लशीचा जुमला, चमत्काराचा मामला…कोरोनाच्या नावानं मोठ्यांनं बोंबला

-ज्ञानेश महाराव

—————————

 रेल्वे बेचो सस्तेमे

 तेल भेजो मेहंगेमे

 जनता के लिए,जो आपदा है

 वो साहब के लिए,अवसर है

    या वास्तवाचं दर्शन घडवणाया देश कारभाऱ्यांच्या व्यवहारातील ‘अवसर’ म्हणजे ‘संधी’ ! चीनने सीमेवर तणाव निर्माण केल्याने तिथल्या जवानांच्या जीविताकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय. अशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना डावलून लडाख-लेह वरच्या भारतीय लष्कराच्या छावणीत अचानक गेले आणि ‘या भेटीतून जवानांचा आत्मविश्वास वाढल्याची’ बातमी ‘मीडिया’तून झळकवण्याची संधी साधली. जवान जेव्हा लष्कराच्या सेवेत दाखल होतात, तेव्हा त्यांच्यात देशरक्षणासाठीचा ‘तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक’ हा निश्चयी बाणा निरंतर जागवणारा आत्मविश्वास खच्चून असतो. त्याला जागवण्यासाठी “भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे,” असल्या उसन्या आत्मविश्वासाची गरज नसते. तथापि, देशाचे मंत्री-प्रधानमंत्री म्हटल्यावर आवश्यक ते सोपस्कार करावेच लागतात. ते लेह-लडाख भेटीत पार पाडताना, नरेंद्र मोदी यांनी आपली ५६ इंचांची छाती दाखवण्याची संधी सोडली नाही. तिथल्या भाषणात त्यांनी चीनच्या साम्राज्य विस्ताराच्या भूमिकेवर हल्ला केला. तो योग्यच होता. तथापि, नरेंद्र मोदी हे आधी ‘स्वयंसेवक’ आणि नंतर ‘प्रधानसेवक’ आहेत. “अखंड हिंदुस्तान” हे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’चे स्वप्न आहे. ते संघ  परिवाराने देशाच्या फाळणीची भळभळती जखम तब्बल ७५ वर्षें उरात वाहत ठेवत जपून ठेवलंय. ते स्वप्न साकार करण्याची संधी पाकिस्तानने १७ महिन्यांपूर्वी पुलवामा  दहशतवादी हल्ल्यात ४१ भारतीय जवान ‘शहीद’ करून आणि आता चीनने लडाखच्या गलवान खोऱ्यात घुसखोरी करताना २० जवानांना ‘शहीद’ करून दिली होती. तरीही नरेंद्र मोदी “अखंड हिंदुस्थान”च्या दिशेने पाऊल का टाकत नाहीत? ते पाऊल  ‘चिनी ॲप’च्या बंदीतच का घुटमळतंय?

      या आणि अशा प्रश्नांचा मारा टाळण्यासाठी ‘कोरोना’वरच्या भारतीय लस निर्मितीची पुडी सोडण्यात आली. त्यांच्या लोकार्पणासाठी १५ ऑगस्टचा मुहूर्तही ठरवण्यात आला. तथापि, हा ‘उतावीळ नवरा, गुडघ्याला बाशिंग’ सारखा प्रकार ‘मोदी सरकार’ला २४ तासांत गुंडाळावा लागला. ‘कोरोना – व्हायरस’ ही जागतिक महामारी आहे. त्यावर उपाय-लस शोधण्याचा प्रयत्न हा जागतिक स्तरावर केला जातोय. त्यासाठी सर्व देशातील ‘मेडिकल सायन्स’चे संशोधक, वैज्ञानिक आपल्याकडे असलेली माहिती एकमेकांना सांगत-पुरवत संशोधनाचे काम करीत आहेत. यासाठी त्यांना ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'(WHO) आवश्यक ती मदत पुरवत आहे. विशेष म्हणजे, ‘कोरोना’चा उदय चीनमध्ये झाला; तसंच त्याच्या बंदोबस्ताच्या संशोधनाला सुरुवातही चीनमधूनच झालीय. यातून ‘कोरोना- व्हायरस’ चा स्पष्ट झालेला ‘जीनोम’ (जनुकीय रचना) चीनने जगजाहीर केलीय. परिणामी, ‘कोरोना’वरच्या लस संशोधनाला गती मिळालीय. संशोधनाचे ४-६ महिने कमी झालेत. अमेरिका व युरोप देशांत सुरू असलेलं संशोधन एव्हाना चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यावर आलंय. भारतही त्याला अपवाद नाही. कारण भारतात सुरू असलेले ‘कोरोना-मुक्त’ लसीचे संशोधन हे चीनने जगजाहीर केलेल्या ‘जीनोम’वरच आधारित आहे. यातून लस तयार करण्यात भारतीय वैज्ञानिकांनी प्रथम यश मिळवलं, तर त्याचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. पण त्यासाठी लोकार्पणाचे सोहळे कशासाठी?

  ‘कोरोना-लस’ हे औषध आहे. ते जेव्हा सिद्ध होईल, तेव्हा तातडीने दिले पाहिजे.  त्यासाठी ‘लॉन्चिंग’ची वा स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधून दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून घोषणा करण्याची गरज नाही. तथापि, या ‘बाबा रामदेव छाप’ प्रकाराला  ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (ICMR) वेळीच चाप लावलाय. हैदराबाद येथील ‘भारत बायोटेक कंपनी’ आणि पुण्यातील ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ एकत्रितपणे ‘कोरोना’ वरील लस विकसित करीत आहेत. या लशीचे संशोधन अजून पूर्ण झालेले नाही. या लशीच्या मानवी चाचणीला ICMR ने परवानगी दिली असून, त्याची सुरुवात दिल्लीतील १२ रुग्णालयांत ७ जुलैपासून सुरू होईल. ही चाचणी प्राधान्याने केली जावी, असा आदेश ICMRने संबंधित रुग्णालयांना दिलाय. या आदेशपत्रात, ही लस १५ ऑगस्ट रोजी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असल्याचे म्हटले आहे.

     तथापि, “२०२० या वर्षात ‘कोरोना’वर लस येणे शक्य नाही,”असे हैदराबादच्या ‘सेंटर फॉर सेल्युलर ॲंड मॉलिक्युलर बायॉलॉजी’ या संस्थेचे संचालक राकेश मिश्रा सांगतात. “लशीच्या चाचण्यांबाबत घाई करण्यासाठी जे आदेश-पत्र निघाले, ते ICMR च्या अंतर्गत वादातून निघाले असावे!”असेही राकेश मिश्रा यांचे म्हणणे आहे. हा सर्वच सरकारी संस्थात असलेल्या ‘भक्त मंडळीं’च्या चढाओढीचा अतिरेकही असू शकतो. कारण, सगळ्या चाचण्या पुस्तकी आदर्शानुसार पार पडल्या तरी, लस येण्यास अजून सहा महिने जावे लागतील, हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे ‘१५ ऑगस्टचा जुमला’ वेळीच ‘१५ लाखांचा’ झाला. हे बरेच झाले ! अशा जुमल्याचा साक्षात्कार वेळीच झाल्यास फसवणूक टळते.

      ‘कोरोना’सारख्या महामारीतही ‘टाळ्या- थाळ्या वाजवा’, ‘दिवे लावा’,  ‘आत्मनिर्भर व्हा’, अशा जुमलेबाजीचा साक्षात्कार प्रधानमंत्री घडवत असताना ; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी “जगाला कोरोना मुक्त करणारा चमत्कार दाखव,” असं साकडे विठुरायाला कशासाठी घातलं ?

    यंदा ‘आषाढी एकादशी’ची वारी झाली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक पंढरपुरात जाऊन विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय पूजा केली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या वतीने विठुरायाला हे चमत्कारिक ‘साकडे’ घातलं. ‘पंढरीचा विठोबा’ हा उद्धवजींचं श्रद्धास्थान असणाऱ्या जागृत एकवीरा, प्रभादेवीचा सिद्धिविनायक, लालबागचा राजा-गणपती, पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणेश आदि सारखा नवसाला पावणारा किंवा शिर्डीच्या साईबाबा सारखा चमत्कार घडवणारा देव नाही. पंढरीचा विठोबा हा ‘शक्ती-भक्ती’चा संगम घडवणारा “लोकदेव” आहे.‌ तिथे चमत्कारला थारा नाही. तशी काही शक्ती विठोबा ठायी असती तर, भक्तांचे वर्षानुवर्ष डोळ्यादेखत शोषण करणाऱ्या बडव्यांना लाथा घालून कधीच आडवे केले असते.

     ‘माणसातला देव शोधा, त्याची सेवा करा,’ असे संतांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करणारा हा विठोबा आहे. म्हणूनच खोट्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, चमत्कार या विरोधात मर्मभेदक लिहिणारे ‘राष्ट्रीय संत’ तुकडोजी महाराज “ग्राम गीता”मधून चमत्काराबाबत सांगतात –

 चमत्काराच्या भरी भरोनी |

 झाली अनेकांची धूळधाणी ||

 चमत्कार यापुढे कोणी |

 नका वर्णू सज्जन हो ||

   ‘कोरोना’चं संकट हे वैज्ञानिकांच्या अथक मेहनतीने बनणाऱ्या लशीतून दूर होणार आहे. तोपर्यंत स्वच्छता आणि डॉक्टरांच्या योग्य उपायांनीच लोकांचे जीव वाचणार आहेत. हे उद्धव ठाकरे यांना चांगलेच ठाऊक आहे. म्हणूनच ते ‘मास्क’ लावून फिरतात. सिद्धिविनायकाचा अंगारा वा एकवीरा आईची हळद लावून फिरत नाहीत. त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद चमत्काराने वा प्रारब्धात होतं, म्हणून मिळालेलं नाही. त्यासाठी प्रयत्न केले म्हणून मिळाले आहे. ‘कोरोना हटाव’साठीही असे कठोर प्रयत्न पाहिजेत. हे प्रयत्न कसे असावेत, याविषयी तुकडोजी महाराज लिहितात-

 प्रयत्न पाहिजेत चांगले।

 कर्त्या सज्जना पाहिजे पुसले॥

 लोभ प्रतिष्ठेसी,जे नाही भाळले।

 तेच खरे प्रयत्नशील॥१

 प्रयत्न अपुले सरस करावे।

 केले तरी करितचि रहावे॥

 थोडे उणे होऊ न द्यावे। प्रयत्नांमध्ये॥ २

    ‘कोरोना’च्या संकटाची तीव्रता कमी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे गेले चार महिने ‘राज्यकर्ता’ म्हणून अथक परिश्रम घेत आहेत. आरोग्य व इतर सरकारी यंत्रणांना आवश्यक ते बळ देत आहेत. तरीही अपेक्षित फळ मिळत नसेल, तर प्रयत्नांतील कमतरता भरून काढली पाहिजे. त्याऐवजी पांडुरंगाकडून चमत्काराची अपेक्षा कशासाठी करायची ?

      आपल्या कर्तव्य कर्मात देवाला कशासाठी आणावं, याचंही मार्गदर्शन संत तुकडोजींनी केलंय. ते असं-

 प्रयत्न करावे आपण।

 मिळवावे देवाचे थोरपण॥

 अंगी येईल अहंकार म्हणोन।

 देव मध्यस्थी घालावा॥

   अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांच्याकडून ठेवता येत नाही. कारण ते ‘विष्णूचे अवतार’ म्हणून ‘ऑलरेडी’ घोषित झालेत. म्हणूनच त्यांच्याकडून होणाऱ्या चमत्कारासाठी ‘कोरोना’ चे संकट हेही ‘अवसर’ ठरलंय.

शाहू विचाराने गोमूत्रवाल्यांचे शुद्धीकरण

मानव हीच एक जात । आहे जगतात

हा शाहूराजांचा विचार । ठेवा ध्यानात –

अशी शाहिरी खूणगाठ असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांची जयंती (२६ जून) नुकतीच राज्यात व इतरत्र साजरी झाली. तशी ती कोल्हापूरच्या दसरा चौकात असलेल्या ‘मुस्लीम बोर्डिंग’मध्येही झाली. सर्व समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिकता यावे, या उद्देशाने  शाहूराजांनी आपल्या संस्थानात ही ‘मोफत वसतिगृह’ सुरू केली होती. त्याच उद्देशाने ती आजही सुरू आहेत. त्यांपैकी हे मुस्लीम वसतिगृह. तिथे शाहू जयंतीचा कार्यक्रम झाला. शाहूराजांचा फोटो खुर्चीवर ठेवला होता. त्या फोटोला ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे माजी नगरसेवक *आदिल फरास* यांनी हार घातला आणि आपल्या सहकाऱ्यांसह फोटो काढला. काही वेळातच हा फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाला. त्या फोटोतील सर्वांच्या पायांत चपला असल्याने आदिल फरास यांना ‘ट्रोल’ करणे सुरू झाले. हे आदिल फरास यांच्या लक्षात येताच, त्यांनी माफी मागितली आणि चुकीबद्दल आपण ३० जून रोजी ‘शाहू समाधी’पुढे “एक दिवसाचे आत्मक्लेष  उपोषण करणार” असल्याचे जाहीर केले.

     तसे त्यांनी केले. पण संध्याकाळी ते तिथून निघताच, ‘भाजप युवा मोर्चा’चे डझनभर कार्यकर्ते ‘शाहू समाधी’ स्थळी आले आणि त्यांनी आदिल फरास आत्मक्लेषास बसले होते, ती जागा गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली. हे शुद्धीकरण त्यांनी निश्चितच शाहू विचाराने केले नाही. आदिल फरास यांच्याऐवजी तिथे कुणी पाटील- कुलकर्णी आत्मक्लेषास बसले असते, तर हा वैचारिक उठवळपणा झालाच नसता. इतक्या कनवाळूपणे कांबळे-खंडागळेकडे पाहिले नसते.

      असा भेदाभेद शाहू विचार-कार्यात नाही. शाहूराजे ‘सत्यशोधक छत्रपती’ आणि ‘कृतिशील समाज सुधारक’ होते. कट्टर  समतावादी होते. आज शाहू महाराज असते, तर शुद्धीकरणाचा बेशुद्ध उद्योग करणाऱ्यांना प्रत्येकी ५० चाबकाच्या फटक्यांची आणि या तरुणांच्या डोक्यात धर्म-जातीभेदाचे विष घालून वापरणाऱ्यांना पन्हाळगडावरची सजा कोठी दाखवण्याची शिक्षा दिली असती. तथापि, या ‘शुद्धीकरण’वाल्या तरुणांनी शाहू-विचार समजून घ्यावा, यासाठी या कृत्याविरोधात सामाजिक कार्यकर्ता *अभिषेक मिठारी* यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. त्याला ऋषिकेश पाटील, सरदार पाटील, प्रभाकर पाटील,कल्याणी मानगावे, दीपक दळवी ह्या तरुणांची साथ मिळाली. ॲडव्होकेट रविराज बिर्जे यांचे मार्गदर्शन मिळाले. शाहू-विचारांचा आग्रह धरणाऱ्या तरुणाईची संख्या अशीच वाढती राहो !

अक्षर सम्राट : कमल शेडगे

टायपिंग, डीटीपी कम्पोझिंग, आणि आता  मोबाईल फोनवर बोलता क्षणी उमटणारी अक्षरे, परस्पर होणारे ‘स्पेल  करेक्शन’ यामुळे हस्ताक्षराला फारसे महत्त्व उरलेले नाही. अशा बदलातही *सुलेखनकार कमल शेडगे* यांचे नाव त्यांनी वयाची ऐंशी पार केली, तरी गाजत होतं. त्यांची ‘कमलाक्षरे’ रोज वृत्तपत्रांतून झळकत होती. ते मूळचे कोकणातले. धुरीवाडा गावचे. चित्रकलेची उपजत आवड. पण वडिलांप्रमाणे ते देखील मुंबईत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ दैनिकाच्या ‘कला विभागात’ नोकरीला लागले. ते इंग्रजीत काय लिहिले आहे, ते विचारून स्केचेस काढत. ती प्रभावी असत. ‘शीर्षकं’ म्हणजे ‘लेटरिंग’ही विषयाला साजेशी रेखाटत. या हातोटीनेच त्यांना ओळख आणि नाव मिळवून दिले. शेकडो पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांच्या अक्षरलेखनाने लक्षवेधी केली आहेत. पण त्यांची अक्षरे गेली ५० वर्षे झळकत राहिली, ती नाटकांच्या जाहिरातींतून !

      मोठ्या कष्टाने आणि खर्चाने नाट्यनिर्मिती होते. ती प्रत्यक्ष रंगभूमी सादर होण्याआधी जाहिरातीतून झळकते. वृत्तपत्रात मनोरंजनाच्या जाहिरातीचं पान-जागा ठरलेली असते. तिथल्या जाहिरातींच्या गर्दीत, मोजक्या जागेत नाटकाच्या नावासह इतर तपशीलही पाहणाऱ्याच्या नजरेत भरणे आणि त्यातून वाचकाला  त्या नाटकाचा प्रेक्षक व्हायला थिएटरपर्यंत आणणे, ही मोठी कसरत असते. ती कसरत कमल शेडगे नाटकाच्या नावातील अक्षरांना कधी वळणदार, तर कधी चित्रमय, तर कधी बोलके करीत हुकमी जिंकायचे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या ‘लेटरिंग’पासून (१९६२)सुरू झालेली  ही हुकमत अखेरपर्यंत टिकून होती. त्यांच्या या हातगुणाने हजारहून अधिक नाटकं रंगभूमीवर आली आणि गाजली. नामवंत दिवंगत नाट्यनिर्माते मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’ निर्मित सर्वच नाटकांचे ‘लोगो’ हे कमल शेडगे यांनी तयार केले होते.

      मोहन वाघ निर्मित ‘रंग उमलत्या मनाचे’ या नाटकाची कमल शेडगे यांनी तयार केलेली जाहिरात आठवते. तेव्हा ‘फुटबॉल : वर्ल्ड कप स्पर्धे’ची जोरदार हवा होती. ‘रंग उमलत्या मनाचे’ या अक्षरांतून त्यांनी ‘स्ट्रोक’च्या हलक्याशा फटकाऱ्यांतून आकाशाच्या दिशेने उंच उडालेला फुटबॉल अवघ्या पंधरा-वीस सेंटीमीटर उंचीच्या जाहिरातीत दाखवला होता. सोबत मोहन वाघ यांचे शब्द होते-“एवढ्या उंचीवर तुम्हाला घेऊन जाणारं नाटक!” ही उंची गाठणारी करामत अक्षरांना अर्थपूर्ण करणाऱ्या कमल शेडगे यांच्या अक्षरलेखनात होती.  याची साक्षच सोबतच्या फोटोतील तरुण नाट्य निर्माता राहुल भंडारे यांच्या ‘अथर्व थिएटर’ निर्मित नाटकांच्या ‘लोगो’तून मिळते. एका भेटीत ते म्हणाले,”नाटक असो वा पुस्तक, त्याच्या नावाच्या मांडणीतून  वाचक-प्रेक्षकांत त्याची ओढ निर्माण झाली पाहिजे. माझा तसा प्रयत्न असतो.” म्हणूनच बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा ‘लोगो’ बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता ‘ऐसी अक्षरे खेळवीन’ अशी हिम्मत दाखवणारा हा ‘अक्षर सम्राट’ होता. ते नुकतेच (४ जुलै) गेले. पण नवीन पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय  ठेवा ठेवून गेलेत. तो पाहण्यासाठी त्यांची “चित्राक्षरे” आणि ”कमलाक्षरे” ही  पुस्तकं नक्की वाचा, पाहा.

(लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत)

9322222145