इस दिल-ए-तबाह को, किसीं…..

अतुल विडूळकर

——————————————
शुक्रवारच्या रात्रीतून जी काही राजकीय परिस्थिती बदलली ती अकल्पित, अतार्किक, अनपेक्षित आहे. ती अनैतिक आहे, असंही म्हणणं चुकीचं ठरू नये; इतक्या विचित्र घडामोडी रात्रीतून घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी जे काही केलं, त्याचं कारण ते काहीही देत असले तरी खरं कारण कळू नये, इतकी जनता काही नासमज नाही.

तरीपण, आज दिवसभर सुरू असलेल्या चर्चेवरून दोन ढोबळ अंदाज निघतात. एक, अजित पवारांच्या मानगुटीवर बसलेलं सिंचन घोटाळ्याचं भूत काही उतरायला तयार नाही. त्यामुळे तुरुंगात जाण्याऐवजी सर्व टीकेचं हलाहल पचवून भाजपची वाट धरा किंवा मग मांडलिकत्व स्वीकारा आणि आजचं मरण उद्यावर ढकला, हा विचार. दुसरा अंदाज अपेक्षित, सरधोपट, नेहमीचाच आहे; तो म्हणजे या प्रकाराला स्वतः शरद पवारांचीच फूस आहे.

आयुष्याची 52-53 वर्षे राजकारणात घालवणारे शरद पवार निःसंशय दिग्गज नेते आहेत. राजकारणातील डाव-प्रतिडाव, कुटनीती यात ते तरबेज आहेत, अजोड आहे. यातही संशय नाही. पण पवारांच्या प्रत्येक कृतीचे जितके अर्थ काढले जातात, तितके अर्थ इतर कुठल्याही नेत्याच्या विचार-कृतीचे काढले जात नाहीत, हे वास्तव आहे. त्यातूनच त्यांची प्रतिमा अत्यंत बेभरवशाचे नेते अशी झाली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या बंडामागे खुद्द मोठे पवार आहेत, अशी शंका घेणं फारसं अनपेक्षित नाही.

पण या दुसऱ्या अंदाजात फार दम असेल, हे आज दिवसभरातील घडामोडीवरून दिसत नाही. उद्धव ठाकरे यांच्या सोबतची त्यांची पत्रकार परिषद, त्यात शपथविधीसाठी अजित पवारांसोबत ‘रामुकाका भवनात’ जाणारे डॉ राजेंद्र शिंगणे यांची साक्ष काढणं, अजित पवारांना गटनेतेपदावरून काढण्याच्या हालचाली हे सारं निर्णायक वळणावर पोहचण्याची पवारांची तयारीच दिसत आहे.

राहिला पहिला अंदाज, त्यातील अजित पवारांचं गटनेतेपद, त्यांचा व्हीप लागू होईल की नाही, या तांत्रिक बाबी सोडल्या तर त्यांच्या बंडाचा ‘रिस्क-रिवॉर्ड रेशो’ हा अजिबात प्रॅक्टिकल नाही. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी सर्वच त्यांच्या मागे जाणं जितकं अशक्य आहे, तितकंच पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदीनुसार किमान दोन तृतीयांश जाणं देखील कठीणच. मग अजित पवारांनी ही रिस्क का घेतली ? अशक्य आणि कठीण वाटणाऱ्या काही गोष्टी घडल्या तरीही त्यांना होऊ शकणारा असा कोणता राजकीय लाभ असेल की ज्याचं त्यांना अप्रूप आहे. उपमुख्यमंत्री पद त्यांनी आधीच उपभोगलय. कदाचित नव्या सरकारमध्ये तेही त्यांचंच पद असतं. ते पैशासाठी जातील असंही वाटत नाही.

समजा, आज पहाटे पहाटे पुन्हा आलेले फडणवीस फ्लोअर टेस्ट नंतर परत गेलेच, तर 30 तारखेला अजित पवारांचं ‘पॉलिटिकल स्टेटस’ काय असणार ? आजही मोठ्या पवारांना मानणाऱ्या महाराष्ट्रात अजित पवारांच्या बंडाला लोक विसरतील का ? की या राजकीय आत्महत्येपेक्षा सिंचन घोटाळ्याच्या फाईलचं वजन जास्त आहे, हे खुद्द अजित पवारच सांगू शकतील.

या सर्व घडामोडींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 30 तारखेची वाट बघावी लागणार आहे, किंवा अत्यंत अनपेक्षितपणे आधीच उत्तर मिळेल हे आज तरी सांगता येत नाही.

पण या दरम्यान लोकशाही मूल्य, राजकारणाची घटनात्मक चौकट, आणि पवारांचं मुरब्बी राजकारण याबाबत काही प्रश्न उभे राहतात.

शरद पवारांच्या राजकीय धुरंधरपणाची आज जी कसोटी लागली आहे, ती इतिहासात क्वचितच लागलेली असेल. कारण यावेळी पवारांचं घर फुटलंय. तसं तर लोकसभा निवडणुकीत घराच्या भिंतीला तडा गेला होता. आपल्या इच्छेविरुद्ध पार्थ पवार उभे राहिले आणि मागे हटायला तयार नाहीत म्हणून स्वतःची उमेदवारी मागे घेऊन पवारांनी डागडुजी करून बघितली. त्यात त्यांना यशही आलं. पण यावेळी पार्थ नाही तर पार्थच्या बापाशी पवारांची गाठ आहे. हा भिंतीला तडा नाही, भगदाड आहे. ते पवार कसे बुजवितात यावर त्यांच्या राजकीय धुरंधरपणाची बुज राखणं अवलंबून आहे.

पण ही बुज राखताना त्यांच्या समोर कोण आहेत, हेही बघायला हवं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच शरद पवारांनी ज्या ताकतीने किल्ला लढवला तो पक्षाच्या कितीतरी उध्वस्त बुरुजांना पुन्हा उभारणारा होता. त्यातच ईडीच्या नोटिशीत त्यांच्या नावाचा असलेला उल्लेख आणि सातारच्या सभेतील पाऊस हे त्यांच्यासाठी बोनस पॉईंटन्स होते. त्यांनतर आजच्या तारखेपर्यंत आणि आताही एक पवारच केवळ राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचं पालकत्व घेतल्यासारखे ते लढत आहे. हा लढा कुणाविरुद्ध आहे हे जर लक्षात घेतलं तर मोठ्या पवारांच्या राजकीय धुरंधरपणाला कोणत्या मर्यादा आहेत, हे जाणवतं.

शरद पवार हे निःसंशय मोठे नेते आहेत. पण त्यांच्या मोठेपणाचे, कुटनीतीचे, चाणक्यनीतीचे दाखले देताना आपण त्यांचा काळ विसरतो. ज्या काळातील दाखले दिले जातात तो काळ देखील काही राजकारणातील संतप्रवृत्तीच्या लोकांनी भरलेला नव्हता. मात्र तरीही आज मोदी-शहा सारखे खुनशी राजकारण करणारे नेते सत्तेत आहेत, तसं आव्हान पवारांना अपवादानेच मिळालं असेल. कारण, मोदी-शहा सारखे नेते, आरएसएससारखी थिंक टॅंक, त्यांचा प्रत्येक घटनात्मक संस्थेवर असलेला एकहाती वचक, कार्पोरेट जगतातून उगम पावणारं अर्थकारण आणि त्यांची सरकारला अर्थपूर्ण साथ, भाजपच्या हातात सत्ता असण्याचे बिग ब्रदर लाभार्थी, अशी ग्रहस्थिती असली की राजकारणात विरोधक तर असतात, पण त्याचं विरोधी राजकारण संपल्यात जमा असतं. पवारांच्या राजकीय धुरंधरपणाला मर्यादा येतात त्या इथे.

*पोलीस, ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणाच नव्हे तर न्यायपालिका, निवडणूक आयोग, राष्ट्रपती-राज्यपाल सारखे संविधानिक पद देखील जेव्हा केंद्रीय सत्तापक्षाच्या मजबूत पकडीत असतात, तेव्हा विरोधी पक्षाच्या राजकारणाला एक विशिष्ट मर्यादा येते, ती पवारप्रेमाच्या आड दुर्लक्ष करण्यासारखी नसते. या मर्यादेत राहून मोठ्या पवारांना मार्ग काढावा लागणार आहे.*

घटनात्मक पेचप्रसंग सोडविताना घटनात्मक तरतुदीच मदतीच्या असतात. पण सध्याच्या राजकीय संस्कृतीमध्ये जिथे या तरतुदींना फाट्यावर मारणं म्हणजे “मास्टरस्ट्रोक” असतो, “चाणक्यनीती” असते, अशा वेळी केवळ विरोधी पक्षच नव्हे तर एकंदरीत लोकशाहीच नामधारी राहण्याची शक्यता असते. कारण घटनात्मक संस्था आणि न्यायपालिका यांच्यावरच लोकशाही वाचवण्याची जबाबदारी दिसत असली तरी, ती ‘लोकशाही मूल्याचा आदर करणारी व्यवस्था अस्तित्वात आहे की नाही’, यावर देखील अवलंबून असते. अशी व्यवस्था निर्माण होण्यासाठी व्यवस्थेपेक्षा मोठा होत चाललेल्या नेत्याची भक्ती थांबणं आवश्यक असते. ती थांबत नसेल तर त्यासाठी प्रयत्न करणं विरोधी पक्षाचं ते काम असते. विरोधी पक्ष संपणे आवश्यक बनते, ते इथेच !

राजकारण हे कधीच नैतिक मूल्यांचं क्षेत्र होऊ शकत नाही. तरीही आजचा दिवस (खरेतर रात्र) लोकशाही मूल्य आणि राजकारणाच्या घटनात्मक चौकटीला तोडणारा दिवस म्हणून लक्षात राहील. त्यासाठी केंद्राचे “रामू काका” म्हणून ‘होशियारी’ करणारी व्यक्ती देखील कायम लक्षात राहील. हा धक्का आपल्या लोकशाहीला पहिला नाही. तसा तो अखेरचाही नसेल. आपल्या लोकशाहीच्या आजपर्यंतच्या प्रवासाला चपखल बसणारा एक शेर आठवतोय..

‘इस दिल-ए-तबाह को किसीं जखम की जरूरत तो नही ;*
‘मगर है आरजू, के तुम भी एक वार करो !!”

असाच एक वार आज झाला. तो अजित पवारांना भाजपने आपल्या तंबूत नेला म्हणून नाही. तर रात्रीच्या अंधारात लोकशाही मूल्य ‘आरे’तली झाडं कापावी तशी कापली म्हणून !!

(लेखक मीडिया वॉच चे उपसंपादक आहेत)

Previous articleकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय
Next articleअजित पवारांचा सर्जिकल स्ट्राईक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.