उटी: क्वीन ऑफ हिल स्टेशन

 -राकेश साळुंखे

 ८०-९० च्या दशकातील हिंदी सिनेमात अनेकदा उटीचे दर्शन घडायचे . तसंही उटी या हिल स्टेशनची माहिती नाही, असा माणूस सापडणं विरळच . तमिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यात हे थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चिम घाटाचा भाग असलेल्या निलगिरी पर्वतराजीमध्ये उटी वसलेले आहे . १८ व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांनी हा निसर्गरम्य परिसर जगासमोर आणला . उटकमंडलमचे उटी असे नामकरण  त्यांनीच केले .

 उटी हे  बंगलोर विमानतळापासून ३०७, म्हैसूरपासून १२५  तर कोईमतूरपासून ८८ किमी अंतरावर आहे. उटीला जाताना बंदिपूर अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यात  हेअरपीनच्या आकाराचे अवघड घाट आहेत. परंतु अधूनमधून भेटणारे चहाचे मळे आणि दाट हिरवळीमुळे भिती  वाटत नाही . पूर्वी  बंदिपूरच्या जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या चंदन तस्कर वीरप्पनची  या भागात प्रचंड दहशत होती. रात्री या घाटातून एकट्या दुकट्या वाहनाला प्रवास बंदी असायची . मी सुद्धा तेथून पहिल्यांदा गेलो तेव्हा माझ्याही मनात वीरप्पनविषयी धाकधूक होती . त्यामुळे वाटेतील निसर्ग , हरणांचे कळप फोटोग्राफीसाठी खुणावत असतानाही थांबण्याचे धाडस होईना. एके ठिकाणी मात्र न राहवल्याने थांबलो होतो . कर्नाटक-तामिळनाडू या दोन राज्यांच्या सीमेवर जंगलातून शॉर्टकटने अजून  एक खड्या घाटाचा रस्ता आहे . जेव्हा मी येथून प्रवास केला तेव्हा हे माहीत नव्हते की दुसरीकडून चांगला रस्ता आहे . तेव्हा GPS/Goggle Map वगैरे नव्हते .  लोकांना विचारून व पुस्तकी नकाशावरूनच प्रवास सुरू असायचा.  या रस्त्याला खूप खडा घाट आहे, तो टाळावाच. गुडलूर मार्गावर हेअर पिन बेंड असले तरी तो रस्ता चांगला व सुंदर आहे .

        सध्या पावसाळा असल्याने सगळीकडे प्रफुल्लीत करणारा हिरवा रंग दिसतोय . साऱ्या शृष्टीने हिरव्या रंगाची चादर पांघरून घेतलीय. त्यामुळे तर उटीची वारंवार आठवण येतेय. हिरव्यागार डोंगर रांगांनी वेढलेल्या उटीचे तापमान वर्षभर थंडच असते . उटीला  दक्षिणेकडील थंड हवेच्या ठिकाणांची राणी (Queen of hill station) म्हणतात.  तिथे मे महिन्यातही  दिसणारी हिरवळ व थंडगार वातावरण ते बिरूद सार्थ असल्याची अनुभूती देते.

    प्रत्येक वेळी उटीमध्ये मी थंडीच्या नाना तऱ्हा अनुभवल्यात .  एकदा उटीला माझ्या पुतण्याना घेऊन गेलो होतो . फेब्रुवारी महिना होता. हॉटेलच्या बाहेर Horticulure  विभागाची मोठी गार्डन होती.  सकाळी बाहेर दाट धुके व भरपूर थंडी होती . सूर्योदयही होऊ लागला होता . त्या गार्डन मधील धुक्याच्या पडद्यातून हुडहुडत चालताना एक वेगळीच मजा येत होती . माझ्या पुतण्यांनीही हा अनुभव घ्यावा असे वाटल्याने त्यांना उठवू लागलो .  पण  प्रचंड थंडीमुळे ते दोघे  अंथरुणातून बाहेर यायलाच तयार होईनात .  ते १० वाजताच बाहेर आले.  असाच अनुभव ऑगस्ट महिन्यात गेलो होतो तेव्हाही आला.  त्यावेळी  रात्री  प्रचंड थंडी आहे म्हणून एक उबदार पांघरूण असतानाही अजून एक उबदार पांघरून मागवले. पण तरीही  थंडी वाजतच  होती . हॉटेल मॅनेजरने रूम घेताना रूम हीटर लागेल का म्हणून विचारले होते. पण एवढी थंडी  वाजेल असे वाटले नाही. त्यामुळे आम्ही हिटर घेतला नव्हता . त्याने  त्याचा  दरही खूप सांगितला होता .  शेवटी रात्री  रूम हीटर घ्यावाच लागला.मगच थंडी गेली.

       उटीचा परिसर हा असंख्य चहाच्या मळ्यांनी व्यापला आहे . अनेक प्रकारच्या बागांनीही उटी समृद्ध आहे . येथील बोटॅनिकल गार्डन हे मुख्य आकर्षण आहे . ५५ एकर परिसरात पसरलेल्या या बागेत निरनिराळी जवळपास ६५०प्रजाती ची झाडे आहेत . जापनीज रेन ट्री पासून ते सकलंट ( Succulent ) पर्यंत विविध प्रकारच्या वनस्पती येथे पहायला मिळतात . ब्रिटिश राजवटीत १८४८मध्ये या बागेची निर्मिती झाली . भाजीपाला पिकविण्याच्या  उद्देशाने १८४७ मध्ये प्रथम ही जागा वापरली गेली. नंतर मात्र फुलोत्पादन शाखा ( Horticultural society ) व सामान्य माणसांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून दिली गेली . या गार्डनच्या वरच्या बाजूला दोडबेटाचे जंगल आहे . दोडबेटा पर्वताच्या उतारावर ही गार्डन उभारण्यात आली आहे . येथे अनेक ग्लास हाऊसेस आहेत की ज्यामध्ये फुलांची खूप विविधता आहे. येथे २० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या झाडाचे खोड जीवाश्म रूपात  पहायला मिळते.

 उटीतील बोटॅनिकल गार्डनमध्ये मला सर्वात जास्त आकर्षण तेथील नर्सरीचे आहे. तेथून विविध प्रकारचे  Succulant (कॅक्टस) घेऊन येणे, हे हे माझे खास उद्दीष्ट असते . गाडीने गेलो  तर खूप सोप जातं. मात्र एकदा ट्रेन व  बस असा प्रवास केला होता. येथून रोपे घेतली होती. बसने उटीहून सकाळी म्हैसूरमध्ये आलो . ट्रेन रात्री होती . मग म्हैसूर बघायचे ठरले. क्लॉकरूमला झाडे ठेऊन घेण्यास तेथील कर्मचारी तयार नव्हते .  मग बॅग विकत घेऊन त्यात ती रोपे ठेवली व नियमानुसार बॅगेला कलुप लावून मगच बाहेर पडलो. तरी  निम्मा जीव त्या रोपांकडेच लागलेला होता . संध्याकाळी जेव्हा ती रोपे सुस्थितीत पाहिली तेव्हाच जीव शांत झाला.   

उटीमधील रोज गार्डन ही खूप सुंदर आहे . उटी शहराच्या मध्यवर्ती भागात जवळपास १० एकर क्षेत्रावर ही गुलाबाची बाग तयार करण्यात आली आहे . गुलाबाचे २०,००० हजार प्रकार येथे पहायला मिळतात . तऱ्हेतऱ्हेचे गुलाबाचे रंग पाहून डोळे दिपून जातात .  येथे एक प्रचंड मोठे झाड आहे त्याच्या बुंध्याचा घेर दोन जणांनी कवेत घेतला तरी हातात येत नाही. येथे गुलाबाची कलमे विकतही मिळतात. सुंदर बगिच्यांबरोबर उटी हे तलावांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे . लहान मोठे असे सात तलाव तेथे आहेत . निसर्गसंपन्न अशा या तलावात बोटिंग करणे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते .

कुनूर (Coonoor ) 

उटीपासून जवळच असलेले, हिरवे गालिचे अंथरल्यासारखे दिसणाऱ्या चहाच्या मळ्यांनी वेढलेलं हे ठिकाण आहे . निलगिरी डोंगर रांगेमध्ये असलेले कुनूर उटीपासून साधारणपणे १९ किमी अंतरावर आहे . कूनूर निलगिरी चहासाठी प्रसिद्ध आहे . सर्व बाजूंनी चहाच्या मळ्यांनी वेढलेल्या कूनूरला भेट दिलीच पाहिजे . उटी ते कूनूर अर्ध्या तासाचे अंतर असले तरी खूप रहदारी असल्याने तेथे जायला एक तास लागतोच . सकाळी लवकर निघाल्यास रस्त्यावर गर्दी कमी असते.  येथील मिल्ट्री एरियातून गेल्यास रुंद रस्ते व  रहदारी कमी लागते .

कूनूर चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे . येथील चहा फॅक्टरीला भेट देऊन विविध प्रकारच्या चहाची चव चाखायला मजा येते . High Field या चहा फॅक्टरी मध्ये चहा पत्तीपासून चहा पावडर कशी बनते, तसेच त्याचे ग्रेडिंग, पॅकेजिंग कसे होते याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते . उटी ते दोडबेटा वाटेवर एक टी फॅक्टरी आहे तेथेही असे प्रात्यक्षिक दाखविले जाते. परंतु तेथे एन्ट्री फी जास्त आहे व गर्दीही खूप असते .

येथील चहाचे मळे उंच टेकड्यांवर आहेत . या मळ्यातून  वाहणारे पाण्याचे छोटे छोटे प्रवाह तसेच काही ठिकाणी त्यांना प्राप्त झालेले छोट्या धबधब्याचे स्वरूप तसेच  खाली असणाऱ्या दरीतून वर येणारे धुके या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यास मजा येते . येथे अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे . हिंदी चित्रपटातील जुनी अभिनेत्री मुमताज हिच्या मालकीचे चहा मळे येथे आहेत .

Dolphin Nose

कूनूर ते कोटगीरी रोडवर हे ठिकाण आहे . या कड्याचे टोक डॉल्फिनच्या नाकासारखे दिसते म्हणून त्याला ‘डॉल्फिन नोज’ म्हणतात . या कड्यावरून खाली दरीतील निसर्ग न्याहाळताना डोळ्याचे पारणे फिटते . धुकं नसेल तर येथून समोरच्या दरीत कोसळणारा धबधबा दिसतो . धुक्याने भरलेल्या हिरव्या रंगाने न्हाऊन निघालेल्या दऱ्या अफलातून दिसतात .

Sim’s Park

विविध प्रकारचे गुलाब , सुगंधी फुले व अनेक तरहतऱ्हेच्या वनस्पती असलेली ही बोटॅनिकल गार्डन आहे . वेळ असेल तरच येथे जावे . येथील टॉय ट्रेन विषयी थोडे सांगावे वाटते . उटी ते कूनूर दरम्यान धावणारी ही छोटी ट्रेन स्वप्नातील सहल घडवते . या ट्रेनमधून प्रत्येकाने अवश्य प्रवास केला पाहिजे . माथेरान, दार्जिलिंग यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी अशा छोट्या ट्रेन इंग्रजांच्या काळापासून धावत आहेत . युनेस्कोने या ट्रेनचा वर्ल्ड हेरिटेज मध्ये समावेश केला आहे . ट्रेनचे अगोदरच ऑनलाइन बुकींग केल्यास सोयीचे पडते . सुट्ट्यांच्या काळात या ट्रेनचे तिकीट सहज मिळत नाही .उटी तसे सर्वांच्या परिचयाचे आहेच. कूनूर थोडे दुर्लक्षित आहे .  मात्र उटी परमाणेच कूनूरही खूप सुंदर आहे .उटीला गेल्यावर इतर साऊथ इंडियन पदार्थांबरोबरच ‘वरकी’ (खारी सदृश पदार्थ) नक्की खाऊन पहा . प्रसिद्ध रेस्टॉरंट चेन ‘अड्यार- आनंद भवन’ ची शाखा येथे आहे . प्रत्येक ऋतूत येणारा वेगवेगळा अनुभव उटीविषयी ओढ निर्माण करतो .  एप्रिल-मे महिन्यात डिसेंबरच्या गारठ्याची अनुभुती देणारी तसेच फेब्रुवारी महिन्यात शांत निवांतपणे सहलीची मजा चाखू देणारी उटी मला नेहमीच आकर्षित करते. तेथील निसर्ग  पुन्हा पुन्हा उटीच्या प्रेमात पडायला भाग पाडतो .

(लेखक लोकायत प्रकाशनचे संचालक आहेत)

84849 77899

चला उटी-कुनूरच्या सफारीलाखालील video वर क्लिक करा

Bandipur-Ooty-Coonoor- By- Rakesh Salunkhe

 

Previous articleजयपूरच्या राजा मानसिंगांची समाधी अचलपुरात  
Next articleप्रिंट माध्यमांचे सामर्थ्य कमी लेखू नये! – एन. राम
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here