कवितेशी एकात्म चित्रेही…

साभार : महाराष्ट्र टाइम्स
-सुनील यावलीकर
विठ्ठल वाघांची कविता ही ग्रामीण जीवनातून जीवनरस घेवून पोषीत झाली आहे. आशय, अभिव्यक्ती आणि भाषिक सौंदर्य या अर्थाने त्यांची कविता समृद्ध आहे. त्यांच्या कवितेने नुसते ग्रामीण जीवनच मांडले नाही, तर ग्रामीण जगण्याची मुळे जितकी खोलवर गेली त्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन ती सर्वव्यापी झाली आहे. त्या सोबतच ग्रामीण जगण्याचे समकालीन वास्तव कवितेने तीव्रतेने मांडले आहे.
परंपरा, त्यातील सौंदर्य उजागर करण्यासोबतच त्यातील कालबाह्य मूल्यांना ही कविता तीव्रतेने नाकारते. ग्रामीण जीवनाचा कणा असलेला शेतकरी, शेतकरी स्त्री त्यांचे निमिक असणे मांडताना, त्याचे होणारे शोषण ते आपल्या कवितेतून मांडतात.
आम्ही जलमलो मातीत
आमची होणार गा माती
खापराच्या दिव्यातून कधी
पेटतील वाती’
ही आणि ‘सगळं कसं सामसुम तरंग नाही तलावात’ ही आणि अशा अनेक कविता त्या निमित्तानं सांगता येतील. शेतकरी स्त्रीच्या आयुष्यातील ओलाव्याचे क्षण, शृंगाराचे क्षण मोठ्या विलोभनीय तरलतेने त्यांनी आपल्या कवितेत मांडले आहेत. ज्यांची मुळे ग्रामीण आहेत, त्यांना ही कविता आपलीच आहे असे वाटण्याइतकी एकात्मता या कवितांमध्ये आपल्याला दिसून येते.
कवी म्हणून विठ्ठल वाघ जेवढे लोकांना ज्ञात आहेत, त्या तुलनेत त्यांच्यातला चित्रकार लोकांपर्यंत पोहचलेला नाही. नाही म्हणायला विविध दिवाळी अंकांत, कविता संग्रहांत त्यांची रेखाटने आहेत. म्हणजे सर रेखाटने काढतात एवढेच पोहचले आहे. वाघ सरांनी नुसती चित्रच काढली असती तरी ते उच्च दर्जाचे चित्रकार म्हणून मान्यता पावले असते. इतकी त्यांची चित्रही कवितेइतकीच जिवंत आहेत. मुळात वाघ सरांची चित्रे ही त्यांच्या कवितांसारखीच संवादी आहेत. कविता जशी आपल्याला आपली वाटते तितकीच त्यांची चित्रेही आपल्याला आपली वाटतात.
कविता जशी प्रतिमा, प्रतिकांचा अर्थपूर्ण समुच्चय असतो, तसेच चित्रांचेही असते. जी लय कवितेमध्ये तीच लयबद्धता, एकात्मता त्यांच्या रेखाटनांमध्ये आणि चित्रांमध्ये आहे. सरांच्या कवितेत शब्दचित्रे येतात. उदा. ‘काया मातीत मातीत तिफन चालते, वटी बांधून पोटाले पाराबती उनारते…’ ‘इज नाचते थयथय ढग ढोलवाजवते’, ‘काटा पायात रुतते, लाल रगत सांडते…’ इत्यादी. ‘डेबू’ कादंबरीमध्ये तर ही शब्दचित्रे पानोपानी उमटली आहेत. ‘डेबू’मधील झडीचे वर्णन वाचताना प्रत्यक्ष निसर्गशब्द चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. डेबूचे आणि त्याच्या आईचे वर्णन वाचून त्यावर चित्र करण्याचा मोह मला आवरला नव्हता.
वाघ सरांच्या चित्रांचा जो परिचय मला झाला, तो वीस-बावीस वर्षांपूर्वी उमेशकाका ढोक यांच्या परतवाड्यातील घरातील भिंतीवर. भिंतीच्या व्यापक अवकाशात कोलाज केलेले, तिफण, पऱ्हाटीचे शेत, कापूस वेचणारी स्त्री यांची स्वतंत्र चित्रशैलीमध्ये केलेली मांडणी मनाला भावून गेली. उमेशकाकांशी चर्चा करताना त्यांची चित्रे महाराष्ट्रभर दूरदूर अनेक घरी आहेत असे कळले. ही चित्रे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली.
लवकरच वाघ सरांच्या घरी त्यांची भेट झाली. आणि चित्र खजिन्याच्या मोठ्या दालनात प्रवेश केल्यासारखे वाटले. घरातल्या भिंतीवर बांगड्यांचे तुकडे (काचकोर), रंगीत कागद, बॉटल्सची झाकणे अशी जी शक्य असेल ती साधने वापरून तयार केलेली घराला व्यापून उरणारी चित्रे पाहून दीपून गेलो. स्वतंत्र बाण्याची चित्रशैली होती ती… ग्रामीण मातीचा वास असणारी चित्रशैली! विठ्ठल वाघांनी निर्माण केलेली ग्रामीण जगण्यात इतके एकजीव झाल्याशिवाय कलाकृतीमध्ये इतकी एकात्मता निर्माण नाही होऊ शकत. इतरत्र कुठेही अनुभवाला न आलेली ही चित्रशैली, त्यातील प्रसंग… अरे ही चित्रे तर आपल्याच जगण्याचा भाग आहे हे फीलिंग देणारी.
विठ्ठल वाघांची कविता जशी ग्रामीण जगण्याचा अविभाज्य भाग म्हणून व्यक्त होते. तितक्याच सहजतेने त्यांची चित्रे उभी राहतात. आता नामशेष होत चाललेल्या परंपरेतील महत्त्वपूर्ण नोंदी चित्रांमध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यासह चित्रामध्ये अभिव्यक्त होतात. कापूस वेचणी, सुरू करण्यापूर्वी होणारी सीतादई, तिफनने, चाळ्याने होणारी वावराची पेरणी, तिफणची आरती, तिचे पूजन, गाईगोंधन, पोळा, दिवाळीची गाणी या सणांचे बारकाव्याने केलेले चित्रण वाघांनी आपल्या चित्रातून केले आहे.
‘बैल’ हा शेतकऱ्याचा जीव की प्राण! त्याच्याप्रती शेतकरी कायमस्वरूपी कृतज्ञ असतो. ती कृतज्ञता तो सणातून लोकगीतांतून व्यक्त करतो. विठ्ठल वाघांनी या बैलांप्रती आपली कृतज्ञता ‘वृषभसूक्त’ या कविता संग्रहातून व्यक्त केली आहे. ‘बैल’ हा त्यांच्या चित्राचांचा विषय न राहिला तरच नवल… उंच खांद्याचा मोठ्या आकडबाज शिंगाचा बैल ही तर सरांच्या चित्रांची ओळख बनली आहे. त्यांच्याच एका कवितेप्रमाणे-
‘बैल उगवता सूर्य
दे तेज पिकांच्या हाती
शिवारातल्या वाटा
घरास उजळून जाती’
घराला सुखाने उजळवणारा हा बैल चित्रकराला पुराणपुरुष वाटतो… त्या अर्थाने ही चित्र मांडणी आकार घेते. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही अनेकांच्या मोठ्या भिंतीच्या कॅन्व्हासवर विविध भावमुद्रांतील मोर दिमाखाने उभे आहेत. आहे त्या उपलब्ध साहित्याला आपल्या चित्रांचे माध्यम विठ्ठल वाघ बनवतात. रंग नाही, ब्रश नाही, कागद नाही. म्हणून सरांची चित्रनिर्मिती थांबून राहत नाही. बारीक कागदाचे तुकडे, तार, खापर, झाकणे, बुच. मिळेल अशा कुठल्याही फेकलेल्या वस्तू त्यांच्यासाठी चित्रमाध्यम बनायला एका पायावर तयार असतात.
ते अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य असताना त्यांच्या ऑफिसच्या अॅण्टीचेंबरमध्ये त्यांनी केलेले दीर्घ कोलाज खिळवून ठेवणारे होते. त्यांच्याच ऑफिसच्या समोर असणाऱ्या छोट्या बगिच्यामध्ये तर, खिळे, बिजागिऱ्यांनी तयार केलेला बैलाचा स्टॅच्यू ही त्यांच्यातल्या शिल्पकाराची वेगळी ओळख आहे. मुळात त्या बैलासाठी लागलेली तार, खिळे हे साहित्य त्यांनी त्यांचे घर ते कॉलेज हे अंतर पायी जाता येता रस्त्यावरून वेचून जमा केले होते. शिवाजी कॉलेज, अकोल्याचा वसंत हॉल त्यांनी लाकूड, कापड, निरुपयोगी वस्तू यांना कलात्मक आकार देऊन सजवला आहे.
विठ्ठल वाघांचे सुलेखन हीसुद्धा एक स्वतंत्र जीवनशैली आहे. त्यांचे सुलेखन मुखपृष्ठ, पत्रिका आदी ठिकाणी उमटलेले दिसते. विठ्ठल वाघांची काव्यशैली, गद्यशैली, चित्रशैली ही एकमेकांची जुळी भावंडे वाटतात. इतकी ती एकात्म झाली आहे!
(लेखातील सर्व रेखाचित्रे विठ्ठल वाघ यांची आहेत) 
(लेखक नामवंत कवी व चित्रकार आहेत)
94046 89517

साहित्य पंढरीचा विठ्ठल- लोककवी विठ्ठल वाघ ही Documentary पहायला विसरू नका- http://bit.ly/2NEAPmf

Previous articleबोराडेंचे परखड बोल आणि साहित्यातल्या टोळ्या !
Next articleगांधी: लेखकांना वेड लावणारा महात्मा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.