उतावीळ नाना पटोळे !   

प्रवीण बर्दापूरकर  

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररची डॉमिनिक केफ्फर याच्या विरुद्धची लढत पाच सेटसपर्यंत आणि जवळजवळ सुमारे अडीच तासावर चालली . फेडरनं हा सामना ७-६ , ६-७ , ७-६ , ७-५ असा जिंकला .म्हणजे दोन्ही खेडाळूंची किती दमछाक झाली असेल हे लक्षात घ्या . पण ,त्यातही कौतुक  रॉजर फेडररचं ; गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झालेल्या शिवाय वय ३९ , सामन्यात तीन ट्राय ब्रेकर… तरी फेडरर जिंकला . आश्चर्यस्तंभित करणारी ही फेडररची कामगिरी आहे . म्हणून कायमच जिद्द आणि प्रेरणा यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे फेडरर आहे . अर्थात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे यांना फेडरर माहीत असण्याची शक्यता नाही आणि फेडररसारखा संयम तसंच जिद्दही नाना पटोळे यांच्यात आहे , असं काही दिसत नाही .

एकूणच नाना पटोळे यांची राजकीय कारकीर्द म्हणजे ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशा पद्धतीची दिसतेय . १९९० साली भंडारा जिल्हा परिषदेवर झालेली निवड ते २०२१ असा नाना पटोळे यांचा राजकीय प्रवास आहे आणि अपक्ष ते काँग्रेस ते भाजप ते पुन्हा काँग्रेस अशी वळणं या प्रवासात नाना पटोळे यांनी घेतलेली आहे. या काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही त्यांनी जिंकलेल्या आहेत . २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपाचे उमेदवार म्हणून जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेऊन पक्ष सोडणं हे नाना पटोळे यांच्या राजकीय कारकिर्दीतलं दुसरं शिखर होतं . २०१४ची निवडणूक जिंकतांना ज्यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण संस्थेत महाविद्यालयीन शिक्षण झालं त्या प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ( महा)राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा नाना पटोळे यांनी केलेला  पराभव हे पहिलं शिखर होतं . त्या निकालानंतर ‘जायंट किलर’ ठरलेले नाना एकदम प्रकाशझोतात आले आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले .

प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केल्याच्या मोबदल्यात जर केंद्रात मंत्रिपद मिळालं असतं तर नाना पटोळे यांनी भाजपचा त्याग केला नसता , हे उघड आहे . पण , ते असो  कारण राजकारणात अनेकांच्या वाट्याला  असे ‘जर तर’ खूप येतात आणि जातात ; कधी त्या येण्या-जाण्याला मोल मिळतं तर कधी मिळत नाही .नाना पटोळे बहुजन समाजातले आहे आणि राजकीय प्रवासाची सुरुवात  स्वबळावर सुरु केलेली आहे . त्यामुळे आजवर त्यांनी जे काही मिळवलं त्याचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे , यात कोणतीही शंका नाही . मात्र , अशात नाना पटोळे यांनी बरेच  लूज बॉल टाकले आहेत . त्यामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील स्थैर्यांबाबत चर्चांना नाहक पेव फुटलं . राजकारणात आलेल्या प्रत्येकाला राज्यात आमदार , केंद्रात खासदार , मंत्री , मुख्यमंत्री व्हावसं वाटण्यात काहीच गैरनाही . मनातल्या मनात असे मांडे भाजणं  प्रत्येकाचाच स्वाभाविक अधिकारच आहे . एकदा तर आपण या राज्याचे सर्वांत सक्षम मुख्यमंत्री आपण कसे होऊ शकतो याची स्वप्न पाहत असल्याचं  नगरसेवकपदी कसाबसा निवडून आलेला एक राजकारणी गप्पा रंगवत असताना बघायला मिळालेलं आहे . नाना पटोळे यांचा दर्जा त्या नगरसेवकापेक्षा मोठा आहे हे नि:संशय पण , त्यासाठी ( पक्षी : मुख्यमंत्रीपद ) जरा कळ सोसणं आणि उतावीळपणा न दाखवता रॉजर फेडररसारखं जिद्दीनं काम करणं आवश्यक आहे , हे कांही नाना पटोळे यांच्या लक्षात येत नाही .

स्पष्टवक्तेपणा आणि बेतालपणा , आक्रमकता आणि आतातायीपणा यातल्या सीमारेषा लक्षात घेऊन जो राजकारणात वावरतो त्याची पावलं यशाच्या मार्गावर कायमच पडत असतात , याचा विसर नाना पटोळे यांना पडलेला दिसतो आहे . अन्यथा ,‘आपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाळत ठेवून आहेत.’ अशी बेताल बडबड नाना पटोळे यांनी केलीच नसती . खणिकर्म महामंडळातील एका कंत्राट प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना आपण आपल्याच पक्षाच्या ऊर्जामंत्र्यावर निशाणा साधतो आहे याचाही विसर नाना पटोळे यांना पडला . विधानसभेच्या सभापतीपदावर असताना राज्याच्या मुख्य सचिवाला सभागृहात हजर होण्याचा हुकूम देण्याचं (आततायी ) धाडस नाना पटोळे यांनी दाखवलं होतं . शिवाय ते भाजप आणि शिवसेनेवरही अधूनमधून गुरगुर करत असतात .

भंडारा जिल्ह्यासारख्या अरण्य प्रदेशातून नाना पटोळे आले आहेत .त्या अरण्यात अनेक वाघ आणि बिबटे आहेत .  त्या वाघांपासूनच ही गुरगुर करण्याची सवय नाना पटोळे यांना लागली , असं कुणी म्हणेलही पण , राजकारण करताना एकाच वेळेस सर्व स्व आणि विरोधी पक्षालाही अंगावर ओढावून घेण्यात कोणताही शहाणपणा नसतो . त्यात पुढे जाऊन देशातले एक ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्यावरही एक उसळता चेंडू भिरकावण्याचा उतावीळपणा नाना पटोळे यांनी केला . शरद पवार यांचं वय , अनुभव आणि त्यांच्या राजकारण करण्याची शैली याची कोणतीही पोच न ठेवता केलेला हा स्वैर मारा येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला महाग पडू शकतो याची जाणीव नाना पटोळे यांना नसावी , हे केवळ त्यांचंच नाही तर काँग्रेस पक्षाचं दुर्दैव म्हणायला हवं . योग्य वेळी ‘धडा’ शिकवणं ही शरद पवार यांची शैली आहे आणि ती योग्य वेळ निवडणूक असते , ही कांही नानांच्या लक्षात आलेलं नाही .

विधानसभेचं अध्यक्षपद सोडून नाना पटोळे यांनी प्रदेश काँगेसचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे ( किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना ते स्वीकारायला लावलं आहे ) . काँगेस पक्षाचा गाडा देश आणि राज्याठी  सध्या सर्व बाजूने चिखलात रुतलेला आणि मोडकळीसही आलेला आहे . एकेकाळी स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेसला १९९९ पासून म्हणजे ‘महा ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा सहारा घ्यावा लागत आहे . आता तर (महा)राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेलाही सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी तिघांची आघाडी काँग्रेसला करावी लागली आहे . राज्यात  विधानसभेतलं संख्याबळ पन्नासच्या खाली उतरलं आहे . अनेक जिल्हा परिषदा , पंचायत समित्या ,नगर पंचायती , नगर परिषदा , महापालिका आणि ग्रामपंचायतीही काँग्रेसच्या हातून अन्य पक्षांनी खेचून घेतल्या आहेत . महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची वाणवा पडावी इतक्या केविलवाण्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष सापडलेला आहे . तरीही काँग्रेस पक्षाची पाळंमुळं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही रुजलेली आहेत , काँग्रेसचे सहानुभूतीदार शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात आहेत , हे न विसरता हा मोडून पडलेला गाडा आधी चिखलातून काढून आणि मग दुरुस्त करुन चालवावा याचं भान नाना पटोळे यांना राहिलेलं नाही , असंच त्यांच्या या उतावीळ आणि आततायी विधानावरुन स्पष्ट होतं . मोडून पडलेल्या या गाड्याला नव्या दमाचे घोडे किंवा बैल जोडून कुशलपणे  सारथ्य नाना पटोळे करतील, अशी अपेक्षा होती . थेट राहुल गांधी यांचा वरदहस्त लाभल्यामुळे संकटनात्मक पातळीवर डागडुजी करुन नाना पटोळे काँग्रेस पक्षात चैतन्य निर्माण करतील असं वाटत होतं  पण , तसं काही घडताना दिसत नाहीये . गावोगाव मेळावे घेणं आणि सर्वांना एकाच वेळी अंगावर ओढवून घेणं , हेच पक्षकार्य असतं असा बहुधा नाना पटोळे यांचा समज झालेला असावा . त्यात नाना पटोळे यांच्या अशा भडकावू वक्तव्यांना मोठी प्रसिद्धी मिळते . ती प्रसिद्धी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आणि काडीमात्र उपयोगाचीही नाही हे नाना पटोळे यांनी लक्षात घ्यायला हवं .

माझी एक आवडती मांडणी आहे – माध्यमं ही ‘नाच्या’ असतात . त्यांना बॅंड कोण वाजवतंय आहे  , याच्याशी काही घेणं-देणं नसतं ; वाजवण्याचे आवाज आले की, नाच्या जसा नाचायला सुरुवात करतो तसं चटपटीत किंवा भडकावू वक्तव्य हाती आलं की , ते करणाऱ्या व्यक्तीला प्रसिद्धी देण्यात माध्यमांना रस असतो . कारण ती व्यक्ती नव्हे तर पद माध्यमांसाठी महत्त्वाचं असतं .  पक्षाचं संघटन मजबूत होतं किंवा नाही , कोणाचं कुठे तरी स्थान मजबूत होतं की नाही  याच्याशी माध्यमांना काही सोयर सूतक नसतं तर ती माध्यमांची मजबूरी असते  .

नाना पटोळे यांनी हे कायम लक्षात ठेवावं की , ते सांगडी मतदारसंघातून भंडारा जिल्हा परिषदेवर निवडून आलेले सदस्य आजही असते तर त्यांना आज मिळते तेवढी प्रसिद्धी कधीही मिळाली नसती . ते प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून माध्यमांचे कथित लाडके आहेत आणि माध्यमांचं लाडकं असण्यापेक्षा नाना पटोळे पक्ष संघटन कसं मजबूत करतात यात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीं तसंच  समर्थक आणि हितचिंतकाना रस आहे . उतावीळपणे वागून आणि बोलून भलेही मोठी प्रसिद्धी मिळत असेल पण , त्याचा पक्षवाढीसाठी काडीमात्र उपयोग नाही हे , नाना पटोळे यांनी लक्षात घ्यावं .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

 

 

Previous articleदोन ध्रुवांना जोडणारं नातं
Next articleप्रलयंकारी काळाचा स्नॅपशॉट घेणारा पत्रकार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.