शिवस्मारक विषयात बेअकली दादागिरी

-मुग्धा कर्णिक

एखाद्या फूटबाॅल फील्डच्या आकारातच्या त्या बेटाबद्दल मला प्रथम सांगितले ते सुप्रसिद्ध सागरी जीवशास्त्रज्ञ डाॅ. ब. फ. छापगर आणि जलचर अभ्यासक शरद साने या दोघांनी.
ते दोघेही आपल्या कोळीमित्रांच्या सोबतीने तिथे अनेकदा जात. समुद्री जीव, समुद्री उभयचर जीव तिथे जीवनाधार शोधत. पूर्णभरतीला हे बेट- एक बसका खडकाळ उंचवटा असे बेट- पाण्याखालीच जाते त्यामुळे ओहोटीची वेळ सांभाळून तिथे जायचे आणि भरती लागायला लागल्यावर चंबुगबाळे आवरायचे. त्यांच्यासोबत गेलेल्या एका नवख्या अतिउत्साही अभ्यासकामुळे एकदा धोक्यातही आले होते. पण सोबतच्या कोळ्यांनी त्या तिघांना सुखरूप बाहेर आणल्याची गोष्ट ते सांगत.
तिथे आणि त्या परिसरात छापगरांना प्रवाळही आढळलेले. पण अभ्यासकांच्या हावरट संग्राहकी वृत्तीपासून ते वाचवायचे म्हणून त्यांनी कधी ते रिपोर्टही केले नाही. नंतर ते दुसऱ्या काही लोकांनी रिपोर्ट केले आणि संग्राहकांचे हात तिथवर पोहोचलेच हा नंतरचा भाग.
हा स्पाॅट वाचवायला हवा, कारण इथली ही छोटीशी परिसंस्था नमुनेदार आहे असं दोघेही सांगत.
ते बेट इतिहासाची वतनं खाऊन सत्तेची भूक भागवणाऱ्या अनैतिक अडाणी लोकांनी वेठीस धरलं आहे.
शिवाजी महाराजांबद्दल खरोखरचं प्रेम यात अजिबात नसून केवळ दाखवेगिरीची हौस आणि महाप्रचंड काहीतरी उभं केल्याचं श्रेय घेण्याचं हे काम आहे. जनतेच्या घरांवर तुळशीपत्र.
या स्मारकाच्या बांधकामाला मच्छीमारांनी हरकत घेतली आहे. शिवाय खर्च प्रचंड असल्यामुळेही अनेकांचा विरोध आहे. असल्या प्रकल्पांवेळी जे विचारमंथन व्हायला हवे तेही यात प्रकल्पबाधित लोक नाहीत हे कारण पुढे करून टाळण्यात आले आहे. अनेक अभियांत्रिकी तज्ज्ञांनी ही जागा बदलावी असा आग्रह धरला पण मेटे आणि मेट्यांची झुंड आणि मामुबाळाचा हट्ट काहीही कानावर घ्यायला तयार नाही. सर्वांनाच शिवबांच्या नावे लोणी चापायचे आहे.
खर्च कमी केल्याची हवा तयार केली गेली. भर समुद्रात भर घालून नवीन जमीन तयार केल्यामुळे समुद्राच्या स्थानिक प्रवाहांवर काय परिणाम होतील याचा अभ्यास झालेला नाही, तेथील प्रस्तर खडक, बेस रॉक तपासून किती वजन पेलेल, वाऱ्यावादळात काय टिकेल याचे प्रतिरुप तयार होऊन वैज्ञानिक काटेकोरपणे हे अभ्यासले गेले पाहिजे. त्याला शॉर्टकट दिलेला आहे.
मेट्यांच्या झुंडीने त्या बोटीत जशी दादागिरी करून जास्तीची माणसं भरली. आणि मग बोटीचा तळ खडकाला लागून बोट फुटली… एक बळी गेला… तशीच या संपूर्ण स्मारकाच्या बाबतीत बेअकली दादागिरी चालली आहे.

शिवाजी महाराजांचं नाव सतत घेणाऱ्यांच्या मनात शिवाजीराजा नाही. ती समज नाही, उमज नाही… उथळपणे बडबड आणि शिवप्रतिष्ठानसारखा संधीसाधूपणा करून यांना सिंहासने हवीत. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचे जतन संवर्धन हा फार लांबचा रस्ता आहे हो. आम्हाला चुटकीसरशी महत्ता हवी.

अरबी समुद्र म्हणजे आपल्या गावचे तळे नाही, वाटेल तिथे भर टाकून इमारत ठोकून टाकायला. समुद्र आहे तो… प्रकल्पग्रस्त झाला तर गरीब दुर्लक्षित प्रकल्पग्रस्तांप्रमाणे निमूट सोसणारा नाही. फेकून देईल तो… तळाला नेईल तुमचा माज… त्या निमित्ताने आमच्या लाडक्या राजाच्या स्मारकाची विटंबना होईल तेव्हा तुम्ही काय कराल, अडाण्या, माजोर्ड्यांनो.

आपल्या माहितीविना लार्सन अॅन्ड टुब्रोला कंत्राट मिळाले म्हणून पेटलेले हे शिवभक्त…
यांना- पर्यावरण संवर्धनाचा, दुर्गसंवर्धनाचा, आणि मच्छिमार या मुंबईच्या प्राचीन निवासी लोकसमूहाच्या उपजीविकेचा विचार करणाऱ्या सर्वांनी, सर्व शहाण्या लोकांनी कडकडून विरोध करायची वेळ आली आहे.

यांना थांबवा.
या ठिकाणी असले फक्त कंत्राटदार आणि राजकारण्यांची भर करणारे स्मारक बांधले जाणे थांबवा.

(लेखिका इंडियन स्टडी सेंटर ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत)

[email protected]

Previous articleखेरांची अनुपम्य उपरती!
Next articleसेक्युलरिजम- प्रा. सुरेश द्वादशीवार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.