नारायण, आचार्य दादा धर्माधिकारी या गांधी शिष्यांचा सहवास-प्रभावच असा होता, की स्वत:साठी छान नोकरी करण्याचा निश्चय केव्हा मागे पडला आणि सार्वजनिक जीवनात केव्हा ओढला गेलो ते कळलंच नाही.
पुढे तब्बल ४२ वर्षे सार्वजनिक जीवनात काम करतो आहे. त्यातील तब्बल १०-११ वर्षे कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता पूर्णवेळ काम केलं आहे. बरं, आपण फार विशेष करतो आहे असंही वाटे ना! कारण कितीतरी दिग्गज माणसांना तसं करताना पाहत होतो. नारायणभाई देसाई, बाबा आमटे, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, चंद्रकांत शहा, ठाकूरदास बंग, (माझ्या वडिलांचे प्राध्यापक होते. प्राध्यापकी सोडून कार्यकर्ते झाले.) गोविंदराव शिंदे, रामभाऊ म्हसकर असे अनेक इतर वडिलांचे सहकारी, सर्वोदयी कार्यकर्ते.
१९७० साली जयप्रकाश नारायणांच्या तरुण शांती सेनेत सामील झालो. दादा धर्माधिकारींच्या वैचारिक परिपोषणावर पुष्ट झालो. बिहार आंदोलनासारखं आंदोलन वाट्याला आलं. त्या काळात विविध आंदोलनातले तरुण सहकारी नेते मित्र झाले. डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अरुण लिमये, प्रमोद महाजन, अशोक बंग, डॉ अभय बंग, डॉ. उल्हास जाजू, चंद्रकांत वानखडे, सुधाकर जाधव, किशोर देशपांडे, शुभमूर्ती, कलानंद मणी, बाळ सरोदे, एकनाथ उगवार हे तरुण शांती सेनेचे सहकारी. आधी डॉ. रूपा कुळकर्णींसोबत ‘हुंडाविरोधी आघाडी’त काम केलं. १९८२ साली अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलनाची चळवळ सुरू केली. त्या वेळी अनेक क्षेत्रांत विविध चळवळी सुरू होत्या. बाबा आमटेंचं आनंदवन हा एक चांगला प्लॅटफॉर्म होता. सगळ््या संघटनांचं पहिलं शिबीर डॉ. विकास आमटेंच्या सक्रिय सहकार्यानं आनंदवनलाच आयोजिलं होतं. तिथून अंधश्रद्घा निर्मूलनाचं काम सुरू झालं. डॉ. प्रकाश आमटेंचं हेमलकसाचं काम आम्हा सगळ्यांसाठीच आत्मीयतेचा व प्रेरणेचा विषय होता. त्याच काळात डॉ. रूपा कुळकर्णी, डॉ. सीमा साखरे यांचे नागपुरातून तर पुण्यातून विद्या बाळ, छाया दातार, शारदा साठे यांचे मुंबईतून स्त्रियांसंबंधीचे आंदोलन सुरू होते. डॉ. बाबा आढावांचे विषमता निर्मूलन कार्य सुरू होते. युनोतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाचा धडाका लावला होता.
मी पत्रकारितेत दाखल झालो १९७८ साली. नागपूरच्या दै. ‘तरुण भारता’तून सुरुवात केली. ‘तरुण भारत’ आरएसएसचं मुखपत्र श्री. मा. गो. वैद्य व श्री. दि. भा. घुमरे या संपादकांच्या हाताखाली काम केलं. माझे विचार वेगळे. ३ वर्षे ‘तरुण भारता’त स्तंभलेखन करत होतो. पुढे सहा महिने १९८२ साली ‘तरुण भारता’त नोकरीही केली. पण मला मान्य नसलेले विचार मी कधी लिहिले नाहीत व माझ्या संपादकांनीही कधी मी त्यांच्या धोरणाप्रमाणं लिहावं असा आग्रह धरला नाही.
१९८२ पर्यंत माझ्या विचारात फारच परिवर्तन झालं. ‘तरुण भारता’च्या धोरणाला ते पेलवेना. तेव्हा डायरेक्टर बोर्डानं फार आग्रह धरला तरी मा. गो. वैद्यांनी मला नोकरीवरून काढून टाकण्यास मान्यता दिली नाही. शेवटी ज्या सा. ‘तरुण भारता’त माझी नेमणूक होती ते साप्ताहिकच बंद करण्याचा निर्णय डायरेक्टर बोर्डानं घेतला. तेव्हा आपसूकच माझी नोकरी संपली.
मी १९ वर्षे पत्रकारिता केली; पण कधीच मनाला न पटणारं लिहिलं नाही. खोटं लिहिलं नाही. कधी भ्रष्टाचाराला साथ वा वाव दिला नाही. पण त्याचं फारसं नवल नव्हतं. कारण गोविंद तळवलकर, यदुनाथ थत्ते, ‘माणूस’चे माजगावकर, ‘सोबत’चे ग. रा. बेहरे, मुकुंदराव किर्लोस्कर, मा. गो. वैद्य, म.प. दळवी, विद्याधर गोखले, माधव गडकरी, कुमार केतकर, विद्या बाळ यांच्यासारखे अनेक तत्त्वनिष्ठ व विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरणारे संपादक त्या काळात होते. पत्रकारिता हे मिशन आहे असं उघडपणे ही संपादक मंडळी बोलत असे, लिहीत असे; तसं वागत असे. त्याचा परिणाम माझ्यासारखा संवेदनशील व नवख्या पत्रकारांवर होत असे.
शैक्षणिक क्षेत्रातही असे उच्च मापदंड होते. प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य नरहर कुरुंदकर, भा. ल. भोळे यांच्यासारखे कितीतरी उत्तम शिक्षक व समाजशिक्षक एकाच शरीरात नांदत होते. प्राध्यापकांनी शिकवण्याचं काम उत्तमपणे करता करताच सामाजिक कार्यात उत्तम योगदान दिलं पाहिजे अशी मान्यता होती. प्रा. राम बापट, प्रा. ग.प्र. प्रधान यांसारखे कितीतरी प्राध्यापक अनेक प्राध्यापक-विद्याथ्र्यांचे प्रेरणास्थान होते. कारण अजूनही म. गांधींनी रुजवलेल्या मानवतावादी व मूल्याधिष्ठित जगण्याला, साध्या राहणीमानाला प्रतिष्ठा होती. आर्थिक संपन्न जीवनापेक्षा मानसिक संपन्न जीवन उच्च दर्जाचं असतं असा प्रबळ सामाजिक संस्कार अजून जिवंत होता. तसे प्रत्यक्ष जिवंत आदर्श ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळत असत. पण याच काळात दुसèया बाजूनं प्रचंड प्रमाणावर मूल्य èहासाला सुरुवातही झाली होती. भ्रष्टाचार हा या देशाचा अविभाज्य भाग आहे. ज्या देशात, जी माणसं देवासारख्या पवित्र क्षेत्रात सौद्यापासून सुरुवात करतात तिथे दुसरंकाय होणार? ‘देवा अमुक झालं तर तुला तमुक वाहीन, एवढ्याची पूजा घालेन’ असा सौदा भक्त करतात आणि पुजाèयाला वा डायरेक्ट देवाला जेवढे अधिक पैसे देऊ तेवढी तो अधिक कृपा करेल असं मानतात त्या देशात भ्रष्टाचाराची गंगोत्री निर्माण होणारच! ती आधी धार्मिक क्षेत्रात होती. ती आता जीवनाच्या सगळ््या अंगांत पसरू लागली आहे.
प. जवाहरलाल नेहरूंच्या काळात थोडाबहुत भ्रष्टाचार असेल; पण त्यांनी कधीही अंधश्रद्घांना, भ्रष्टाचाराला, धर्मवादाला प्रतिष्ठित केलं नाही. या देशाची एक सेक्युलर प्रतिमा राखण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिकता रुजविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांची मुलगी इंदिरा गांधी, रणरागिणी, दुर्गा होती. प्रबळ, प्रभावी शासक होती; पण असुरक्षित होती. त्यातून या देशाचा पंतप्रधान पहिल्यांदा उघड अंधश्रद्घांना प्रतिष्ठा देऊ लागला. मंदिराचे आशीर्वाद घेत हिंडू लागलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी राजकारणात धर्म आणला आणि निवडणूक राजकारणासाठी भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचारही प्रतिष्ठित केला. जिथे पंंतप्रधानच प्रवाहपतित होतो तिथे दुसरं काय होणार?
जयप्रकाश यांचं आंदोलन, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, म. गांधींची मूल्यव्यवस्था पुन्हा रुजवणारं उत्तम साधन बनावं असा प्रयत्न होता. जयप्रकाश यांचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. त्यामुळं पहिल्यांदा या देशातील सरकार बदललं. काँग्रेसऐवजी दुसरं सरकार आलं. पण ज्याच्या नैतिक बळावर हा बदल झाला तोच जयप्रकाश या जगातून निघून गेला. या देशात दुसèयांदा इतिहासाला तसंच नकारात्मक वळण लागलं.
म. गांधींनी काही भरीव करण्याची गरज होती त्या वेळी गोडसेंनी त्यांना संपवलं आणि आता सत्तेबाहेर राहून पुन्हा देशातील सर्वच क्षेत्रांत काही उच्च नैतिक मापदंड निर्माण करण्याची क्षमता असणारे जयप्रकाश नारायणही नाहीसे झालेत.
या देशाचा सर्वांगाने èहास सुरूच राहिला. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातले आमचे काही सहकारी राजकारणात जाऊन भ्रष्टाचार-सहकारी ठरले.
पंतप्रधान राजीव गांधींना म्हणावं लागलं, की १ रुपयापैकी केवळ १० पैसेच गरिबांपर्यंत पोहोचतात. ९० पैसे मधली पैसे पोहोचवणारी यंत्रणा नाहीसे करू लागली.
पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंगांच्या काळात शूद्रांमधल्या काही जातींना आरक्षणाच्या निमित्तानं बळ मिळालं. त्यांची अस्मिता जागी झाली. ते राजकारणात प्रभावी बनू लागले. काहीअंशी सत्तेची सूत्रं त्यांच्या हाती येऊ लागली. पण त्यांचं भारतीयकरण होण्याची प्रक्रिया सुरू नसल्यामुळं ते ‘इंडिया’त दाखल होऊ लागले. खरा इंडियनाईज बदल झाला तो पंतप्रधान नरसिंह रावांच्या काळात. राजीव गांधींनी आधुनिकीकरण स्वीकारलं होतं; पण मिश्र अर्थव्यवस्था कायम होती. राजीव गांधींना कदाचित भारत कळत नव्हता; पण तो एक प्रामाणिक माणूस होता. आपल्या आईपेक्षा निश्चित अधिक प्रामाणिक होता. पण अत्यंत अंधश्रद्घा आणि भ्रष्टाचाराचं, अनैतिक मार्गांचं मुळीच सोयरसुतक नसलेले, तथाकथित विद्वान नरसिंह रावांनी व डॉ. मनमोहन सिंगांनी ग्लोबलायजेशन, जागतिकीकरण स्वीकारलं. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था टाकून देऊन, कल्याणकारी राज्याची कल्पना सोडून देऊन खुली भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली. त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात झाली आणि देशाचं ‘इंडियनायजेशन’ उघडपणे सुरू झालं. ‘भारता’चा कुणीच वाली उरला नाही. उलट ‘भारत’ हा अर्थव्यवस्थेवरचा भार आहे अशी धारणा सर्वच क्षेत्रांत रुजू लागली.
पैसा आणि पैशालाच प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त झाली. सारे यशाचे मापदंड बदलले. पैसा म्हणजेच यश, पैसा हेच साध्य, पैसा हेच ध्येय हा खुल्या भांडवलशाहीचा संस्कार सर्वच क्षेत्रांत रुजू लागला. परिणामत: पैसा ध्येय प्राप्त करण्याकरता पैसा साधनाचा वापर होऊ लागला. भ्रष्टाचार जो आधीच या देशाचा संस्कार होता तो आता जीवनाचा भाग बनला, शिष्टाचार झाला; प्रतिष्ठित झाला. मानवी जीवनमूल्ये, उच्च नैतिक मूल्ये रुजवणारी प्रक्रियाच अवरुद्घ झाली. पैशाची आणि दानधर्माची बटिक बनलेली भ्रष्ट, धार्मिक व्यवस्था अधिकच भ्रष्ट झाली. ती दिवसेंदिवस श्रीमंत आणि भ्रष्ट होते आहे. मानवी मूल्ये रुजविण्याचं कार्य या देशात धर्म करू शकत नाही. कारण तो पुरोहितशाहीचं शोषणाचं हत्यार बनला आहे.
म. गांधींनी मानवी, नैतिक मूल्ये रुजविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याची खूप चांगली फळे ४०-५० वर्षे दिसली. आता ती प्रक्रिया अवरुद्घ झाली आहे. मधे एक आशेचा किरण उद्भवला होता. अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन. म्हणूनच साèया देशातील सारे ‘इंडियन’ तरुणही त्यांच्यामागे उभे राहिले. त्यांच्यात म. गांधींना पाहू लागले. पण वरपांगी म. गांधी दिसणाèया अण्णा हजारेंना इंडिया आणि भारत यातलं नेमकं अंतर कळतं काय? ते भारतात जन्मले, भारतीय कपडे घालतात, भारतात ग्रामीण भागात राहतात. पण त्यांना खरा भारत कळताना दिसत नाही. तेवढा आवाका, तेवढा अभ्यास, तेवढं आकलन त्यांना आहे हे जाणवत नाही. त्यामुळं त्यांच्यावर एका मर्यादेपेक्षा जास्त अपेक्षा लादणं हा त्यांच्यावरचाच अन्याय ठरेल.
आज आहे त्या परिस्थितीचा विचार केला तर दिवसेंदिवस ‘इंडिया’ प्रगत, बलिष्ठ, श्रीमंत होत जाणार आहे. त्यातील अनेकांची विक एण्ड घरं अमेरिका, युरोप, ऑस्टड्ढेलियात निर्माण होतील आणि ‘भारत’ दिवसेंदिवस गरीब होणार, कुपोषित होणार; आत्महत्येस प्रवृत्त होणार. पण हे डिटोरिएशन एका मर्यादेपलीकडे ‘इंडिया’ला परवडणारं नाही. कारण पैसे पोट जाळू शकत नाही. त्यासाठी अन्नधान्यच लागतं आणि ते ‘भारत’च पिकवू शकतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्याची क्षमता जगात इतर कुणामध्येच नाही. त्यामुळे ‘इंडिया’ला जगण्यासाठी ‘भारता’ला जिवंत ठेवावंच लागणार आहे. ‘भारता’च्या अस्तित्वावरच इंडियाची मिजास, प्रगती अवलंबून आहे. त्यामुळं जेव्हा परिस्थिती फारच रसातळाला जायला सुरुवात होईल तेव्हा याच भारतातून इंडियात जाऊ इच्छिणाèया आणि इंडियात असणाèया काही संवेदनशील माणसांना ‘भारत’ समजून घेण्याची इच्छा होईल. त्यातून त्यांना भारत कळताना उच्च मानवी मूल्ये व उच्च नैतिक मूल्यांचं महत्त्व पटेल. ते रुजविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतील आणि त्यातून पुन्हा जीवनातल्या सर्वच अंगांत उच्च मानवी मूल्याधारित मापदंड प्रस्थापित होतील. ते मापदंड स्वत:च्या जगण्यात स्थापित करणाèया अनेक व्यक्ती पुन्हा या समाजात बहुसंख्येत दिसू लागतील. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. राजा, कलमाडी यांचं तुरुंगात जाणं, अण्णा हजारे, केजरीवाल यांचं आंदोलन ही सारीच त्या दिशेनं ‘भारत’ चालत जाण्याची शक्यता दर्शविणारी सुचिन्हे आहेत. मावनी जीवनाचं एक जैविक वैशिष्ट्य आहे. त्याच्या साèया जगण्याची धडपडच सुख, आनंद मिळविण्यासाठी असते. ‘पैशातून हवं ते सुख मिळवता येतं’ हा संस्कार जागतिकीकरणामुळं मोकाट सुटलेली भांडवलशाही रुजविण्यात यशस्वी झाली आहे. पण माणसाचा शोध असतो तो ‘दीर्घकाळ टिकणाèया सुखाचा.’ आणि पैसा, वस्तू, चैनीची साधनं, तात्पुरता सेक्स कधीच दीर्घकाळ टिकणारं सुख देऊ शकत नाही. त्यातून मिळणारं सुख खूप क्षणिक असतं. काही संवेदनशील माणसांना हे तीव्रतेनं लक्षात येतं. एखाद्या प्रसंगामुळं, घटनेमुळं ते भानावर येतात आणि मग त्यांचा दीर्घकाळ मिळणाèया सुखाचा शोध सुरू होतो. काही वाट चुकलेले हिमालयात जातात सुख शोधायला आणि देव देव करत बसतात.
काही वाट गवसलेले ‘माणसांना जोडून घेण्यात’ सुख शोधतात आणि मग अशांच्या सुख शोधण्याच्या प्रक्रियेतून नैतिक मूल्ये रुजवणारी क्रांती घडून येते. माणसाला माणूसपण देणारी प्रक्रिया घडून येते. अशांमुळेच मानवजात टिकून आहे. जिवंत आहे. प्रगतिपथावर आहे… असणार आहे.
श्याम मानव
(लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत )
९३७१०१४८३२

Previous articleमहाराष्ट्र भूषण वादंगात पुरोगाम्यांच्या तोंडाला पट्टी का?
Next articleन्यायालय, नेते, मीडिया आणि जनता…सारेच प्रवाहपतीत
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here