४० वर्षांचा विजनवास…महान छायाचित्रकार केकी मूस यांची चटका लावणारी कहाणी

– निशिकांत भालेराव

क्वारंटाइन ,आयसोलेशन आणि लॉकडॉऊन अगदीच कंटाळवाणे झालेय ११५ दिवसापासून.असेच काही कारणामुळे दोन वेळा क्वारंटाइन झालो होतो.एक वेगळीच अनुभूती आणि संताप…संताप.मग विचार केला कसे राहत असतील लोक एकटे कोंडून घेऊन.अचानक आठवले वाचलेले…  जगात सर्वात अधिक काळ विजनवासात म्हणा वा सक्तीच्या एकांतवासात राहिला तो कुख्यात खुनी थॉमस एडवर्ड सिल्वरस्टीन.३८ वर्षे एका विशिष्ठ कोठडीत कोलोराडो जेलमध्ये तो पूर्ण एकांतवासात होता म्हणे.

तसा क्वारंटाइनचा इतिहास पहिला तर अमेरिकेत १८७८ मध्ये  विविध संसर्गजन्य रोगाच्या काळात ज्या बोटी बंदरावर येत तेव्हा त्यांना सक्तीने ४० दिवस अडकवून ठेवले जाई,आणि नंतर नांगर टाकण्याचा परवाना मिळत असे. अगदी १४ व्या शतकातही प्लेगच्या साथीत जहाजांना क्वारनटाईन केले जाई.पुढे अनेक देशांनी साथीच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्वारनटाईन कायदे केले.आपल्याकडे अनेक कारागृहात क्वारंटाइन कोठड्या आहेत आणीबाणीत १९ महिने सर्वपक्षीय नेते क्वारंटाइनमध्ये राहिले होते.पण काही म्हणा कोरोना काळातील ही शिक्षा तशी सुन्न आणि खिन्न करणारीच आहे.पण तरीही जिद्दीने अनेकजण एकांतात समाधानाने राहतात आणि त्यांच्याकडे पाहूनच मला या लॉकडॉऊनचे आता फार काही वाटत नाही.

१९८७ मध्ये मराठवाडा दैनिकात वार्ताहार असताना मुस्लीम मनाचा कानोसा समजून घेण्यासाठी मी ‘औरंगाबाद टाईम्स’ या उर्दू दैनिकात नेमाने जात असे.मालक खुसरो ,वार्ताहर हाफिज ,तहसीन काही माहिती देत.तिथे एक गृहस्थ शांतपणे उर्दू लिहित असलेले दिसायचे.हाफिजने ओळख करून दिली. इनसे मिलीये, “ये हैं जनाब कमर इक्बाल साब’. मी म्हणालो शायर? ते म्हणालो हा कर लेता हुं कभी कबार. मग बऱ्यापैकी भेटी झाल्या,मनात कोणतीतरी सल जळत ठेऊन ते बोलायचे.फार मोठा आणि ताकदीचा शायर  पण चीज झाले नाही. ghost writting आणि संपादनाचे काही पैसे मिळायचे. पण नाव नाही.कमरभाई यांची एक गझल मला फार आवडते.सगळ्याच एकाकी माणसांवर त्यांनी ती लिहिली असे वाटत राहते.

युंहि कैद हम हुये कि – हवा को तरस गये
अपने हि कान – अपनी सदा को तरस गये
खाली जो अपना जिस्म – लहू से हुआ ‘कमर’
कितने हि हाथ रंगे – हीना को तरस गये !

शायराना अंदाजमधील तरसणे,विजनवास जाऊ द्या,मी ४० वर्षे स्वेछेने लॉकडॉऊन करून घेऊनसुद्धा तसूभरही आपल्या महान कामापासून दूर न झालेल्या एका मनस्वी अवलियाला १९८८ मध्ये भेटलोय . कोरोनाच्या लॉकडॉऊनमध्ये तोच माझी प्रेरणा ठरला.

केकी मूस असे त्यांचे नाव.चाळीसगावसारख्या एका बकाल गावात एका मोठ्या वाड्यात किमान ४० वर्षे या माणसाने घराचा उंबरठासुद्धा ओलांडला नाही.मी जेव्हा त्यांना वाड्याच्या बाहेर येऊन मला पोज देण्याचा आग्रह केला तेव्हा जगातील या महान छायाचित्रकाराने मंद हसत वाड्याच्या विकेड गेटवर रेलून छानसा फोटो मला काढू दिला.१९८८ मध्ये पेन्टाक्स कॅमेरा होता माझ्याकडे आणि मी स्वत: कृष्णधवल छायाचित्रे धूत असे.मला कल्पना नव्हती की जगातील एक महान फोटोग्राफर नवशिक्या माणसाला अशी पोज देतोय.वाड्याबाहेरच्या विकेडगेट वर रेलून लेन्समध्ये त्यांनी पाहिल्यानेच हा फोटो उत्तम आला.हाच फोटो  पूर्ण लॉकडॉऊनच्या काळात माझ्यात काही आशा निर्माण करत होता.

खरे म्हणजे स्वतः के.कैखुसुरू माणिकजी मूस तथा केकी यांचे ४० वर्षे एकांतवासात गेले. Royal Photoraphic Society of Grate Britain मधून शिक्षण, लंडन येथून कलेची पदवी घेऊन १९४० च्या सुमारास हा पारशी तरुण मुंबईत आला. पैशाच्या मागे लागणारे वाडवडिलांचे उद्योग त्याला करायचे नव्हते. घरच्यांना त्याचे वागणे पसंत नव्हतेच. त्याच्या वडिलांचा  चाळीसगावला रेल्वे स्टेशन बाहेर एक वाडा होता. चाळीसगावातच सोडावॉटर  फॅक्टरी होती आणि देशी दारूचे एक दुकानही होते. केकी मूस हे  १९४८ मध्ये चाळीसगावला आले आणि तिथेच त्यांनी रमवून घेतले. असे सांगितले जाते की, मुंबईत त्यांचे प्रेम जमले होते . त्यांची प्रेयसी मुंबईत लग्न करण्यास घाबरत होती.’तू चाळीसगावला जाऊन राहा मी काही दिवसांनी पंजाब मेलने तिथे पोहोचते’. या तिच्या प्रेमवचनावर विसंबून हा गडी चाळीसगावला आला . ते १९५० मधील चाळीसगावच्या  स्टेशनजवळील एका वाड्याला “रीब्रांट रिट्रीट’ असे नाव देतो,ही भारतीय कला विश्वात फार मोठी घटना मानायला पाहिजे. रीब्रांट हा १६२५ ते ६० या काळातील जागतिक कला क्षेत्रातील दादा माणूस होता.उत्तम पेंटर , प्रिंटमेकर आणि ड्राफ्टसमन होता.The Jewish Bride/Return of Prodigal/ Self Portait ही त्याची चित्रे मैलाचे दगड मानले जातात. केकीवर रिब्रांटचा प्रभाव होता.

आता असा माणूस चाळीसगावला त्याकाळात आला हे विलक्षण म्हटले पाहिजे.मी १९८८ मध्ये औरंगाबादच्या हौशी फोटोग्राफर्ससह चाळीसगाव मुक्कामी असताना केकी यांना भेटलो.त्यांच्या वाड्यात घुसलोच म्हणा.तिथे जाईपर्यंत त्यांच्याविषयी फार जुजबी माहिती होती . प्रत्यक्षात वाड्याचे रुपांतर केकी यांनी एका कलादालनात केले होते.भेटलो तेव्हा केकी उतारवयात होते.३१ डिसेंबर ८९ ला केकी आपली फोटो फ्रेम सोडून गेले. १९८० नंतर केकी यांना त्यांच्या कलादालनाचा पसारा आवाक्यात आणता आला नाही. एकतर ते अखेरपर्यंत उपेक्षित राहिले, आणि दुसरे ऐन उमेदीच्या काळात स्वतःला त्यांनी लॉकडॉउन करून घेतले.वर जो उल्लेख केलाय त्यांच्या कथित प्रेयसीचा…तिच्यामुळे त्यांनी स्वत:ला कोंडून घेतल्याचे सांगितले जाते.रोज रात्री १ वाजता पंजाब मेल चाळीसगाव जंक्शन वर थांबायची. त्यामधून कबूल केल्याप्रमाणे ‘ती’ इथे येईल, असे त्यांना अखेरपर्यंत वाटत राहिले .पण ती का नाही आली ?,त्यांच्या कलेची प्रेरणा कोण? असे कित्येक प्रश्न केकी यांनी अनुत्तरीतच ठेवले.

त्यांच्या कलादालनात मी स्वतः सात-आठ हजार कलाकृती इकडे तिकडे लावलेल्या. पडलेल्या पाहिल्या. तेव्हा त्यांना विचारले होते,  ‘हे असे का ?’ त्यावर त्यांच्याकडून उत्तर नाही आले .केकी यांचे वैशिष्ट्य म्हणजे टेबलटॉप फोटोग्राफी.देशातील या कला प्रकारचे ते जनकच मानले पाहिजे.आपण बाहेर पडणार नाही आणि तरी आपल्याला बाहेरचा एखाद्या दृश्याचा आभास निर्माण करून त्यावर नियंत्रित प्रकाश टाकून सजीव छायाचित्र निर्माण करायचे आणि त्यासाठी विविध कागद,ओरिगामी कलाप्रकाराच्या निर्मितीतून त्यांनी देखण्या कलाकृती निर्माण केल्या. हे सगळे मोडेल्स, पुत्ठा ,Wood Carvings,Claymodels यांचा वापर आणि ते कसे शूट करायचे, हे त्यांनी सहजपणे आम्हाला दाखवले. जगातला नामांकित कलाकार आपल्याला हे समजून सांगतोय याची जाणीव तेव्हा झाली नाही. ५ हजारापेक्षा जास्त कलाकृती त्यांनी निर्माण केल्या आहेत.फेक फोटोग्राफी १९५०-६० मध्ये त्यांनी केली होती. त्याचे अनेक गमतीदार नमुने तिथे होते.नूरजहान,जहांगीर,शेक्सपियर,बाबा आमटे,शंकरराव देव,सानेगुरुजी,जयप्रकाश नारायण,पंडित नेहरू यांची अप्रतिम चित्रे त्यांनी बनवली.विशेष म्हणजे ही सारी मंडळी केकी यांना भेटायला चाळीसगावला आली होती. या मान्यवरांनी  वेळ देऊन केकीच्या कुंचल्यातून,लेन्समधून स्वतःला साकारून घेतले. पंडित नेहरू यांनी तर रेल्वेने येऊन ती थांबवून(जंक्शन असल्याने गाड्या ४० मिनिटे थांबत)केकी यांची भेट घेतली होती.विनोबा भावे हे स्टेशनवरून इकडे येण्यास तयार नव्हते आणि केकी घर न सोडण्याचा पण करून बसलेले. शेवटी केकी ४० वर्षात एकदाच बाहेर पडले ते विनोबा यांचेसाठी. एवढे करूनही  विनोबांनी या महान छायाचित्रकाराला फोटो नाही काढू दिला.या सगळ्या गोष्टी १९८८ च्या भेटीनंतर चाळीसगावातील जुन्या मंडळीनी मला सांगितल्या.

घरात कोंडून घेऊन त्यांची कलासाधना चालूच होती.अनेक आंतरराष्ट्रीय छायाचित्र आणि कला प्रदर्शनात ते कलाकृती पाठवत राहिले. त्यांना जवळपास ३०० नामंकित पुरस्कार मिळालेत मात्र त्याची सूचना देणारी जी पत्रे त्यांना येत,  ती त्यांनी उघडून सुद्धा पहिली नाहीत.त्यांच्या मृत्यूनंतर ती उघडण्यात आली तेव्हा १९६० ते ८५ पर्यंत त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचे रहस्य उलगडले.काही संस्थानी मात्र त्यांना घरी येऊन गौरविले होते.अनेक वर्षे केकी यांनी एक खानसामा ठेवला होता.तो त्यांना खाना बनवून देई,पुढे १९८० नंतर त्यांना चक्क एका खानावळीतून डब्बा येत असे.त्यांनी पाळलेल्या टोनी कुत्र्याने त्यांची साथ सोडल्यावर आधीच एकाकी असलेले केकी खंतावत गेले .नाही म्हणायला महाराष्ट्र सरकारने १९८३ मध्ये life and sketch of keki हा ग्रंथ प्रकशित केला.केकीने कित्येक हजार विविध भाषेतील निवडक पुस्तके,काही वाद्ये,पाशिमात्य आणि शास्त्रीय संगीताच्या तबकड्या जमा केल्या होत्या.उस्ताद दिन मोहम्मद खान यांच्याकडून त्यांनी सतार वादन शिकून घेतले.अशा या हरहुन्नरी कलाकाराने मृत्यूपूर्वी केकी मूस आर्ट ट्रस्ट स्थापन करून सर्व अधिकारट्रस्टला दिले. १९०७ साली बांधलेला देखणा वाडासुद्धा ट्रस्टकडेच आहे.

जळगावच्या कलेक्टर रुबल अग्रवाल यांनी मूस यांच्या स्मारकासाठी  प्रयत्न केले होते. पण शासन दरबारी प्रस्ताव तसेच पडून राहिले. विनोद तावडे एकदा भेट देऊन गेले होते.जवळपास १५००० हजार चित्रे-छायाचित्रे मूस यांची आहेत.त्याचे मूल्य आणि दुर्मिळता लक्षात घेऊन सरकारने काही हालचाल केली पाहिजे. कमलाकर सामंत हे केकी मूस कलादालनाचे काम पाहतात. ‘केकींचा हा अनमोल खजिना सांभाळणे आम्हाला शक्य नाही .त्याचे चाळीसगावात जतन होऊ शकत नाही.’,असे अलीकडेच त्यांचे म्हणणे वाचनात आले होते. केकी यांचा हा ठेवा कसा काय जतन करायचा, हा प्रश्न लाज वाटावा असाच आहे.नेहरू,जेपी,लोहिया,अत्रे,वसंत देसाई,ना.सी.फडके यांच्यासारखी मंडळी केकीकडे येऊन जात आणि आपले सांस्कृतिक दायित्व दाखवत असतं. सरकार मात्र कोणाचेही असो, काहीच करत नाही, हे संतापजनक आहे. ‘When I Shed my tears हे केकी यांचे आत्मचरित्र हस्तलिखित तिथेच अजून पडले आहे, अशी माहिती मध्ये मिळाली होती.एका महान छायाचित्रकाराविषयीची ही अनास्था अस्वस्थ करणारी आहे .

(लेखक जेष्ठय पत्रकार आहेत)

[email protected]

नक्की पाहा-केकी मूस यांच्यावरील documentary

Previous articleसंतपीठाचं ग्रहण खरंच सुटेल ?
Next articleलशीचा जुमला, चमत्काराचा मामला…कोरोनाच्या नावानं मोठ्यांनं बोंबला
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

3 COMMENTS

 1. प्रा.जी व्ही साळी फैजपुर 425503 (से नि)/ ललित कला केंद्र,चोपडा जि. जळगांव

  चाळीसगांव ला 💝 प्रेम विरहाचा 40 वर्षा चा विजनवास …….

  खिरोदा जि. जळगांव येथे BFA पहिल्या बॅच ला वर्ष 1984 ला प्रवेशीत असतांना प्रा. तांबटकर सर यांचे समवेत भटकंती च्या निमित्याने चाळीसगांव ला मा.के की मूस साहेब यांचेशी प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्या वेळी तेथील कलाकृती,टेबल टॉप फोटोग्राफी,बघता आली.हा आमच्या साठी मूस साहेबा सोबतचा सुवर्णक्षण होता .तेथील कलात्मक वातावरण, रेल्वे स्टेशन जवळील टुमदार बंगला छानच आहे. अतल्प साधन सामुग्रीत कलाकृती साकारणे एक आव्हानच होते त्या काळी
  के की चे ते देखणे भारदस्त गोरेपान तेजस्वी रूप आम्ही बऱ्याच वेळ बघतच राहिलो.
  प्रेयशी साठी शेवटच्या क्षणा पर्यंत वाट बघणे …..
  मन सुन्न करून जाते. अश्या थोर विभूतीस सलाम या सुवर्ण भेटीला निमित्य ठरले ते सर्वांचे लाडके प्रा.तांबटकर सर

 2. कहर आणि अत्यंत अनभिज्ञ अशी घटना. या हरहुन्नरी कलाकाराचे जगणे ऐकून स्तब्ध होऊन गेलो. अशी निस्तब्धता फार कमी वेळा मी अनुभवली आहे. या व्यक्तीच्या जीवनात असलेल्या त्या प्रेयसीची सुद्धा कहानी पुढे यायला हवी.आणि तिची अगतिकता ही किंवा तिच्या समोरच्या अडचणी या प्रकाशात यायला हव्यात. कारण तिच्या विरहा मध्ये इतका महान कलाकार अशा पद्धतीने आपली कला पुढे नेत राहिला ते प्रेरणास्थान जगाच्या पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे. या कलाकाराला मनस्वी लाखो सलाम……..

 3. कलाकार गेल्या नन्तरच्या कला कथा.
  van gogh, केकी मुस ,गायतोंडे आता अनेक कलावंत कोरोना काळात कला आणि असे अनेक कलाकार घटका मोजत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here