म्युकरमायकोसिसला वेळीच कसे रोखायचे?

-डॉ. प्राजक्ता कुलकर्णी

Black fungus किंवा Mucormycosis ने सध्या हाहाकार माजवला आहे. लोक खूप घाबरले आहेत याला.  याबद्दच चर्चेसाठी हा धागाप्रपंच.

म्युकॉरबद्दल आम्हाला पीजी करताना शिकताना पहिलं वाक्य हे असायचं की हे एक अत्यंत रेअर फंगल इन्फेक्शन आहे. कोविडच्या काळाने मात्र हे वाक्य खोटं ठरवलं. तर पहिली गोष्ट ही समजून घ्या की हा काही नवीन रोग नाही. आधीपासून याबद्दल आपल्याला माहिती होती, फक्त आता हा खूप जास्त प्रमाणात दिसून येतोय.

 कोविड पेशंटना हा रोग का होतोय?

1. म्युकॉर फंगसचे स्पोअर्स ubiquitous सगळीकडे, सर्रास असतात. असे असूनही तो इतका दुर्मिळ (rare) आजार होता, कारण तो फक्त त्यांनाच होत असे ज्यांची प्रतिकार क्षमता खूप म्हणजे खूप कमी झालीये. सहसा अनियंत्रित मधुमेह असलेल्यांना हा होत असे. कोविड झालेल्या लोकांमधे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे ते म्युकॉरला ससेप्टिबल होतात.

2. कोविडचे काही complications (cytokine storm) थांबवण्यासाठी स्टेरॉइड दिली जातात. या औषधांमुळे रक्तातले साखरेचे प्रमाण वाढते शिवाय प्रतिकार शक्ती कमी होते, दोन्ही गोष्ट म्युकॉर आजारासाठी घातक आहेत.

3. कोविडमधे रक्तातील फेरिटिन नावाच्या लोहयुक्त पदार्थाचे प्रमाण वाढते, हेही म्युकॉरच्या वाढीला पोषक ठरू शकते.

4. ऑक्सिजन ट्यूबमधून याचं इन्फेक्शन होतय का अशी शंका होती. पण आता ऑक्सिजनच्या नळीतून याची बाधा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. घरी विलगीकरण झालेल्या आणि ऑक्सिजन न दिलेल्या काही लोकांना हा आजार झाला आहे.

 हा फंगस एकाचा दुसऱ्याला पसरू शकतो का?

कोरोना वायरस सारखा हा फंगस एकापासून दुसऱ्याला अजिबात होत नाही. फंगसचे स्पोअर्स नाका-तोंडातून किंवा कानाचा पडदा फुटला असेल तर तिथून चेहऱ्यातील सायनसेस या हाडांच्या पोकळीत शिरतो. पण आधी सांगितल्याप्रमाणे ते स्पोअर्स सगळीकडे असतात (मातीत, धुळीत). त्यामुळे इनफेक्शन झालेल्याच्या संपर्कामुळे (कोविडचा असला)  म्युकॉरच्या संसर्गाचा धोका नसतो.

 या रोगाचे काय परिणाम होतात? लक्षणे काय आहेत?

हा फंगस स्पोअर्स (अंडी) मधून हायफेट फॉर्ममधे वाढायला लागतो आणि रक्तवाहिन्या ब्लॉक करतो.

हा रोग फक्त नाकापर्यंत असताना सुरुवातीची लक्षणे- घाण वासाचा/ रक्त मिश्रित शेबूड येणे. या स्टेजवर जर नाकात एण्डोस्कोपी (दुर्बिणीने चिकित्सा) केली तर काळ्या रंगाचे पॅचेस दिसतात. यावरूनच याचं नाव ब्लॅक फंगस असं पडलय.

नाकातून हा रोग सायनसेस मधे जातो. तेव्हा चेहऱ्यावर दुखणे किंवा तीव्र डोकेदुखी होते, दात दुखी, गालावर सूज येते. तिथून पुढे हा रोग ऑर्बिट (डोळ्यांभोवतीची पोकळी) मधे शिरतो. तिथल्या रक्तवाहिन्या ब्लॉक केल्यामुळे दृष्टी अंधुक होणे, तिरळेपणा येऊन डबल दिसणे, डोळ्यांवर लाली, सूज येणे अशी लक्षणं दिसतात. जर वेळीच याला थांबवलं नाही तर पाहता पाहता फंगस ऑर्बिटमधून क्रेनियम (कवटी) मधे शिरतो. एकदा का मेंदूला याची बाधा झाली की पेशंट वाचण्याची शक्यता फार कमी उरते. नाकापासून मेंदूपर्यंतचा प्रवास आठवडाभरातही होऊ शकतो. म्हणून याचा वेळीच निदान आणि उपचार होणं अत्यावश्यक आहे.

 निदान कसं करतात?

याचं निश्चित निदान फंगसच्या पीसीआर टेस्टने होतं. पण त्याचा रिपोर्ट मिळायला वेळ लागतो. त्यामुळे नाकातला टिश्यु खरवडून त्याची मायक्रोस्कोपीने प्रॉबॅबल (संभाव्य) निदान कळू शकतं. याशिवाय तो कुठपर्यंत पसरलाय यासाठी पुन्हा पुन्हा एम आर आय (MR angiography) ही चाचणी करावी लागते.

 उपाय काय?

यावर काही ॲण्टीफंगल औषधं आहेत. सगळ्यात स्वस्त औषध Amphotericin B हे आहे. पण याची गरज आधी खूपच कमी पडत होती त्यामुळे ते औषध त्या प्रमाणातच बनवलं जात असे. आता अचानक गरज वाढल्यामुळे कुठेही मिळेनासं झालय. इतर औषधांचा खर्च लाखांच्या घरात असल्यामुळे सामान्य जनतेला न परवडण्यासारखे आहेत. परत औषधं जर रक्ताद्वारे द्यायचं ठरवलं तर हा फंगस रक्तवाहिन्याच बंद करतो, त्यामुळे रक्ताद्वारे दिलेलं औषध जिथे पोचायला पाहिजे तिथे पोचेल की नाही हे आधी MR angio चाचणीत कळतं. जर रक्तवाहिन्या बंद झालेल्या असतील आणि अजून मेंदूजवळ पोचला नसेल तर तिथे पोचू नये म्हणून बाधा झालेला भाग काढून टाकणे हाच उपाय उरतो. यामुळेच काही लोकांचे डोळे त्यांचा जीव वाचवण्यासाठी काढून टाकावे लागले होते (orbital exeteration). एकदा का मेंदूपर्यंत पोचला की कोणताच उपाय लागू होत नाही.

 याला प्रतिबंध (prevention) करता येईल का?

निश्चितच. कोविडप्रमाणे याची प्रतिबंधक लस नाही. पण काही सावधगिरी बाळगली तर आपण याला टाळू शकतो.

1. स्वच्छता. हाताप्रमाणेच चेहरा साबणाने धुणे, शरिराची व परिसराची स्वच्छता ठेवणे

2. एकदा घातलेला मास्क परत परत न वापरणे

3. रक्तातील साखरेच्या प्रमाणाबद्दल कोविड झालेल्यांनी तसेच न झालेल्यांनी जागरूक असणे. ती कंट्रोल मधे ठेवण्यासाठी जरूर ते करणे (आहार, व्यायाम, औषधे)

4. वाफारा घेणे

5. कोविड झालेल्यांनी बिटाडीन गार्गल्स करणे. बिटाडीन या फंगसला मारून टाकतं

6. स्टेरॉइड औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेणे

या साध्या सोप्या उपायांनी आपण हे इनफेक्शन टाळू शकतो.

तर सारांश असा की, हा आजार घातक असला तरी पॅनिक होण्याची गरज नाही. आजार न होण्यासाठी सोपे उपाय आहेत. याउपरही झालाच तर सुरुवातीची लक्षणं दिसताच उपाय केला तर बरा होतो.

 काळजी घ्या, काळजी करू नका!

(लेखिका मंगलोर( कर्नाटक) येथील नामवंत नेत्र तज्ञ आहेत.)