कर्तव्यकठोर कर्मयोगी : संत गाडगेबाबा

-संतोष अरसोड

संत गाडगेबाबा जे आयुष्य जगलेत तसे कुणीच जगू शकत नाही. विरक्तीचे दुसरे रूप म्हणजे गाडगेबाबा . ते खऱ्या अर्थाने कर्मयोगीच होते. संत गाडगेबाबा यांच्या आयुष्याच्या वादळी प्रवासातील काही प्रसंग प्रत्येकाला कायम अस्वस्थ करून सोडतात. सर्व प्रकारच्या लौकिक सुखांपासून बाबा स्वतः अलिप्त राहिलेच; पण कुटुंबियांनाही त्यांनी कर्तव्य कठोरतेने भौतिक सुखसुविधात गुंतू दिले नाही. त्यांच्या आईची काही स्वप्ने होती. तशीच बायकोची आणि लेकीची पण होती. पण त्यांच्या स्वप्नांचा बाबांनी कधी विचारच केला नाही. तो त्यांनी करायला हवा होता, असे आपल्याला वाटणे स्वाभविक आहे. मात्र बाबा हे वेगळेच रसायन होते. हे रसायन समजून घेणे अतिशय कठीण आहे. सामान्य माणसाच्या आकलनशक्तीच्या कल्पनेपलीकडचे आहे.

समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नयनासाठी स्वत:च्या कुटुंबाला वणव्यात लोटून देणे ही कल्पना अंगावर शहारे आणते. संत गाडगेबाबा नावाच्या कायमघोंगावणाऱ्या वादळात त्यांची आई, बायको, लेकी, एकुलता एक मुलगा गोविंदा पालापाचोळ्यासारखे उडून गेले. या वेड्या माणसाचं जगणं हाच त्यांच्या जीवनाचा भाग झाला होता. असे असले तरी त्या बिचाऱ्यांनी कधी याची तक्रार केली नाही. डेबू जे करतो आहे ते बरोबरच आहे आणि गाडगेबाबा नावाचा नवरा जे करतो आहे तेही बरोबरच आहे असं वाटणारी माय आणि बायको, बाळंतपणानंतर साडी-चोळीसाठी बापानं भीक मागायला लावली तरी बापाचं काही चुकलं नाही असं माणनारी लेक आलोका अन् जन्मापासून मृत्यूपर्यंत वण-वण वाट्यास आलेला एकुलता एक मुलगा गोविंदा… यालाही बाप जे करतो आहे ते योग्यच आहे, असे वाटणे हाच तर या कौटुंबिक नात्याचा खरा क्लायमॅक्स आहे. कुटुंबातील हे सारेच घटक संत गाडगेबाबा नावाच्या झंझावाताचा एक भाग झाले होते. संत गाडगेबाबांच्या सामाजिक लढाईला त्यांनी दिलेले हे मूक समर्थन होते.

संत गाडगेबाबा आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यातील हे प्रसंग डोळ्यासमोर आले की, आजही अंगावर काटे उभे राहतात. गृहत्याग केल्यानंतरचा ऋणमोचन येथील भेटीचा तो प्रसंग. चराचरा कापणारे मायचे काळीज, पतीसोबत सुखाचे आयुष्य काढावं ,हे पत्नी कुंताबाईच्या डोळ्यातील धुसर होणारे स्वप्न आणि तो चिमुकला गोविंदा. सारेच कसे मन हेलावून टाकणारे. पूर्णेचा काठही या प्रसंगाने करूणेने पाझरला असेल. “डेबू, चल घरी” अशी कुटुंबाची विनवणी. मात्र डेबू आपल्या निर्णयावर ठाम. ‘नाही यायचं मला तुमच्या छोट्या घरात, ही पृथईच आता म्हायावालं घर’, डेबूचे हे उत्तर काळीज चिरून टाकणारे होते. एकीकडे कर्तव्यकठोर डेबू अन् दुसरीकडे त्याच्या निष्ठेच्या पुढे हतबल झालेला परिवार. गाडगेबाबा नावाच्या महानायकाच्या जडणघडणीतील हा कसोटीचा प्रसंग. इथूनच तर मग त्यांच्या कुटुंबाच्या वाट्यास येत गेल्या वेदना अन् विवंचनेच्या चिंध्या. हे वेदना अन् विवंचनांचे गाठोडे घेऊनच पायपीट झाली माय, बायको, लेकरांची. ही खडतर पायपीट अखेरपर्यंत कायम राहिली, नव्हे ती त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक झाली होती. संत गाडगेबाबांचा कुटुंबासोबतचा हा स्नेह जगावेगळा होता. रक्ताच्या नात्याविषयी इतके कठोर असणारे बाबा इतर लोकांच्या बाबतीत मात्र नवनीताच्या गोळ्यासारखे मऊ असायचे. कुटुंबियांच्या वाट्यास आलेले एकेक प्रसंग डोळ्यासमोर आणला तर डोळे पाण्याने भरून येतात.

माय सखुचे डोळे आभाळ झाले. डेबू आता घराकडे येत नाही. त्याचा निश्चय झाला आहे. आता आपणही त्याच्यासोबत राहावे हे तिने ठरविले. नाही तरी तिच्या वाट्यास दु:खाशिवाय आले तरी काय? ऐन तारूण्यात दारूच्या व्यसनामुळे नवरा गेला. दु:खाचं आभाळ पेलण्याचं वय तरी होत का तिचं? लहानग्या डेबूचा सांभाळ…. पांढऱ्या कपाळाने पुन्हा माहेरी परत. माहेरी वहिणीचे टोमणे, जात्यावरचे दळणं, प्रचंड ढोर मेहनत, बापाचा अन् मायचा मृत्यू. पाठोपाठ भावाचाही. तिचे स्वप्न अनेक संकटांनी थिजून गेलेले. माय सखुबाईच्या स्वप्नांना कधी आशेची पालवी फुटली नाही ती एका महाकाय वेदनेची भागीदारच होती जणू. डेबू अर्थात गाडगेबाबा हा आता या स्वप्नांचा आधार उरला होता. बाबांनी मोकळ्या हवेत, आभाळाच्या छताखाली या कुटुंबास ऋणमोचन येथे एका झाडाजवळ पऱ्हाट्याची झोपडी बांधून दिली. याच झोपडीतून सुरू झाली त्यांची पुढील वणवण. सर्वांना मजूर म्हणून कामावर ठेवले. काम करायचं अन् पोट भरायचं हा या झोपडीचा नित्यक्रम. या पऱ्हाटीच्या झोपडीत काही अनुयायी बाबांना न सांगता साहित्य नेऊन द्यायचे. बाबा अतिशय चाणाक्ष. अचानक ते झोपडीत शिरायचे. झोपडीत काही मोठे कपाट कुठे असणार? मायने लपवून ठेवलेले साहित्य बाबा हुडकून काढायचे अन् द्यायचे मजुरांना वाटून. “हे कोणतं होय तुह्यावालं? आम्ही काय मांगाले गेलो होतो कोणाच्या दारी? लोकायनं देल्लं आणून तर लेकरासाठी घेऊ नाही त काय?” मायच्या या प्रश्नावर बाबा म्हणायचे, “हे मजूर तुह्यावाले लेकरं नोय, तर कोण व्होय?

ती झोपडी मुव्हेबल होती. ती झोपडी या गावावरून त्या गावाला कधी मुक्कामी जाईल याचा नेम नसायचा. ऋणमोचनवरून ही झोपडी बाजूच्याच आमला या गावी हलविण्यात आली. ‘काम करा अन् पोट भरा’ हे रोजगाराचे सूत्र या झोपडीच्या मनावर कायम कोरलेले. सासू, सुना शेतमजुरी करून प्रसंगी भीक मागून पोट भरू लागल्या अन् इकडे बाबा लोकांच्या मुखात मिष्टान्न भरविण्यात मग्न. मुलगी कलावतीचं लग्न ठरलं तर माय कुंताबाईने भीक मागावी आणि त्यातून लग्न पार पाडावे, असे फर्मान बाबांनी सोडले. लग्नाच्या अहेरात काही रोख रक्कम आली त्यातून बाबांनी बैलांच्या पोटापाण्याची सोय केली. काही दिवसांनी आमला येथून ही झोपडी बाजूच्या झिंगले-पिंगले या गावात हलविली. ओसाड जागेत ही झोपडी होती. अवतीभवती लांडगे व रानडुकरांचा वावर. सासू-सुना मजुरीला तर लहानगा गोविंदा झोपडीत. मायचं मन काय म्हणत असेल अशा वेळी. एवढ्यावरच ही परवड थांबली नाही. गोविंदास पुढे कळाशी या गावी मावशाकडे ठेवण्यात आले. सासू-सुना वेगवेगळ्या झोपडीत राहू लागल्या. काम करावे, भीक मागावी अन् पोट भरावे हे दैन्य त्यांच्या वाट्यास आले. गाडगेबाबांची पत्नी भीक मागून जगत आहे म्हणून अस्वस्थ होऊन मूर्तीजापूर येथील डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी कुंताबाईला स्वत:च्या घरी आश्रय दिला. त्यांना भीक मागू दिली नाही. बायकोला आश्रय मिळाला ही गोष्ट गाडगेबाबांच्या कानी गेली. बाबांनी लगेच डॉ. सहस्त्रबुध्दे यांना पाठविण्यासाठी पत्र लिहून घेतले. या पत्रातून त्यांची समाजसेवची कल्पना किती कठोर आणि पारदर्शक होती हे लक्षात येईल, ते पत्र असे होते-

श्रीमंत कर्णासारखे उदार दयाळू, सहस्त्रबुध्दे डॉक्टर साहेब यांस….

गाडगेबुवांचे अनंत कोटी नमस्कार,

आपल्या घरी आपण माझी लक्षमी सौ. कुंताबाई यास कामास ठेऊन घेतले आहे, असे समजले. आम्ही परीट. लोकांचे कपडे धुऊन, त्यांचे घरून भाकरी मागून खाव्या, हा आमचा धंदा. त्यास फुकट, काम करता खाऊ घालू नये. कपडे धुऊन घ्यावे. हे झाले तर त्यास गाव मोकळे आहे. त्यांनी कुठेही भाकरी मागून खावे. आपल्या घरी राहू नये.

डॉ. सहस्त्रबुध्दे यांना लिहिलेले हे पत्र सामाजिक काम किती कठोर आणि पारदर्शकपणे केले पाहिजे याचा मुलखावेगळा पुरावा आहे.

आलोकाबाई ही गाडगेबाबांची लेक. या लेकीलाही असेच फाटके आयुष्य जगावे लागले. तिकडे बाप लोकांचे फाटके संसार शिवत होता. लेक मात्र आयुष्यभर फाटकीच. ऋणमोचनच्या यात्रेत बाबा वस्त्रदानाचा कार्यक्रम पार पाडीत होते. कार्यक्रम संपला तेव्हा २० साड्या शिल्लक होत्या. लेक आलोका आपले फाटके लुगडे बापाला दाखवत होती, मात्र बापाने तिला उरलेल्या साड्यांपैकी एकही साडी दिली नाही. शंकर महाराज वंजारी नावाचे बाबांचे एक अनुयायी लाडूचा डबा आलोकाबाईस देतात. बाबांना हे माहीत होते आणि लगेच ते लाडूचा डबा परत करतात. असाच एक प्रसंग आलोकावर कोसळला. बाळंतपणासाठी ती मूर्तीजापूरला आली होती. लेकीचं पहिलं बाळंतपण होतं. पत्नी कुंताबाईने ही बाब बाबांच्या कानावर टाकली. सासरी जाताना लेकीला साडी-चोळी करावी लागेल असे सांगितले. मात्र बाबाचे उत्तर भलतेच आले. “बाप जर एकपट साधू असेल तर मुलांनी दहा पट साधू व्हावे” असे ते उत्तर होते. शेण, गोवऱ्या गोळा कर आणि त्यातून आलेल्या पैशातून चोळी-बांगडी करून घ्या, असा निर्णय बाबांनी दिला. असा हा सामाजिक अंगाने अत्यंत पारदर्शक असलेला माणूस बाप म्हणून भावनिक प्रसंगातही तितकाच कठोर वागायचा. सामाजिक कार्यावरील पारदर्शक निष्ठा व कौटुंबिक भावना यांचे हे व्दंद कसे पेलले असेल बाबांनी? कुठून आली असेल ही ताकद? असेच एक पत्र आहे बाबांनी आपली लेक आलोकाबाईस लिहिलेले. २० जुलै १९५५ चे हे पत्र बाबांनी गुरूदास ढेमरे मास्तरांकडून लिहून घेतले आहे. या पत्रातून गाडगेबाबा नावाचा कठोर बाप समोर येतो. असा बाप की ज्याने सामाजिक क्षेत्रात प्रचंड वैभव निर्माण केले. असा बाप की, ज्याने हजारो दीनदुबळ्यांना आश्रय दिला. हाच बाप लेकीच्या बाबतीत किती कठोर वागला हे या पत्रावरून सिध्द होते.

सौ. अलोकाबाई यांना

गाडगेबाबांचा अनंत कोटी नमस्कार

पत्रास कारण की, गोरक्षणातून बाहेर पडाल तर फार बरे होईल. कोठे जागा मिळेल तर घेऊन देतो. निवृत्ती गावाकडे मूर्तिजापूरला येतो म्हणतो. त्याचे ५०० रुपये आहेत. त्याला दिलेले २५० रुपये लग्नाला दिलेले २५०रुपये. त्याला आता आमचे कडून शिक्षणासाठी जाण्यायेण्यासाठी पैसे मिळत नाहीत. त्याला आता ५०० रुपयातून पैसे पाठवितो. तो तुमचे आज्ञे परमाणे राहील तर ठीक. नाही तर तो आपले मनाप्रमाणे त्या ५०० रुपयाचे काहीही करो. त्याचे ५०० रुपये देऊन टाका. पाहुणेबुवाचे २५० रुपये दादांचेकडे देऊन टाका. दादा त्यांना दोन रुपये देतात. ते बंद करा. त्यांचे हयातीपर्यंत २५० रु. त्यांना देतील. अडचण आली तर मी देईन. तुमची मुलगी मास्तरीणबाई तिचे २५० रु. आहेत. २५० रु. तुमचे वावरातील द्या. असे ६०० रु. तिला द्या. त्यांना सांगा की, तुम्ही कुठेही घर बांधा पण गोरक्षणात राहू नका. १५० रु. लागवणचे वावर तुम्हाला १०० रुपयात दिले. प्रभाकरचे इकडे ५०० रु. राहिले तर १००० रु. राहिले म्हणत होते. बरे झाले त्यांनी तुमची सही, आंगठे, तारीख मिती लिहून घेतली होती. नाही तर मोठा गोंधळ झाला असता.

तुला पैशाचे पक्के भूत लागले. कच्चे नाही. तू मेल्याशिवाय ते भूत निघणार नाही. तुला हे लागावं पण लागलं. दादाला निरोप सांगा की पाहुणेबुवाचेरु. बंद करा. पाहुणे तुझे मालक आहेत. त्यांचे डोळ्याने दिसत नाही. त्यांची पूर्ण सेवा कर. ज्या माणसाला पैशाचे भूत लागले तो पोटाला कमी खात असतो. तो स्वत: काही खात नाही तर दुसऱ्याला काय घालणार? खोली आम्ही तुझ्या आईचे हयातीपर्यंत ठेवणार. ती तेथे राहील. तुम्ही आपले कुठेही घर बांधा भेटीला येत जा. आता गाडेबाबांची मुलगी म्हणून सांगू नको. तुझ्या पोटी जन्मलेला मुलगा वासुदेवराव तेवढा फक्त सुधारला. अजून पक्का नाही. त्याचे वय किती तुझे वय किती. तो सुधारला तुला सुधरायला बुध्दी नाही. मी तुम्हाला येता येता ३० रु. तिकिटाला दिले. ते माझी चूक झाली. आता तुम्ही मला कधी काही मागू नये तुम्ही मागितले तर मी देऊ नये. देवाचे भक्तीला लागलो म्हणून पांग फिटला २५० रु. काय पण अडीच रुपये सुध्दा दिसले नसते मुलांना शाळासुध्दा दिसली नसती. गावोगावचे जसे मेले तसे त्याच नतिजाने तुमचे झाले असते. भक्तीने तुमचा पांग फिटला.

काल पाहुणेबोवाने विचारता खोलीतले सामान काढून खोलीत घुसले. धर्मशाळेत मला तांब्या उचलता येत नाही असा ट्रस्ट आहे. तेथे तुमची कोण किंमत करील? दादाला सांग की, पाहुणेबुवाला धर्मशाळेत कामाला ठेऊ नये. तुम्ही शहाणे असाल तर जाऊ नये श्री. दादांनी काही देऊ नये. तुमचेवर गोरक्षणाचे लोकांचे असे प्रेम लागले पाहिजे होते की, त्यांनी म्हटले पाहिजे की, तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही कोठेही राहा पण तुम्हाला कोणी विचारीत नाही. कुत्र्याला आब आहे. पण तुम्हाला आब नाही. तुम्ही शहाणे असाल तर तेथे राहू नये. गाडगेबाबांचे नावावर दादाला किती मान आहे. कोणी धान्य देतात, कोणी कापड देतात, तर कोणी शेत देतात. पण तुमचे झोपडीवर कोणी दीड पायली ज्वारीही आणून देत नाही. साधूचे घरातील माणसे उदार असतात. तुकारामबोवा उदार, जिजाबाई उदार, मुलेही उदार, तसेच कबीर उदार, कमाल उदार, संत आले कबीराचे घरी, कबीराने बाईला वाण्याचे घरी गहाण ठेविले संतांना जेवू घातले. मरता मरता कबीराने मुलाला मार्ग सांगितला.

कबरी कहे कमालकू दो बात लिख ले। कर साहब की बंदगी और भूखे कु कुछ दे॥तुमचे झोपडीवर एखादा महारोग्याला किंवा आंधळ्याला पांगळ्याला जेवू घालून जुना पुराणा एखादा कपडा देऊन आणे दोन आणे देऊन वाटेला लावले काय? असे एक जरी उदाहरण असेल तर मला लिहून कळवावे. तुला पक्के पैशाचे भूत लागले. त्यावर भुजंग होऊन बसली. तीन वेळा झोपडीतील सामान फेकले. मोटार आली होती तेव्हा डाळीचे पोते मागितले होते. मी नाही म्हटले. आजपासून कोणाजवळ निरोप सांगशील तर तुझा अपमान होईल. करिता कोणाला काही मागू नये. या पत्राची कॉपी श्री. दादा श्री. वासुदेवराव यांचेकडे पाठविली आहे.

गुरूदास ढेमरे मास्तर

श्री बाबांचे आज्ञेवरून

हे पत्र वाचताना आजही अंगावर काटा उभा राहतो. सामाजिक कामात कुठलाच गैरप्रकार होऊ नये, म्हणून सदैव दक्ष असणारे संत गाडगेबाबा लेकीच्या कारभाराचे किती कठोर शब्दात वाभाडे काढतात त्याचा हा जळजळीत पुरावा आहे. हे पत्र आजच्या भोंदू साधू व महाराजांच्या व सामाजिक संस्थानिकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

बाप म्हणून गोविंदासोबतही बाबा अत्यंत कठोर वागले आहे. गोविंदा, संत गाडगेबाबांचा एकुलता एक मुलगा. आईच्या पोटात तीन महिन्यांचा असताना बाप नव्या वाटेच्या शोधात निघून गेलेला. मायच्या पोटात असतानाच गोविंदाची बापाशी नाळ तुटलेली. कारण बापाची नाळ समाजातील अनेक गोविंदांसोबत जुळलेली. या सख्ख्या मुलाच्या वाट्यास बापाचं प्रेम कधी आलं नाही. पित्रृछत्र काय असते हे कधी त्याला कळलेच नाही. बालपणातच अनेकदा गोविंदाला उपवास घडायचा. फाटक्या कपड्याने अंग झाकणारा गोविंदा एका चिरंजीव वेदनेचे प्रतिक आहे. बाबाचा धाक असा की, बाबाचा मुलगा म्हणून कुणी गोविंदाचे लाडही करू शकत नव्हते. त्यास नवीन कपडे दिले तर बापाचा पुन्हा याकडे कटाक्ष. अखेर बाबाच्या एका अनुयायाने गोविंदास मुंबई येथे नेले. निदान त्याची परवड तरी थांबेल हीच या अनुयायाची भावना. मुंबई येथे सातरस्त्यास आऊबाई भंडारी यांचेकडे गोविंदा राहायला होता. लहानपणी रानावनात राहिलेला गोविंदा, मुंबईतही त्याचे दिवस सुखात थोडी जाणार होते? विवंचना त्याच्या पाचवीलाच पूजलेली. कुठतरी जेवायचं अन् शाळेत अक्षर गिरवायची. बाप इकडे अक्षरांचे सोहळे साजरे करीत होता तर लेक मात्र अक्षरांसोबत जवळीक निर्माण करताना कसा तरी आपले बालपण घेऊन जगत होता. एखाद्या घरी जेवायचं अन् शाळेची वाट धरायची, हा त्याचा नित्यक्रम. बाबांची आई गोविंदांच्या लग्नाची घाई करीत होती. एकदा डोळे भरून नातसून पहावी, ही सखुबाईची इच्छा. कलावती, अलोका यांच्या लग्नाचे विचीत्र आयोजन मायच्या डोळ्यासमोर होतेच. मात्र गोविंदाच्या वेळी तरी साधुबोवा थाटात लग्न करेल असे तिला वाटत होते.

बाबांनी ठरवलं, लग्न बम्बईत करायचं अन् तेही त्यांच्याच मताप्रमाणे होईल. सारी वऱ्हाडी मंडळी मुंबईत एकत्र आली. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश या परिसरातून बाबांचे अनुयायी पोहचले. बाबांनी पुन्हा एकदा धक्का दिला. ऐन लग्नाच्या दिवशीच गोविंदाला बाबांनी त्याचे लग्न असल्याचे सांगितले. अनुयायी थाटात लग्न करण्याच्या विचारात होते पण बाबांनी हा सारा डाव उधळून लावला. गोविंदास त्यांनी सांगितले की, “बाबू रे! आज तुह्य लगीन करायचं. उठा, भीक्षा मागून या.” लग्नाच्या दिवशी नवरदेव असलेला गोविंदा सातरस्त्यावर भीक मागत होता. बापाच्या कठोर नियमांचे चटके गोविंदाच्या मनास बसत होते. काय अवस्था झाली असेल बिचाऱ्या गोविंदाची? पण बाबा पुढं त्याचे काहीच चालत नव्हते. सारी मंडळी वरळीच्या डोंगरावर एका अनोख्या लग्नासाठी जाऊन पोहोचली. नवरदेव, नवरी, बाबांची आई, पत्नी, अनुयायी व स्वत: बाबा यांनी डोंगरावरील पटांगण झाडून स्वच्छ केले. अन् जुन्या कपड्यावर हळद लावून गोविंदा विवाहबध्द झाला. कॉन्ट्रक्टर असलेल्या अरूण पाटील यांनी त्यांच्या कामगारांच्या मदतीने डोंगरावर पाण्याची व्यवस्था केली. यावेळी बाबांनी कुणाचाही अहेर स्वीकारला नाही. एका श्रीमंत अनुयायाने आणलेले चांदीचे ताटही परत केले. गोविंदाची मिरवणूक चारचाकी वाहनातून काढावी म्हणून काही अनुयायांनी वाहने आणली होती पण बाबांनी मात्र वरात बैलगाडीतून काढली. दहा हजारांचा जनसमुदाय हे अनोखे लग्न डोळ्यात साठवून घेत होता. बापाच्या कठोरते पुढे गोविंदा मात्र स्तब्ध होता. असा हा मुलूखा वेगळा कुटुंब कठोर बाप.

पत्नी कुंताबाईच्याही वाट्यास हाच वेदनांचा प्रवास. जिकडे भ्रमंती तिकडे तिची झोपडी. ऋणमोचनपासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रभर सुरू होता. ऋणमोचन, आमला, झिंगले-पिंगले, मुर्तीजापूर, शेगाव, माटुंगा, पुणे, आळंदी, दादर, बांद्रा अशी अनेक ठिकाणे या झोपडीने आपल्या हृदयात कोंडून घेतली आहे. कुंताबाई या झोपडीची सहप्रवासी. बाबा जीवनाच्या अंतिम सत्याकडे प्रवास करीत होते. शेवटच्या काळात इरवीन दवाखान्यात कुंताबाई सोबत होत्या. शेवटच्या प्रवासात गाडीत बसायची इच्छा तिने व्यक्त केल्यानंतर बाबांनी तिला नकार दिला. तू नको येऊ आता. तू अथिसा राहा अमरावतीत, भाकरी मागून खात जा कुंताबाई अखेरपर्यंत अमरावतीत थांबल्या. बाबांचे जे समाधीस्थळ आहे त्याच्या बाजुला कुंताबाईची झोपडी होती. दहनस्थळावर येणारे ताट नंतर कुंताबाईस पोहोचते व्हायचे. बाबांच्या या वागण्याचा प्रचंड फटका कुंताबाईला अनेकदा बसला. किती वेदना भोगल्या असतील या माय माऊलीने? साहजिकच तिलाही वाटले असेल की, साधुबोवानं अवघ्याहीसाठी काई-काई केलं. लोकांसाठी राजमहाल बांधले. आंधळ्या-पांगळ्याहीले सदावर्ते, गाईसाठी गोरक्षण! आमच्यासाठी काई नाही केलं. पत्नी म्हणून असे वाटणे स्वाभविक आहे. मात्र त्यांच्या सहनशिलतेमुळेच बाबांना सामान्य माणसांचे जग उभे करता आले. मोहपाशाचे सर्व डाव उलथवून टाकणारा असा हा कर्मयोगी. आई सखुबाई भेटीसाठी व्याकुळ होते पण निरोप येऊनही हा लेक आईच्या भेटीस जात नाही. हा संत इकडे समाजाचा संसार उभा करण्यात मग्न होता. तो कौटुंबिक मोहपाशातून कधीच बाहेर पडला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण या गावी कीर्तन चालू असताना एकूलत्या एक मुलाची अर्थात गोविंदाच्या मृत्युची बातमी येते तरी या माणसाचा तोल ढळत नाही. पुत्र वियोगाने तो खचून जात नाही. ‘ऐसे गेले कोट्यानु कोटी, काय रडू एकासाठी’ असे म्हणत हा माणूस पुन्हा आपल्या कीर्तनामध्ये तल्लीन होतो. १ मे १९२३ ला आई सखुबाई हे जग सोडून जाते आणि ५ मे १९२३ ला एकुलता एक पुत्र गोविंदा या जगाचा निरोप घेतो. आईच्या मृत्युची बातमी सहा महिन्यानंतर बाबांना समजते तर मुलगी कलावतीच्या मृत्युची बातमी दोन वर्षांनी.

इतकी सारी फरफट झाली मायची, बायकोची, लेकीची अन् लेकाचीसुध्दा, मात्र तक्रारीचा सूर नाही, हे या फरफटीमागचे सामाजिक वास्तव आहे. गाडगेबाबांच्या या निस्पृह, निर्मोही समाजसेवेला या कुटुंबांने जणू पाठिंबाच दिला होता. म्हणूनच मृत्युच्या दारात असताना भेटीचा निरोप देऊनही लेक अर्थात गाडगेबाबा भेटीस आले नाही त्यावेळी आई सखुबाईने काढलेले उद्गार अधिक बोलके आहेत. माय सखुबाई हिची सून कुंताबाई अर्थात बाबांच्या पत्नीस म्हणाली, “आईकलं काय? माहा डेबू गुनाचा आहे. थो तर देवाचा माणूस झाला. त्याची किरत गगनाले भिडली, त्याचा राग करू नका. जमल तितकी त्याले साथ द्या. त्याची साथ सोडू नका. त्यानं तर आपला उध्दार करून घेतला. तुमचाही उध्दार होऊ द्या.” माय सखुबाईचे हे उद्गार म्हणजे कृतज्ञतेचे महाकाव्य आहे.

बाबांच्या लोकसेवेचा रथ वेगाने धावत होता. त्यामागे कुटुंबाने सहन केलेल्या यातनांचा मोठा रोल आहे. बाबांनी प्रचंड काम उभे केले अन् ते लोकांच्या स्वाधीन केले. या लोकसंपत्तीवर त्यांनी वारसांचा, नातेवाईकांचा हक्क अमान्य केला. अगदी सुतळीच्या तोड्याचा हक्कही त्यांनी घरच्या मंडळींना दिला नाही. या कर्मयोग्याने उभ्या केलेल्या संस्थेत एकाही नातेवाईकास ट्रस्टी म्हणून स्थान नाही. कुण्या नातेवाईकास साधी नोकरीही दिली नाही. वैराग्य या संज्ञेचा खरा अर्थ म्हणजेच संत गाडगे महाराजांचे जीवन होय. वैराग्याचा यापेक्षा दुसरा पुरावा असू तरी शकतो काय?

(लेखक ‘मीडिया वॉच’ वेब पोर्टलचे कार्यकारी संपादक आहेत.)

9623191923

(मनोविकास प्रकाशनातर्फे गाडगेबाबांवर लवकरच प्रकाशित होत असलेल्या संतोष अरसोड यांच्या आगामी पुस्तकातील हे प्रकरण)

Comments are closed.