कैसा यह मेरे जिस्म में इक शोर मचा है..!

नीलांबरी जोशी

माझ्या एका मित्राला पाठदुखीचा असह्य त्रास सुरु झाला. चालताना, उठताबसताना तो त्रास त्याचा पिच्छा पुरवत होता. त्यानं त्यावरच्या उपचारांबाबत तीन डॉक्टर्सचा सल्ला घेतला. एका डॉक्टरनं ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागेल असा सल्ला दिला. दुसर््या डॉक्टरनं शस्त्रक्रियेची गरज नाही, फिजिओथेरपी चालू ठेवावी आणि काही काळानं बरं वाटेल असं ठामपणे सांगितलं. तिसर््या डॉक्टरनं स्टिरॉइडस दिली आणि त्यानं एका महिन्यात बरं वाटलं नाही तर शस्त्रक्रिया करावी लागेल असा सल्ला दिला.

मित्रानं तिसऱ्या डॉक्टरचा सल्ला मानला आणि त्या प्रक्रियेतून मित्राला बरं वाटलं. पण या तीनही सल्ल्यांमधल्या फरकामुळे मित्र बेचैन होता. कोणाचा सल्ला बरोबर होता यावर त्याच्या मनात आजही गोंधळ आहेच.

रुग्णाला कॅन्सरपासून नैराश्यापर्यंत कोणत्याही शारिरिक किंवा मानसिक समस्या असतील तरी डॉक्टरांच्या उपचारांबाबतच्या सल्ल्यांमध्ये मध्ये असे मतभेद नेहमीच असतात. वेगवेगळ्या डॉक्टर्सच्या सल्ल्यांमधले फरक आपण समजू शकतो. पण मजेचा भाग म्हणजे, त्यांच्यात एकमेकांच्या अंदाजाबद्दल मतभिन्नता असतेच पण स्वत:च्या अंदाजांबद्दलही ते वेगळ्या दिवशी वेगळी मतं नोंदवतात. उदाहरणार्थ, २२ फिजिशियन्सनी १३ अॅंजिओग्राम्स काही महिन्यांच्या अंतरानं दोन वेळा तपासले. स्वत:च्याच निदानाशी त्यांच्या अंदाजांमधला फरक सुमारे ६३ टक्के होता.

हे केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. एखादा प्रोजेक्ट किती दिवसात संपेल याचा सॉफ्टवेअर डेव्हलपर्सचा अंदाज दोन वेगवेगळ्या दिवशी वेगळा असतो. असा वेगवेगळ्या दिवशी स्वत:च्याच अंदाजाबाबत वेगळा आकडा सांगितलं जाण्याचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या बाबतीत प्रमाण ७१ टक्के आहे.

******

वेगवेगळ्या व्यवसायांमधल्या तज्ञांच्या निर्णयांमध्ये असे फरक नेहमीच आढळतात. उदाहरणार्थ, नवीन उत्पादनाचा खप किती होईल, बेरोजगारीचा दर किती वाढेल, कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागेल का? अशा प्रकारचे अनेक अंदाज वर्तवणार््या तज्ञांमध्ये मतभेद असतात. कामाच्या ठिकाणी एकाच उमेदवाराची मुलाखत वेगवेगळे अधिकारी एकाच पध्दतीत घेत असले तरी त्यांचं त्या उमेदवाराचं मूल्यमापन मात्र अत्यंत वेगळं करतात. एकाच कर्मचार््याेचं परफॉर्मन्स रेटिंग वेगवेगळ्या वरिष्ठांकडून विलक्षण वेगवेगळं येतं.

न्यायप्रक्रिया त्याला अपवाद नाही. न्यायालयात जामीन मिळणं, सारख्याच गुन्ह्यासाठी गुन्हेगारांना होणार््यान शिक्षांमध्ये प्रचंड तफावत असणं सर्रास घडतं. उदाहरणार्थ, दोन माणसं. दोघांचंही फसवणूक, गुन्हेगारीबाबत कोणतंही रेकॉर्ड नाही. दोघांवरही चेक बाउन्स झाल्याचे आरोप होते. ज्याचा ५८ डॉलर्सचा चेक बाऊन्स झाला त्याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि ज्याचा ३५ डॉलर्सचा चेक बाऊन्स झाला त्याला ३० दिवसांचा तुरुंगवास…!

न्यायालयात, साधारणपणे दिवसाच्या सुरुवातीला किंवा लंचब्रेकनंतर समोरच्याला पॅरोल मिळण्याची शक्यता जास्त असते. जर न्यायाधीशाला भूक लागलेली असेल तर त्याचे निर्णय जास्त कठोर असतात असंही घडतं. एवढंच नव्हे, जर स्थानिक फूटबॉलचा संघ (किंवा आपल्याकडे भारताचा क्रिकेटचा संघ) वीकएंडला मॅच हरलेला असेल तर सोमवारी (आठवड्याच्या इतर दिवसांच्या तुलनेत) न्यायाधीश जरा कठोर निर्णय घेतात.

अमेरिकेत, ४ वर्षातल्या २,०७,००० इमिग्रेशनच्या केसेसचा अभ्यास केल्यावर बाहेर जर तापमान जास्त असेल तर समोरच्या निर्वासिताला अमेरिकेत असायलम मिळण्याची शक्यता कमी असते असं लक्षात आलं होतं. बाहेरच्या देशांमधून युध्दासारख्या कारणांमुळे निर्वासित म्हणून वेगळ्या देशात गेलेल्या लोकांना त्या देशानं आश्रय द्यावा का नाही या इमिग्रेशनच्या असंख्य केसेस जगभरात असतात. थोडक्यात, बाहेरचं तापमान अशा कारणांचाही निर्णयप्रक्रियेवर परिणाम झालेला असतो.

******

या सगळ्या प्रकाराला डॅनियल काहनेमान या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ञानं आपल्या नवीन पुस्तकात कोलाहल / noise असं नाव दिलं आहे. बिहेविअरल इकॉनॉमिक्समध्ये काहनेमानला ट्वेरस्कीसोबत नोबेल पारितोषिक मिळालं होतं. “नॉईज : अ फ्लॉ इन ह्यूमन जजमेंट” या पुस्तकाचे एकूण तीन लेखक आहेत. त्यापैकी काहनेमान सोडून आॉलिव्हिए सिबॉनी हा मॅनेजमेंटचा प्राध्यापक आणि कास सनस्टाईन हा अर्थतज्ञ आहे.

तोच डेटा समोर असताना वेगवेगळे लोक वेगवेगळा निर्णय कसा घेतात? एकच माणूस सारख्याच परिस्थितीत सारख्याच घटनेबाबत वेगळा का वागतो? याचे न्यायसंस्थेवर, व्यवसायावर काय परिणाम होतात. “नॉईज” हे पुस्तक या प्रश्नांना सामोरं जाऊन त्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतं.

४३३ पानांचं हे पुस्तक सहा भागांमध्ये २८ प्रकरणांत विभागलेलं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकत्रयीनं bias आणि noise यातला फरक स्पष्ट केला आहे.

पूर्वग्रह मनात असल्यामुळे निर्णयांमध्ये जो फरक पडतो तो bias. पुरावे किंवा सत्याचा आधार नसताना आपल्या पूर्वग्रहांमुळे निर्णय घेणं, मत मांडणं हा bias झाला. Bias चे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ, “१२ अॅंग्री मेन” या चित्रपटात झोपडपट्टीत रहाणारी माणसं गुन्हेगार असणारच.. अशा पूर्वग्रहामुळे निर्णयप्रक्रियेवर फरक पडलेला असतो.

काहनेमानं यानंच बायसचे प्रकार आणि त्याची अनेक उदाहरणं यापूर्वी दिली आहेत. उदाहरणार्थ, “अॅव्हेलेबिलिटी बायस“ म्हणजे एखादा विषय, संकल्पना, निर्णय याचं मूल्यमापन करत असताना नुकतीच घडलेली उदाहरणं मनात पटकन येणं. “पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट” अशा प्रकारची नेहमी ऐकलेली वाक्यं यातून तयार झाली आहेत. बातम्या पहाताना/वाचताना/ऐकताना आपल्या मनात जे विचार येतात ते या प्रकारचे असतात. एखाद्या राजकीय नेत्याबद्दलची आपली मतं नुकत्याच घडलेल्या घटनांनुसार मनात तयार होतात. मात्र त्या नेत्याच्या कारकीर्दीतल्या मागच्या गोष्टी मनात धूसर झालेल्या असतात. त्या आपल्याला चटकन आठवत नाहीत. निवडणूका जवळ आल्यानंतर हा प्रकार एखाद्या पक्षाला बहुमत सुध्दा मिळवून देऊ शकतो.

तसंच एखादा खाद्यपदार्थ विकत घेताना आपण बर््यााचदा किंमत पाहून स्वस्त असेल त्या ब्रॅंडचा पदार्थ विकत घेतो. त्यातल्या पोषणमूल्यांचं प्रमाण तपासायला हवं हे आपण तेव्हा विसरुन जातो. दुसरं म्हणजे, नुकत्याच पाहिलेल्या जाहिरातीत विशिष्ट ब्रॅंडचा खाद्यपदार्थ खाऊन आनंदी झालेल्या कुटुंबाचे चेहरे आपल्यासमोर तरळत असतात. तशाच आनंदाच्या अपेक्षित भावनेनं तेव्हा आपल्या मेंदूतल्या “पोषक अन्न म्हणजे काय?” वगैरे तर्कशुध्द विचारांवर मात केलेली असते.

****

मात्र नॉईज हा प्रकार वेगळा आहे. त्या क्षणी मनात आलं म्हणून घेतलेला निर्णय, मांडलेलं मत असं इथे जास्त प्रमाणात झालेलं असतं. नॉईज म्हणजे काय, तो का निर्माण होतो, तो का कमी करायला हवा आणि कसा कमी करायचा या पध्दतीत “नॉईज” हे पुस्तक आकार घेत जातं. वैद्यकीय व्यवसाय, मॅनेजमेंटपासून न्यायव्यवस्थेपर्यंत अनेक केस स्टडीजचा आधार यात आहे. नॉईज निर्माण होण्यामागची मानसशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक कारणं शोधायचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. नको इतका बळावलेला आत्मविश्वास, गोष्टींचं ब्रॅंडिंग करुन त्यावर छाप मारण्याची घाई, सामाजिक दबाव अशी अनेक कारणं यात मांडली आहेत. आपल्या धारणांना पूरक असाच विचार करण्याची आपली वृत्ती हेही एक कारण आहेच. काहनेमान स्वत: मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे मानसशास्त्राचा नॉईज निर्माण करण्यातला सहभाग यात जागोजागी स्पष्ट होतो.

****

कम्प्युटर्सचे अल्गॉरिदम्स आणि नॉईज याबद्दलही या पुस्तकात अनेक उदाहरणं आहेत. पण अल्गॉरिदम्समध्ये शेवटी माणसांच्या मनातलेच गोंधळ / पूर्वग्रह रिपिट होतात आणि ते वेगात वाढतात. उदाहरणार्थ, स्वयंपाकाची चित्रं ओळखायला शिकवणार््या् एका अल्गॉरिदममध्ये मुळातच स्वयंपाक करताना स्त्रिया जास्त प्रमाणात दिसत असल्या तर अल्गॉरिदम स्वयंपाक / स्वयंपाकघर आणि स्त्रिया यांचा संबंध जास्त प्रमाणात जोडतोच. अॅमेझॉनचे अल्गॉरिदम्स अशाच प्रकारे वर्णभेद करुन दाखवतात. थोडक्यात gender / racism असे माणसांच्या मनातले नॉईज कम्प्युटर अल्गॉरिदम हजारपट मोठे करतो इतकंच.

*********

Bias and noise या दोन्ही प्रकारांमुळे न्यायनिवाडा योग्य प्रकारे न होणं, पैसे आणि वेळ यांचा अपव्यय आणि एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक / मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणं सारख्याच प्रमाणात घडतं. त्यामुळे नॉईज या प्रकारावर काम करण्याची गरज आहे असं लेखकांचं मत आहे.

नॉईज या प्रकाराचं महत्व किती आहे? तर “सुपरफोरकास्टिंग”सारख्या गाजलेल्या पुस्तकांच्या लेखकानं – फिलीप टेटलॉकनं लक्षणीय पत्रकार, शिक्षणतज्ञ, नेत्यांचे प्रमुख सल्लागार अशा ३०० लोकांना “त्यांचे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अंदाज खरे ठरले का?” असं विचारलं होतं. टेटलॉकचं हे संशोधन वीस वर्षं चाललं होतं. याचं उत्तर टेटलॉकच्या शब्दात सांगायचं झालं तर “डार्ट फेकणाऱ्या चिंपाझींचे निशाणे जितके अचूक लागले असते, साधारण तितकेच या तज्ञांचे अंदाज अचूक ठरले…!”

यावरुन नॉईजचं प्रमाण लक्षात येऊ शकेल.

त्यामुळेच नॉईज कसा मोजावा, नॉईज आणि पूर्वग्रह हे एकमेकांमध्ये कसे परावर्तित होतात यावर या पुस्तकात स्वतंत्र प्रकरणं आहेत. नॉईज कसा आणि का वाढतो आणि तो कसा कमी करावा याबद्दल “नॉईज आॉडिट” कसं करावं याचं तपशीलवार मॉडेल पुस्तकात आहे.

एका इन्शुरन्स कंपनीमध्ये असं “नॉईज आॉडिट” केल्यावर कंपनीचे अधिकारी चाट पडले. ग्राहकांच्या प्रिमिअमच्या रकमांबाबत नॉईजमुळे प्रचंड तफावत दिसत होती. कंपनीला त्या नॉईजमुळे दरवर्षी लाखो डॉलर्सची किंमत मोजावी लागत होती.

निर्णयांचं निरीक्षण करणारा “decision observer” नेमावा असाही एक उपाय यात दिला आहे. “decision observer” या पदाला उपयोगी पडणारी चेकलिस्ट पुस्तकात आहे. एखादी टीम निर्णयापर्यंत कशी पोचली, कोणाच्या मनात पूर्वग्रह होते का?, माहितीचं विश्लेषण निर्णय घेताना कसं केलं गेलं अशा विभागांमध्ये ती चेकलिस्ट आहे. अर्थात, ज्या टीमला योग्य निर्णय घेतला जावा असं मनापासून वाटतं त्याच टीमला या सगळ्या उपायांचा उपयोग आहे. टीममधल्या लोकांमध्येच विसंवाद असेल आणि एकानं निर्णय घ्यायचा असं ठरलेलं(च!) असेल तर तर निर्णयांवर कोणामुळे किंचितही फरक पडू शकत नाही असं बजावायला लेखकत्रयी विसरलेली नाही.

*********

अर्थात काही वेळा नॉईजचा सकारात्मक वापर होतो. चित्रपटांची समीक्षा, पुस्तकाचं रसग्रहण किंवा वाईन टेस्टिंगमध्ये वेगवेगळी मतं मागवली जातात. ते योग्य आहे. काहनेमानचं “थिंकिंग फास्ट अॅंड स्लो” हे पुस्तक नॉईज या पुस्तकाचा पाया आहे. ते वाचलेलं असेल तर नॉईज समजायला तुलनेनं सोपं जाईल. मात्र ते वाचलेलं असायलाच हवं असं मात्र नाही.

*********

“नॉईज” हे पुस्तक वाचताना मला “१२ अॅंग्री मेन” हा चित्रपट तर आठवत होताच. पण बर्ट लॅकेस्टरनं काम केलेला “द यंग सॅव्हेजेस”, स्टॅनली क्रॅमर या दिग्दर्शकाचा “जजमेंट अॅंट न्यूरेंबर्ग”, नेटफ्लिक्सवरची “टोकियो ट्रायल” ही मालिका, जॅक निकोलसनच्या भूमिकेनं लक्षात राहिलेला “अ फ्यू गुड मेन”, “ट्रायल आॉफ शिकागो सेव्हन” असे अनेक चित्रपट आठवत होते…!

त्याहीपेक्षा आपला प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती यामागे जर मनात गोंधळ, संदिग्धता असेल तर त्याचा स्वत:वर आणि इतरांवर किती परिणाम होतो याची जाणीव हे पुस्तक वाचत असताना मला होत होती. आपण प्रतिक्रिया देतो, प्रतिसाद द्यायला हवा वगैरे REBT मध्ये शिकतो पण ते अंगिकारणं किती गरजेचं आहे हे “नॉईज” वाचताना सखोलपणे जाणवत गेलं. मनाच्या अंतरंगातले आपले आपण अशा पुस्तकांमुळे उलगडत जातो. “मुझको मेरी आवाज सुनायी नहीं देती, कैसा यह मेरे जिस्ममें एक शोर मचा है..” अशी अवस्था धावपळीच्या जगात साधारणपणे सगळ्यांचीच झालेली असते. सभोवतालच्या असंख्य distractions मधून आपण स्वत:पर्यंत पोचून प्रत्येक क्षणी योग्य वागणं किती विसरत जातो ते या पुस्तकातून मला दिसत गेलं.

पुस्तकातली काही रिपिटिशन्स सोडली तर “ज्यांच्या निर्णयांचा दुसऱ्याच्या आयुष्यावर परिणाम होतो अशांनी म्हणजे सगळ्यांनीच” हे पुस्तक वाचायला हवं.

संदर्भ :

Noise : A Flaw in human judgement by Daniel Kahneman, Olivier Sibony and Cass Sunstein.

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

…………………………

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleतक्रार करण्यासाठी जागा मिळाली की निम्मी भांडणं कमी होतात
Next articleराजकारणातलं `संवेदन`पर्व
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.