गढा मंडला: प्रेमात पाडणारं ठिकाण

-डॉ. नीलेश हेडा

वेरियर एल्विन ह्या जगप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञाच्या आत्मकथेत वारंवार मंडल्याचा उल्लेख येतो . गोंड आदिवासींसोबत काम करायला लागल्यावर गोंडांच्या साम्राज्याबद्दल माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. गोंड साम्राज्य विस्ताराचा विचार करतांना वारंवार मंडला हे ठिकाण मनात घिरट्या घालायचं. योगायोगाने का होईना, या शहराच्या, तेथील व्यक्तिच्या प्रेमात पडलो.

मध्यप्रदेशच्या ईशान्येला, मध्यभारतातल्या निबिड अशा पाणगळीच्या जंगलाने व्यापलेला, कधीतरी गोंड राजांच्या अल्ट्रामॉडर्न राज्यकारभाराने अन पराक्रमाने शहारलेल्या अन नर्मदेच्या विशाल पात्राने सिंचित झालेला मंडला जिल्हा. मंडला शहर जिल्ह्याचं ठिकाण. २००५ मध्ये मी पहिल्यांदा या शहरात गेलो अन नंतर अनेक वेळा जातच राहिलो. नागमोड्या नर्मदेच्या कुशीत वसलेलं, राणी दुर्गावतीच्या शौर्यागाथा सांगणारं आणि गोंड साम्राज्याच्या स्वर्णिम इतिहासाची साक्ष पटवणारं हे शांतीप्रिय ठिकाण. नागपूरवरुन सिवनीमार्गे मंडल्याला जातांना आसपासचा निसर्ग झपाट्याने बदलत जातो. नागपूरच्या आसपासचा उजाड प्रदेश पाणगळीच्या जंगलाने अन उंच बांधाच्या भातशेतीने हळूहळू परिवर्तित व्हायला लागला की समजावं, आता आपण दंडकारण्यात प्रवेश केला आहे. गाडी पेंच व्याघ्र प्रकल्पामधून जायला लागली, की मला मोगलीची आठवण येते. रुडयार्ड किपलिंगच्या ‘जंगल बुक’ पुस्तकात ज्याचे वर्णन आहे तो हा प्रदेश. सिवनी हे जिल्ह्याचं ठिकाण, जागोजागी इंग्रज साम्राज्याच्या खुणारेषा अजूनही अंगावर बाळगणारं हे ठिकाण. सिवनीवरुन एक राष्ट्रीय महामार्ग जबलपूरकडे निघतो अन दुसरा मंडल्याकडे. तसं सिवनी-मंडला हे अंतर (११५ कि.मी.) फार नाही. पण वाईट रस्त्यांमुळे तिथे पोहाचायला काहीसा त्रास होतो.

मंडला शहर नर्मदा नदीच्या विशाल पात्राने दोन भागात विभागलं गेल आहे. एकदा का या नर्मदेवरील विशाल पुलावर आपली गाडी आली की नर्मदेचं मनमोहक रूप पाहून प्रवासाचा सारा ताण क्षणभरात निघून जातो. शहरात प्रवेश करताना एखाद्या प्राचीन, ऐतिहासिक नगरीत आपण प्रवेश करतो आहे आणि कुठल्याही क्षणी दोन घोडेस्वार येऊन ‘गढा मंडला में राणी दुर्गावती की और से आपका स्वागत है’, असं म्हणतील की काय, असे वाटते. मंडला शहर हे नर्मदेचं शहर आहे. शहराचे सारेच संदर्भ, इतिहास, संस्कृती, सणवार, नवस, उत्सव, प्रत्येक ऋतू, प्रेयसी-प्रियकराच्या आणाभाका आणि मनुष्याचं अंतिमस्थान सारं काही नर्मदेशी जोडलेले. शहरासाठी नर्मदा फक्त नर्मदा नाही, “मां नर्मदा” आहे. शहराचा प्रत्येक भाग हा नर्मदेशी कायमच संपर्कात असल्यासारखा असतो. ‘सहस्त्रधारा’, ‘हाथी घाट’, ‘जेल घाट’, ‘उर्दू घाट’, ‘वैद्य घाट’, ‘महंतवाडा घाट, हे सारे घाट सदैव ‘सुमत्स्य, कच्छ, नक्र, चक्र, चक्रवाक शर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे’ च्या जयघोषाने दुमदुमत असतात. वर्धेजवळच्या पवनार आश्रमात गंगेची सुंदर मूर्ती आहे तशीच एक रेखीव, मगरेच्या वाहन असलेल्या नर्मदेची मूर्ती मंडला जवळच्या पुरवा गावात आहे.

मी नदी प्रेमी, माशांचा अभ्यासक असल्याने मंडल्याला पोहोचलो की तडक घाटावर जातो. ढिवर, मल्लाह, केवट हे पारंपरिक मासेमार नर्मदेच्या विस्तिर्ण पात्रात होडीवर मासेमारी करतांना बघणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. नर्मदेचा ‘सहस्त्रधारा’ हा घाट नैसर्गिक सौंदर्याचा अमीट असा आविष्कार आहे. नर्मदेचा हट्टी प्रवाह असंख्य पाषाणांच्या सुळक्यावरुन कापला जाऊन नर्मदा अनेक धारांमध्ये विभागली जाते म्हणून या ठिकाणाला ‘सहस्त्रधारा’ म्हणून ओळखले जाते .
मंडल्याला एक स्वर्णिम इतिहास आहे. मात्र हा काही मोजके जाणकारांचा अपवाद वगळता मंडलाकडे फार कोणी फिरकत नाही. मंडल्यापासून ४० कि.मी. अंतरावर भारतातले पहिले जीवाश्म राष्ट्रीय उद्यान आहे. ६.५ कोटी वर्षांपूर्वीचे वनस्पती प्राण्यांचे अवशेष इथे सापडतात. ३० हेक्टरच्या क्षेत्रफळात पसरेले हे राष्ट्रीय उद्यान पृथ्वीच्या जिऑलाजिकल इतिहासाचे दृष्य उदाहरण आहे. केळीच्या फळात पूर्वी बिया होत्या, निलगिरी हा वृक्ष भारतीय आहे, अशा अनेक नवीन गोष्टींचा खुलासा याच  जीवाश्म उद्यानामुळे झाला. ह्या उद्यानात फेरफटका मारतांना करोडो वर्षांच्या जीवनाचे अवशेष ठिकठिकाणी विखुरलेले दिसतात.

महाभारत काळापासून हा प्रदेश महाप्रतापी नाग वंशीयांचा प्रदेश म्हणून सुप्रसिद्ध होता. महाभारतात अनेकदा आर्यांच्या व नागांच्या संघर्षाची कहाणी आहे. मंडला हे नागांचं महत्त्वाचं ठाण असावं. मंडलापासून २८ कि.मी. वर नर्मदा आणि तिची एक छोटी उपनदी बुढणेरच्या संगमावर देवगांव नावाचं गाव आहे. शीघ्रकोपी जमदग्नी ऋषींच्या आश्रमाचं ते गाव. प्राचीन ग्रंथात मंडला शहराचे नाव महिष्मती नगरी असे आढळते. महिष्मतीचा राजा सहस्त्रबाहू याने परशुरामाच्या वडिलांना म्हणजे जमदग्नीला मारुन त्याच्या गाई पळवल्या .त्यामुळे चिडून जाऊन परशुरामाने सहस्त्रबाहूच्या सर्व वंशाचा नाश करून सूड घेतला. अशी कहाणी आहे . देवगाव मध्ये एका गुफेमधल्या मंदीरात आकर्षक शिवलिंग आहे. त्याच ठिकाणावरुन पूर्वेला १३ किलोमीटरवर  एका पहाडावर परशुरामाचा आश्रम आहे. तिथेच सिंगारपूर या ठिकाणी राजा दशरथाच्या पुत्र कामेष्ठी यज्ञानंतर शृंग ऋषी  येऊन राहिले, अशी आख्यायिका आहे. कबिराने जेथे तपस्या केली असे सांगितले जाते , ते कबीर चबुतरा सुद्धा मंडल्यापासून अगदी जवळ आहे. याच ठिकाणी शिखांचे गुरु नानक आणि कबिरची भेट झाली होती. मंडला शहरात असलेल्या कबीर पंथीय लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे काशी आहे. नर्मदेचे उगमस्थान असलेले अमरकंटक मंडलापासून १०० कि.मी. वर अंतरावर आहे.

मंडला हे गोंड साम्राज्याचं महत्त्वाचं ठिकाण. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून गोंड राजा संग्रामशाही यांनी आपल्या राज्याचा विस्तार मंडलापासून ५२ गढांपर्यंत केला. १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच त्याच्या राज्याचा विस्तार भोपाळपासून  छोटा नागपूरपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून चांदा (चंद्रपूर) पर्यंत केला. दुर्गावती ही संग्रामशाहीची पत्नी. संग्रामशाहीचा तरुणवयातच मृत्यू झाला. त्यानंतर राणी दुर्गावती मंडलाच्या सिंहासनावर आरुढ झाली. विद्वत्ता, ऐश्वर्य, कला व संस्कृतीचा अत्युच्च संगम हिच्या काळात झाला, असे सांगितले जाते . त्या काळी अकबराने राणी दुर्गावतीच्या राज्यकारभाराचा अभ्यास करण्यासाठी एक दूत मंडल्याला पाठवला होता. मंडल्यामध्ये नर्मदा आणि बंजर नदीच्या संगमावर वसलेला गोंडांचा ऐतिहासिक किल्ला गोंड साम्राज्याच्या उत्कर्ष आणि पतनाचा मूक साक्षीदार आहे. किल्ला तिन्ही बाजूने नर्मदेने वेढलेला असून चौथ्या बाजूने दोन मोठमोठे खंदक निर्माण केले आहेत. किल्याच्या आत राजराजेश्वरीचे मंदीर संग्रामशाहीने बनवले होते. मात्र राणी दुर्गावतीनंतर गोंडांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि एका स्वर्णीम युगाचा अंत झाला. आता त्या स्वर्णयुगाचे भग्न अवशेषच शिल्लक आहेत.

निसर्गाने मंडल्यावर भरपूर कृपादृष्टी केलेली आहे. कान्हा हा जगप्रसिद्ध व्याघ्र  प्रकल्प मंडल्यापासून १०० कि.मी. अंतरावर आहे. मंडला शहरात गर्द झाडी आहे, उद्यानं आहेत, पुतळे आहेत आणि जिल्ह्याचे ठिकाण असूनही फार धावपळ नाही. मंडल्याच्या रस्त्यावरुन अनेक युगं एकाच वेळी हातात हात घालून मार्गक्रमण करतांना दिसतात. आजूबाजूच्या गोंड टोल्यावरुन मंडल्याच्या बाजारात अनवाणी पायाने लाकडाच्या मोळ्या, कोळसे, बांबूच्या गवताच्या विविधांगी वस्तू आणणारी गोंड मंडळी मनाला एका वेगळ्याच प्रदेशात घेऊन जातात. अजूनही आपली समाज व्यवस्था ही जैवभार आधारित समाजव्यवस्थाच आहे हे मनाला पटते. विविधता ही मंडल्याच्या एकूणच जीवनाचा महत्वाचा भाग आहे. मंडला बाजारात असंख्य प्रकारचे मासे, भाज्या, कंद, मातीची विविध आकाराची भांडी आणि विविध प्रकारचे गुण्यागोविंदाने नांदणारे लोक पाहावयास मिळतात . येथील सर्व घटकांना  नर्मदेबद्दल असणारी आस्था, श्रद्धा मोठी विलोभनीय आहे. देशाच्या अन्य भागांतील  नद्या मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या आहेत मात्र  मंडल्याची नर्मदा अजूनही यौवनावस्थेतच असल्यासारखी दिसते. नागपूरकडे जाणारी बस नर्मदेच्या एक किलोमीटर लांब पुलावर पोहोचते, तेव्हा आपोआप प्रवाशांचे हात जोडले जातात.

(लेखक संशोधक व कृषिप्रेमी आहेत)

9765270666

Previous articleभारतीयांना नवजीवन देणाऱ्या ‘मान्सून’ चा वेध
Next articleगुलाबो सिताबो: शूजित सिरकारचा आणखी एक अप्रतिम चित्रपट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.