खेरांची अनुपम्य उपरती!

-राज कुलकर्णी

डॉ.मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीतील कांही प्रसंगावर आधारित ‘The Accidental Prime Minister’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले ज्यात मनमोहन सिंग यांची भूमिका अभिनेते आणि नेते अनुपम खेर यांनी केली आहे. अनुपम खेर भाजपचे नेते असून त्यांच्या पत्नी किरण खेर या भाजप खासदार आहेत यावरून त्यांच्या राजकीय भूमिकांविषयी प्रचंड स्पष्ट चित्र आहे. मात्र चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर अनुपम खेर यांना उपरती होऊन त्यांनी डॉ.मनमोहन सिंग यांच्याबाबत गौरवोद्गार काढले म्हणे! त्याचवेळी सिंग त्यांच्याबद्दल माझी गतकाळातील कांही मते चुकीची असल्याबाद्दल खेद वाटतो, इतिहास तुमची योग्य नोंद घेईल, असे डॉ.मनमोहन सिंग यांचेच वाक्य उधृत केले.आज नेते असणारे अनुपम खेर कसलेले अभिनेते आहेत यात शंकाच नाही ! त्यामुळे त्यंचे हे वक्तव्य अथवा खंत मुळातून आहे की चित्रपटातील प्रसंगासारखीच हे समजणे अवघड आहे!

‘The Accidental Prime Minister’ हा चित्रपट याच नावाच्या संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. संजय बारू हे डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात २० मे २००४ पासून २५ ऑगस्ट २००८ माध्यम सल्लागार होते. या पूर्वीही भारताच्या अनेक पंतप्रधानांना असे मध्यम सल्लागार असत कुलदीप नय्यर, बी.जी.वर्गीस, प्रेम शंकर झा, एच. के. दुआ यासारख्या अनेक दिग्गज पत्रकारांनी या पदावर काम केले आहे. परंतु यांच्यापैकी कोणीही अशा विश्वासाच्या संबंधावर जनतेसमोर कांही लिहिलेले नाही. संजय बारू यांनी देखील २०१३ पर्यंत यावर लिहायचे नाही म्हणून ठरवले होते मात्र ज्या प्रमाणे सत्तर वर्षात जे कधी घडलेले नाही ते सर्व कांही घडू लागण्याचा कालखंड सुरु झाल्यावर संजय बारू यांचे हे पुस्तक बरोबर २०१४ साली प्रकाशित झाले ज्यात मनमोहन सिंग यांना कधी धृतराष्ट्र तर कधी भीष्म म्हटले आहे. पुस्तक छापण्यापूर्वी यातील कोणताही भाग मी मनमोहन सिंग यांनी दाखवला नाही असे संजय बारू यांनीच मनोगतात म्हटले आहे. विशेष म्हणजे बारू हे केवळ युपीए -१ च्या काळात ऑगस्ट २००८ पर्यंत पदावर होते, युपीए २ मधे नव्हते तरीही त्यांनी त्यावर अशा पद्धतीने लिहीले आहे जणू २०१४ पर्यंत ते त्या पदावर होते. त्यांचे २००९ ते २०१४ या काळातील आकलन हे पुर्णत: त्यांच्या वैयक्तिक राजकीय दृष्टीकोनावर आधारीत आहे. याच लेखनाचा आधार घेऊन National Advisory Council ला लोकशाही विरोधी व घटनाद्रोही ठरवणारे कथिक तठस्थ लोक आज शबरीमला मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणा-या केरळ सरकारवा बरखास्त करण्याची धमकी देणा-या भुतपुर्व तडीपार गुंडाच्या वक्तव्यावर मात्र मुग गिळून असतात. अर्थात डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर कोणत्याही प्रकारे तोंडसुख घेण्याचा आणि अश्लाघ्य टीका टिप्पणी करण्याचा तो कालखंड होता कारण प्रत्येकाला त्यावेळी विष्णूच्या ११ व्या अवताराच्या अत्यंत सात्विक आणि विद्वान अशा मोदिजींच्या विराटरूप दर्शनांची ओढ लागली होती. संजय बारू वा अनुपम खेर यास अपवाद कसे असणार!

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ,भाजपा या पक्ष्यास पराभूत करण्यासाठी पाकिस्तान बरोबर संगनमत केल्याचा आरोप करणारे विद्वान पंतप्रधान मा. मोदिजी यांच्या बाबत अनुपम खेर यांच्या मनात अतिशय श्रुद्धेची आणि भक्तीची भावना आहे. अनुपम खेर यांनी स्वतःला अभिमानाने मी ‘पंतप्रधान मोदींचा चमचा’ असल्याचे स्वतःहून एका कार्यक्रमात जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांना मोदीजींचा चमचा म्हणणे हा त्यांचा सन्मानच म्हणावा लागेल. कारण कोणी काय आहे यापेक्षा त्यास स्वत:ला काय म्हणून ओळखले जावे वाटते, हा प्रत्येकाचा अधिकार आहे!

दिव्यमराठी या दैनिकासाठी नुकताच मी अब्रु नुकसानीच्या दाव्यासबंधी लेख लिहीला होता. त्यात व्यक्तीची मानहानी आणि मान सन्मान याबाबत कायदेशिर तरतुदीबाबत लिहिले होते. एखाद्या व्यक्तीस एखाद्या व्यक्तीचा चमचा म्हणणे अवमानकारक किंवा अपमानास्पद समजले जाते अशी आजपर्यंतची प्रचलित धारणा आहे. मात्र अनुपम खेर हे कसलेले अभिनेते असल्याचे दरवेळी सिद्ध होते. शेवटी मान ,अपमान अथवा अब्रू ही मोठी विचित्र बाब आहे ! मान आणि सन्मान हा समाज तुमच्याबद्दल काय विचार करतो यावर अवलंबून असतो तर अपमान हा व्यक्ती स्वतःबद्दल काय विचार करतो यावर अवलंबून असते. कारण व्यक्तीची समाजातील प्रतिमा आणि आपल्या प्रतिमेबद्दल त्या व्यक्तीची धारणा ही कालानुरूप बदलते आणि मानहानीचे संदर्भ बदलून जातात.अनुपम खेर याचे अत्यंत चपखल उदाहरण आहेत.‘The Accidental Prime Minister’ हे पुस्तक लिहिणाऱ्या संजय बारुंना मनमोहन सिंग यांनी १९ मे २००४ ला नियुक्ती केली होती. त्यानंतरच्या काळात ऑक्टोबर महिन्यात, माकपच्या ‘पिपल्स डेमॉक्रसी’ या मगॅझीनमध्ये Central Board of Film Certification च्या सदस्यांवर टिका केली गेली होती, त्यानंतर अनुपम खेर यांना पदावरून कमी केले गेले. पदावरून कमी केल्याबद्दल अनुपम खेर यांचा आक्षेप नव्हता मात्र कम्युनिस्ट नेते हरकिशनसिंग सुरजित यांनी त्यांना त्या लेखात ‘संघाचा माणूस’ म्हटले आणि यामुळे ‘बेअब्रु आणि बदनामी झाली’ असे म्हणून अनुपम खेर यांनी सुरजित यांच्याविरोधात अॅड. माजीद मेमन यांच्याकडून बेअब्रु झाल्याबद्दल फौजदारी खटला दाखल केला होता. त्यावेळी खेर यांना ‘संघाचा माणूस’ म्हणून ओळखला जाणे बेअब्रु वाटत असे आणि मात्र आज तोच त्यांच्या अब्रुचा गौरवाचा आणि प्रतिष्ठेचा प्रमुख आधार बनला आहे ! अब्रु वा बेअब्रुचे मापदंड कांही व्यक्तीबाबत बदलतात ते असे. खेर यांच्या अभिनयाचा आणि मान सन्मान अब्रु बेअब्रुचा अनुपम्य सुखसोहळा असा वारंवार पाहायला मिळालेला आहे कारण मुळातच ते कसलेले अभिनेते आहेत.

खेर यांचे अभिनय कौशल्य इतके की, दोन वर्षापुर्वी कलकत्यात Telegraph National Debate मधे बोलताना त्यांनी योगी आदित्यनाथ आणि साध्वी प्राची यांना भाजपामधून काढून टाकून त्यांची रवानगी कारागृहात करावी असेही म्हटले होते हे विशेष!

तसे पाहीले तर पंतप्रधान मा.मोदीजींचे हे नेता अभिनेता हे दर्शन सुरवातीपासून घडत आले आहे पण त्यांचा अधिकृत चमचा असणा-या अनुपम खेर यांचीही नेता नि अभिनेता कारकिर्द अच्छे दिनात चांगलीच बहरली आहे. चित्रपट येत आहे, मग फिल्म प्रमोशन साठी निर्माते अभिनेते काय नाही नाही ते करतात मग अनुपम खेर यांनी या प्रमोशन साठी अभिनय कौशल्य वापरून मनमोहन सिंग यांच्याबद्दल चांगले शब्द वापरणे वा खंत व्यक्त करणे व चित्रपटाची चर्चा माध्यमात करणा-या आजच्या बाजारात उपयुक्ततेची आहे.

अच्छे दिन संपत आले आहेत. बदलाचे संकेतही अनुपम खेर यांना दिसत असावेत म्हणूनही ते कदाचित डॉ. सिंग यांच्या कांही चांगले बोलत असतील. शेवटी डॉ. सिंग यांच्या सोबत चहा पिण्याची इच्छा व्यक्त करत खेर म्हणतात ‘ I can say it with utmost sincerity that history will not misjudge you. Will wait to have that cup of tea with you once you watch our film,”

शेवटी चमच्यांना कोणतीच बशी वा कोणताच कप वर्ज्य नसतो हेच खरं!

 (लेखक अभ्यासपूर्ण लेखन व वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत)

Previous articleदेवत्व संपायचा काळ जवळ येतो आहे
Next articleशिवस्मारक विषयात बेअकली दादागिरी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here