कुछ दर्द कलेजे से लगाने के लिए हैं…

सफल प्रेमाच्या असफल गोष्टी-४

– सानिया भालेराव

तो तिची वाट पाहत होता. आज कित्येक वर्षांनी तो तिला भेटणार होता. मध्ये किती वर्ष सरून गेली त्याने क्षणभर हिशोब मांडला. १७ वर्ष! केवढा मोठा काळ. तिचं आपल्यावर प्रेम आहे हे तो जाणून होता तेव्हाही आणि आत्ताही. पण तेंव्हा त्याला तिच्याबद्दल फार काही विशेष वाटलं नाही आणि नाती ही गरजेने बनतात असं त्याला नेहेमी वाटायचं. एकदिवस तिची गरज संपली आणि लग्न करून तो आपलं आयुष्य जगू लागला. मधल्या काळात खरंतर तिची फारशी आठवण त्याला आली नाही. पण मग हळूहळू खऱ्या जोडीदाराची गरज वाटायला लागली त्याला. पुन्हा ती आठवली. आणि आज ती त्याला भेटायला येणार होती.

तिने दाटल्या गळ्याने त्या दोघांचा फोटो पहिला.महताब आलम चा शेर आठवला तिला.

दिल भी तोड़ा तो सलीक़े से न तोड़ा तुम ने
बेवफ़ाई के भी आदाब हुआ करते हैं

कितीही वाटलं तरी तिला काही केल्या रडायला येईचना. काही वेळेला मन दुःखाने इतकं भरून जातं ना की डोळ्यात पाणीही येत नाही. जणू काही ते दुःख अश्रूही शोषून घेतात. एक क्षणभर तिची नजर त्याच्या चेहेऱ्यावर रेंगाळली. भारदस्त कपाळ, कोरीव भुवया, ह्रदयाचा ठाव घेणारे त्याचे डोळे. तरतरीत नाक आणि विलक्षण रेखीव ओठ. एखाद्या पुरुषाने किती देखणं असावं? तिने त्याच्या फोटोवरून हळुवार हात फिरवला. तो तिच्याबरोबर किती आनंदी दिसत होता. लक्षमीनारायणाचा जोडा असं कित्येक लोकं म्हणाली होती त्या दोघांना बघून. तिला जायचं होतं त्याच्या लग्नाला पण ती तेवढा धीर नाही एकटवू शकली. फार एकटं वाटत होतं तिला. रात्रभर रडून उशी ओली केली होती तिने. वेळ सगळ्या जखमांवरचं औषध आहे म्हणतात. पण काही जखमा कधीच भरून येत नाहीत. वरकरणी त्या भरल्या सारख्या वाटतात पण आत त्या भळभळून वाहत राहतात. मग मग हळूहळू त्या जखमेची, ठसठशीची सवय होऊन जाते. अगदी आपलीशी वाटायला लागते ती जखम. तीच आपली सोबतीण बनते. तसंच काहीसं झालं तिचं. तिचा मित्र परिवार म्हणत राहिला तू विसरशील त्याला, दुसरा मिळेल तुला जोडीदार पण झालं उलटंच. तीच प्रेम आटलं नाहीच. ते बहरत राहिलं. तिच्या मनात त्याची जागा इतकी पक्की होती कि कोणी दुसरा तिथे येऊच शकला नाही.

तो शेर आहे ना …मीर तक़ी मीर चा…. तसंच काहीसं!
बेवफ़ाई पे तेरी जी है फ़िदा
क़हर होता जो बा-वफ़ा होता

तिला त्याच्याकडून कुठलीच अपेक्षा नव्हती. अगदी त्याने तिच्याशी बोलावं इतकीही नाही. तो त्याच्या आयुष्यात, कामात मश्गुल होता. त्याला तिचा विसर कधीच पडला होता. बायको, पोरं ह्यातच रममाण होता. शेवटी नाती गरजेवर अवलंबून असतात असं तो म्हणायचा हे त्याने खरं करून दाखवलं होतं. गरज असेपर्यंत ती होती, गरज संपली की तीची आठवण सुद्धा गायब. याउलट ती मात्र त्याच्यावर प्रेम करत राहिली. तिला जेव्हा तिची मैत्रीण ह्यावरून हिणवायची तेंव्हा ती म्हणायची अगं, त्याच्यावर प्रेम करणं ही माझी गरज आहे असं समज. तू कसं श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही …तसं तो श्वास आहे माझा.

एखादा पुरुष स्त्री च्या मनावर अधिराज्य कसं काय गाजवू शकेल इतकं? तिलाही आश्चर्य वाटायचं सुरवातीला. ती स्वतःशीच खूप झगडली. कितीही प्रयत्न केला तरी तो तिच्या मनातून जाईचना. तो किती चुकीचं वागला, तिच्या प्रेमाची त्याने कशी कदर नाही केली आणि अशा कितीतरी गोष्टी तिने आपल्या मनाला समजावल्या. पण व्यर्थ! शेवटी हार मानली तिने. त्याने तिची जोडीदार म्हणून निवड नाही केली म्हणून तिचं त्याच्यावरचं प्रेम कमी होणार नव्हतं. एवढं होऊनही तो सुखी राहावा हेच तिला वाटायचं.

तकलीफ़ मिट गई मगर एहसास रह गया
ख़ुश हूँ कि कुछ न कुछ तो मिरे पास रह गया

खूप वर्ष सरली. तिने तिच्या एकटेपणाशी हातमिळवणी केली होती. प्रेम होतंच सोबतीला. बहरत गेली ती. असंच एकदिवस फोन आला. उचलता क्षणी त्याच्या श्वासावरून तिने ओळखलं त्याला. म्हणाला, तुला भेटायचं आहे. तुझं प्रेम नाही समजू शकलो मी. पण आता उमजलंय. भेटीची वेळ ठरली. ती तयार झाली, पोहोचली आणि दुरूनच त्याला डोळेभरून पाहून घेतलं तिने. डोळ्यात प्राण आणून तिची वाट बघत होता तो . तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं होतं. ते थांबवायचा प्रयत्न देखील केला नाही तिने. झटकन परत फिरली आणि चालू लागली. घरी आली. त्याचा फोटो उराशी धरला आणि मनसोक्त रडून घेतलं तिने.तिचं प्रेम कदाचित समजलं होतं त्याला. पण आता उशीर झाला होता.

देर तक मिल के रोते रहे राह में
उन से बढ़ता हुआ फ़ासला और मैं …… ताबिश मेहदी

एव्हाना त्याला कळून चुकलं होतं तिचं न येणं.प्रत्येका गोष्टीची एक वेळ असते. ती वेळ साधली नाही तर अगदी बेशकिमती नाती, माणसं सुद्धा हातातून निसटून जातात. हताश मनाने त्याने परतीची वाट धरली. खूप काही तरी मौल्यवान आपण गमावून बसलो आहोत ह्याची जाणीव त्याला अस्वस्थ करत होती. आत कुठेतरी खोल जखम झालीये असं जाणवत होतं .आता त्याला सुद्धा आयुष्यभर जगायचं होतं ह्या जखमेबरोबर.

अब ये भी नहीं ठीक कि हर दर्द मिटा दें
कुछ दर्द कलेजे से लगाने के लिए हैं…
– जाँ निसार अख़्तर

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

……………………………………………………………………………………………………

हे सुद्धा नक्की वाचा –

बे-मोहब्बत ख़ुदा नहीं मिलता….  http://bit.ly/2DpsbCS

दिल धडकने का सबब याद आया   http://bit.ly/2D28ktu     

कुछ लोग बिखर कर भी तमाशा नहीं होते   http://bit.ly/2X9YRIa

 

Previous articleनवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे
Next articleकाँग्रेसाध्यक्ष जवाहरलाल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here