खोट्याची कलाकुसर करण्याचा उद्योग

-मुग्धा कर्णिक

जे काही सभोवार चालले आहे या सर्वांला कारण या देशातील निर्णायक बहुसंख्यांकांची शिथिल झालेली नीतीमत्ताच आहे या विषयी माझ्या मनात शंका नाही.
देशात एक असा हिस्सा आहे की ज्याला नीती, बुद्धी, स्वसन्मान याचा विचार करण्याइतकी जगण्याची फुरसतच कधी मिळाली नाही. ज्याला अजूनही सत्तेवर कोण आला, कोण गेला, आणि का आला, का गेला या प्रश्नांवर विचार करायला वेळ नाही, वेळ असला तरीही फारशी साधने नाहीत. तत्वज्ञानात पशुपक्षी आणि लहान मुले यांना निरागस निष्पाप याबरोबरच ‘ननैतिक” (amoral) असे मानले जाते. हा बराचसा मोठा वर्ग तसाच आहे. सांगोपांग विचार करायला मालकीचा वेळ नसलेला वर्ग. आज या प्रकारातील डोळ्यांवर प्रचाराचे भडक फ्लेक्स, कानांवर प्रचाराचे लाउडस्पीकर्स आणि हातात वॉट्सॅप विद्यापीठाचे बोगस सर्टिफिकेट आहे.
आणि दुसरा जो वर्ग आहे तो शतकानुशतके सरंजामशाही, जातिव्यवस्था यांची रसदार फळे चाखत आलेला आहे. साधनसंपत्ती आहे. त्याच्यापाशी ज्ञान आणि माहितीची वानवा नाही. साधनांची अगदीच कमतरता नाही. मालकीचा वेळ आहे. आणि स्वतःच्या विशिष्ट स्थानाचा दुरभिमान पुरेपूर आहे. यात जन्मलेले बुद्धीजीवी जे आजच्या नैतिक पातळीचे निर्देशक आहेत- यात भ्रष्टाचारी बाबू आहेत, जात्याभिमानी पोलीस-जवान आहेत, लबाडी करणारे वकील-डॉक्टर्स-एंजिनीअर्स आहेत. हे लोक आपली स्वतःची ऐहिक विलासाची प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठेचे स्थान मिळवणे यापलिकडे त्यांची नीतीमूल्ये फार काही डोकावून पाहात नाहीत. जे अपवाद जन्मतात घडतात, ते बिचारे एकटे पडतात, एकट्याच लढाया लढतात… आणि आजच्या घटकेला ते फुरोगामी, सिकुलर, लिब्टार्ड ठरतात आणि तरीही ठामपणे आपल्या नैतिक भूमिका बदलत नाहीत.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आणि करोडपती आमदार-खासदारांना नावे ठेवताना, किंवा खोटारड्या उचच्पदस्थांवर टीका करताना त्यांना वश होणाऱ्या आणि निवडून देणाऱ्या या दोन्ही वर्गांकडे पाहिले पाहिजे.
आपल्या नैतिक मूल्यांची घसरण काही आजची नाही. ती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. याची कारणं फार पूर्वीपासून चालत आलेल्या दबलेल्या मानसिकतेतही दडली आहेत.
आपल्याला सत्य बोला-पण कुणाला दुखावू नकाचा डोस पाजला गेलाय आणि तो चांगलाच भिनलाय. म्हणजे सोयीसोयीने सत्य नाही बोलले तरी चालेल हेच अखेर मनात उतरते. आपल्याला ज्येष्ठांचा मान ठेवा हे भरवले गेले- ते ज्येष्ठ मान न देण्यालायक असले तरीही, वयाकडे पाहून त्यांच्या पायांना हात लावा. म्हणजे नाटक करणे महत्त्वाचे हे आपण आपोआप शिकत गेलो.
का लोक निर्भेळ खोटे वागणाऱ्याला, खोटे दावे, खोटा इतिहास, खोटी वचने देणाऱ्याला निवडून देतात आपला प्रतिनिधी म्हणून? कारण एक तर नक्कीच की त्यांना तो आपलासा वाटतो. खोटं बोलण्यात फारसं चूक काय असतं? सगळेच खोटं बोलतात, रोज काही ना काही खोटं वागतोबोलतोच आपण.
खोटं बोलणाऱ्या पंतप्रधानाविरुद्ध क्षोभाचा कल्लोळ का उमटत नाही? प्रचारात खोटं बोललं जाण्यात कुणाला फारसं वावगं कां वाटत नाही? अरे निवडणुका आहेत, युद्धच आहे ते. माहीतीए ना… प्रेमात आणि युद्धात सारं माफ असतं. आता द्वेषात आणि युद्धात सारं माफ असतं असा नवा फंडा झालाय. आत्ताआत्तापर्यंत जे वर्तन अमान्य केलं जात होतं, जी भाषा त्याज्य ठरवली जात होती ती भाषा लाल किल्ल्याच्या मंचावरूनही यायला लागली, संसदेच्या बाकांवरूनही यायला लागली, तर मग कालांतराने का होईना तिच्या त्याज्य असण्याची धार कमीच होत जाते. पूर्वी ज्याला गटार म्हटलं जायचं ती आता जराशी प्रदूषित नदी ठरते आहे. मान्यता मिळू लागली आहे गटाराला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रीय उच्च पातळीवरच्या सर्व सत्ताधारी नेत्यांचे आणि त्यांच्या पक्षाने चालवलेल्या प्रचारातील असत्य चौफेर वेशीवर टांगले गेले. त्यांच्या मातृसंघटनेच्या काठावरच्या संघटनांनी, जालीय संस्थळांनी चालवलेल्या प्रचारातले असत्य अधोरेखित करण्यात आले.  पंतप्रधानांनी पातळी सोडण्याचीही सर्वात खालची पातळ गाठली. पण एक पंतप्रधान देशाच्या इतिहासातील एका महान व्यक्तीबद्दल, एका माजी पंतप्रधानाबद्दल इतकं खोटं बोलतो आहे याबद्दल जनक्षोभ उसळला नाही. विरोधकही आता हां मोदी ना- ते खोटं बोलतातच अशा काहीशा एक प्रकारे मान्य करण्याच्या पायरीला येऊन पोहोचले आहेत. पण मतदाराचं नवल आहे. खोटं बोलणाऱ्या माणसाला नाकारायची गरज त्यांना वाटत नाही. कारण खोटं बोलणं हा त्यांच्याही जगण्याचा भाग झाला आहे? हा एकंदरीत आपल्या मूल्यव्यवस्थेचाच पराभव आहे हे हळुहळू अधिकाधिक स्पष्ट होत जात आहे.
आज आपल्या देशात नुसतेच खोटे बोलणे हे वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवण्यात आले आहे. खोट्याची कलाकुसर करणारा मोठा उद्योगच उभारला गेला आहे. मेक इन इंडिया. एकेक असत्ये घेऊन ती आपल्या पगारी सेनेच्या मार्फत सजवून, मीठमिरी लावून पसरवण्याचे काम चालते. या कामाचा पगार घेणाऱ्यांचे वेगळे. ते केवळ पोटभरू बुणगे सैनिक. त्यातल्या एखाद्याची सदसद्विवेकबुद्धी जागी होते. बाकी तसेच खांद्यावर बंदुका वाहत रहातात. किंवा पगार न घेता देशाचे भले हे करू शकतील या फसव्या विश्वासापोटी काम करायला घेणारीही फौज आहे,  अनेक पगारी, बिनपगारी लोक असे आहेत की जे हे असत्य आहे, अनैतिक आहे हे स्पष्ट दिसत असूनही डोळेझाक करतात. कारण हे असत्य कालपरत्वे त्यांची अस्मिता बनून जाते. त्यांची ओळख बनून जाते. आपल्या अवतीभवती ही माणसे सहजच दिसतात. भाषेवर उत्तम प्रभुत्व, थोडीफार इतिहासाची जाण, साहित्यिक मूल्यांचे भान असलेली ही माणसे असत्याच्या पकडीत स्वतःची ओळख गडद करू शकतात पण स्वतःचे नैतिक भान गमावून बसतात. ती केवळ एका इतिहासाच्या जोखडाखाली सापडलेल्या वर्तमानाच्या घाण्याभोवती फिरत रहातात. त्यांच्या बाबतीत असत्याचे हीनत्व संपते आणि ती एक जीवनावश्यक कला बनून जाते.
नेत्याने पेट्रोल-डीझेल स्वस्त होऊ दिले नाही, डाळतांदूळ परवडेलसे ठेवले नाही, वचन दिलेली कर सवलतही दिली नाही, पक्षाच्या आय़टीसेल व्यतिरिक्त क्षेत्रात नोकऱ्या तयार झाल्या नाहीत, अतिरेक्यांचा खात्मा झाला नाही किंवा पाकिस्तानला धडा मिळाला नाही हे सारेसारे गौण ठरवण्याची असत्यभक्ती त्यांच्यात कशी काय भिनत जाते या प्रश्नाचे उत्तर एवढेच आहे की त्यांना सत्याशी देणेघेणे उरले नाही.
आपली संघटना म्हणते तेच सत्य, आपला नेता आणि त्याचा चोपदार जे सांगतो तेच सत्य अशी मनोभूमिका तयार आहे. आणि मेंदू वापरायला वेळ नसलेले, किंवा क्षमता हरपलेले लोक कुणाच्याही सत्यासत्यांनी फरक पडण्यापलिकडे गेले आहेत ही दुसरी मनोभूमिका.
आज सत्याची, सभ्यतेची बाजू लावून धरणारे लोक पप्पू ठरत आहेत. जोराजोरात खोटे सांगण्याची क्षमता नसलेले लोक बिनकामाचे ठरत आहेत हे चित्र जर निर्णायक निवडणुकांतून उभे रहात असेल तर मग सत्य पराभूत होत आहे हे नक्की. निर्लज्जपणे वाट्टेल ते खोटेनाटे नागरिकांच्या तोंडावर मारले जात असेल आणि त्याचा जाब नागरिकांनी विचारला नाही तर त्याची किंमत देशाला चुकवावी लागेल. आज आणि उद्या.
निवडणुकीत पंतप्रधानांच्या गँगने जे काही केले त्या असत्याचे भान बाळगणे अधिक मह्त्त्वाचे आहे असे मला वाटते. त्या खोटेपणामागील अनैतिकतेकडे आपण हसून दुर्लक्ष केले तर आपल्या झेंड्याच्या आणि आपल्या ब्रीदाच्या चिंध्या झालेल्या आहेत अशे खुशाल समजावे.

(लेखिका रोखठोक लेखनासाठी प्रसिद्ध आहेत)

Previous articleव्यवहारज्ञानाचे नियम झुगारून प्रेम करणाऱ्या प्रेमिकांसाठी -‘सिड्युसिंग मिस्टर परफेक्ट’
Next articleनथुराम तुमचा कोण होता?- निखिल वागळे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.