उदार हिंदू मनाला घातली जाताहेत कुंपणे!

(साभार: साप्ताहिक साधना)

-रामचंद्र गुहा

मुख्यमंत्र्यांनी विज्ञानाला मोडीत काढून अंधश्रद्धांचा पुरस्कार करणे, स्त्रियांच्या स्वातंत्र्याला कमी लेखणे, पाश्चात्त्यांविषयी सातत्याने काही तरी बरळणे, संघप्रणीत वर्चस्ववादी उतरंड रुजवण्याचा प्रयत्न करणे- या सगळ्यातून आजचे कुंपण घातलेले हिंदू मानस दिसते. पत्रकार, कलाकार, लेखक, चित्रपट-निर्माते असे जे कोणी समाजातील अन्यायांचे स्वरूप वा त्याबाबतचे सत्य दाखवण्याची हिंमत करतील, त्यांच्यावर हल्ले केले जातात. खूप पूर्वी एकोणिसाव्या शतकात- जेव्हा हवाई प्रवास आणि इंटरनेट यांचा शोधही लागला नव्हता, तेव्हा- ज्योतिबा फुले जगभरातील शोषितांच्या सामाजिक उत्थानाची प्रक्रिया समजून घेण्याकरता मनाने सातासमुद्रापार पोहोचले. आज एकविसाव्या शतकात जग अतिशय जवळ आलेलं आहे, पण भारताचे पंतप्रधान आपल्याला झापडं लावून केवळ स्वत:कडे बघायला सांगत आहेत. आपण हे करता कामा नये.

…………………………………………………….

‘मी कोण आहे? आशियाई, युरोपियन की अमेरिकन? माझ्यातल्या विभिन्न व्यक्तिमत्त्वांच्या मिश्रणाबाबत मला औत्सुक्य वाटतं.’

– स्वामी विवेकानंद

समाजसुधारक म. फुले यांनी 1873 मध्ये जातिव्यवस्थेची चिकित्सा करणारी एक स्फोटक पुस्तिका प्रकाशित केली. ‘गुलामगिरी’ हे त्या पुस्तकाचं नाव. हे पुस्तक मराठीत लिहिलेलं होतं, त्याची अर्पणपत्रिका मात्र इंग्रजीत होती. यावरून लेखकाचे अमेरिकेतील चांगल्या लोकांचं कौतुक करण्याचा, त्यांच्या प्रेरणादायी संघर्षाचे व गुलामगिरीच्या विरोधात दिलेल्या आत्मबलिदानाचे कौतुक करण्याचा प्रयत्न दिसून येतो. अमेरिकेतील वंशभेदाविरोधात पेटून उठलेल्या तिथल्या लोकांनी केलेल्या संघर्षाचे उदाहरण इथल्या शूद्रांना, (ब्राह्मणी वर्चस्वापासून स्वत:ला मुक्त करण्यासाठी) आदर्श ठरेल, अशी आशा फुलेंना वाटत होती.

अलीकडे पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणाबाबतच्या बातम्या वाचून मला फुलेंच्या या अर्पणपत्रिकेची आठवण झाली. ‘विदेशी विचारसरणी विध्वंसक आहेत, त्याविरोधात भारतीयांनी एकवटले पाहिजे,’ असा इशारा पंतप्रधानांनी त्या भाषणातून दिला. व्यक्तीला समताधिष्ठित अवकाश मिळणे, त्याकरता संघर्ष-समाजसुधारणा हे एका बाजूला; तर त्याविरोधात भारतातल्या सर्वशक्तिमान माणसाच्या मनात असलेली इतर देशांबाबतची सततची संशयी हेटाळणी दुसऱ्या बाजूला. स्पष्टच सांगायचे तर आताच्या परिस्थितीपेक्षा- म्हणजे आपण अधिक प्रगत, स्वतंत्र राष्ट्र म्हणवून घेतो, या काळापेक्षा- आपण वसाहतिक राजवटीखाली जगत होतो, तेव्हाचे हिंदूमन अधिक उदार होते.

एकोणिसाव्या शतकादरम्यान आणि विसाव्या शतकातही हिंदू समाजातील नेत्यांना समाजरचनेतील कमतरता-उणिवांची जाणीव होती. या उणिवांचा त्रास हिंदू समाजाला सहन करावा लागला, मात्र तो स्वत:च्या पायावर पाडून घेतलेला धोंडा होता. आपल्या अपयशाचे सगळे खापर केवळ जुलमी वासाहतिक शासकांवर फोडता येणार नाही. हिंदू समाजाला जी काही विकलांगता आली आहे, त्यातून पुढे जाण्यासाठी व तयार झालेल्या विविध गंडांवर मात करण्यासाठी या सतत बदलत जाणाऱ्या जगात हिंदूंना एकच गोष्ट मदत करू शकते- ती म्हणजे चिकित्सा. अंतर्गत आणि बाह्य (विदेशी) अशी दोन्ही प्रकारची चिकित्सा, टीका ऐकली गेली पाहिजे.

आधुनिक हिंदू समाजात समाजसुधारणेची सुरुवात राममोहन रॉय यांच्यापासून झाली. हिंदू लोक पवित्र, सर्वगुणसंपन्न व कधीच न चुकणारे आहेत, असा कडवा विचार (जसा तो आजचे हिंदुत्ववादी करतात) त्यांनी केला नाही. रॉय यांनी स्वत:च्या समाजाचे मूल्यमापन करताना तीन निकषांवर त्यातील दोष काढले. आधुनिक शिक्षणाप्रति एत्तदेशीयांची उदासीनता, स्त्रियांना ते देत असलेली वागणूक आणि तर्कापेक्षा पोथी-पुराणांवर त्यांनी ठेवलेला विश्वास हे ते तीन निकष होत. समाजसुधारणेसाठी तीन घटकांवर काम करणे खूप गरजेचे होते. रॉय यांच्यासोबत जी समाजसुधारकांची फळी तयार झाली, त्यांनी यावर खूप काम केले. विवाहासाठी संमतिवय वाढवणे, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन, स्त्री-पुरुष दोहोंसाठीही आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार, जातिभेदाचा विनाश, तसेच प्रसारमाध्यमांच्या साह्याने खुल्या वाद-विवादाची संस्कृती वृद्धिंगत करणे अशी अनेक कामे त्यांनी केली.

राममोहन रॉय यांनी पाश्चिमात्य देशांत खूप प्रवास केला होता. अनेक पाश्चिमात्य विचारवंत व अभ्यासकांशी त्यांनी संवाद साधला. रवींद्रनाथ टागोर यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे- ‘आपल्या भावनिक आणि वैचारिक व्याप्तीने रॉय यांनी पूर्वेशी (पौर्वात्य जगाशी) फारकत न घेता पाश्चिमात्य विचारांचा स्वीकार केला आहे.’ संस्कृत, बंगाली आणि फारसी या भाषांचा दांडगा अभ्यास असलेल्या रॉय यांची ठाम वैचारिक भूमिका घेण्याची एक पृष्ठभूमी तयार झालेली होती. भारताचे खरे वैभव त्यांना अचूकपणे माहीत होते, ते त्यांनी स्वत:ही प्राप्त केलेले होते. परिणामी, इतरांकडे असलेले वैभव (वैचारिक) पारखण्यासाठी लागणारा परिसही त्यांच्याजवळ होता.

राम मोहन रॉय यांच्याप्रमाणेच त्या काळी रवींद्रनाथ टागोर हे बंगाली विचारवंतही भारतातातील कानाकोपऱ्यांत काय सुरू आहे, तसेच जगात जे काही सुरू आहे त्याबाबत भारतीय काय विचार करतात, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. इथे एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. बहुसांस्कृतिकतेबाबत टागोरांनी दिलेल्या दाखल्यांची व्याप्ती केवळ युरोप आणि उत्तर अमेरिकेपुरती मर्यादित (जे बहुतेक भारतीयांबाबत घडते) नव्हती. ज्ञानाच्या शोधार्थ ते जपान, चीन, जावा, इराण ते अगदी लॅटिन अमेरिकेला गेले. याचाच परिणाम म्हणून त्यांनी बंगालच्या ग्रामीण भागात स्थापन केलेल्या विद्यापीठाला ‘विश्व-भारती’ असे नाव दिले. ‘संपूर्ण जग भारतात सामावलेले आहे’- असे त्याचे भाषांतर आपण करू शकतो. या विद्यापीठाच्या निवेदनात उद्देश ठळकपणे स्पष्ट केलेला आहे. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांतील-(राष्ट्रीयत्व, समूह, विविध जाती इत्यादी घटकांबाबत वैरभाव न बाळगणाऱ्या विचारवंतांना) अभ्यासकांना एकत्र आणणे आणि पौर्वात्य व पाश्चात्त्य जगाबाबतची त्यांची समज, जगाच्या या दोन भागांमध्ये असणारे सहसंबंध एकत्रितपणे, सद्‌भावनेने समजून घेणे.

महात्मा गांधींनी असहकार चळवळ 1920-21 मध्ये सुरू केली. यादरम्यान वासाहतिक राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळण्याबरोबरच, सर्वदूर पोहोचलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही द्वेषमूलक वृत्ती हा टागोरांच्या चिंतेचा विषय होता. ‘पाश्चात्त्यांबाबत आपण सतत नकारघंटाच वाजवत राहायची आहे का?’ असा प्रश्न टागोरांनी गांधींच्या अनुयायांना विचारला. ‘इतरांशी असलेले (इंग्रजाशी) वाद, त्यांच्या चुकांची सतत पुनरुक्ती हाच स्वराज्य संकल्पनेचा पाया आहे का?’ असा प्रश्नही टागोरांनी विचारला. एका खासगी भेटीत टागोरांनी गांधीजींशी या विषयावर संवाद केला. ‘‘एक भारतीय म्हणून पाश्चात्त्यांकडून आपल्याला काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत; केवळ शिकणंच नाही, तर आपणही त्यांना आपल्याकडचं काही देऊ शकतो. त्यामुळे आपण पाश्चात्त्यांसोबत संवादाची दारं अजिबात बंद करता कामा नयेत. याउलट शिक्षणाद्वारे पाश्चात्त्यांशी सहसंबंध जोडण्यातून आपण एक समज विकसित करू शकतो, असे मला वाटते,’’ असे टागोर त्या भेटीत गांधीजींना म्हणाले.

राम मोहन रॉय आणि रवींद्रनाथ टागोर द्रष्टे नेते होते. इतर संस्कृतीशी जोडून घेतल्याने आपण अधिक समृद्ध होऊ शकू, हे त्यांनी जाणले होते. तत्कालीन इतर भारतीय समाजसुधारकांनीही असा व्यापक दृष्टिकोन बाळगला होता. त्यामुळेच अमेरिकेतील वर्णव्यवस्थेविरोधातला लढा फुल्यांना इथल्या जातिनिर्मूलनाच्या संघर्षासाठी प्रेरणादायी वाटला. फुल्यांनी भारताबाहेर प्रवास कधीही केला नव्हता, मात्र त्यांचे थोर अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताबाहेर गेले होते. अमेरिकेत घेतलेल्या शिक्षणाचा बाबासाहेबांवर यथोचित प्रभाव पडला. फुल्यांप्रमाणेच अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांची परिस्थिती आणि भारतातील दलितांची परिस्थिती यात त्यांना लक्षणीय साधर्म्य आढळले. यादरम्यान जॉन ड्युई या तत्त्वज्ञाच्या विचारांनी नागरिकत्वाबाबतच्या आंबेडकरांच्या कल्पनेत बदल घडवून आणला. नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेत शिक्षणाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांना ड्युई यांच्या प्रतिपादनातून कळले.

रॉय ते आंबेडकर व्हाया फुले, गोखले, टागोर, गांधी, पेरियार, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि अशा अनेक समाजसुधारकांची भली मोठी यादीच करता येईल- ज्यांनी स्वदेशी बांधवांना भूतकाळाच्या ओझ्यापासून मुक्त करण्यासाठी अविरत कष्ट उपसले. हिंदू समाज एके काळी किती विषम, अशिक्षित व जखडलेला होता, हे त्यांना माहीत होते. त्यांनी तसा अनुभवही घेतला होता. स्त्रिया, दलित व निम्न जातीयांसोबत केला जाणारा भेदभाव नष्ट करून, आधुनिक धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रसार करून तसेच ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली करून, सार्वजनिक वादविवाद-चर्चांची संस्कृती रुजवून त्यांनी या समाजाला अधिक मुक्त व उदार बनवले.

भारतात समाजसुधारणांसाठी पिढ्यान्‌पिढ्या खपलेल्या लोकांनी हिंदू मानस अधिक व्यापक, विशाल दृष्टीचे बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचीच परिणती पुढे भारतीय संविधान बनवण्यात आणि ते स्वीकारण्यात झाली. जगभरातील चांगल्या जीवनव्यवहारपद्धती, लागू असलेले कायदे तसेच युरोप-अमेरिकेतील विचार, कल्पना यांचा समावेश यात करण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे संविधाननिर्मितीच्या अशा मुक्त-उदार पद्धतींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ क्रोधित झाला. डॉ. आंबेडकरांनी 1949 मधील नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संविधानाचा अंतिम मसुदा सादर केला, तेव्हा आर.एस.एस.चे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ने अशी टीका केली की, ‘भारतीय संविधानात भारतीय असे काहीच नाही, हे फार वाईट आहे. त्यात भारतातील जुने सांविधानिक कायदे, संस्था, परिभाषा, शब्दयोजना या कशाचाही समावेश नाही.’ संविधाननिर्मितीसाठी एका लेखकाने आंबेडकरांना ‘आधुनिक भारताचा मनू’  असे म्हटले होते. याबाबत संताप व्यक्त करणारा एक लेखही आर.एस.एस.च्या एका बुद्धिजीवीने ‘ऑर्गनायझर’मध्ये लिहिला होता. डॉ.आंबेडकरांचे असे वर्णन म्हणजे लिलीपुटची (एखाद्या लहानशा बेटासारखी काल्पनिक जागा) तुलना ‘ब्रॉबिंगनाग’शी (जिंकलेल्या मोठ्या भूप्रदेशाशी- काल्पनिक) करण्यासारखे आहे. मनूसारख्या देवाशी आंबेडकरांची तुलना करणे म्हणजे टिंगल करण्याचा (मनूची) अत्युच्च नमुना आहे,’ असे त्या लेखात लिहिले होते.

आंबेडकरांबाबतचा आकस हे आर.एस.एस.चे एक वैशिष्ट्य राहिले आहे. या स्तंभात मी ज्या समाजसुधारकांचे कौतुक केले आहे, ते वगळता संघाला मात्र कायम असे वाटते की- हिंदूंना इतर संस्कृती वा देशांकडून शिकण्यासारखे काहीच नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला हिंदूंना संस्कृती-प्रसारासाठी जगभरात पाठवले गेले, अशी वल्गनाही ते करतात. हिंदू हे ‘विश्वगुरू’ आहेत, अशी घमेंडी धारणा संघाच्या स.म. गोळवलकरांपासून अनेक बुद्धिजीवींच्या लिखाणातूनही पाझरत असते.

आर.एस.एस.चा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वर्चस्ववादी आणि संशयी आहे. एका बाजूला ते हिंदूंच्या जगभर असलेल्या वर्चस्वाचे सतत आणि अभिमानाने गोडवे गातात, तर दुसऱ्या बाजूला इतर धर्मीय भारतीय आणि विशेषत: मुस्लिमांना सतत बदनाम करतात. हिंदू समाजातील काही- किंबहुना बऱ्याच उणिवांना संकुचित हिंदूंचे विचार व कृतीच कारणीभूत आहेत, याची जाणीवदेखील हिंदू मानसाला नाही आणि याबद्दल हिंदूमन अतिशय उदासीन आहे.

मागील काही दशकांमध्ये जसजशी संघ परिवाराची ताकद आणि प्रभाव वाढला, तसे हिंदूमन अधिकच संकुचित होत गेले. स्वतंत्र विचार, स्व-चिकित्सा, आत्मपरीक्षण या पातळ्यांवर हिंदू मानस आक्रसतच गेले. आणि आता जेव्हा भाजप, संघ आपल्या राजकीय आणि संस्थात्मक अवकाशात वर्चस्व गाजवत आहेत, तेव्हा तर या संकुचित हिंदूमनाचा आविष्कार उघडपणे सरकारी पातळ्यांवरही दिसतो आहे. मुख्यमंत्र्यांनी विज्ञानाला मोडीत काढून अंधश्रद्धांचा पुरस्कार करणे, स्त्रियांच्या स्वातंत्र्याला कमी लेखणे, पाश्चात्त्यांविषयी सातत्याने काही तरी बरळणे, संघप्रणीत वर्चस्ववादी उतरंड रुजवण्याचा प्रयत्न करणे- या सगळ्यातून आजचे कुंपण घातलेले हिंदू मानस दिसते. पत्रकार, कलाकार, लेखक, चित्रपट-निर्माते असे जे कोणी समाजातील अन्यायांचे स्वरूप वा त्याबाबतचे सत्य दाखवण्याची हिंमत करतील, त्यांच्यावर हल्ले केले जातात.

खूप पूर्वी एकोणिसाव्या शतकात- जेव्हा हवाई प्रवास आणि इंटरनेट यांचा शोधही लागला नव्हता, तेव्हा- ज्योतिबा फुले जगभरातील शोषितांच्या सामाजिक उत्थानाची प्रक्रिया समजून घेण्याकरता मनाने सातासमुद्रापार पोहोचले. आज एकविसाव्या शतकात जग अतिशय जवळ आलेलं आहे, पण भारताचे पंतप्रधान आपल्याला झापडं लावून केवळ स्वत:कडे बघायला सांगत आहेत. आपण हे करता कामा नये.

(अनुवाद : प्रियांका तुपे)