गडचिरोलीत ओबीसींची नाराजी भाजपला भोवणार ?

-अजिंक्य पवार
गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने  डॉक्टर नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु या मतदारसंघात काँग्रेसला गटबाजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचे काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी या मतदारसंघात उसेंडी यांच्या नावाला विरोध दर्शवून डॉक्टर कोडवते यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्षाकडे केली होती. वडेट्टीवार यांचे मोठे वर्चस्व आहे . अशा परिस्थितीत त्यांची नाराजी कॉंग्रेसला महाग पडू शकते . सिरोचा पासून आमगाव पर्यंत पसरलेला हा मतदारसंघ नक्षलग्रस्त भाग आहे. अहेरी, गडचिरोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, चिमूर, आमगाव असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.
  सध्या अहेरीत आमदार अमरीश राव आत्राम, गडचिरोली येथे डॉक्टर देवराव होळी तर आरमोरीत कृष्णा गजबे ,चिमूरमध्ये बंटी भांगडीया व आमगाव मध्ये पुराम हे भाजपचे आमदार आहेत. ब्रह्मपुरीचे प्रतिनिधित्व विजय वडेट्टीवार करतात . गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपने आदिवासी विद्यार्थी संघ व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून सत्ता हस्तगत केली आहे .गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व देसाईगंज या तीनही नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. चार्मोशी हे मोठे गाव असून येथील नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. कॉंग्रेसप्रमाणेच भाजपही अंतर्गत गटबाजीने विस्कटलेला आहे. मात्र  विद्यमान खासदार अशोक नेते यांचा मतदारांसोबत असलेला व्यक्तिगत जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाने केलेली काम व सूरजागड येथे लोह प्रकल्पासाठी सुरू असलेलं काम या विद्यमान सरकारच्या जमेच्या बाजू आहेत. स्थानिक आदिवासींच्या सूरजागड लोह प्रकल्पाला विरोध आहे परंतु इतर कुठल्याही राजकीय पक्षांनी या प्रकल्पाला विरोध केलेला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथून उत्खनन करून लोहखनिज चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथे नेण्यात येत आहे.
  आदिवासींना जमीन पट्ट्याचा प्रलंबित असलेला प्रश्न हा भाजपसाठी डोकेदुखी आहे. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसीचे कमी झालेले आरक्षण आहे, हाही प्रश्न भाजपसाठी अडचणी निर्माण करू शकतो . गेल्या काही वर्षात ओबीसी विरुद्ध आदिवासी असा सुरु असलेला संघर्ष या निवडणुकीत प्रमुख विषय असणार आहे .अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली येथे घेतलेल्या जाहीर सभेत ओबीसींच्या आरक्षणाबाबत शासन गांभीर्याने विचार करत असल्याचं जाहीर केलं. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीशिवाय ओबीसी समाधानी होतील असे वाटत नाही . या मतदारसंघात अशोक नेत्यांशिवाय दुसरा उमेदवार भारतीय जनता पक्ष जवळ नाही त्यामुळे अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे उमेदवारीसाठी नाव चर्चेत आहे. राजे अम्ब्रिशराव आत्राम चार वर्षापासून राज्यमंत्री असले तरी त्यांना या मतदारसंघात प्रभाव पाडता आला नाही.
      कॉंग्रेस पक्षातही गटबाजी आहेच. अहेरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते हे विजय वडेट्टीवार यांना मानणारे आहे. गडचिरोली लोकसभा  मतदारसंघात २००९ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  मारोतराव कोवासे यांना लोकसभेवर निवडून आणले होते. मात्र मारोतराव कोवासे यांनी नंतर वड्डेटीवार यांच्याकडे नंतर पाठ फिरवली. त्यामुळे नाराज विजय वडेट्टीवार यांनी २०१४ मध्ये  डॉक्टर नामदेव उसेंडी यांना तिकीट मिळवून दिले .मात्र त्या निवडणुकीत डॉक्टर नामदेव उसेंडी यांचा मोठा पराभव झाला.  स्वतःच्या गडचिरोली विधानसभा मतदारसंघातही ते ८० हजार मतांनी मागे होते.  त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही डॉ. उसेंडी यांना तिकीट देण्यात आले नाही .   काँग्रेसच्या नेत्या सगुना तलांडी यांना उमेदवारी देण्यात आली . मात्र त्यांचाही दारुण पराभव झाला.  आता पुन्हा एकदा डॉक्टर नामदेव उसेंडी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर पक्षातील गटबाजी हे सर्वात मोठे आव्हान आहे. या मतदारसंघात भाजपला पुन्हा विजयाची मोठी संधी आहे मात्र भाजपातील अंतर्गत बंड शमविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे .या मतदारसंघात  ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पाच वर्षापूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद बऱ्यापैकी वाढली आहे . गडचिरोली जिल्हा  परिषद व आरमोरी नगर पालिकेत भाजपची सत्ता येण्यात त्यांचा मोठा वाटा आहे .  पोरेड्डीवार तुलनेने भाजपात नवीन असले तरी त्यांची पक्षात  बरीच चालती आहे. त्यामुळे  त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दोन्ही पक्ष अंतर्गत गटबाजीला कसे निपटतात यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे .
(टीम मीडिया वॉच)
Previous articleकाँग्रेसला चंद्रपूर जिकांयचेच नाही!
Next articleतुम्हाला आईच्या योनीतून जन्मच नाही मिळणार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here