ओल्ड मॅन इन वॉर : शरद पवार

– विजय चोरमारे

`गेल्या चौऱ्याऐंशी दिवसात त्याला एकही मासा गावला नव्हता. पहिले चाळीस दिवस त्याच्याबरोबर एक पोरगा येत असे, पण या चाळीस दिवसांत म्हाताऱ्याच्या गळाला एकही मासा लागला नाही, असे पाहिल्यावर पोराच्या आईबापांनी त्याला सांगितलं की म्हातारा आता पुरता दळभद्री झालाय. मग आईबापांच्या सांगण्यावरून पोरगा दुसऱ्या होडीवर गेला आणि त्या होडीवरच्या लोकांनी एका आठवड्यातच तीन झकास मासे पकडले. रोज आपली रिकामी होडी घेऊन परतणाऱ्या त्या म्हाताऱ्याकडे पाहून पोराला वाईट वाटे. मग होडीवरचं सामान किनाऱ्यावरआणण्यासाठी तो त्याला मदत करू लागे. पिठाच्या पोत्यांची गोणपाटं जोडून केलेलं त्याचं ते शीड फडफडायला लागलं म्हणजे चिरंतन पराजयाची पताकाच फडफडल्यासारखी वाटे.
उष्णकटिबंधातल्या समुद्रातल्या पाण्यावरून परतणाऱ्या तीव्र सूर्यकिरणांनी म्हाताऱ्याच्या गालाला कर्करोगाचे चट्टे बहाल केले होते. मोठमोठाले मासे समुद्रांतूनखेचून काढता काढता त्याच्या हातावर दोरखंडाचे खोल असे वण उठले होते. पण यातला एकही वण ओला नव्हता. एखाद्या वाळवंटी रणात कोण्या काळी उठलेल्या चराइतके ते जुनाट होते. त्याच्या डोळ्याखेरीज त्याचं सारं काही जीर्ण होतं. पण डोळे मात्र समुद्राइतके निळे होते. हसरे होते आणि त्यांनी कधी हार खाल्ली नव्हती…`

अर्नेस्ट हेमिंग्वेच्या जगप्रसिद्ध ‘ओल्ड मॅन अँड सी’ कादंबरीतल्या म्हाताऱ्याचं हे वर्णन आहे. पु. ल. देशपांडे यांनी ‘एका कोळीयाने’ या नावाने मराठीअनुवाद केला आहे कादंबरीचा. आकड्यांचे आणि समुद्राचे काही संदर्भ इकडे तिकडे केले तर आजच्या घडीला हे ज्याला लागू पडतं असा एक म्हातारा सध्या महाराष्ट्रात आहे. वयाने थकला आहे, अनेक आजारांनी त्रासला आहे. जिवलग म्हणता येतील असे जवळचे लोक सोडून शत्रुपक्षात गेले आहेत. तरी म्हाता-याने कच खाल्लेली नाही, किंवा हार मानलेली नाही. या म्हाता-याचं नाव आहे – शरद पवार !
कुणी किती म्हातारा म्हटलं तरी हा म्हातारा मात्र आपण म्हातारे झालोय हे मान्य करायला तयार नाही. जाहीर समारंभांतून तो सांगतो, मी अजून म्हातारा झालेलो नाही. त्याचा उत्साह, त्याची अखंड भ्रमंती, धडपड सगळं पाहिल्यानंतर ते मान्य करावं लागतं, की खरंच हा म्हातारा अजून म्हातारा झालेला नाही!

‘आय लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू, बट आय विल किल यू…’ असं हेमिंग्वेचा म्हातारा ज्या आत्मविश्वासाने होडीपेक्षा मोठ्या आकाराच्या माशाला म्हणतो, त्याच आत्मविश्वासानं शरद पवार ‘अजून बऱ्याच जणांना घराकडं पाठवायचं आहे..’ असं म्हणताहेत. केंद्रातील प्रचंड बहुमताची सत्ता. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या बळावर ताबा मिळवलेल्या अनेक छोट्या मोठ्या संस्था आणि भाजपचा उधळलेला वारू कुणालाच अडवता येणार नाही, असे चित्र प्रसारमाध्यमांनी निर्माण केले आहे. ईडीच्या नोटिशीनंतर राज ठाकरे यांचा आवाज बंद झाला आहे. उद्धव ठाकरे किंचित आवाज देण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांनीही मोदी-शहांपुढे शरणागती पत्करल्याचेच अनेकदा दिसून आले आहे. भाजपलाच नको असेल तर युती तुटेल आणि त्यानंतर ते स्वाभिमानाची आरोळी ठोकून कालपर्यंतच्या मोठ्या भावाला औरंगजेब, अफझलखान वगैरे ठरवतील. गेल्या सव्वापाच वर्षांत अपमानाचे अनेक घोट पचवूनही त्यांनी भाजपची शेपूट सोडलेली नाही, ही गोष्ट विसरता येत नाही. आणि आताही तडजोड करून युती केली तर पुन्हा मोठा भाऊ छोटा भाऊ खेळ खेळतील. मोदींनी वाचाळ म्हणून संभावना केली असली तरी पुन्हा राम मंदिरासाठी आम्ही सोबत आहोत, असले काहीबाही निरर्थक सांगत बसतील. काँग्रेसमध्ये तर लढण्याची ऊर्जाच दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी फरारी झाले आहेत. सोनिया गांधी यांनी सूत्रे हाती घेतली असली तरी त्या महाराष्ट्राच्या मैदानात तडफेने उतरून कार्यकर्त्यांना लढण्यासाठी बळ देतील का, याबाबत शंकाच आहे. कारण मोदी-शहांचे दौरे झाल्यावरही त्यांनी इकडे ढुंकून बघितलेले नाही. सत्ता नसतानाही काँग्रेसचे नेतृत्व इतके कशात बिझी असते, या प्रश्नाचे उत्तर भल्याभल्यांना देता येत नाही. प्रकृतीच्या तक्रारी असू शकतात, पण तसे असेल तर मग जबाबदारी कशाला घ्यायची हा प्रश्न उरतोच. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांबद्दल तर बोलायलाच नको. पृथ्वीराज चव्हाण यांचे सगळे अनुयायी भाजपमध्ये गेले आहेत आणि काँग्रेस रुजवणाऱ्या विलासकाका उंडाळकरांचा विरोध त्यांनी अजून सोडलेला नाही. बाळासाहेब थोरात यांना अजूनही आपण प्रदेशाध्यक्ष झालो आहोत यावर विश्वास बसत नाही. प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर अशोक चव्हाण संन्यस्तवृत्तीकडे झुकल्यासारखे वाटतात. नाना पटोले भिडण्यासाठी सज्ज असले तरी आत्मविश्वास गमावलेल्या नेभळट सरदारांच्या भरवशावर त्यांचा निभाव लागणे कठीण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. राज्य सहकारी बँकेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवार एकूण चित्रातून गायब झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी संवादयात्रा सुरू करुन एक पाऊल पुढे टाकले असले तरी महिला संघटनेच्या मर्यादा ओलांडून समग्र नेतृत्वाकडे जाताना आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निष्ठेने पवारांची साथ देत असले तरी त्यांच्या प्रभावाच्या मर्यादा दिसून येतात. अशा परिस्थितीत केवळ धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी या तिघा तरुणांच्या जिवावर शिवस्वराज्य यात्रेतले चैतन्य टिकून राहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची ताकद कमी असली तरी नैतिक दरारा मोठा असल्यामुळे त्यांचा आवाज दखलपात्र ठरतोय.

सत्ताधारी मंडळींच्या विरोधातली सगळी परिस्थिती अशी दिसते. त्यामध्ये एकटे शरद पवार अनेक आघाड्यांवर मोदी-शाह यांच्या विरोधात लढताहेत. वय वर्षे ७८ च्या पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात ७८ सभा घेतल्या. मतदान संपल्यावर बाकीचे नेते श्रमपरिहारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आणि दुसऱ्या दिवशी पवार दुष्काळग्रस्त लोकांच्या अडचणी समजून घ्यायला थेट बांधावर पोहोचले. काही आठवड्यांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र महापुरात अडकला त्यावेळी छोट्या छोट्या गावांपर्यंत जाऊन पवारांनी लोकांना धीर दिला. ज्या काळात लोकांना मानसिक आधाराची गरज वाटत होती, तेव्हा हा ७८ वर्षांचा म्हातारा थेट लोकांच्या घरापर्यंत येऊन धीर देत होता. तसा दुसरा कुणी नेता नव्हता. राजकारणातल्या पवारांच्या अनेक चुकांची चर्चा करता येईल, पण या जाणिवेच्या बाबतीत पवारांच्या जवळपासही दुसरा कुठला नेता पोहोचू शकत नाही. ना देशातला, ना राज्यातला. गुजरात भूकंपाच्यावेळी पंतप्रधान वाजपेयी म्हणाले होते, संसदेत साडेसातशे खासदार आहेत, पण भूकंपग्रस्त प्रदेशाच्या उभारणीचं काम एकटे पवार करू शकतात. परवा अमित शाह येऊन सोलापुरातून शरद पवार यांची मापे काढून गेले. पवारांनी इतके नेते उभे केले, परंतु पवारांवरील टीकेला उत्तर द्यायला राष्ट्रवादीचा एकही नेता पुढं आला नाही. पूर्वीही कधी कुणी येत नव्हतं. पवारांवर टीका करणारांना फक्त आर. आर. पाटील अंगावर घ्यायचेत. आज जितेंद्र आव्हाड सोडले तर एकही नेता पवारांच्यावरील टीकेला उत्तर द्यायला पुढे येत नाही. परंतु राष्ट्रवादीच्या सरंजामी नेत्यांनी त्यांनाही एका विशिष्ट वर्तुळाच्या आत येऊ दिलेले नाही. सोलापुरात स्वतः पवारांनी अमित शाह याना टोले लगावले. तोवर मोदी येऊन पवारांवर टीका करू लागले. म्हणजे पवारांना टार्गेट करणे, त्यांचे प्रतिमाभंजन करणे हा भाजपचा एकमेव अजेंडा दिसतो आहे. महाराष्ट्र आज मोदी-शहांच्यापुढे नुसता वाकलेलाच नाही तर रांगताना दिसतो आहे. शरद पवार यांच्यावर निर्णायक घाव घातला की कोणाचाही अडसर राहणार नाही, अशी भाजपच्या नेतृत्वाची धारणा दिसून येते.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत असे चित्र होते की पवारांचा नव्या पिढीशी कनेक्ट नाही. परंतु परवाची सोलापूरची मिरवणूक आणि मराठवाड्यातील ताजी गर्दी पाहिल्यावर लक्षात येते की पवार पुन्हा नव्या पिढीचे हिरो बनताहेत. सत्ताधारी पक्षाविरुद्ध जो असंतोष खदखदतो आहे तो संघटित करण्यात पवारांना यश येतंय. सत्ताधा-यांविरोधात, प्रस्थापितांविरोधात चीड असलेले अनेक घटक आहेत. सरकारच्या धोरणांनी त्रासले आहेत, गांजले आहेत. त्यांचा असंतोष संघटित करून सरकारला आवाज देण्यासाठी महाराष्ट्रात आज एकच नेता आहे, तो म्हणजे शरद पवार. एवढे सगळे लोक सोडून गेले तरी हिंमत न सोडता ते लढताहेत त्यामुळे नव्या पिढीला हा लढणारा म्हातारा जाम आवडू लागलाय.

उदयनराजे भोसले खासदार झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसमुळे. त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे झाडून सगळे आमदार, लोकप्रतिनिधी पवारांची विनवणी करीत होते. परंतु पवारांनी सगळ्यांना नाराज करून उदयनराजेंना उमेदवारी दिली. तेच शंभर दिवसांत भाजपमध्ये गेले. शरद पवारांना सर्वाधिक बदनामीला कुणामुळे सामोरे जावे लागले असेल तर ते छगन भुजबळ आणि पद्मसिंह पाटील यांच्यामुळे. छगन भुजबळ यांची तर तेलगी प्रकरणापासून अलीकडच्या ईडीच्या प्रकरणापर्यंत पवारांनी सातत्याने पाठराखण केली. पवनराजे निंबाळकर प्रकरण असो किंवा अण्णा हजारे प्रकरण असो पद्मसिंह पाटील यांच्याभोवती संशयाचे धुके असतानाही पवारांनी त्यांना अंतर दिले नाही. पैकी भुजबळ शिवसेनेकडे गळ टाकून अंदाज घेऊ लागले. पद्मसिंहांचे कुटुंबच भाजपमध्ये गेले. परंतु गेलेल्यांचे दुःख करत न बसता पवार नव्याने कामाला लागले आहेत. त्यांनी रान पेटवायला सुरुवात केली आहे. त्यांना आपल्या पक्षातल्या किंवा काँग्रेसमधल्या इतरांची कशी साथ मिळते, त्यावर पुढचा सामना रंगणार आहे.

सामना खूप विषम आहे, याची जाणीव पवारांसह सगळ्यांनाच आहे. परंतु विषम असला म्हणून सामनाच खेळायचा नाही किंवा नुसता खेळल्याचा देखावा करायचा हे पवारांसारख्या आयुष्यभर राजकारणासोबतच क्रीडांगणावर वावरणा-या पट्टीच्या खेळाडूला मान्य होणारे नाही. निवडणुकीचा निकाल काहीही लागेल. परंतु सगळे मराठे सत्तेच्या वळचणीला गेले असताना शरद पवार नावाचा म्हातारा शेलारमामासारखा लढत होता, याची महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंद करावी लागेल. माध्यमांनी हवा भरली असली आणि महाजनादेशाच्या इव्हेंटमुळे भव्यदिव्य चित्र उभे केले असले तरी या सामन्याचा निकाल शेवटी महाराष्ट्रातील जनता देणार आहे. निकाल काहीही लागला तरी शरद पवार यांची ही लढाई हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतला उत्कर्षबिंदू असेल.

ओल्ड मॅन अँड सी मधला म्हातारा शेवटी म्हणतो, “I am a tired old man. But I have killed this fish which is my brother and now I must do the slave work.”

पवारही म्हणत असतील, सोडून गेलेले सगळे माझे भाईबंद आहेत. त्यांना शुभेच्छा. या वयात मला माझ्यासाठी काही मिळवायचं नाही. परंतु मला आयुष्यभर साथ दिलेल्या तळागाळातल्या लोकांसाठी, शेतकरी-कष्टक-यांसाठी मला ही लढाई लढण्यावाचून पर्याय नाही.

(लेखक ‘महाराष्ट टाइम्स’ चे सहायक संपादक आहेत)

95949 99456

Previous articleगांधी समजून घेताना…-अमर हबीब यांची मुलाखत
Next articleअमिताभ बच्चन: बोलबच्चन ते अबोलबच्चन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.