किया है प्यार जिसे….

साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’

-वसुंधरा काशिकर

नेमकी कुठे वाचली ते आठवत नाहीये. पण एक नितांतसुंदर गोष्ट या गझलेच्या निमित्तानं सांगाविशी वाटतेय. एक राजा असतो. असाच एकदा तो शिकारीला गेला असताना रस्ता चुकतो. भटकत भटकत तहान लागली म्हणून एका तळ्याचे पाणी तो ओंजळीत घेतो. पाणी पिण्याआधी धुळीने माखलेला चेहरा धुवावा म्हणून तो पाण्याचा हबका चेहऱ्यावर मारतो. पाणी खराब असतं त्याचे डोळे जातात. आंधळा झालेला राजा चाचपडत फिरत असतो तेवढयात जंगलात राहणाऱ्या एका आदिवासी मुलीला तो दिसतो. ती त्याला आश्रय देते. अनेक दिवस त्याची सेवा करते. राजाही तीला आपली राजा म्हणून ओळख सांगत नाही. मधल्या काळात या आदिवासी मुलीच्या राजा प्रेमात पडला असतो. तिच्या समपर्णामुळे, प्रेमामुळे, सेवेमुळे ती त्याला आवडायला लागली असते. ते लग्न करणार असतात. यथावकाश राजाचे सैनिक त्याला शोधत येतात. वैद्य इलाज करतात. राजाचे डोळे परत येतात. राजा डोळे उघडल्याबरोबर प्रथम आदिवासी मुलीला बघण्यास आतूर असतो. कारण तिनेच त्याची सेवा केली असते, त्याला आधार दिला असतो. डोळे उघडता क्षणी बघतो तर काय, ती आदिवासी कन्या दिसायला कुरूप असते. राजाच्या तोंडून नकळत उद्गार निघतात…”बरं झालं! मला दृष्टी आली नाहीतर मी केवढी मोठी चूक केली असती…” त्यावर तत्क्षणी ती स्वाभिमानी पण आत्यंतिक दुखावलेली कन्या उद्गारते…”बरं झालं, तुला दृष्टी आली, नाहीतर मी केवढी मोठी चूक केली असती”.

किया है प्यार जिसे हमने ज़िंदगी की तरह
वो आश्ना भी मिला हमसे अजनबी की तरह

पाकिस्तानी शायर क़तील शिफाई यांनी लिहिलेली ही गझल म्हणजे मला अशा अनके दु:खाच्या, फसवल्या गेलेल्या क्षणांचा, विश्वासघात झालेल्या क्षणांचा उद्गार वाटते.

ज्यावर आम्ही स्वत:च्या आयुष्यावर जितकं प्रेम करतो तितकंच प्रेम केलं…किंबहुना त्यापेक्षाही अधिक…तो मित्र, प्रियकर, प्रेयसी माझ्याशी भेटताना अगदी अपरिचिताला भेटावं, एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटावं तितक्या कोरडेपणाने, अलिप्तपणे भेटला.

असा प्रसंग बहुतेक वेळेला बहुतांश लोकांच्या आयुष्यात कधी ना कधी आलेला असतोच. मी यावेळी जाणीवपूर्वक बहुतांश म्हणतेय प्रत्येकाच्याच नाही म्हणत आहे. ते यासाठी की, बहुतांश लोक हे भावनेला आयुष्यात स्थान देणारे, प्रेम, मैत्री, निष्ठा मानणारे असतात. आणि फार थोडे लोक हे निव्वळ पैसा, व्यवहार यासाठी लोकांचा हवा तसा वापर करुन घेणारे कोरडेठाक असे असतात. अशा लोकांसाठी माणसं ही देखील इतर साधनांसारखी साधनं असतात.

माझं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे असं मी जेव्हा विधान करते, तेव्हा ते प्रेम कृतीतून दिसणं अपेक्षित आहे. केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असं असेल तर त्या ‘वांझोटया प्रेमाचा’ (वि.स.खांडेकरांची क्षमा मागून) कवडीचाही उपयोग नाही. ‘वांझोटी करुणा’ हा शब्दप्रयोग वि.स.खांडेकरांनी बाबा आमटे यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ यांच्या काव्यसंग्रहात वापरला होता. त्यांच्या मते, ‘बाबांची करुणा ही वांझोटी नव्हती…’ त्याच धर्तीवर वांझोटं प्रेम हा शब्दप्रयोग करावासा वाटतो.
प्रेम कृतीतून दिसणं अपेक्षित आहे म्हणताना, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, मग तो मित्र-मैत्रिण असेल, प्रियकर—प्रेयसी असेल, बहिण-भाऊ असेल..ती व्यक्ती जर अडचणीत असेल, संकटात असेल, दु:खात असेल तर अलिप्तपणे किंवा केवळ शब्दांचीच साखरपेरणी तुम्ही करत असाल तर ते प्रेम सोडून बाकी सर्व आहे असं समजून जावं. त्या क्षणाला माझ्या सर्वशक्तीनिशी त्या व्यक्तीला मी त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी झटणं अपेक्षित आहे.
पण असं कमी वेळा होताना बघायला मिळतं. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या आयुष्यातला एक मजेदार आणि मार्मिक प्रसंग आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना एक माणूस सांगत होता, “शॉ, तो एक मनुष्य तुमच्याबद्दल फार वाईट बोलत होता”. शॉ लगेच म्हणाले, “हो का, पण मी तर त्याचं काहीच भलं केलं नाही.”

ज्यावर जीव उधळून प्रेम करावं, तिथून असे विश्वासघाताचे झटके पचवणं महाकठिण काम. ह्रषीकेश गुप्ते यांच्या ‘दंशकाल’ कादंबरीत एक प्रसंग आहे. यातल्या नायकाची आई एकदा आपल्या नवऱ्याला आपल्याच लहान दीराच्या बायकोसोबत नको त्या अवस्थेत बघते…त्या प्रसंगानंतर ती अक्षरश: वेडीपिशी होते. ज्या नवऱ्यावर इतकं जीवापाड प्रेम केल, ज्याच्या पायी सर्व समर्पण केलं तिथून हा विश्वासघात, दगा तिला सहन होत नाही. ती नवऱ्याचा अख्खं आयुष्य शत्रूपेक्षाही तिरस्कार करते आणि नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिचं आलेलं वेड जातं.

फार थोडी ठिकाणं अशी असतात की जिथे, माणूस स्वत:ला पणाला लावतो. जिथे माणसानं स्वत:ला पणाला लावलं तिथून असे वंचनेचे अनुभव आले की येणारं वैफल्य अनिर्वचनीय असतं.
सितम तो ये है की, वो भी न बन सका अपना… क़ुबुल हमने किये जिसके ग़म खुशी की तरह…
ज्याचं दु:ख आम्ही सुखासारखं आपलं मानलं…तो सुद्धा आपला होऊ नये..यापरतं दु:ख ते काय?

ही गझल दोन व्यक्तिचित्र रेखाटते. गझलेतला एक माणूस आहे ज्याने बेहिशेबी, बेतहाशा, उधळून टाकणारं प्रेम केलंय…आणि दुसरी व्यक्तिरेखा आहे त्या प्रेमाचा संपूर्ण अनादर केलाय…यातल्या फसवल्या गेलेल्या, वंचना पदरी पडलेल्या माणसाचं मनोगत म्हणजे क़तील शिफाई यांची ही गझल.
ही गझल थोडी गैरमुसलसलही आहे. मागे सांगितल्याप्रमाणे सलग एकच विषय, आशय धरून लिहलेली गझल म्हणजे मुसलसल गझल आणि विषय किंवा आशयाच्या दृष्टीनं गझलेतल्या शेरांमध्ये भिन्नता असेल तर ती गैरमुसलसल गझल.

‘बढ़ा के प्यास मेरी उसने हाथ छोड दिया’ यामध्ये सूचक दोन अर्थ आहेत. श्लेष आहे…एक संदर्भ आहे प्रणयाचा आणि दुसरा आहे नात्याचा…सोबतीची सवय ही सगळ्यात घातक सवय..ही सवय लावून अचानक कोणीतरी जेव्हा तुम्हाला मधेच सोडून जातं तेव्हाची जी व्याकुळता असते ती भयंकर असते. ती कधीच कोणाच्या वाटयाला न येवो…
या शेरमधली दुसरी ओळ खूपच गोड...वो कर रहा था मुरव्वत भी, दिल्लगी की तरह..तो औपचारिकता ही मोठ्या प्रेमाने करत होता. त्याचं औपचारिक वागणंही असं भासवणारं होतं की, जणू तो प्रेमातच आहे. आणि आम्ही त्याला प्रेम समजून बसलो..आणि फसलो..

अत्यंत लोकप्रिय शायर आणि गीतकार क़तील शिफाई यांची ही गझल. ते पाकिस्तानी शायर असले तरी भारतातही त्यांची लोकप्रियता होती. जगजीत सिंग यांनी त्यांच्या गझलांवर ‘माईलस्टोन’ नावाचा एक अख्खा अल्बम काढलाय. हा अख्खा अल्बमच खूप मेलोडियस झालाय. एक से बढ़कर एक अशा गझला आहेत त्यात. प्रेम आणि दु:ख यावर क़तील यांनी खूप लिहिलं. आपल्या व्यक्तिगत जीवनातही ते वारंवार प्रेमात पडायचे. कधी पूर्तता तर कधी अपूर्णता. अपूर्णतेतून शायरी आली असावी. प्रसिद्ध गायिका इक़बाल बानो यांच्यासोबतच्या त्यांच्या प्रेमाची चर्चा तर एकेकाळी खूपच रंगली होती.  गोष्ट लग्नापर्यंत गोष्ट येऊन ठेपली होती. क़तील हे सोप्या भाषेत, आम आदमीला समजेल अशा भाषेत लिहिणारे शायर आहेत. सुरेख विरोधाभास त्यांच्या शायरीत सहज उतरतो.

रात के सन्नाटे में हमने क्या क्या धोके खाये है,
अपना ही जब दिल धडका तो हम समझे वो आये है..

किंवा

दिल को ग़म ए हयात गवारा है इन दिनो
पहले जो दर्द था, वही चारा है इन दिनो

ज़र्रे (अतिशय छोटा कण, अणू) को आंधियों का, सहारा है इन दिनो..

आपल्या सदमा तो है मुझे भी या गझलेत ते प्रेमातल्या प्रतिस्पर्ध्याला, उर्दूत त्याला रक़िब म्हणतात, सल्ला देतात.

ले मेरे तजुर्बो से सबक़, ऐ मेरे रक़िब
दो-चार साल उम्र में, तुझ से बड़ा हूँ मैं…

किया है प्यार जिसे ही गझल मेहंदी हसन, गुलाम अली आणि जगजीत-चित्रा या तिघांनीही गायली आहे. चाल अर्थातच वेगवेगळी आहे. पण मला मनापासून जगजीत सिंग यांची कंपोझिशन आवडली. अत्यंत मेलोडियस चाल जगजीत यांनी या गझलला दिलीय. या गझलेत सुरवातीची गिटार आणि त्यामागोमाग येणारी सतार व बासरी जरूर ऐका. ओपनिंग गिटार ही सिग्नेचर आहे. त्यानंतर शेरमध्ये पार्श्वसंगीतात वापरलेला सॅक्सोफोन गझलेतली उदासी सुंदर करतो. यात तो रोमॅंटिक न वाटता दयाळू वाटतो.

चित्राजींच्या प्रत्येक शेरआधी येणारी बासरीही सुरेख..शेवटची ‘हमने ज़िंदगी की तरह’ ही दोघांनी मिळून घेतलेली तिहाई सुंदरच…soothing अशी चाल आहे. कलाकृती जेवढे जास्त लोक रिलेट करू शकतील तेवढी ती लोकप्रिय आणि मोठी. त्या कसोटीवर ही गझल कदाचित सगळेच लोक रिलेट करू शकतील. जवळच्या नात्यांमधून जेव्हा वंचना,अपेक्षाभंग वा फसवणुकीचं दु:ख वाटयाला येईल तेव्हा क़तील यांची शायरी तुम्हाला सहारा ठरू शकते…पण ही वेळच तुमच्यावर येऊ नये..कोणाचं वाक्य आहे माहित नाही…पण May you.. attract someone who speaks your language so you don’t have to spend a lifetime translating your soul…या शुभेच्छांसह..!

किया है प्यार जिसे हम ने ज़िंदगी की तरह
वो आश्ना भी मिला हम से अजनबी की तरह
किसे ख़बर थी बढ़ेगी कुछ और तारीकी
छुपेगा वो किसी बदली में चाँदनी की तरह
बढ़ा के प्यास मेरी उस ने हाथ छोड़ दिया
वो कर रहा था मुरव्वत भी दिल-लगी की तरह
सितम तो ये है कि वो भी न बन सका अपना
क़ुबूल हम ने किए जिस के ग़म ख़ुशी की तरह
कभी न सोचा था हम ने ‘क़तील’ उस के लिए
करेगा हम पे सितम वो भी हर किसी की तरह

-क़तील शिफाई

(लेखिका वसुंधरा काशिकर या Transform skill enhancers private limited च्या संचालक, स्तंभलेखक, भाषाविषयक सल्लागार  व निवेदिका आहेत)

[email protected]

Previous articleत्यागाने एकाकीपणाची भूक मिटते काय?
Next articleमाहिती व मनोरंजनाच्या भडीमारातून मेंदूत ‘ट्रॅफिक जॅम’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.