केवळ प्रेम पुरेसं आहे…?

-वसुंधरा काशीकर

 (Warning- This is not a spoiler:)

“दिवसातून चारवेळा विनाकारण फोन वा मेसेज करायचे हे एखाद्या स्त्रीला अपेक्षित असेल तर तो पुरूष मी नव्हे’’ इति अश्विन

काही दिवस जातात. अश्विनकडे स्वयंपाक, स्वच्छता असं सर्व काम करणारी रत्ना तिच्या बहिणीच्या लग्नासाठी तीन दिवसाची सुटी घेऊन गावी जाते. अश्विनला रत्नाच्या नसण्याने घरात एक पोकळी जाणवते आहे. अश्विन फोन उचलतो आणि रत्नाला फोन करतो. तिकडे गावात फोनच्या स्किनवर अश्विनचं नाव पाहून रत्ना चकित. ‘हॅलो सर, कुछ काम था क्या? रत्ना.

‘नही. बस ऐसे ही फोन किया’- अश्विन…

अश्विन हरवलाय..पण रत्नामध्ये त्याला काही सापडतंय..

होणाऱ्या बायकोचं दुसरीकडेच अफेअर आहे…स्वाभाविकच त्यामुळे लग्न तुटलंय..त्या फसवणुकीनं तो अत्यंत व्यथित झाला आहे…अस्वस्थ झाला आहे…तो श्रीमंत आहे..न्यूयॉर्कहून परत आलाय, वडलांना व्यवसायात मदत करतोय…तो लिखाण करतो…अत्यंत हॅँडसम, उमदा, संवेदनशील आणि मितभाषी अश्विन!

दुसरीकडे लग्नानंतर चारच महिन्यात विधवा झालेली ती…गरिबीपोटी नाईलाजानं स्वप्न मारून लग्न करावं लागलं… नवरा लग्नाआघीच व्याधीग्रस्त होता ते लग्नानंतर कळलं..जे झालं ते झालं पण आता मात्र तीला शिवण शिकायचं आहे…फॅशन डिझायनर व्हायचं आहे..किडकिडीत..हडकुळी रत्ना!

रत्ना अश्विनकडे कामासाठी म्हणून राहायलाच येते. घरातल्याच मदतनीसांसाठी असलेल्या सर्व्हंट रुममध्ये राहते. रत्ना बहिणीच्या शिक्षणासाठी पैसे पाठवते. रत्नात एक चमक आहे, इमानदारीची, लढण्याची! आपलं आयुष्य बदलून टाकण्याची तीची असोशी विलक्षण आहे.

मनापासून आपलं काम करणारी रत्ना…तिच्याबद्दल अश्विनला अचानक काही जाणवतं…हे जाणवणं अर्निवचनीय आहे…या जाणवण्यात आस्था आहे…Companionship आहे…पोकळी भरून येणं आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे एक ‘उबदार’ कसलंही म्हणणं नसणारं, ‘अस्तित्व’ आहे…

अश्विनची रत्नाशी लग्न करण्याचीही तयारी आहे..त्याला सामाजिक प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील…Socio-economic status हा विचारही त्याच्या डोक्यात येत नाही…तो अगदी नैसर्गिक वागतो..सहज..खरा

विवेक गोंबेरने आणि तिलोत्तमा शोम दोघांचाही अभिनय…बस लाजवाब!

अँमेझॉनवरून रत्नासाठी सिंगरची शिवणकामाची मशिन अश्विन मागवतो आणि दोघं मिळून ती उघडतात तो क्षण…अगदी किंचित शरीराने जवळ आल्यावर येणारं अवघडलेपण…आणि त्यानंतर अश्विननं रत्नाला ‘चलो घुमने चलते है…’असं अगदी सहज म्हणणं…Hats off to screenplay writer and director…

चित्रपटाचा शेवट म्हणजे अगदी कविता आहे…हा संपूर्ण चित्रपट बघणे म्हणजे एक अप्रतीम कथा वाचण्याचा किंवा कविता ऐकण्याचा अनुभव आहे…

अश्विनचं आपल्या फॅशन डिझायनर मैत्रिणीला फोन करुन सांगणं की तू रत्नाला फोन कर आणि तीला फॅशन डिझायनिंग शिकव…हा प्रसंग हेच सांगतो…खरं प्रेम हे कधीच वांझोटं असू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीवर आपलं खरं प्रेम असेल तर तीला तीच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण मदत केल्याशिवाय राहणार नाही..खरं प्रेम तुम्हाला कधीही न्यूनत्वाची भावना देत नाही..आणि अशी भावना एखाद्या नात्यात येत असेल तर ते प्रेम नव्हे…

हा चित्रपट पाहल्यावर रिचर्ड गिअर आणि ज्युलिया रॉबर्ट्सच्या प्रीटी वूमनची आठवण आल्याशिवाय राहत नाही. थेट वर्गसंघर्ष दाखवलेला नसला तरी समाजातल्या दोन वर्गांमध्ये असलेली पराकोटीची विषमतेवर चित्रपट अप्रत्यक्ष भाष्य करतो.

नातं किती तरल असू शकतं..शब्द किती तोकडे असू शकतात, प्रेम हे किती पूर्णत्व देणारं, काळजी घेणारं असू शकतं, पुरूष किती डिग्नीफाईड, संवेदनशील असू शकतो…आणि प्रचंड अभाव असूनही आत्मसन्मानाची लखलखती असिधरा कशी तळपू शकते, असा अनेकांगी अनुभव हा चित्रपट पाहताना येतो….

या चित्रपटात खूप संवाद नाहीत, स्पर्शही नाही…आणि तरीही खूप उत्कट असं सतत जाणवणारं काहीतरी आहे. त्याचं श्रेय या सिनेमाच्या दिग्दर्शिकेला जातं. ती स्त्री असल्यानं कथा सांगण्याच्या, मांडण्याच्या तरलतेत निश्चितच प्रचंड फरक पडला आहे.

तुम्ही खूप अस्वस्थ असाल, व्याकूळ असाल, व्यग्र असाल तर जरूर जरूर जरूर हा चित्रपट पाहा…हा चित्रपट तुम्हाला भरलेपणाची भावना देईल..ठहराव देईल….आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रचंड शांतता देईल….

चित्रपट- Sir

दिग्दर्शक- रहीना गेरा (Rohena Gera)

प्रमुख भूमिका- विवेक गोंबेर, तिलोत्तमा शोम

ओटिटी प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स

(लेखिका उर्दू शायरीच्या अभ्यासक व नामवंत स्तंभलेखक आहेत)

[email protected]

Previous articleस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…
Next articleदार्जिलिंग :द टेस्ट ऑफ टी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here