एक अनोखी दास्तान…

-समीर गायकवाड

आपल्यापैकी किती जण टेनिसचे चाहते आहेत ठाऊक नाही आणि कितीजण या दोघींना ओळखतात याची कल्पना नाही. मात्र जे ह्या दोघींबद्दल जाणतात त्यांच्या लेखी या दोघीजणी म्हणजे टेनिसकोर्टवरच्या सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी होत. या दोघींनी तब्बल सोळा वर्षे नेटच्या दोन्ही बाजूंनी लढत टेनिसचं युद्ध खेळलं. त्या इतक्या त्वेषाने लढायच्या की प्रेक्षकांना स्फुरण यायचं. विशेषतः अंतिम सामन्यात या आमने सामने आल्या की क्रीडारसिकांना मेजवानी लाभे. त्या अक्षरशः तुटून पडत. दोघींना अफाट पाठीराखे लाभले होते. दोघींनाही मोठ्या संख्येत प्रेक्षक चिअरअप करायचे.

महिला टेनिसचा तो खऱ्या अर्थाने सोनेरी काळ होता असे म्हटले जाते. कारण पुरुषांच्या सामन्यांहून अधिक लोकप्रियता या दोघींच्या सामन्यास लाभे. चुरशीच्या द्वंद्वावरून यांच्यातलं नातं सहज सुलभतेचे नसेल असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. या दोघी बेस्ट फ्रेंड्स होत्या ! आणि आजही त्यांच्यातल्या मैत्रीचा गंध सीमापार दरवळतो आहे.

मार्टिना नवरतिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट यांचे टेनिस कौशल्य अफलातून होते. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात विम्बल्डनपासून रोलँ गॅरोसपर्यंत त्यांनी महत्वाची सर्व टेनिसकोर्ट्स गाजवली. मार्टिनाचा जन्म झेकोस्लोवाकियाचा होता. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने अमेरिकेकडून खेळण्यास पसंती दिली. तिथेच तिची गाठ पडली जन्माने अमेरिकन असलेल्या ख्रिस एव्हर्टशी. ख्रिसची आई कोलेट तिला सरावासाठी घेऊन येत असे. मार्टिनाची त्या दोघींशी गट्टी जमली. ती मैत्री आजही कायम आहे.

ग्रँड स्लॅमसाठी या दोघीत चुरस असे. ख्रिस आणि मार्टिना यांच्यात जेव्हा अंतिम सामने असे तेव्हा प्रेक्षकांत टसल टेन्शन राही. मात्र सामना संपल्यानंतर जय पराजय जाहीर झाल्यानंतर लॉकररूममध्ये फक्त या दोघीच असत. दोघींपैकी एक रडत असे आणि दुसरी तिचे सांत्वन करत असे. हे खूप कमी लोकांना ज्ञात होतं. कारण जगाने त्यांच्यातली स्पर्धाच पाहिली होती, मैत्री पाहिलीच नव्हती.

१९८६ मध्ये ख्रिसचा घटस्फोट झाला आणि ती कोलमडून पडली तेव्हा मार्टिनाने तिला सपोर्ट केले. मानसिक स्थैर्य लाभावे म्हणून मार्टिनाने ख्रिसला आपल्या घरी आणले. ख्रिसला तिथे खऱ्या अर्थाने आधार लाभला, वैवाहिक जीवनातील वादळाच्या धक्क्यातून तर ती सावरलीच खेरीज याच दरम्यान तिच्या भावी साथीदाराशी तिची भेट झाली. पुढे त्यांचा विवाह झाला तेव्हा मार्टिनानेच सारे नियोजन केलेलं !

ख्रिस आणि मार्टिना दोघीही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात राहतात. मार्टिना मियामीत राहते तर ख्रिस बोकरटोन शहरात राहते. त्यांच्यातली मैत्री काळागणिक दृढ झालीय. दीड दशके एकमेकाविरुद्ध उभं राहूनही जिवलग मैत्र कसं होता येतं याचं हे उदाहरण ठरावं.

स्त्रिया फार भांडकुदळ असतात, कजाग असतात, त्यांच्यात हेवा मत्सर अधिक असतो असंच आजवर आपल्या मनावर बिंबवलं गेलेलं असल्याने अशा प्रकारची निकोप मैत्री आपल्या पचनी पडत नाही.

आपण ज्यांच्याशी चुरस केलेली असेल, इर्षा केली असेल, दैनंदिन जीवनात एकमेकासमोर उभे ठाकलेले असू आणि तरीही आपल्यात अत्यंत निकोप सच्ची मैत्री असेल तर आपली मने खूप नितळ नि संयमी असतात !

परस्परांचे गुणदोष खुल्या मनाने सांगता आले पाहिजेत, त्यांना स्वीकारता आले पाहिजे आणि परस्पर हितासाठी झटले पाहिजे, मग आपलीही अशीच कसदार दास्तान होते !

(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)

८३८०९७३९७७

समीर गायकवाड यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –समीर गायकवाड– type करा आणि Search वर क्लिक करा.