कोरोनाची महामारी, धर्म आणि देवदेवदेव…

– मुग्धा कर्णिक

ज्ञात इतिहासात नोंदलेल्या महामारी साथींची यादी पाहू या.

दोन हजार पाचशे वर्षे नक्कीच उलटली आहेत एथेन्सच्या प्लेगच्या साथीला. यात एक लाख लोक मरण पावले. हे एक लाख लोक मरणाच्या दाढेत जाण्यापूर्वी सारा तो समाज भय-निराशेच्या जबड्यात सापडला होता. अनेक लोक काहीही मदत न मिळता तडफडून मेले. या काळात मृत्यूच्या भयाला सामोरे जाताना लोकांनी नीतीमत्ता गुंडाळून ठेवली. मरायचंच आहे तर मजा करून घेऊ या असा त्यांचा दृष्टीकोन होता. देवाच्या कोपाचे भय असणारा तो रोमन समाज होता- पण आपलं आता काही खरं नाही, देव कोपलेच आहेत तर होऊं दे खर्च असा पवित्रा त्यातील अमीर रोमनांनी घेतला. असले कसले देव हा प्रश्न काही मनांना पडलाच असेल तर त्याची नोंद नाही.

त्यानंतर दोन हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यात देवीची साथ आली. ती साथ वीस वर्षे घुसळत राहिली आणि त्यात सुमारे एक कोटी लोकसंख्या नष्ट झाली. लोक या संपूर्ण कालखंडात दुःखी, निराश जगत होते. या काळातला रोमन राजा ऑरेलियस याने तेव्हाच्या मूठभर ख्रिस्ती लोकांवर याचे खापर फोडले. आणि रोमन देवदेवतांना त्यांनी दुखावले म्हणून हे संकट आले असे त्याचे म्हणणे होते. पण आपले देव असे कसे निष्ठूर की मूठभर अभक्तांसाठी कोट्यवधी भक्तांनाही त्रास देतात हा प्रश्न विचारला गेला नाही. मात्र याच काळात सेवा कार्य करणाऱ्या ख्रिस्तींना पाहिल्यामुळे काही रोमन देवभक्त ख्रिस्ताच्या धर्माकडे वळले खरे.

नंतरच्या सायप्रियन प्लेगच्या काळातही सेंट सायप्रियनने लोकांना प्लेगच्या भयापासून सुटका करून घेण्याची संधी म्हणून ख्रिस्ताकडे वळवण्याचे यशस्वी प्रयत्न केले. आणि त्यांच्या देवामुळे नव्हे, तर त्यांच्या सेवाकार्यामुळे त्यांना नवे अनुयायी या साथीत मिळाले. आणि रोमन देवांचे अधिष्ठान मानणारे रोमन साम्राज्य अधिकच खिळखिळे झाले. रोमन देव अपेशी ठरले आहेत हे लोकांनी मान्य करून टाकलं. देव अपेशी ठरले हे मान्य करण्याची ही पहिलीच घटना जगाच्या इतिहासात असावी. अर्थात त्याची जागा देव नाही या विवेकाने घेण्याचा तो काळच नव्हता. त्यांची जागा ख्रिस्ताने आणि त्याच्या दूतांनी घेतली. अर्थात कुणी किरकोळ चमत्कारांचे दावे केले असले तरीही यात दैवी काहीही नव्हते. होता तो लोकांना उपयोगी ठरलेला सेवाभाव, धर्मादाय भाव. निस्वार्थ सेवा करणारे ख्रिस्ती लोक पाहून जुन्या देवांवरची श्रद्धा सोडून देऊन लोक ख्रिस्ती धर्माकडे वळले ही एक गोष्ट या साथीने साध्य केली हे वादातीत आहे.

इ.स. सहाव्या शतकात बायझँटाईन सम्राट जस्टिनियन याच्या काळात पुन्हा एकदा प्लेगची महामारी आली. पाच कोटी माणसे यात दगावली. नाव जस्टिनियन असलेला हा सम्राट कृतीने अगदीच अनजस्ट होता. अन्यायी सम्राट. त्याच्या प्रजेने या प्लेगचे खापर सम्राटाच्या अन्यायी राजवटीवर फोडले. त्याला देवाने शिक्षा दिली असेच लोकांनी मानले. हा प्लेगसुद्धा चीनमधून रेशीममार्गे संक्रमित होऊन इराणचा घास घेऊन कॉन्स्टॅटिनोपलकडे गेला होता ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. रेशीममार्गावर सातत्याने दळणवळण चालू असल्याने साथ पसरत गेली होती.

चौदाव्या शतकातला प्लेग- ब्लॅक डेथ म्हणून ओळखला जातो. युरोप आणि सिरिया, इराक, जॉर्डन, इस्राएल, लेबेनॉन या भागात या प्लेगने हलकल्लोळ माजवला. एकट्या युरोपमध्ये पाच कोटी आणि जगभरात आणखी आठ कोटी लोक यात मृत्यूमुखी पडले.

खरे तर अशा साथी येणे आणि त्यात प्रचंड प्रमाणात मरणाचा खेळ चालणे हे मध्ययुगीन कालखंडात तसे नेहमीचेच झाले होते. चौदाव्या, पंधराव्या शतकांची प्रत्येकी चाळीसपन्नास वर्षे असल्या साथींनी युरोपला ग्रासले होते असे विल ड्यूरान्ट हा इतिहासकार म्हणतो. पण त्यातही ब्लॅक डेथ अधिकच भयानक.

या काळ्या मृत्यूच्या सावलीत लोक पैसे उडवून जिवाची मौज करून घेत होते- उरले सुरले दिवस मौज करण्याचीही साथ आली होती, परंतु त्या काळातही लोक एकमेकांत मिसळणे टाळू लागले होते अशा नोंदी आहेत.

या काळात काही देशांनी आपल्या रोगग्रस्त शेजाऱ्यावर आक्रमण करण्याचे मनसुबे रचले अशीही नोंद इतिहासकार बार्बरा तुखमन यांनी केली आहे- पण त्यांचे मनसुबे प्रत्यक्षात येण्याआधीच साथीने त्यांच्याही देशावर आक्रमण केले. -आठवतंय का आपले गावठी चाणक्य काय म्हणाले होते- अविनाश धर्माधिकारींनीही याच देशांप्रमाणे पाकिस्तानवर आक्रमण करण्याची आणि त्यांच्या ताब्यातले काश्मीर सोडवण्याचा सल्ला दिला होता. आपल्याच देशाला सांभाळण्याची कुवत नसलेले लोक हवेत साबणाचे फुगे खूप सोडतात.

अमेरिकेतही असले फुकटचंबू होते- माइक पॉम्पिओ या संरक्षण सचिवाने इराण कोरोनाने घायाळ असल्याचा फायदा घेऊन हल्ला करावा असा सल्ला दिल्याची बातमी बाहेर फुटली. पण अर्थात अमेरिकेतच दुरवस्था झाल्यावर बाकीच्यांनी त्याला गप्प केले.

ब्लॅकडेथमुळे युरोपमध्ये अंधश्रद्धा, ईश्वरश्रद्धा या क्षेत्रात प्रचंड गोंधळ उडाला होता. हे सारे सैतानाचे कृत्य… आणि याला कारण ज्यू लोक असे ‘ट्रेन्डिंग’ सुरू झाले. सैतानाची कारस्थाने, शत्रूची कारस्थाने अशी कुजबूज एकदा सुरू झाली की मग लोकांच्या अविवेकाला पारावर रहात नाही. मग शत्रू ठरवून टाकला जातो. सैतानाचे दूत ठरवून टाकले जातात. ब्लॅक डेथच्या काळात ज्यू धर्मीयांना शत्रू ठरवण्यात आले. त्यांना या पृथ्वीतलावरून नष्ट करायला हवे असा सूर कोरस झाला.

ज्यू लोक विहिरींत विष घालतात, ख्रिस्ती बालकांना ते खातात वगैरे गलिच्छ प्रचार वणव्यासारखा पसरू लागला… आठवतायत ना अलिकडच्याच गोष्टी… कोरोनाग्रस्त मुसलमान येऊन विहिरींत थुंकतात, साधूवेषात येऊन मुलांना पळवतात वगैरे वावड्या कुणी बरं उठवल्या होत्या. १३४९मध्ये असल्या वेडगळ पण व्यवस्थित रचलेल्या कुभांडापायी युरोपात शेकडो ज्यू वस्त्या नष्ट करण्यात आल्या आणि हजारो ज्यूंना ठार करण्यात आले.

अलिकडच्याच इतिहासात १९१८-२० या काळातील स्पॅनिश फ्लूच्या महामारीत आजवर विज्ञानाने जे साध्य केले होते ते काहीही उपयोगात येईना. कारण हा रोग जिवाणूंमुळे नव्हे तर विषाणूंमुळ पसरत होता. विषाणूशी ओळख व्हायला आणि त्यावर वैज्ञानिक उपाय शोधले जायला वेळ लागला. या विषाणूचा संसर्ग जगभरात पन्नास कोटी लोकांना झाला. आणि मृत्यूचा आकडा दीड कोटी ते दहाकोटी या घरात असू शकतो.
या साथीवर उपाय मिळत नव्हता तेवढ्यात परंपरावादी ख्रिस्ती पोंगा पंडितछाप धर्मगुरूंनी लगेच हा देवाचा कोप आहे, मानवी पापांचे फळ त्यात देव देतो आहे वगैरे तुणतुणे वाजवायला सुरुवात केली. लोक देव सोडून विज्ञानावर विश्वास ठेवत आहेत म्हणून देवाने आपली शक्ती दाखवली- आता यात विज्ञान काहीही करू शकत नाही वगैरे बरळगरळ सुरू झाली.

अर्थात यातही काही शहाणे धर्मगुरू होते. आणि त्यांनी या साथीचा सामना करताना वैयक्तिक स्वच्छता राखणे, स्वच्छता राखणे हे महत्त्वाचे आहे हे सांगायला सुदैवाने सुरुवात केली. काही काळ चर्चेस बंद ठेवावीत असेही त्यांनी सांगितले. त्याला अर्थातच बुरसट धर्मगुरूंनी विरोध केलाच.

वेगवेगळ्या धर्माच्या पंडितमुल्लाबिशपांनी या कोरोना साथीच्या वेळी कशी मूर्खपणाला चालना दिली यावर पूर्वी लिहिलेच आहे. पण आता सुदैवाने जगभरात असला धार्मिक वेडाचार फारसा मातणार नाही. जिथे संवादसंपर्क कमी आहे अशा जिल्ह्यांतल्या अंधाऱ्या कोपऱ्यांत जे चालते त्याला मात्र सध्यातरी इलाज नाही. आणि पेटवायला गोस्वामी-चौधरी-नाविका-अंजना-चौरासिया आहेतच. तरीही एकंदरीत चित्र धार्मिक दंगलींच्या दृष्टीने बरे राहील असे वाटते.

आता प्रश्न आहे देवावरच्या विश्वासाचा.
आज आपल्या देशात ज्या करूण कहाण्या समोर घडताना पाहाव्या लागत आहेत, ते पाहाता अनेकांच्या मनात देवाच्या अस्तित्वाबद्दल एकदाचे प्रश्नचिन्ह लागू लागले आहे. धर्माचेही महत्त्व एकंदरीत या आपत्तीशी लढताना वाढत गेलेले दिसत नाही. अगदी रामदेवची फालतूगिरीही अनेक लोक उडवून लावताना दिसत आहेत. नाकात एकेक चमचा मोहरीचे तेल कुणी टाकणार नाही असा विश्वास वाटतो आहे. आणि निरुपद्रवी, निरुपयोगी साबुदाण्याच्या गोळ्या खाल्ल्या न खाल्ल्या तर प्लासिबो- छद्मसमाधानापलिकडे काहीही होणार नाही त्यामुळे कुणी राष्ट्रभक्ती ओताओत सांस्कृतिक संघटना त्या फुकट वाटत असल्या तरी काही बिघडत नाही.

देवावरचा विश्वास हेही एक छद्मसमाधानच असते. प्लासिबो. तो जोवर या वेळी जत्रोत्सव करण्यात, कुंभ नि वारीला जाण्यात रुपांतरित होत नाही तोवर काही त्रास नाही.

पण ही एक चांगली संधी आहे. आपापले देवाच्या अस्तित्वावरचे विश्वास तपासून पाहाण्याची. तर्कदृष्ट्या या साऱ्या आपत्तीत देव कुठे बसतो का हे तपासून पाहाण्याची.

किंवा मग ठरवून टाका की आपण विश्वास ठेवतो तो देव, अल्ला, जीझसचा बाप एकदम चिंधीगिरी करणारा, फक्त संपन्न वर्गाच्याच प्रार्थना ऐकणारा, पीडीतांना अधिक पिडणारा आहे आणि तरीही आम्ही त्याच्यावर गर्व से विश्वास ठेवणारच.

होमो सेपियन सेपियन म्हणवण्यासाठी थोडे अधिक बौद्धिक कष्ट घ्यावेच लागतील.

आज ना उद्या…

( या लेखासाठी अनेक लेखांतील संदर्भ वापरले आहेत.)

(मुग्धा कर्णिक या अभ्यासिका असून रोखठोक लेखनासाठी त्या ओळखल्या जातात)

[email protected]

Previous articleग्रीष्मलळा…
Next articleमी पुन्हा येईन ! ऑपरेशन फेल !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.