कुमारपंथ

गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ता
..
मराठीपणाचे सर्व बंध आणि गंड झुगारून सध्‍याच्‍या काळात राष्‍ट्रीय प्रभावळीत स्‍थान निर्माण करू शकणा-या महाराष्‍ट्रातील काही मोजक्‍या महानुभावांत कुमार केतकर यांचं नाव आघाडीवर राहील. मनाचा अमर्याद मोकळेपणा, विरोधी मताचा आदर, जगण्‍याच्‍या अनेक अंगांना स्‍पर्श करणारी बुद्धी आणि इंग्रजी तसंच मराठी या दोन्‍ही भाषांतली सहजशैली ही त्‍यांची महत्त्वाची वैशिष्‍ट्य सांगता येतील. मराठी माणूस, त्‍यातही मध्‍यमवर्गीय वातावरणातला असेल, तर अमराठी उच्‍च मध्‍यमवर्गीय वातावरणात तो बराचसा बुजतो. कुमार केतकर याला सन्‍माननीय अपवाद. द इकॉनॉमिक टाइम्‍स, ऑब्‍झर्वर ऑफ बिझिनेस अँड पॉलिटिक्‍स, महाराष्‍ट्र टाइम्‍स आणि लोकसत्ता व्‍हाया अनेक चळवळी, ग्रंथाली, सार्क संघटना,काही परदेशी विद्यापीठं इत्‍यादी अशी दैदीप्‍यमान आणि निष्‍कलंक, समृद्ध वाटचाल केतकरांची झालेली आहे. भारताची स्‍वातंत्र्यचळवळ, लोकमान्‍य टिळक यांच्‍या विचारसरणीतलं डावेपण, स्‍वातंत्र्योत्तर कामगार चळवळ, इंदिरा गांधी यांचा उदय आणि त्‍या काळाची अपरिहार्यता म्‍हणून लादली गेलेली आणीबाणी . . . ज्‍याचं ठाम समर्थन करण्‍याचं धारिष्‍ट्य ते करतात. इथपासून ते १९९१ नंतरचं आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाची अनिवार्यता एवढ्या मोठ्या अवकाशात केतकर लीलया संचार करतात.
..
आधुनिक मराठी विद्वानांत मनाचा मोकळेपणा हा फार मोठा गुण अभावानेच आढळतो. अनुभव असा की चार विद्वान एकत्र जमले तर तिथे हजर नसलेल्‍या पाचव्‍या विषयी फार चांगलं ऐकायला मिळत नाही. कुमार केतकर याला शंभर टक्‍के अपवाद आहेत. कोणाच्‍याही पाठीमागून कधीही कोणाविषयीही वाईट बोलताना त्‍यांना कोणी ऐकलं असण्‍याची सुतराम शक्‍यता नाही. एरवी मराठी विद्वान आपल्‍या विरोधात मत व्‍यक्‍त करणा-याविषयी तितकासा सहिष्‍णू असतोच असं नाही. किंबहुना तो तसा नसण्‍याची शक्‍यताच जास्‍त. पण याही बाबतीत कुमार केतकर हे मोठे अपवाद आहेत. त्‍याचमुळे कॉंग्रेसचा बुद्धीपुरस्‍सर पुरस्‍कार करत असताना कडव्‍या संघीयांशी किंवा डाव्‍यांशी त्‍यांची मैत्री राहू शकते. आपल्‍या विरोधी मताचा तो आपला विरोधक असला संकुचित विचार त्‍यांनी कधी केला नाही.
..
पत्रकारितेत त्‍यातही राजकीय पत्रकारितेत इतकी वर्ष काढल्‍यानंतर राजकारणाविषयी त्‍यांची जाण उत्तम आहे, हे सांगण्‍यात हशील नाही. ती त्‍यांच्‍या पदाची मूलभूत गरज झाली. पण एरवी राजकीय पत्रकारांना ज्‍या विषयात सुतराम गती नसते, त्‍या विषयी लिहिताना केतकर यांची लेखणी राजकीय विश्‍लेषण करतांना जितकी उत्तम चालते त्‍यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं चालते. आईनस्‍टाईनचा सापेक्षतावाद, विश्‍वाच्‍या निर्मितीचं गूढ, माहिती तंत्रज्ञानाचा वाढता पसारा, विज्ञानाच्‍या सर्वव्‍यापी प्रगतीनं होणारी सामाजिक आर्थिक परिणाम यावर केतकर जे लिहितात ते नुसतं रोचकच नसतं तर भविष्‍यवेधीही असतं. या संदर्भात राजीव गांधी आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी आणलेल्‍या संगणक, दूरसंचार क्रांतीचं उदाहरण देता येईल. ज्‍या वेळी अनेक इंग्रजी पत्रपंडितही या संगणक क्रांतीवर टीकेचे आसूड ओढण्‍यात धन्‍यता मानत होते त्‍यावेळी त्‍यांच्‍या मताची पर्वा न करता केतकरांनी त्‍या सगळ्याची अपरिहार्यता मांडली होती.
..
मराठी प्रसारमाध्‍यमांत वैश्विक भान फार अभावानं आढळतं. गड्या आपला गाव बरा . . . ही मराठी वृत्ती माध्‍यमांतूनही डोकं वर काढते. हल्‍ली तर ही माध्‍यमं राजकारण्‍यांपेक्षा राजनिष्‍ठ पद्धतीनं मराठी मराठी करतांना दिसतात. केतकर यांनी कटाक्षानं या मर्यादांचा स्‍पर्श स्‍वतःला होऊ दिलेला नाही. स्‍थानिक विषयांवरही लिहितांना त्‍यांचं जगाचं भान कधी सुटत नाही. त्‍यामुळेच त्‍यांच्‍या वैचारिक लिखाणात आणि मांडणीत एक प्रगल्‍भता आढळते. अनेक आंतरराष्‍ट्रीय वृत्तसंस्‍था, नियतकालिकं यांच्‍या कार्यालयात भारताविषयीचे भाष्‍यकार म्‍हणून केतकर यांचे दूरध्‍वनी क्रमांक, हाताशी असतात याचं कारण हे आहे. द न्‍यूयॉर्कर या भारदस्‍त नियतकालिकाचा संपादक डेव्हिड रॅम्निक, सुकेतू मेहता सारखा लेखक आदि मंडळींना संदर्भासाठी आधार लागतो तो कुमार केतकर यांचा ते यामुळेच. १९९८ साली मे महिन्‍यात भारतान दुसरी मोठी अणुचाचणी केली त्‍यावेळी बीबीसीनं सातत्‍यानं केतकर यांच्‍याकडून अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या सरकारची या मागची भूमिका समजावून घेतली होती. बीबीसीच्‍या लंडन कार्यालयात केतकर यांच्‍या मुलाखतीच्‍या किमान पन्नासभर तरी ध्‍वनीफिती प्रस्‍तुत लेखकाने पाहिलेल्‍या आहेत.
..
या माणसाचं आणखी एक वैशिष्‍ट्य नमूद करणं आवश्‍यक आहे. ते म्‍हणजे आधुनिक मराठी पत्रकारितेत केतकर यांना मानणारा, त्‍यांच्‍या गुणवैशिष्‍ट्यांची छाप पडलेला असा एक पंथ तयार झाला आहे. उदारमतवाद आणि बुद्धिप्रामाण्‍य हे या पंथाचं व्‍यवच्‍छेदक लक्षण. अशा लक्षणांनी युक्‍त अनेक कुमारपंथीय आज प्रसारमाध्‍यमांत अनेक ठिकाणी आढळतील. ज्‍या व्‍यवसायानं त्‍यांना मानमरातब आणि कीर्ती दिली त्‍या व्‍यवसायाची केतकर यांनी केलेली ही कृतज्ञ परतफेड.
..
गिरीश कुबेर

Previous articleसंभाजीराजांची हत्त्या आणि गुढी पाडवा !
Next articleशेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच फलित
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.