नितीन गडकरी नावाची एका राजकीय ब्रॅण्डची गोष्ट

-रघुनाथ पांडे

“महाराष्ट्रात जशी ठाकरी भाषा आहे. तशीच गडकरी भाषाही आहे. अगदी रोखठोक. लेचीपेची नसलेली. भिडमुर्वत न बाळगणारी. थेट झोंबणारी. नाका-तोंडाला. जनतेला न्याय देणारी ‘गडकरी भाषा’! असं तिला म्हणतात. या भाषेतून संवेदनशीलपणा डोकावतो. व्यवस्था, नेते, राजकारण, प्रशासन, सरकारला त्यांच्या बोलण्यातून सुधारणेचेच संकेत मिळतात. कितीही कठोर किंवा प्रमाणाबाहेर कटू बोलले तरी ‘समजनेवालों को इशारा काफी’ असेच त्यांचे मत होते. ते विकासाचा ब्रॅण्ड झाले आहेत.

…………………………………………..

ही एका ब्रॅण्डची गोष्ट आहे. प्रचंड आवडीचा. टोकदार टीकेचा. महाप्रचंड झपाट्याचा. देशभर प्रसिद्ध पावलेला आणि विश्वासावरच जग जिंकणारा एक विलक्षण राजकीय ब्रॅण्ड. या ब्रॅण्डचे नाव आहे. नितीन गडकरी!

हा ब्रॅण्ड आश्वासक आहे. बिनतोड आहे. अचूक आहे. नखशिखांत राजकारणात मुरलेला असूनही जगरहाटीत लुप्त होत चाललेल्या ‘विश्वास व शब्द’ यावरच या ब्रॅण्डची मदार टिकून आहे. म्हणूनच, गडकरी जे बोलतात ते जनतेलाच  नव्हे, तर त्यांच्या राजकीय विरोधकांनाही आपलेच वाटते. त्यांच्या संतापाला अनुभवाचे बळ असते. त्यांच्या शब्दांना विश्वासाची जोड असते. कुणाला ते बोल म्हणजे टीका वाटते, कुणी त्याला कान टोचले म्हणतात. कुणी इशारा तर… कुणी ‘सावध ऐका पुढच्या हाका…’ असेही समजतात. पण गडकरी बोलताना तमा बाळगत नाहीत. आपला-तुपला करत नाहीत. हा राजकारणी आपला तो त्यांचा हाही भाव नाही. त्यामुळेच त्यांच्या खडसावण्यातून संवेदनशीलपणा डोकावतो. व्यवस्था, नेते, राजकारण, प्रशासन, सरकारला त्यांच्या बोलण्यातून सुधारणेचेच संकेत मिळतात. कितीही कठोर किंवा प्रमाणाबाहेर कटू बोलले तरी ‘समजनेवालों को इशारा काफी’ असेच त्यांचे मत होते.

पण गडकरींना त्यांचे कटू आणि थेट बोलणेही कैकदा अडचणीत आणते. त्यांचे गंभीर परिणाम त्यांनी अनेकदा भोगलेही आहेत. त्यांची राजकीय कोंडी म्हणा की पक्षीय अस्तित्वाची झुंज समजा, गडकरींनी त्यांच्या परखड बोलण्याने बरीच किंमत चुकवली आहे. ती जनतेला, जवळच्या लोकांना अनेकदा दिसलीही. दिसतेही. पण हा नेता ‘विकासाचा महामार्ग’ असल्याने पुन्हा फिनिक्स होतो. दिल्लीकर म्हणतात, ‘गडकरी का काम बोलता है’. महानायक अमिताभ बच्चन हे तर तारीफ करताना हातचे राखून ठेवत नाहीत. अगदी अलीकडेच अमिताभ म्हणाले, गडकरी म्हणजे,‘ विश्वास, शब्द आणि अचूकता.’ बिल आणि मिलिंडा गेट्स कुटुंबाने गडकरींच्या शब्दांखातर पाणी, शिक्षणात आर्थिक मदत केलीच पण दिल्ली ते गडचिरोलीपर्यंतच्या गरिबांसाठी जे करणे शक्य आहे, ते करू असा शब्द दिला. गडचिरोलीच्या श्रमिकांनी बनवलेली बांबूची सुटकेस प्रियांका चोप्रा घरी घेऊन गेली आणि गडकरींना म्हणाली, ‘आदिवासींच्या हाताला यामुळे रोजगार मिळणार असेल तर मी नि:शुल्क बांबूची ब्रँड अँबेसिडर होते’. तिने बॉलिवूडमधील अनेकांना मग याच सुटकेस भेट दिल्या. प्रियांका गांधी यांनी हल्दीया ते कोलकाता गंगा नदीतून प्रवास केला आणि उतरल्यावर गडकरींच्या जलवाहतुकीचे कौतुक केले. सोनिया गांधी यांनी तर ‘रस्ते बांधावे ते गडकरींनीच’ असे संसदेत जाहीरपणे म्हटले आणि तसे पत्रही गडकरींना दिले. शिवाय आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाची यादी दिली.

सांगायचा मतलब इतकाच की, गडकरींचे काम बोलते, असे जाणकार जेव्हा म्हणतात, तेव्हा आपल्या मंत्रालयाने चूक केली, कामे रखडवली, अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केला तर गडकरी कसे तीक्ष्ण बोलतात हे परवा सगळ्यांनी पाहिले. यात वावगे काहीही नाही. जी भाषा प्रशासनाला समजते, त्याच भाषेत गडकरी कान पिळतात. परवा, महामार्ग प्राधिकरणाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात गडकरींनी अधिकाऱ्यांचा जो ‘क्लास’ घेतला, तो अत्यंत योग्य आहे. महाराष्ट्रात जशी ठाकरी भाषा आहे. तशीच गडकरी भाषाही आहे. अगदी रोखठोक. लेचीपेची नसलेली. भिडमुर्वत न बाळगणारी. थेट झोंबणारी. नाका-तोंडाला. जनतेला न्याय देणारी ‘गडकरी भाषा’!

वक्तशीरपणा हा गडकरींच्या कार्यशैलीचा परमोच्च समाधान बिंदू आहे. त्यासाठी ते जीवाचा आटापिटा करतात. कोकणातील सावित्री नदीवरील पूल त्यांनी विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केला. देशातील अनेक महामार्ग, बोगदेही त्यांनी अभूतपूर्व वेळेत पूर्ण केले. त्यासाठी त्यांनी संबंधितांचे कौतुक करताना मन आखडते घेतलेले नाही. पण जेव्हा वेळेत होणारे काम रखडते तेव्हा गडकरींचा पारा तापमानाच्या सगळ्याच ‘डिगऱ्या’पार करतो. महामार्ग प्राधिकरणाची दिल्लीतील इमारत बांधायला बारा वर्षे लागली. त्यावरून गडकरी पराकोटीचे संतप्त झाले. अकार्यक्षम अधिकाऱ्यांचे बुरखे फाडताना त्यांनी, ‘मीडियाने मलाही एक्सपोज केले तरी चालेल.’ इतकी टोकाची भाषा वापरली. याचा अर्थ एकच होतो की, गडकरींच्या सहनशीलतेचा अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेने ‘अंत’ पाहिला.

२००८ मध्ये या इमारतीचे काम प्रास्तावित होते. २०११ ला टेंडर निघाले. काम पूर्ण होण्यासाठी जवळपास नऊ वर्षे लागली. यादरम्यान प्राधिकरणाचे सात अध्यक्ष बदलले. केंद्रात दोन सरकारे आली. तरीही बांधकाम सुरूच होते. हा खरंच चीड आणणारा प्रकार आहे. अधिकारी आपल्याच इमारतीबद्दल इतके उदासीन असतील तर जनतेच्या कामात किती चालढकल ते करत असावेत, याचे सात्विक मोजमाप करण्यास गडकरींना या प्रसंगाने बाध्य केले. शेवटी, गडकरींना अधिकाऱ्यांसाठी टकमक टोकाची भाषा वापरावी लागली. इतका कडेलोट त्यांचा झाला!!

गडकरी मोठ्या मनाचे व संवेदनशील नेते आहेत. त्यांची भाषा कठोर जरूर असेलही पण कैकदा गरजेची असते. अलीकडचे उदाहरण घेऊ. ‘कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण करू नये. राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्यावे,’ असा सल्ला गडकरींनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला होता. यासाठी त्यांनी ‘डंमरू’ हा  विलक्षण शब्द वापरला. राजकारणात यामुळे जायचे व द्यायचे ते संकेत गेले. ते म्हणाले होते, ‘अनेकदा महाराष्ट्र सरकारच्या काही बाबी पटत नाहीत. तेव्हा मी थेट मुख्यमंत्री किंवा सचिवांशी चर्चा करतो. चुका सगळ्यांकडून होतात, अशावेळी चर्चा करून मार्ग काढायचा असतो. एकमेकांवर जाहीर टीका करून वाद निर्माण करणे टाळायला पाहिजे. एकदा हे संकट सरल्यानंतर आपण पुन्हा राजकारण करायला मोकळे आहोत.

’ राज्यातील निवडणुका तोंडावर असताना गडकरी बोलले, ‘भारतीय जनता पक्ष कधीही एकाच्या विचाराने चालला नाही. भाजपची वेगळी ओळख आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, स्वत:च्या फायद्यासाठी काहीही मिळवण्याचा प्रयत्न करू नका. किती खायचे यावर प्रत्येकाने मर्यादा ठेवल्या पाहिजे, नाहीतर डॉक्टरकडून नियंत्रण आणता येते.’

विदर्भ आंदोलन आणि गडकरी हे नाते जुने आहे. सरकार आल्यावरही वेगळा विदर्भ होत नसल्याची खंत भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याला विदर्भवादी खतपाणी घालतात. गडकरींचे एका कार्यक्रमात नागपूरमध्ये भाषण सुरू असताना काही विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करत पत्रके सभास्थळी फेकली. तेव्हा संतप्त झालेल्या गडकरींनी ‘शांत बसत नसतील तर त्यांना ठोकून काढा’, असे निर्देश पोलिसांना दिले.

कामासाठी गडकरी वाघ आहेत. केरळमधील रस्त्यांचा विषय घेऊन तेथील मुख्यमंत्री पी. विजयन चार-पाचवेळा गडकरींकडे आले. आश्वासन घेऊन ते माघारी जात होते. मात्र त्यांचे काम मार्गी लागले, असे गडकरींना अधिकारी सांगत होते. एक दिवस पुन्हा मुख्यमंत्री विजयन आले. त्यांनी रस्ते रखडल्याचे सांगितले. ते ऐकून संतप्त गडकरींच्या तोफखान्यापुढे अधिकारी आले. गडकरी त्यांना म्हणाले,‘ मी आधी नक्षलवादी होतो, नंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गेलो. मला पुन्हा नक्षली व्हायला भाग पाडू नका. वेगवेगळ्या विकासकामांच्या फाईल अडवून ठेवू नका. मला ठाऊक आहे, अडचणी निर्माण करणार कोण आहेत. इथे मी बॉस आहे हे लक्षात घ्या. राज्यातील रस्त्यांच्या कामासाठी विजयन यांनी मला भेटण्याची ही पाचवी वेळ आहे. हे लज्जास्पद आहे. वेळेत कामे झाली नाही तर गाठ माझ्याशी आहे…’ गडकरींच्या या संतापाचा परिणाम पाहायला मिळाला. मुख्यमंत्री विजयन पुढच्या भेटीत गडकरी यांच्यासाठी ‘नेयप्पम’ आणि ‘बनाना हलवा’ हे केरळी गोड पदार्थ घेऊन आले.

गडकरी बरेचदा फटकळ आणि थेट वागतात. त्यांनी मराठवाड्यातील नेत्यांना चांगलेच सुनावले होते. विकास कामात हयगय ते सहन करत नाहीत, हे त्यांना सांगायचे होते. गडकरी औरंगाबादेतील एका कार्यक्रमात म्हणाले, ‘केंद्र शासनाच्या निधीतून एखादा मोठा प्रकल्प मंजूर केला तर कंत्राटदाराला काम सुरू करण्यासाठी मराठवाड्यातील खासदार, आमदार त्याला घरी बोलावतात. अगोदर आमचे ‘काम’कर मगच पुढे विकास कामाला सुरुवात कर, असा अजब आग्रह धरतात. त्यामुळे मराठवाड्यात कामासाठी आलेले कंत्राटदार अक्षरश: कामे सोडून पळून जात आहेत. ही परिस्थिती कुठे तरी बदलली पाहिजे.’

अगदी अलीकडेच वाहतूक दंडाची कपात करणाºया गुजरात सरकारवर गडकरी संतापले होते. ‘मोटर व्हेइकल अ‍ॅक्ट २०१९’ अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या रकमेच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी दंडाच्या रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर गडकरी म्हणाले, ‘वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर आकारण्यात येणारा दंड हा कोणाचेही खिसे भरण्यासाठी नाही. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी अति वेगात गाडी चालवल्यामुळे आपल्याकडूनही दंड आकारण्यात आला होता.’

गडकरी मोकळेढाकळे नेते आहेत. बोलीभाषेत ते संवाद साधतात. नेत्यांपेक्षा त्यांचा जीव कार्यकर्त्यांत अधिक रमतो. तिथेच घुटमळतोही. ‘भाजपात सामान्य कार्यकर्त्याला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे कोणीही मंत्रिपदाच्या मोहात पडू नका.. नगरसेवकाला आमदार, आमदाराला मंत्री आणि मंत्र्याला मुख्यमंत्री व्हावे वाटत आहे; हा आपल्यामधील दोष आहे. भाजपमध्ये कोणाच्या मनाप्रमाणे काहीच होत नाही. कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांना प्राधान्य दिले जाते. मंत्र्यांचा माजी मंत्री होतो तर मुख्यमंत्र्यांचा माजी मुख्यमंत्री होतो. राजकारणामध्ये काहीच कायमचे नसते. आपल्या भोवती असणारेसुद्धा बाजूला जातात. मात्र कार्यकर्ता हा कधीही माजी कार्यकर्ता होत नाही.’

ते त्यांच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्यांना चांगलेच चेपतात. गडकरींचे सरळ धोरण आहे. ‘राजकारणात काहीही कायम राहत नाही. सत्ता आली की, काही जण उगीच सायरन वाजवतात. गडकरी यांचे एक अमर वाक्य आहे. ‘मंत्र्यांचे पीए तर चहापेक्षा किटली गरम’ असे वागतात. मंत्रिपद गेले की, आजूबाजूची सुरक्षाव्यवस्थाही हटवली जाते. त्यामुळे उगाच मोहात पडू नका,’ असा राजकारणातला वडिलकीचा सल्लाही देऊन जातात. गडकरी विद्यार्थी नेते होते. त्यामुळे त्यांचे शब्द ताजे असतात. ते उच्चारताना आडपडदा नसतो. आपण जगभर फार मोठे तीर मारतो. असा अहंभाव नसतो. जे पटते ते बोलतात. संघाचे मुख्यालय असलेल्या महाल भागात त्यांचे वावरणे. नागपुरी बोली जिभेवर खेळते. गडकरींचा जन्म कोकणात झाला असता तर ते फणसाप्रमाणे असते…पण विदर्भात जन्मूनही त्यांनी फणसाचा ‘गर’ जपला. ते विकासाचा ब्रॅण्ड झाले आहेत. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात ,‘शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धन जनलोकी..’ जनतेच्या सुविधेसाठी गडकरी असेच जगतात.

(लेखक ‘पुण्यनगरी’ च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत.)

संपर्क : ९८१८२१३५१५

Previous articleभुलाबाई आली पाच दिवसांच्या माहेरपणाला…
Next articleमुख्यमंत्रिपद म्हणजे मास्क नव्हे, जबाबदारी!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.