काँग्रेसकडे हरण्यासारखं आता काहीच नाही

ओजस मोरे

कर्नाटकात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याबद्दल अभिनंदन! २२४ जागांच्या विधानसभेत १०३ जागा मिळवुन सिंगल लार्जेस्ट पार्टी बनण्याचा मान भाजपचाच आहे…त्यामुळे सरकार बनवायला आधी त्यांनाच बोलवायला हवं, आणि बहुमत सिद्ध न करता आल्यास कुमारस्वामींना संधी द्यावी…. ‘ जी दगडं आपण इतरांवर फेकतो, ती काही काळाने आपल्याच अंगावर येतात ‘, अशा आशयाची म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे.. आज त्या म्हणीचा प्रत्यय येतोय… गोवा, मेघालय सारख्या राज्यांमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस असताना, राज्यपालांनी जी वागणुक दिली, आज त्याची आठवण येतेय…

पाच वर्षांपुर्वी २०१३ साली याच काळात कर्नाटकात निवडणुका पार पडल्या होत्या, तेव्हा ज्या परिस्थितीत आज काँग्रेस आहे, त्याच परिस्थितीत भाजप होतं, मध्यप्रदेश, गुजरात वगळता कुठल्याही मोठ्या राज्यात त्यांची सत्ता नव्हती आणि कर्नाटकटी हातातून निसटलं होतं… आज त्याच परिस्थीतीत काँग्रेस आहे… कर्नाटक आणि पंजाब वगळता कुठेही काँग्रेसची सत्ता नाही… आणि सहाच महिन्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान सारख्या राज्यात निवडणुका होऊन भाजपच्या विजयाची सुरवात झाली होती… कर्नाटकची निवडणुक लोकसभेच्या निवडणुकीसाठी टर्निंग पाँईंट मानल्या जातो, ते यासाठी!

आता काँग्रेससाठी प्लस पाँईंट आहे तो असा, की आता काँग्रेसकडे हरण्यासारखं काहीच नाही, पण वसुंधरा राजेच्या गलथान कारभारामुळे आणि सचीन पायलटच्या युवा नेतृत्वामुळे राजस्थान जिंकल्यात जमा आहे ( २०१३ मध्ये इथे काँग्रेसच्या २०० पैकी ३० जागाच निवडुन आल्या आणि २०१४ मध्ये २५ पैकी २५ जागा भाजप जिंकलं होतं, पण महिन्याभरापुर्वी झालेल्या ३ पोटनिवडणुकांत तीनही जागा काँग्रेस जिंकली, यावरुन तिथल्या हवेचा अंदाज घेता येईल). मध्यप्रदेशची स्थीती याहुन वेगळी नाही… राजस्थान काँग्रेस एकहाती सत्ता मिळवेल, इथे मात्र संघर्ष करावा लागेल.

खरी चिंता आहे ती भाजपला! २०१४ च्या चमत्कारात उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३, महाराष्ट्रात ४८ पैकी ४२, मध्यप्रदेशात २९ पैकी २७, गुजरातेत २६ पैकी २६ , राजस्थानात २५ पैकी २५ जागा त्यांनी जिंकल्या असल्या, तरी असे ‘चमत्कार’ नेहमी नेहमी होत नसतात, याची जाणिव भक्तांना नसली तरी, भाजपच्या शिर्ष नेतृत्वाला नक्कीच आहे… आणि आतापर्यंत ‘पप्पु’ म्हणुन हिणवल्या गेलेल्या राहुल गांधींनी बरोबर योजना आखुन उत्तरप्रदेशात मायावती – अखिलेश यांना एकत्र आणले ( गोरखपुर या योगी आदित्यनाथ यांची व फुलपुर या केशव प्रसाद मौर्य यांच्या हायप्रोफाईल आणि भाजपचा गड असलेल्या जागांवर भाजपचा पराभव करुन दाखवला तो याच योजनेमुळे ) . २०१४ च्या आकडेवारीनुसार १९ मध्ये या आघाडीमुळे भाजपच्या ५० जागांत बिघाडी होईल, राजस्थान, मध्यप्रदेश आणि मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातेत सुद्धा ( हीसुद्धा राहुल गांधींचीच जादु) भाजपचे प्रत्येकी १०-१५ जागांचे नुकसान होणार आहे….

२०१४ मध्ये भाजपला २८२ जागा मिळाल्या, त्यानंतर देशभरात २५ पेक्षा जास्त पोटनिवडणुका झाल्या, यातली बीडची जागा वगळता सर्व निवडणुका भाजप हरली आणि २८२ चे संख्याबळ २७४ वर आले… काँग्रेसच्या मात्र ४ जागा वाढल्या… पुढल्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, राजस्थान , मध्यप्रदेश, गुजरात यांचा अंदाज घेतला तर २७४ चं संख्याबळ १९० च्या घरात जाईल… महाराष्ट्रात शिवसेना- भाजपच्या भांडणामुळे, बिहारमध्ये केलेल्या फोडाफोडीमुळे ही संख्या १६०-१७० पर्यंत खाली जाईल.

आपण अख्खं जग जरी जिंकलं असलं, तरी सहकारी पक्षांशी वागण्याची सभ्यतेत बसणारी पद्धत असते, याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे तेलगु देसम या १६ खासदार असलेल्या पक्षाने भाजपची साथ सोडली, १८ खासदार असलेल्या शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली, अकाली दल धुमसत आहेच! त्यामुळे ३२४ खासदार असलेल्या NDA आघाडीचे संख्याबळ २००च्या घरात जाईल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. अन् तिकडे काँग्रेसचे संख्याबळ मात्र वाढतच जाईल!

राजकारणाच्या पटात मोठं युद्ध जिंकण्यासाठी काही लहान लढाया हरत असेल, तर ती फार मोठी गोष्ट नसते… आणि एखादा दीर्घकालिन डाव मांडताना तात्कालिक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते.

त्तपुर्वी, जगदीश शेट्टर या भाजप उमेदवाला एकुन मतदानापेक्षा जास्त मतदान झाल्यामुळे मतमोजणी रद्द ठरवली आहे…काही दिवसांपुर्वी २०१० मध्ये प्रदर्शित झालेला ‘राजनीती’ हा चित्रपट पाहीला, त्याच EVM च्या गडबडीचा उल्लेख आहे… म्हणजे EVM वर गेले ८-१० वर्षांपासून शंका घेतली जात आहे, फक्त मोदी जिंकताहेत म्हणुन त्यांच्यावर आक्षेप आहे, अशातला भाग नाही… इंग्लंडआदी पाश्चात्त्य देशांनी EVM सोडुन परत बॅलेट पेपरने निवडणुका सुरु केल्या, त्या यामुळेच! पुण्यातला मागच्यावर्षीच्या निवडणुकीतला एक खरा किस्सा ऐकला, एका उमेदवाराला शुन्य मतं मिळाली, तेव्हा त्याने मिडीयासमोर हेच बोलला की माझे जवळचे मित्र, कुटुंबीय यांना जाऊ द्या, माझं स्वतःचं मत तर मी मलाच दिलंय, तेही माझ्या खात्यात आलं नाहीये! यावरुन EVM च्या विश्वसनीयतेचं नेमकं काय, याचा निकाल लागेल!

(लेखक मीडिया वॉच नियतकालिक आणि वेब पोर्टलचे उपसंपादक आहेत.)

९५६१८५६४०३

Previous articleमोदी जिंकणारच!
Next articleसावरकर माफीवीर तर भगतसिंग क्रांतिकारी होते!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.