सोहाचे मनस्वी आत्मकथन – दि पेरील्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस …

-राज कुलकर्णी

‘दि पेरील्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस’ म्हणजे सुप्रसिध्द व्यक्तींच्या सहवासात असणे हे तुलनेने कमी प्रसिध्द असणाऱ्या व्यक्तीस एक प्रकारचे संकटच असते ,याचे अनुभव कथन !

हे पुस्तक आहे, सोहा अली खान हिचे!.. हो, तीच ती! सुप्रसिद्ध नटी शर्मिला टागोर यांची मुलगी , बॉलीवूड स्टार सैफ अली खानची बहिण आणि हिरो कुणाल खेमूची पत्नी ! वडील मन्सूर अली खान पतोडी हे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू शिवाय भावजय करीना प्रथितयश अभिनेत्री ! म्हणजे घरात एवढे सारे सुप्रसिद्ध लोक आणि त्यात सोहा म्हणजे कमी प्रसिद्ध म्हणूनच लेखिकेने या पुस्तकात, तुलनेने कमी प्रसिध्द असल्यामुळे काय अनुभव येतात , हे खूप मार्मिकतेने, रंजकतेने आणि मिश्कील भाषाशैलीत लिहिले आहे.

सोहा , पुस्तकाच्या अगदी सुरवातीला मनोगतात स्पष्टपणे म्हणते, सैफ आणि करीना यांच्याबद्दल कांही वाचायला मिळेल म्हणून तुम्ही पुस्तक घेणार असाल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठी अजिबात नाही ! लेखनाची प्रेरणा सांगताना ती खूप मनमोकळेपणाने लिहिते ‘अनेक दिवसापासून लिहिण्याचा विचार होता मात्र ते जमले नाही. अल्पाईन सालामँडर ( ४८ महिने) प्रमाणे माझ्या चित्रपटांचा आणि माझ्या पुस्तकाच्या गर्भारपणाचा कालावधीही जास्तच लांबला. एक अभिनेत्री म्हणून १२ वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये असूनही तिशीत गेल्यावर स्वतःला समाधान देणारी भूमिका मिळणे म्हणजे मान्सून काळात मुंबईत खड्डे नसलेला रस्ता पाहायला मिळण्याएवढे दुर्मिळ असते. व्यावसायिक चित्रपटात स्त्री म्हणजे चाळीशीच्या आत एकतर त्या हिरोवर प्रेम करणारी प्रेयसी किंवा पन्नाशी नंतर हीरोची आई ! मग चाळीशीतल्या अभिनेत्रींनी करायचे काय ? स्वतःचे प्रॉडक्शन चालू करायचे (सोहा आणि कुणाल यांची स्वतःची Renegade Films निर्मिती संस्था आहे) किंवा दागिन्यांचे दुकान टाकायचे किंवा इन्टेरियर डेकोरेटर व्हायचे ! कुटुंबातच रमायचे किंवा फँशन व्यावसायिक व्हायचे ? नाहीतर मग पुस्तक लिहायचे’ सोहाने याच विचाराने हे पुस्तक लिहायला घेतले.

सोहा उच्च विद्याविभूषित असून तिच्या वाचनाचा आवाका मोठा आहे. इतिहास, राज्यशास्त्र ,कला, संस्कृती, निसर्गविज्ञान, समकालीन राजकारण , समाजकारण यावर तिचे वाचन आणि स्वतःचे चिंतन आहे, हे तिच्या लेखनातून वारंवार जाणवते आणि त्या लेखनाची मिश्कील अशी ललित शैली खूप आनंद देते.

आपण खूप लहान आहेत आणि वारसा मात्र खूप मोठा , हे सांगताना ‘Big Shoes ,small Feet’ या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात तिने “ Are you famous?’ म्हणून केली आहे. सोहास सर्वजन आई किंवा भावावरून ओळखतात. ती म्हणते ‘मला याचा वैताग येतो परंतु असे ओळखले जाणे माझ्यासाठी जास्त सुरक्षित आहे.याच अवस्थेला ती ‘मॉडरेटली फेमस’ म्हणते. हे पुस्तक म्हणजे तीने कुटुंबाला वाहिलेली आदरांजली आहे. यातील कौटुंबिक फोटोअल्बम खूपच सुंदर आहे. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोचे कॅप्शन खूप मिश्किल आहे !

सोहा अली खान चे मूळ नाव , Nawabjadi Soha Ali Khan of Pataudi and Bhopal’ असे आहे! यात भोपाल हे जसे शहर आहे ,तसेच पतोडी देखील एक शहर आहे.पतोडी हे हरियाणामधील २३००० लोकवस्तीचे एक लहान संस्थान होते. सोहाचे आजोबा इफ्तिखार अली खान पतोडी म्हणजे या संस्थानाचे आठवे नवाब ! इफ्तिखार पतोडी नावाजलेले क्रिकेटपटू होते. त्यांनी नवाब म्हणून स्वातंत्र्याच्या वेळी पतोडी व भोपाळ संस्थान भारतात विलीन केले. याचवेळी त्यांचे भाऊ शेर अली खान आणि साहबजादा याकुब अली खान मात्र त्यांना पाकिस्तानी लष्करात आणि सरकारात मोठा हुद्दा मिळाल्यामुळे तिकडे स्थाईक झाले. मात्र मुख्य नवाब इफ्तिखार हे खूप आधुनिक विचाराचे होते. त्यांचे राहणीमान ब्रिटीश होते आणि भारतातील लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारावर विश्वास ठेवून त्यांनी भारतातच राहणे स्वीकारले.

खान यांचे कुटुंब पतोडी चे नवाब होते तर मंसुर अली यांची आई साजिदा सुलतान भोपाळच्या नवाब कुटुंबातील होती. भोपाळचे नवाब हमिदुल्ला खान मुलगा नव्हता आणि थोरली मुलगी अबिदा सुलतान हीस पाकिस्तानानात दिल्यामुळे भोपाळ संस्थानाचे सर्वाधिकार सोहाजी आजी साजिदा सुलतान मार्फत पतोडीच्या नावाबांकडे आला म्हणून या खानदानास ‘Nawab of Pataudi aani Bhopal’ असे म्हणतात !

मंसूर अली खान हे नवाब असले तरीही त्यांची वृत्ती मुळ पतोडी गावाप्रमाणे काटकसरीची होती. मितभाषी असणा-या मंसूर यांच्याकडे एक टू सीटर ‘जग्वार’ वगळता त्यांनी एकही परदेशी गाडी घेतली नाही. रोज घरातील सर्व दिवे बंद केले केले की नाही, फारच गरज असेल तर गाडी वापरावी असा त्यांचा शिरस्ता होता ! सोहा खूप आत्मियतेने वडिलांबद्दल लिहीताना म्हणते ‘एका डोळा गमावून देखील त्यांनी माल्कम मार्शल सारख्या बॉलर्सचा सामना केला! एकदा तर त्यांचा एक चेंडूने जबडा तुटला ,तरीही त्यांचे क्रिकेटवरील प्रेम कायम राहिले. एका डोळ्याने बॅटींग करणे किती अवघड हे पाहण्यासाठी एक डोळा बंद करून ग्लासात पाणी ओतण्याचा प्रयत्न करून पहा , म्हणजे कळेल!’

सोहाचे आजोळसुद्धा असेच सुप्रसिद्ध! आई शर्मिला रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबातील ! रवींद्रनाथ यांचे थोरले बंधू द्विजेन्द्रनाथ यांची नात म्हणजे लतिका बरुवा, शर्मिला टागोर यांची आजी !इरा बरुवा या शर्मिलाच्या आई ! आणखी एक नाते असे की, रविंद्रनाथामचा पुतण्या गंगेन्द्रनाथ आणि या गंगेन्द्रनाथ यांचा नातू गितेन्द्रनाथ म्हणजे शर्मिला यांचे वडील! शर्मिला यांना घरी सर्वजन रिंकू म्हणत कारण, बंगाल मध्ये मुऴ नाव आणि टोपण नाव असतेच असते ! या पुस्तकामुळे समजले की , प्रणब मुखर्जी यांचे घरगुती नाव , पोल्त्यू असे आहे !

सोहाने आपली नानी इरा बरूवा म्हणजेच लाल दीदी यांच्याबद्दल भरभरून लिहिले आहे. शर्मिला यांना जेंव्हा शक्ती सामंत यांनी १९६१ साली ‘काश्मीर की कली’ या चित्रपटासाठी ऑफर दिली तेंव्हा पासून शर्मिला यांच्यासोबत लाल दीदी सतत मुंबईत असत. उत्तम कुमार त्यांचा आवडता अभिनेता होता. लाल दीदी यांचा स्वभाव आणि वृत्ती एकदम आधुनिक आणि मुक्त होती! कलकत्यात अमीर खान आणि सोहा जेव्हा त्यांना भेटल्या ,तेव्हा त्या नव्वदीत होत्या मात्र अमीर खानने काय घेणार म्हणून विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘ओन्ली टीचर्स व्हिस्की’ !

सोहाने ‘Wakeful city’ या प्रकरणात मुंबईतील तीचे अनुभव सांगितले आहेत. मुंबईतील सिटीग्रुप प्रायव्हेट बँकेत नौकरी करायला सुरुवात केली तेंव्हा ती तेवीस वर्षाची होती ! महिना १७०० रुपये भाडे देवून लोअर परेल भागात 2BHK मधे राहायची ! मुंबईतील flat मध्ये एकदा चोर शिरल्याचा आणि २६ जुलै २००५ ला मुंबईत आलेल्या जलप्रलयाचा वाईट अनुभव तीने विस्तृत पणे मांडला आहे. त्या रात्री आयुष्यात प्रथमच बेस्ट बसने प्रवास घडला हे सांगताना हा कमी प्रसिद्ध असल्याचा फायदाही ती सांगते. पुढे हाच प्रसंग ‘तुम मिले’ या चित्रपटात करताना त्या आठवणींना उजाळा मिळाला असे तीने लिहीले आहे. मात्र २६/११ च्या हल्ल्यानंतर सोहाने मुंबई सोडून दिल्लीला राहणे पसंत केले !

सोहाने ऑक्सफर्ड विद्यापिठात ‘Modern History’ या विषयात पदवी तर ‘London school of Economics’ प्रथितयश संस्थेत ‘Master in international relations’ ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. शिवाय बँकिंग क्षेत्रात कामही केले आहे ! रघुराम राजन यांनी RBI गवर्नर पदाचा राजीनामा 2016 मधे दिल्यावर, तिने यास भारताचे दुर्दैव असे ट्विट करताच तीचे प्रचंड ट्रोलिंग केले गेले! हिला अर्थकारणातलं काय कळतं ? हिला RBI चा अर्थ तरी कळतो का ? अशी टिका झाली. यावर ती मिश्कील पणे म्हणते “ SLB is Securities Lending and barrowing and not Sanjay Leela Bhnsali , P.C is P.chidambarm and not priyanka chopra!”

सोहा मला आवडतेच ! तिचे हे पुस्तकही मला खूप आवडले. सतत राजकीय लेखन आणि इतिहास संशोधनातील डोक्याला ताण देणारे विषय वगळून काही हलके फुलके वाचावे ,या हेतूने हे पुस्तक हातात घेतले आणि वाचताना मिळालेल्या आनंदात ते केव्हा संपले समजलेच नाही !

‘The perils of being moderately famous’ by Soha Ali Khan , Penguin Books , 2017. Pages-217

(लेखक अभ्यासक व वक्ते आहेत)

९४०४५३५३८६

Previous articleगांधी : एक अंगुळ तरी आकळावा
Next article‘सत्तातुराणां न भयं , न लज्जा’ 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.