केशवराव धोंडगे – ‘मन्याड’चा थकलेला वाघ !

-प्रवीण बर्दापूरकर    

जाणीव-नेणिव आणि स्मरण-विस्मरणाच्या सीमा रेषेवर असलेल्या वयोवृद्ध केशवराव धोंडगे यांची नुकतीच भेट झाली . महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणारे केशवराव धोंडगे यांचं वय १०५ आहे ; दस्तुरुखुद्द केशवराव आणि त्यांच्या कुटुंबियांचाही दावा आहे. मात्र , विधिमंडळाच्या सदस्य परिचय पुस्तिकेत त्यांची जन्म तारीख २५ जुलै १९२२ असल्याची नोंद आहे ; वयाचा वाद सोडून देऊ यात पण , आंध्रप्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकेकाळी वेधून घेतलेलं होतं यात शंकाच नाही .

केशवरावांचं व्यक्तिमत्त्व अस्सल मराठवाडी  ग्रामीण ढंगातलं . ते राजकारणात आले तेव्हा महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचा बोलबाला होता . याच पक्षाचे विधानसभा सदस्य म्हणून ते सहा वेळा आणि नांदेड लोकसभा मतदार संघातून एक वेळा विजयी झालेले आहेत .  ( आजच्या माध्यमांच्या भाषेत सांगायचं तर ते ‘विधानसभेचे आमदार’ होते .  विधिमंडळाचा सदस्य म्हणजेच आमदार आणि संसदेचा सदस्य म्हणजे खासदार असतो , हे आपल्या माध्यमांना जणू ठाऊक नाही . जर प्रकृतीनं ठणठणीत असते तर माध्यमांच्या या भाषक दारिद्रयाबद्दल केशवराव धोंडगे यांनी चांगलंच बोचकारुन काढलं असतं ! ) शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांची होती तशीच केशवराव धोंडगे यांचीही साम्यवाद , मार्क्सवाद एकाच वेळी श्रद्धा आहे . एकाचे वेळी महात्मा गांधी आणि क्रांतीवर श्रद्धा असणारा पाहण्यात आलेले केशवराव धोंडगे हे माझ्या पत्रकारीतेतले एकमेव राजकारणी आहेत !

मध्यम चणीचे , किचिंत गव्हाळ वर्णाचे आणि बंड केलेल्या म्हणजे विस्कटलेल्या डोईवरच्या केसांचे , धोतर आणि साधारण किचिंत ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता घातलेले , डोईवर टिळा लावलेले , असं केशवरावांचं व्यक्तिमत्त्व तब्बल तीन दशकं विधानसभेत गाजलं . खणखणीत आवाज , बोलण्याची बोचरी शैली , त्या शैलीला मराठवाडी बोलीची ‘भरजरी’ किनार आणि जे काही बोलायचं ते रोखठोक , असं केशवरावांचं वागणं असायचं .

शिवाय कुणी अंगावर आलं की शिंगावर घेतल्याशिवाय त्यांनी कुणालाच सोडलं नाही  . किती बोचरं आणि किती रोखठोक असावं तर त्याची एक आठवण सांगतो- केशवरावांचा वयाची शंभरी पार केल्याचा सत्कार ( बहुधा नांदेडला ) देशातले एक ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्या हस्ते झाला . तेव्हा शरद पवार यांची–‘शरदरावांची बारामती म्हणजे भानामती’, ‘माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल’, ‘नारदमुनीही पवारांची बरोबरी करु शकणार नाही’, ‘पवार म्हणजे बिन चिपळ्यांचे नारद’ , अशा इरसाल शब्दांत केशवरावांनी ‘स्तुती’ केली होती आणि पवारांनीही केशवरावांच्या म्हणण्याला भरभरुन दाद दिली . आलेल्या माणसाचं स्वागत उजव्या हाताच्या पालथ्या मुठीवर अत्तर लावून आणि समोरचा जास्तच जवळचा असेल तर त्याच्या भालप्रदेशाचा मुका घेऊन करायचं , हेही केशवरावांचं एक वैशिष्ट अनेकांना ठाऊक असेल , अनेकांना नाहीही . अत्तर लावून आणि प्रेमभरे मुका घेऊन स्वागत झालेले शरद पवार केशवरावांच्या या इरसालपणावर  तसंही काय बोलणार होते म्हणा ! छगन भुजबळांची मफलर सध्या राजकारणात एक सिंबॉल झाली आहे पण , आमदार असताना केशवराव धोंडगेही अनेकदा गळ्यात मफलर घालत आणि ती बहुधा प्लेन किंवा प्रिंटेड  लाल रंगाची असे . हा लाल रंग त्याची क्रांतीवर असणारी श्रद्धा दर्शवत असे .  थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मफलर संस्कृतीचे खरे जनक केशवराव धोंडगे आहेत .

पत्रकारितेतली माझी पिढी खरंच भाग्यवान होती . बहुसंख्य लोकप्रतिनिधी वर्तन आणि व्यवहारात साधे होते , धन संचय करण्याची वृत्ती त्यांच्यात नव्हती आणि जनतेच्या प्रश्नाबद्दल त्यांना डोहखोल तळमळ होती . याच  तळमळीपोटीच विधिमंडळात हे बहुसंख्य लोकप्रतिनिधी केवळ एक रुपयाची कपात सूचना मांडून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढत जनतेचे प्रश्न मांडत असत . शिवाय स्थगन प्रस्ताव आणि शून्य प्रहरातही सरकारची सालटी सोलण्याची एकही संधी तेव्हाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी कधीच सोडत नसत . विधिमंडळाचं अधिवेशन पूर्ण मुदतभर आणि अनेकदा तर रात्री  उशिरापर्यंत चालत असे . अधिवेशन सुरु होण्याआधीच ‘कामकाज चालू देणार नाही’ अशी सरकाराच्या सोयीची भूमिका घेणारे विरोधी पक्ष तेव्हा जन्मालाच यायचे होते  . त्यामुळे सभागृहाचं  कामकाज ‘उरकून’ टाकण्याची हिंमत सत्ताधारी पक्षाला मुळीच होत नसे कारण  विरोधी पक्षातील या बहुसंख्य सदस्यांचा नैतिक आणि सात्विक धाक सरकारला वाटत असे . ही मंडळी साधी होती म्हणजे किती साधी होती तर , ते चक्क एस टी महामंडळाच्या साध्या बसनं सर्वसामान्य माणसांसोबत प्रवास करत . ( तशाही तेव्हा वातानुकूलित बसेस आणि कार नव्हत्याच म्हणा . ) केशवराव धोंडगे ‘त्या’ जातकुळीचे लोकप्रतिनिधी म्हणून कायमच वावरले . या पार्श्वभूमीवर विद्यमान बहुसंख्य लोकप्रतिनिधी एकतर भोंगे वाजवतात , नाही तर चालीसा म्हणतात , नाही तर सत्ता लोभासाठी मुंबई ते सुरत-गुहाहाटी-गोवा-मुंबई असा प्रवास करताना दिसतात . अशा वेळी केशवराव धोंडगे आणि त्यांच्या पिढीच्या लोकप्रतिनिधींमधल्या तळमळ आणि  साधेपणाला  सलाम केल्याशिवाय पर्यायच उतरत नाही  .   .
या व्यतिरिक्त केशवराव धोंडगे यांचा  वाचन व्यासंगही भरपूर होता . ते एका साप्ताहिकाचं प्रकाशनही करत .  गुराखी साहित्य संमेलनासारखी एक वेगळी वाट त्यांची चोखाळली . वृत्तपत्र आणि ग्रंथ वाचनामुळे केशवरावांचं भाषण म्हणजे संदर्भाचा मसाला असे . खणखणीत आवाजात , चुरुचुरुपणे ते बोलत आणि प्रतिस्पर्ध्यांचे वाभाडे काढत . चौफेर वाचन , जीभेला धार आणि कष्टकरी तसंच तळागाळातल्या  जनतेशी जोडलेली नाळ , या मिलाफातून प्रसिद्धी मिळवण्याची विलक्षण हातोटीही  केशवराव धोंडगे यांनी प्राप्त केलेली होती . बोलण्याच्या या असोशीतून वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून केशवराव  स्वत:ला अनेकदा आवरु  शकले नाहीत .

महात्मा गांधी मिशन रुग्णालयात त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली . डिस्चार्ज मिळण्याआधी त्यांना भेटायला गेलो . रुग्णशय्येवर पडलेल्या केशवरावाचा आवाज याही वयात तेवढाच खणखणीत आहे  . या वयात ही शस्त्रक्रिया जोखमीची होती पण ते आव्हान महात्मा गांधी मिशनमधील डॉक्टरांनी यशस्वीपणे पेललं . शस्त्रक्रियेनंतर  प्रकृती सुधारली आणि केशवरावांनी त्यांच्या सवयीला साजेसं बंड , गावी जाण्यासाठी पुकारलं . बारा तास ते चक्क मौनात गेले . आरोग्यविषयक सर्व निकष योग्य पण , केशवराव मात्र मौनात . अखेर रात्री उशिरा मौनभंग करुन गावी जाण्याची आस त्यांनी व्यक्त केली . भाषेबद्दल केशवराव याही वयात किती आग्रही आहेत तर डिस्चार्जपूर्वी उपचारांबद्दल महात्मा गांधी मिशनच्या कमलकिशोर कदम , अंकुशराव कदम , डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्याप्रती त्यांनी ऋण  व्यक्त करतांना आभार हा शब्द त्यासाठी कसा योग्य नाही हे आवर्जून सांगितलं .

दोन एक महिन्यापूर्वी आजारी होईपर्यंत ‘म्हातारा न तुका’ या बाण्याला स्मरुन केशवराव जगत होते . दूध आणि रस यावर ते ठणठणीत असत . श्रवणवशक्ती क्षीण झालेली आणि स्मरणशक्ती विस्मरणाशी खेळत असलेली तरी , सकाळी वृत्तपत्रांचं नियमित वाचन , मग त्यांच्या पुढाकारानं सुरु झालेल्या गावातील संस्थांचा फेरफटका , लोकांच्या गाठीभेटी असा त्यांचा दिनक्रम  राहिला . या वयात स्मरण-विस्मरणाचा ऊन-सावलीचा खेळ अपरिहार्यच असतो पण , काही नाव मेंदूत किती पक्की रोवलेली असतात याचा अनुभवही आमच्या या भेटीत आला . माझ्यासोबत प्राचार्य डॉ. रेखा शेळके आणि प्रा . जयदेव डोळे होते  . जयदेवचं ‘डोळे’ हे आडनाव ऐकताच केशवरावांच्या डोळ्यात एकदम चमक आली आणि ते ना. य. डोळे समजून जयदेवशी बोलू लागले . ना. य. डोळे म्हणजे तळमळीचा शिक्षक , मोठा माणूस , क्रांतीकारक , महापुरुष असं  बरंच काही केशवराव म्हणाले . बाय द वे , प्रा. जयदेव डोळे हा ना. य. डोळे यांचे पुत्र आहेत .

सुपरकॉप म्हणून ओळखले जाणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांच्या ‘बुलेट फॉर बुलेट’ या पुस्तकात केशवराव धोंगडे यांचा उल्लेख असल्याचं आठवतं  . रिबेरो हे १९६९ साली नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते , तेव्हाची ती एक आठवण आहे .  त्यावेळी मन्याड खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी केशवराव यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं . ते आंदोलन कसं आटोक्यात आणावं असा प्रश्न सरकारला पडल्याचं रिबेरो यांनी नमूद केलं आहे .  ते आंदोलन अखेर यशस्वी ठरलं . तेव्हापासून केशराव धोंगडे  यांना ‘मन्याड खोऱ्याचा वाघ’ म्हणूनही ओळखलं जात असे . तेव्हा केशवराव  आमदार होते . एखादा आमदार आपल्या मतदारसंघातील जनतेच्या जगण्याबद्दल किती संवेदनशील असतो याचं नेमकं उदाहरण म्हणजे ते आंदोलन होतं .  .त्यांचा मुलगा पुरुषोत्तम  यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं ? हा  माझा प्रश्न मोठ्ठ्या आवाजात विचारला  आणि  केशवरावांनी तत्परतेनं  साभिनय उत्तर दिलं . ‘राजकारणाबद्दल बोलण्यासारखं आता काहीच नाही . बोलणं बंदच करायला पाहिजे . उत्तर एकच .  तोंडावर हात आणि कानावरही हात , हेच आजच्या राजकारणावरचं उत्तर आहे’ , असं केशवराव म्हणाले . अन्यही कांही विषयावर ते बोलले पण , त्यात संगती नव्हती शिवाय  कांही वेळ  बोलल्यामुळे त्यांना थकवा जाणवू लागला असल्याचं जाणवलं आणि आम्ही रुग्णालयाच्या त्या  खोलीतून बाहेर पडलो .

एकूण काय तर , मन्याड खोऱ्यातील एकेकाळचा वाघ आता वृद्धत्वामुळे थकला आहे .विद्यमान राजकारणात असे वाघ आहेत कुठे ?

( छायाचित्र – महात्मा गांधी मिशन रुग्णालयात केशवराव धोंडगे , सोबत  त्यांच्या पत्नी सौ . प्रभावती . )

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous articleगद्दार गाडायच्याच लायकीचे!
Next articleरावणाला का जाळायचं?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.