कुंती-माद्री: सत्व आणि सावली

महाभारतातल्या स्त्रिया- भाग चार
………………………………..

-मिथिला सुभाष

कुंतीबद्दल लिहिणं सोपं नाहीये. तिचं व्यक्तिमत्व केवळ विशाल नाही, विराट होतं. दिसायला सर्वसाधारण, शरीराने मजबूत, खूपशी पुरुषीच. पण संपूर्ण स्त्री म्हणावी अशी.
शारीरिक सौंदर्य, स्त्रीसुलभ नाजुकपणा वजा करून स्त्री ‘संपूर्ण’ असू शकते? नाही, त्याही काळात हे असं जगावेगळं सौंदर्य समाजाला मान्य नव्हतं, म्हणूनच तर तिच्या उरावर भीष्माने माद्रीला आणलं.

कुंती समंजस होती. आई म्हणून जागरूक होती. राज्य मिळवण्याच्या आपाधापीत आपली पाच मुलं एकत्र राहणं आवश्यक आहे हे उमगल्यावर तिने धोरणीपणे द्रौपदीला पाचांची पत्नी बनवलं. पाची पोरग्यांना पुढे घालून हिने त्यांना आयुष्यभर मॉनिटर केलं. कायम मन मारलं. मुलांची शक्ती बनून राहिली. पण खरी कुंती कळते महाभारतातल्या दोनतीन घटनांत.

पहिली घटना: स्त्री समागम केला तर मृत्यू ओढवेल असा शाप असल्यामुळे पंडू आपल्या दोन्ही पत्नींना घेऊन वनात राहात होता. तिथे एक दिवस झऱ्यात आंघोळ करणाऱ्या माद्रीला पाहून त्याचा संयम सुटतो, तो माद्रीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा मृत्यू ओढवतो. हे कळल्यावर कुंतीने माद्रीवर जे काही तोंड सोडलं, ते वाचून अंगावर शहारा येतो.. तिचा मुख्य रोख, माद्रीला पतीसुख मिळालं आणि आपल्याला ते मिळत नाहीये, हाच होता! आपल्या आयुष्यातला रखरखाट बोलून दाखवतांना, तिने माद्रीला इतका कमीपणा दिला की माद्री मेलेल्या नवऱ्याचं डोकं मांडीवर घेऊन सती गेली.. त्यानंतर मात्र कुंतीने नकुल-सहदेव या माद्रीच्या लेकरांशी कधीही दुजाभाव दाखवला नाही. हे तंतोतंत मानवी वागणं आहे.

दुसरी घटना: ती एका समारंभात तरुण कर्णाला पाहते. त्याची कवच-कुंडले बघून तिला आठवते की आपल्याला कुंवारपाणी झालेला, आपण घाबरून नदीत सोडलेला हाच आपला मोठा मुलगा! त्यावेळची तिची घुसमट मुळात वाचण्यासारखी आहे.. पण लगेच, कट टू.. आणखी एक प्रसंग, युद्ध सुरु झालंय, कृष्ण आपल्या या आत्याला सांगतो की कर्णाकडे जा. तू त्याची आई आहेस हे त्याला सांग आणि त्याने अर्जुनाला मारू नये असं वचन घेऊन ये त्याच्याकडून. कुंती ते करते. कर्ण खचतो. तिने मागितलेले वचन तिला देतो. कुठे ती कर्णाला पाहून व्याकुळ होणारी कुंती आणि कुठे ही कुंती? हे पूर्णपणे मानवी वागणं. अनेकदा आपण माणसं आपलं मन मारून, ‘जगण्याचं धोरण’ सांभाळतो, कारण त्यामुळे कुटुंबाचा तोल सांभाळला जाणार असतो. त्यावेळी आपल्या मनाची किती घालमेल होतेय हे कुटुंबाला कळत नाही. तशीच वागली कुंती. आणि अखेर अर्जुन जिवंत राहिला, कर्ण मेला. पिंडदान करतांना मात्र तिने युधिष्ठिराला सांगितलं की कर्णाच्या नावाने तर्पण कर, तो तुमचा मोठा भाऊ होता! त्यानंतर युधिष्ठिराने समस्त स्त्री जातीला श्राप दिला की यापुढे स्त्रिया कुठलेही रहस्य लपवून ठेऊ शकणार नाहीत. खरंच, किती काय-काय दडवून ठेवलं होतं या कुंतीने मनात!

(मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या. मी ज्या बाईबद्दल लेख लिहीत असते, तिच्याशी संबंधित जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याच लिहिते. नाहीतर मला संपूर्ण महाभारत सांगावे लागेल. कुंतीला कर्णाने दिलेल्या वचनात एक खोच होती, पण त्याचा कुंतीशी काही संबंध नाहीये!)

तर अशी ही कुंती. यादव कुळातल्या राजा शूरसेनाला एक मुलगा आणि एक मुलगी होते. मुलगा वसुदेव (कृष्णाचे वडील) आणि मुलगी पृथा. पण बालपणीच महाराज कुंतीभोज याने पृथाला दत्तक घेतलं आणि ती ‘कुंती’ झाली. ही कृष्णाची आत्या. पांडव आणि कृष्ण आते-मामे भावंडं.

हे सुद्धा नक्की वाचा – गांधारी..तिचं चुकलंच..!! पण ती अजाण होती..!!https://bit.ly/3aFk3Nw

दुर्वास ऋषी एकदा कुंतीभोजाकडे साधना करायला आले. त्यांना अजिबात न बोलणारी सेविका हवी होती. कुंतीची पाठवणी दुर्वासाच्या कुटीत झाली. साधना पूर्ण झाल्यावर तिच्या सेवेने प्रसन्न झालेल्या दुर्वासाने तिला स्वत: सिद्ध केलेले पाच मंत्र दिले. त्या मंत्राच्या उच्चाराने कुंती सहा देवांना बोलावू शकत होती. त्या मंत्रामुळे ते देव तिच्याशी समागम करून तिला पुत्रप्राप्ती करून द्यायला बांधील असणार होते. तापट माणूस कधी-कधी बिनडोकपणे वागतो त्यातला हा नमुना. तेरा-चौदा वर्षाच्या कुमारिकेला असले भन्नाट मंत्र कशाला द्यायचे? झालं, दुर्वास निघून गेल्यावर कुंतीने सूर्याला पाचारण केलं आणि यथावकाश तिला नैसर्गिक कवच-कुंडले ल्यालेला कर्ण झाला. कुमारी माता! तिने घाबरून त्याला एका टोपलीत घालून गंगेत वाहवून दिले. तो एका अधिरथ नावाच्या सूताला मिळाला आणि त्याचा मुलगा म्हणूनच वाढला. सूत म्हणजे सारथी.

कुंतीच्या चार आणि माद्रीच्या दोन मुलांच्या जन्माबद्दल एस.एल. भैरप्पा यांनी ‘पर्व’मधे  केलेले भाष्य अगदीच वेगळे आहे. ते मला पूर्णत: मान्य असलं तरी ‘महाभारतातल्या स्त्रिया’ ही लेखमाला लिहितांना मी व्यासरचित महाभारताचाच विचार करायचा असं ठरवल्यामुळे व्यासांनी जे लिहिलं त्याच्याच सावलीत मी राहतेय.

कुंतीचं आणि पंडूचं लग्न झालं ते तिच्या स्वयंवरात. थोडी बोजड शरीराची आणि फारशी सुंदर नसलेल्या कुंतीने पंडूला वरले. पंडूला एक देखणी बायको असावी म्हणून भीष्माने मद्रदेशाची राजकन्या बरेचसे वधूमूल्य देऊन पंडूची दुसरी बायको म्हणून आणली. पंडूने एकदा शिकार करत असतांना, मृगरूपात समागम करणाऱ्या किंदम ऋषीला बाण मारला. त्याने मरतांना पंडूला शाप दिला की तू स्त्री-समागम केलास तर मृत्युमुखी पडशील! झालं, पंडूवर सक्तीचे ब्रम्हचर्य आले.

कुंतीबद्दल पुढे खूप लिहायचे आहे. तिच्या तेजात माद्री झाकोळून जाण्याआधी तिच्याबद्दल लिहिते. या मुलीच्या आयुष्याची अक्षरश: धूळधाण झाली. पंडू-कुंती विवाह झाल्यावर, पंडूला एक सौंदर्यवती पत्नी असावी, पण तिने बुद्धिमान, धोरणी कुंतीसमोर नेहमी दबून राहावे या धूर्त विचाराने भीष्माने थेट मद्रदेशात जाऊन माद्री आणली. आर्यांच्या लग्नात भरपूर वरदक्षिणा दिली जायची. त्यामुळे वधू नाक वर करून सासरी यायची. मद्रदेशात वधूमूल्य द्यावे लागायचे. म्हणजे नवरी विकत आणायची. भीष्म म्हणजे हस्तिनापुराचा बिग बॉस! एकवेळ राजेमहाराजे परवडले, पण किंगमेकर्सचे तोरे त्रासदायक असतात. भीष्म तसा होता. वरवर देखावा मात्र कुटुंबकल्याण करत असल्याचा, म्हणजे फोडावर पुटकुळी! त्याने गाडाभर सुवर्णमुद्रा, रत्ने, घोडे, गाई, गुरे, उंची वस्त्रे, आभूषणे, मौल्यवान अत्तरे, मसाले देऊन माद्रीला पंडूसाठी विकत घेतले. तिला आणि तिच्या भावाला घेऊन किंगमेकर हस्तिनापुरी आले. लग्नात माद्रीच्या भावाला कळले की आपल्या बहिणीचा नवरा पंडूरोग झालेला रुग्णाईत आहे. लग्न लागल्यावर माद्रीला कळले की आपल्याला आधीच एक सवत आहे. तिने लग्नात रग्गड वरदक्षिणा आणली आहे, आपण विकत आलेलो. माद्री तिथेच खचली. पण काही बोलणे शक्यच नव्हते. हाच, खूप दूर देशातून नवरी विकत आणून लग्न लावण्याचा प्रयोग काही वर्षेच आधी भीष्माने केला होता, गांधारी-धृतराष्ट्र लग्नाच्या वेळी.

हे सुद्धा नक्की वाचा –अंबा..!! पुरुषप्रधान समाजाचा बळी..!!-https://bit.ly/2Jzxy5j 

पंडूचा दोघींशी संसार सुरु झाला. पण कुंतीने कधीही माद्रीला मान उचलू दिली नाही. कुंती शहाणी होती. तिने कधीही स्पष्ट छळ केला नाही. पण सतत माद्रीला याच फीलिंगमधे ठेवलं की तू विकत आणलेली बायको आहेस, औक़ातीत राहायचं. त्यामुळे माद्री कायम मापातच राहिली. पंडूला मिळालेल्या शापामुळे तो दोघींना घेऊन हिमालयाच्या पायथ्याशी वनात राहायला गेला. तिथे कुंतीने तिला दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरदानाबद्दल सांगितलं. पंडूने तिला यमधर्म, वायूदेव आणि इंद्राला पाचारण करून पुत्रप्राप्ती करून घेण्याचा आदेश दिला. कुंतीला तीन वर्षात तीन मुलगे, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन झाले. नवऱ्याच्या नजरेत तिची किंमत वाढली. तिने त्याच्या राज्याला एक सोडून तीन युवराज दिले होते. माद्री मुकाट्याने कुंतीची बाळंतपणं करत होती. पंडूला स्त्रीसंग मज्जाव असल्यामुळे कुंतीने तिला नवऱ्याच्या नजरेसमोर देखील न येण्याची सक्त ताक़ीद दिली होती. कुंतीकडे आणखी एक मंत्र होता. पंडूचा आग्रह सुरु होता की आणखी एक पुत्र होऊन जाऊ दे. आता मात्र माद्रीचा धीर सुटला. तिने कुंतीसमोर पदर पसरला. शेवटचा मंत्र मला द्या ताई, मलाही मातृत्व मिळू दे. कुंती लागोपाठच्या बाळंतपणांनी जेरीस आली होती. माद्रीला उपकृत करण्याची ही संधी तिने घेतली आणि मंत्र तिला शिकवला. ‘आपल्याला तीन मुलगे आहेत, हिला एक होईल,’ हा विचार होता. माद्रीला सासरी किंमत नसली तरी ती मूळची हुशार होती. तिने त्या एकाच मंत्राने ‘अश्विनीकुमार’ या देवांच्या वैद्यबंधूंना पाचारण केले. म्हणजे एका मंत्रात दोघांशी संभोग! कुंतीचा जळफळाट झाला. तिच्या आयुष्यात यमधर्म, वायू आणि इंद्रदेव वाऱ्याच्या झुळकीसारखे येऊन ती गर्भवती होईपर्यंत रानात थांबले होते. शरीरसुखासाठी कुंती तडफडत होती आणि माद्रीच्या कुटीत आलटून-पालटून अश्विनकुमार बंधू जात राहिले. यथावकाश माद्रीला गर्भधारणा झाली. अश्विनकुमार निघून गेले. माद्रीला तिच्यासारखे देखणे नकुल-सहदेव झाले. आपल्या थोराड मुलांकडे बघून कुंती उसासे सोडायची. आणि त्याच सुमारास पंडूने झऱ्याकाठी आंघोळ करणाऱ्या माद्रीला पाहिले आणि त्याचा संयम सुटला.. तो तिच्या शरीराशी झटू लागला आणि त्याचा मृत्यू ओढवला.

आपल्याला हेच दिसलं की माद्री त्या संसारात दबलेली होती. पण नाही हो, कुंतीला माद्रीच्या सौंदर्याचा भयंकर कॉम्प्लेक्स होता. त्यात तिला झालेले जुळे आणि काहीच वेळ, अर्धवट का होईना तिला मिळालेला पतीचा सहवास. कुंतीचा तोल सुटला आणि ती माद्रीला अद्वातद्वा बोलली. तिच्या सौंदर्याला शाप दिले, तिच्यावर पतीहत्त्येचे आरोप लावले. माद्रीने खालमानेने सगळं ऐकलं. तिच्या लक्षात आलं की आता या कुटुंबात आपले निभणार नाही. ती चितेवर चढली, आणि पंडूचं कलेवर मांडीवर घेऊन सती गेली. अक्षरश: माती झाली तिच्या आयुष्याची. चौदाव्या वर्षी लग्न करून वधू झालेली माद्री त्या राजपरिवारात सतत जळत राहिली आणि सव्वीस, सत्ताविसाव्या वर्षी दोन मुलगे सवतीच्या स्वाधीन करून चितेच्या ज्वाळेत विलीन झाली. माहेर पारखं झालेलं, सासरी शून्य किंमत आणि थोरामोठ्या घरची कुंती, सवत म्हणून डोक्यावर बसलेली. माद्रीला कसलेही सुख भरभरून मिळाले नाही. कुंती निदान वैभवशाली राज्याची राजमाता तरी झाली, माद्रीच्या नशिबात तर सगळा रखरखाटच. ती सुटली!

कोणाला दोष द्यायचा? मला तर दोघींना पोटाशी घ्यावेसे वाटते!!

हे सुद्धा नक्की वाचा –मत्स्यगंधा..! योजनगंधा..!! सत्यवती..!!https://bit.ly/2UYhJKI

कुंतीचे आयुष्य लहानपणापासून नेहमी सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर राहिले. पंडू मेल्यावर, त्याच्यासह माद्रीची राख झाल्यावर, कपाळावरचे शोभेचे कुंकू पुसून, पाच मुलगे घेऊन कुंती हस्तिनापुरी आली. तोपर्यंत गांधारीला भीमाच्या बरोबरीचा दुर्योधनादी शंभर मुलगे झालेले होते. एका गर्भखंडातून शंभर मुलगे वगैरे ‘जादूचे प्रयोग’ आहेत, पण त्याविषयी काही बोलायचं नाही हे आपलं ठरलेलं आहे. कुंती प्रकाशाच्या त्या तिरीपेसारखी आहे जी मोकळी वाट मिळाल्यावर वळचणीला देखील प्रकाशित करते. बहुतेक कुटुंबात अशी एखादी स्त्री असते जी त्या कुटुंबाचा कणा असते, कुटुंबासाठी जिने आपल्या इच्छाआकांक्षांचा बळी दिलेला असतो. जी कुटुंबाची मार्गदर्शक असते पण जिला व्यक्ती म्हणून घरात फारशी किंमत नसते. कुंती तशी होती. पूर्ण मानवी गुणांनी परिपूर्ण. देवत्वाचा लवलेश नसलेली. पण राव, माणूस म्हणजे तरी कोण असतो? भरकटलेला देवच ना? तेवढे देवत्व कुंतीच्या स्वभावात देखील होते. तीही स्खलित होऊ शकेल अशी मानवीच होती. पण आपल्या स्खलनशीलतेवर जो मनाचा अंकुश ठेऊ शकतो तो देवमाणूस. मला कुंती देवमाणूस वाटते.

तिचा अंत फार विचित्र झाला. महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारीसह ती वानप्रस्थाला गेली, तिथे रानात वणवा पेटला आणि तिघं संपले. आंधळेपणाने प्रेम करणारा बाप आणि नादानपणे डोळे मिटून घेतलेली घरची स्त्री असेच संपतात. पण कुंती?? तिनेही जळून मरावं?? आयुष्यभर मनाने जळली आणि शेवटी सरणावर चढवण्याआधीच जळून गेली, तेवढा देखील त्रास दिला नाही कुणाला!!

[email protected]

               

Previous articleचंद्र आणि मंगळवारीचा दिवस आता दूर नाही!
Next articleआमराया: आता उरल्या आठवणी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here