काँग्रेसाध्यक्ष जवाहरलाल

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग १२

साभार – साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

काँग्रेसचा हा मसुदा सरकारला पाठवीत असतानाच गांधींनी एका स्वतंत्र पत्राद्वारे काँग्रेसच्या तीन अटी सरकारला कळविल्या. त्यानुसार सरकारने ताब्यात घेतलेल्या सर्व राजबंद्यांची तात्काळ सुटका व्हावी, गोलमेज परिषदेला इतर पक्ष हजर राहणार असले तरी काँग्रेसला देशात असलेला लोकमताचा प्रचंड पाठिंबा लक्षात घेऊन त्या पक्षाच्या शब्दाला व भूमिकेला परिषदेत अधिक महत्त्व दिले जावे आणि वसाहतीचे येऊ घातलेले स्वराज्य कॅनडा वा ऑस्ट्रेलियाच्या पातळीवरचे (म्हणजे इंग्लंडचे राजपद नामधारी व देश आपल्या व्यवहारात स्वतंत्र व सार्वभौम) असावे, अशा मागण्या होत्या. गांधीजींच्या या अटी कधीही मान्य होणार नाहीत असे मोतीलालजींचे मत होते व ते त्यांनी गांधींना ऐकविलेही. मात्र गांधीजी आपल्या अटी मागे घ्यायला तयार नव्हते. अखेर इंग्लंडच्या पार्लंमेंटनेच त्या अटी फेटाळल्या व गांधीजी इंग्रजांशी वाटाघाटी करण्याच्या तणावातून मुक्त झाले.

लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी देशातील दहा प्रांतिक काँग्रेस कमिट्यांनी गांधीजींचे तर पाच समित्यांनी सरदार पटेलांचे नाव सुचविले होते. तीन समित्यांनी नेहरूंच्या नावाची शिफारस केली होती. पुढे झालेल्या अ.भा. काँग्रेसच्या बैठकीत गांधीजींनी स्वत:चे नाव मागे घेतले व नेहरूंना आपला पाठिंबा जाहीर केला. तसे करताना त्यांनी सरदार पटेलांची त्याला संमतीही घेतली होती. नेहरूंच्या मनातील समाजवाद व तारुण्यसुलभ आकांक्षांना आवर घालणे हा जसा त्या मागचा हेतू होता तसा नेहरूंनी फेरवाद्यांना  दिलेल्या साथीचाही विचार होता. देशातील कायदेमंडळे परिणामकारक ठरत नव्हती आणि त्यांचे कधीकाळी आपण नेते व प्रवक्ते होतो याचा मोतीलालजींनाही तेव्हा पश्चात्ताप होऊ लागला होता. या विधिमंडळांची रचना त्यांना स्वातंत्र्य देणारी नव्हती. त्यामुळे निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासने त्यांना पूर्ण करता येत नव्हती. विधीमंडळांची ही अवस्था नाफेरवाद्यांना सुखावणारी होती. ही विधीमंडळे जावीत या मतावर मोतीलालजीही आले होते आणि लाहोर काँग्रेसमध्ये तसे करण्याची संधी मिळेल अशी आशाही  ते बाळगून होते.

काँग्रेसच्या या बैठकीनंतर गांधीजींनी नेहरूंना तात्काळ बोलवून घेतले व त्यांच्या माथ्यावर लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा त्यांनी शिरपेच चढविला. त्याचवेळी ‘आता मद्रास काँग्रेस मागे पडली असून तुम्ही तुमची वेगळी भूमिका लाहोरच्या व्यासपीठावरून मांडायला हरकत नाही’ अशी परवानगीही त्यांनी नेहरूंना दिली.

‘अध्यक्षपदाचा भार उचलायला तुम्ही समर्थ आहात काय?’ असे गांधीजींनीच नेहरूंना विचारले होते. त्यावर नेहरूंचे उत्तर ‘तुमचा आणि पक्षाचा विश्वास मला तसे बळ देईल’ हे होते. त्याचवेळी देशातील तरुणांना उद्देशून गांधीजी म्हणाले ‘जवाहरच्या रूपाने या देशाचे नेतृत्वच मी तुमच्या हाती देत आहे. ते पुढे नेण्याची व देश बलवान करण्याची जबाबदारी आता तुमची आहे. तुम्ही माझा हा विश्वास खरा कराल याची मला खात्री आहे.’

नेहरूंचे मन मात्र अखेरच्या क्षणापर्यंत द्विधा अवस्थेत होते. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी पक्षाला पूर्णत: मान्य नाही आणि आपण ज्या समाजवादाचा विचार स्वीकारला आहे तोही त्याला अमान्य आहे हे त्यांना दिसत होते. त्यामुळे आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीला पक्ष एकमताने साथ देईल की नाही याचा विश्वास त्यांना वाटत नव्हता. मात्र गांधींचा पाठिंबा हा त्यातून मार्ग काढील असेही त्यांना वाटत होते.

लाहोर काँग्रेस ही भारताच्या इतिहासाला उत्साही वळण देणारी ऐतिहासिक बाब ठरली. एका पांढर्‍या शुभ्र घोड्यावर स्वार झालेले पक्षाध्यक्ष नेहरू हजारोंच्या जयजयकारांच्या घोषणांसह अधिवेशनाच्या स्थानाकडे निघाले होते. त्या प्रसंगाचे गांधीजींनी केलेेले वर्णन ‘एका राजपुत्राच्या राज्यारोहण समारंभाला साजेसे वाटावे’ असे आहे. नेहरूंचे आईवडील रस्त्याच्या दोन्ही कडेला उभे राहून आणि डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या पुत्राचे कौतुक पाहत होते. एकच क्षण आपल्या आईकडे पाहून नेहरू कमालीचे नम्र व ओशाळल्यागत झाले. काँग्रेसमधील तरुणांचा वर्ग कमालीच्या उत्साहात होता व त्याच्या मनातले नेहरूंविषयींचे प्रेम उचंबळून येताना दिसत होते.

नेहरूंचे अध्यक्षपदावरून झालेले भाषणही काँग्रेसच्या आजवरच्या अध्यक्षीय भाषणांहून वेगळे होते. या भाषणात त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी तर केलीच शिवाय वसाहतीच्या स्वराज्याची मागणी आता आपण मागे टाकली असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तेवढ्यावर न थांबता संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्याची जबाबदारी त्यांनी खुद्द गांधीजींवरच टाकली. आपल्या भाषणात त्यांनी त्यांची समाजवादावरची निष्ठा जाहीररीत्या सांगितली. ‘रशियामुळे नाही, आणि तेथील क्रांतीमुळेही नाही तर मी मनानेच समाजवादी आहे, स्वातंत्र्य या कल्पनेला समाजवादाची म्हणजे समाजाच्या आर्थिक व न्याय्य उत्थानाची जोड दिल्याशिवाय स्वातंत्र्याची कल्पना भरीव होत नाही. स्वातंत्र्य म्हणजे राज्यकर्ते बदलणे नव्हे’ असे सांगून ते म्हणाले, ‘काँग्रेस पक्षातील अनेकांना माझा विचार मान्य नाही. त्यांना देशाच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत नैसर्गिकरित्या होत जाणारे सुसह्य बदलच तेवढे हवे आहेत. पण ते बदल समाजाला व  त्यातील पीडितांच्या वर्गाला न्याय देणारे असणार नाहीत आणि तसा न्याय त्यांना लवकर मिळणारही नाही. आज ना उद्या माझ्यावर रुष्ट असलेली पक्षातील ज्येष्ठ मंडळीही एक दिवस माझ्या मतावर आल्याखेरीज राहणार नाही. देशातील बहुसंख्य वर्गांना आर्थिक सहकार्याचा हात देणे व त्यांना इतरांच्या बरोबरीने येण्याची संधी देणे हा केवळ न्यायच नाही तर ती माणुसकीही आहे.’

नेहरूंचे वय तेव्हा अवघे ४० वर्षांचे होते (त्यांच्याआधी गोपाळकृष्ण गोखले व मौलाना आझाद यांनीही याहून कमी वयात काँग्रेसची अध्यक्षपदे भूषविली होती.) मोतीलालजी, आपल्या हातची अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या मुलाच्या हाती सोपविण्याच्या घटनेनेच आनंदी होते. मात्र त्यांचा नेहरूंशी असणारा मतभेद तेव्हाही संपला नव्हता. ‘मतभेद असतील पण तो स्वतंत्र मते राखतो याचा मला अभिमान आहे’ असे ते त्या काळात म्हणालेही आहेत.

रावी नदीच्या तीरावर भरलेल्या काँग्रेसच्या या अधिवेशनातील स्वयंसेवकांची संख्याच दहा हजारांएवढी मोठी होती. हजारोंची उपस्थिती, प्रचंड उत्साह आणि देशभरातून आलेल्या सर्व नेत्यांचा सहभाग असलेल्या या अधिवेशनाने देशात स्वातंत्र्याची मोठी लाटच उभी केली असे नव्हे तर देशातली तरुणाई स्वातंत्र्याच्या लढ्याला व काँग्रेसलाही त्याने जोडून दिली. त्यातून नेहरूंचे व्यक्तिमत्व सार्‍यांच्या डोळ्यात भरणारे आणि ते दीपवणारेही होते. त्यांच्या देखणेपणावर लोकप्रियतेची आभा होती आणि अंगावर घेतलेल्या जबाबदारीची जाणही सोबत होती.

दरम्यान देशाच्या व्हाईसरॉय पदावर आलेले लॉर्ड इर्विन हे सौम्य व धार्मिक वृत्तीचे अधिकारी होते. त्या पदावर येताच त्यांनी भारताचे भवितव्य घडविण्याच्या कामात भारतीय नेत्यांनी इंग्लंडला सहकार्य करावे असे आवाहन केले. ‘सारे काही इंग्लंडच ठरवील’ या लॉर्ड रिडींग यांच्या पूर्वीच्या भूमिकेहून हा पवित्रा वेगळा होता. नव्या सुधारणांच्या आखणीत भारतीयांना सामील करून घ्यायला इंग्लंड तयार झाले होते. इर्विन यांनी भारतात येताच गांधी, मोतीलालजी व बॅरि. सप्रू यांच्याशी चर्चा करून एक संयुक्त पत्रक जाहीर केले. त्यात वसाहतीच्या स्वातंत्र्यावर चर्चा करण्यासाठी सार्‍यांची अनुमती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले… नेहरूंचे मन मात्र त्याला तयार नव्हते. एका व्यथित अवस्थेत त्यांनी त्यांचे प्रस्तावित अध्यक्षपद नाकारण्याचीही शहानिशा गांधीजींजवळ केली होती. गांधीजींनी कधी रागावून तर कधी समजूत काढून त्यांना राजी केले होते. अखेर नेहरू राजी झाले. मात्र त्यासाठी त्यांनी सुभाषबाबूंचा रोष ओढवून घेतला.

अध्यक्षपद मान्य केल्यानंतर नेहरू, गांधीजी, मोतीलालजी, सप्रू आणि विठ्ठलभाई पटेलांसोबत इर्विन यांना भेटायला दिल्लीला आले. याच काळात दक्षिणेच्या दौर्‍याहून परत येत असताना दिल्लीजवळच इर्विनच्या गाडीखाली बॉम्बस्फोट झाला होता. त्या गाडीतील जेवणाचा डबा त्यामुळे उद्ध्वस्त झाला व एका कर्मचार्‍याला दुखापतीही झाल्या… मात्र भेटीच्या वेळी इर्विन नेहमीप्रमाणे प्रसन्न होते. आरंभी सार्‍यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली तेव्हा ते सहजपणे म्हणाले ‘जाऊ द्या. आपण आपल्या कामाविषयी बोलू या.’

‘भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचे आपले आश्वासन तुमचे सरकार पूर्ण करेल की नाही’ या गांधीजींच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले तसे कोणतेही स्पष्ट आश्वासन मला देता येणार नाही. ३१ ऑक्टोबरला ब्रिटीश सरकारने जाहीर केलेल्या योजनेपलिकडे जाण्याचा मला अधिकार नाही. मात्र तुम्ही तशी मागणी गोलमेज परिषदेत करायला हरकत नाही.’ त्यावर गांधींचे समाधान झाले नाही आणि ते चर्चेतून बाहेर पडले. पुढे अनेक दिवस ते त्यांना पुन्हा भेटायला गेले नाहीत.

मात्र यावेळपर्यंत देशाचे डोळे दिल्लीहून नव्या सांवैधानिक सुधारणांकडे  व नेहरूंच्या अध्यक्षपदाकडेच अधिक लागले होते. त्याचवेळी नेहरूंची दृष्टी मात्र आणखी एका संघटनेवर खिळली होती. ट्रेड युनियन काँग्रेस या देशातल्या कामगारांच्या संघटनेने त्यांची आपल्या अध्यक्षपदी याचवेळी निवड केली होती. प्रकृतीने जास्तीच्या डाव्या असलेल्या या संघटनेला नेहरूंचा सौम्य समाजवाद काही काळ चालणारा होता. मात्र त्या संघटनेतच तीन गट होते. एक उजव्या प्रकृतीचा व शांततामय आंदोलनाच्या दिशेने जाणारा. दुसरा मध्यम, चर्चा व अहिंसा या दोन्ही गोष्टी मान्य असलेला तर तिसरा एकदम कम्युनिस्ट विचाराचा व क्रांतीची भाषा बोलणारा. या संघटनेचे अधिवेशन नेमक्या याच काळात नागपुरात भरले होते. नेहरूंची त्यातली उपस्थिती कामगारांचा हा वर्ग काँग्रेसशी जोडण्याच्या व त्याला त्या पक्षाच्या जवळ आणण्याच्या मोहिमेचा भाग होती. त्यासाठी त्यांनी त्या संघटनेतला मध्यम वर्ग प्रथम हाताशी धरला. नेहरूंचे नाते ग्रामीण जनतेशी जेवढ्या सलगीचे व जिव्हाळ्याचे होते तेवढे ते या कामगारांशी कधीही जुळले नाही. एकतर कामगारांचा वर्ग गरीब असला तरी तो ग्रामीण शेतकर्‍यांच्या व शेतमजुरांच्या वर्गाहून अधिक चांगल्या स्थितीत होता. त्याची मानसिकता शहरी आणि मार्क्सवादाकडे झुकलेली होती. त्यांच्यात मतैक्य घडविण्यात नेहरूंना फारसे यश आले नाही. पुढे त्या संघटनेची तीन शकलेच झालीत. ती तशी व्हायला त्यांच्यातील प्रकृतीभेदच कारणही होता.

लाहोर अधिवेशनाने नेहरूंचे काँग्रेसमधील स्थान केवळ अढळच नाही तर गांधीजींच्या नंतरचे दुसर्‍या क्रमांकाचे बनविले होते आणि यापुढे नेहरू हेच गांधीजींचे वारसदार अशी देशाची धारणा झाली. याच काळात नेहरूंवर देशभर कविता व गाणी लिहिली गेली. त्यांची चरित्रे बाजारात आली आणि त्यांच्या नेतृत्वाला जनमानसात चांगला पाठिंबाही उभा राहिलेला दिसला. गांधीजींच्या मनात सरदार पटेलांविषयी अपार प्रेम व विश्वास होता.  त्यांच्या वास्तववादी भूमिका त्यांना नेहमीच जमिनीवरच्या वाटत होत्या. पण स्वतंत्र देशाचे नेतृत्व तरुण नेत्याकडे असावे असेही त्यांच्या मनात होते. पटेलांचे वय नेहरूंहून चौदा वर्षांनी अधिक होते. नेहरूंच्या स्पर्धेत आणखीही एक तरुण नेता काँग्रेसमध्ये   होता, सुभाषचंद्र बोस. ते नेहरूंहून नऊ वर्षानी लहान होते. पण जेवढे लहान तेवढेच ते जास्तीचे उत्साही व उतावळे म्हणावे असेही होते. गांधीजींनी  त्यांना तसे अनेकवार ऐकविलेही होते.

केंब्रिजमध्ये शिक्षण घेऊन व आयएएसची नोकरी सोडून सुभाषबाबू १९२१ मध्ये गांधीजींच्या चळवळीत सामील झाले होते. लहानपणापासूनच एक हूड वृत्तीचा लढाऊ कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुभाषांनी आपल्या कॉलेजातच भारतीयांविषयी अपशब्द वापरणार्‍या एका इंग्रजी प्राध्यापकाला चोप देऊन आपला दरारा उभा केला होता. विद्यार्थ्यांचे संप घडविणे व ब्रिटीश सरकारच्या कामकाजात अडथळे आणणे यासाठी त्यांना महाविद्यालयाने दोन वर्षासाठी निलंबितही केले होते. त्यांचे बालपण स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या व त्यांचे पट्टशिष्य स्वामी विवेकानंदांच्या सहवासात गेले होते. हिंदू धर्माला त्याच्या जुन्या परंपरा व जातीयवादासारख्या कुप्रथांपासून दूर करण्याचे व्रतही त्यांनी विवेकानंदांसोबतच घेतले होते. आईचा धार्मिक प्रभाव व या सत्संगाचा परिणाम असा की सुभाषबाबूंना घर व संसार यांची आस्था उरली नाही. त्या सार्‍यांचा त्याग करून ते हिमालयाच्या आश्रयाला गेले. तेथे त्यांनी काही काळ अध्यात्म साधना केली. पुढे गंगेच्या तीरावरील पवित्र स्थळांना भेटी दिल्या. मात्र संन्यासवृत्तीचे वैय्यर्थ लक्षात येताच ते पुन्हा जीवनाकडे वळले. मात्र समाजकारण व राजकारणाविषयीची त्यांची ओढ कायमच राहिली.

सुभाषबाबूंना गांधीजींची अहिंसा व सत्याग्रह यांची उपयुक्तता जाणवत नव्हती. स्वातंत्र्यासाठी अतिशय उग्र लढा लढविण्याचा मानस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. देशबंधू दास हे त्यांना गुरूस्थानी होते. त्यांचे वक्तृत्व व विचार हे दोन्ही कमालीचे प्रभावी व आक्रमक होते. गांधींचे भावनांना केले जाणारे आवाहनही त्यांना मान्य नव्हते. एका बुद्धीवादी व बुद्धीगम्य अशा लढ्याशी काँग्रेसने स्वत:ला जुळवून घ्यावे ही त्यांची इच्छा होती. त्यांचा गांधींविषयीचा हा दुरावाच त्यांना त्यांच्यापासून व पुढे काँग्रेसपासून वेगळे राखत आला. ‘गांधीजींशी दुरावा नको, देश त्यांच्या पाठीशी आहे आणि या देशाला त्यांच्याएवढे कोणी समजून घेतले नाही’ हा नेहरूंचा सल्ला त्यांनी फारशा गांभीर्याने घेतलाही नाही. आणि अखेर व्हायचे तेच झाले. ते गांधींपासून, काँग्रेसपासून व देशापासूनही दूर झाले. त्यांची लोकप्रियता कायम राहिली पण तिला देशात सक्रिय व सामाजिक रूप कधीच आले नाही.

(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमालाजुने सगळे लेख वाचण्यासाठी क्लिक करा- http://mediawatch.info/category/%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82/

Previous articleकुछ दर्द कलेजे से लगाने के लिए हैं…
Next articleप्रत्येकाचं सत्य वेगळं असू शकतं हे सांगणारा -आँखो देखी!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.