अकरा जून रोजी दुपारी बारा वाजता ‘बिमान बांगला’ फ्लाईट क्र 088 मधून प्रवास आरंभ होणार म्हणून सकाळी पाच पासूनच लगबग सुरु झाली. ठीक सात वाजता टॅक्सीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालो व आठ वाजता पोचलो सुद्धा. ठरलेल्या जागी एस्कॉर्टची शोधाशोध सुरू झाली. मात्र विदेशवारीत सराईत असल्याने त्यांचे टाईम मॅनेजमेंट चोख होते. ते बरोबर नऊ वाजता येणार असे कळले. तो पर्यंत एक तास टिवल्या बावल्या करीत एअरपोर्टचे बाहेरून अवलोकन सुरू झाले. सोबतच एन्ट्री गेट्सची सरळ व उलट गिणती, विदेशी प्रवाश्यांची हालचाल, ट्रॉलीवर लगेज ठेवून ढकलण्याची प्रॅक्टिस, फोटो सेशन, इंटरनॅशनल रोमिंग सीमची गळ घालणारे एजन्ट्स, इत्यादी! नेहमी विदेश यात्रा करणारे मात्र आपल्याच देशाच्या या नवख्या यात्रेकरूंकडे हिणकस दृष्टीने बघत होते. हळूहळू परिषदेत सहभागी होणाऱ्या सह-यात्रेकरूंची आवक वाढत गेली. जुन्या-नव्या ओळखीतून संवाद साधल्या जाऊ लागला. फोटो, चहा-नाश्ता इत्यादी मधून वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रत्येकाची ‘कोशीश जारी’ राहिली.
“आपण काही क्षणातच ‘बंग बंधू’ मुजीबुर रहमान यांच्या भूमीवर उतरणार! बांगला देशाच्या निर्मितीसाठी बंग बंधूंच्या नेतृत्वात मुक्ती सेनेचा लढा, मुक्ती सेनेला इंदिराजींच्या खंबीर नेतृत्वाची मिळालेली साथ, पाकिस्तानच्या जुलमी जोखडातून मुक्त झालेला ‘आमार सोनार बांगला’, मानवी मूल्यांसाठी लढणारी ‘तस्लिमा नसरीन’, नोबेल पारितोषिक विजेते ‘मोहम्मद युनूस’…अशा कित्येक आठवणींनी भराभर स्मृती चाळल्या गेली. भारताची फाळणी झाली नसती तर आज आमचे सार्वभौमीत्व ‘लाहोर’ पासून ‘ढाक्या’ पर्यंत अबाधीत राहिले असते. इंग्रजांच्या कुटील नीतीने भारतभूमीवरच दोन मुस्लिम राष्ट्रे उभी झाली. कधीकाळी एकत्र नांदनाऱ्या भावंडामध्ये स्वार्थी राज्यकर्त्यांनी धार्मिक कट्टरता पेरून त्यांना कायमचे वैरी करून टाकले. या खेळीतून राजकारणी आणि धर्ममार्तंड गब्बर झाले आणि जनता कायमची गरीब!
वेळ पुढे सरकत गेला आणि विमान सायंकाळच्या सुमारास थायलँडची राजधानी बँकॉकच्या आकाशात शिरले. कित्येक दिवसापासून ज्या स्वप्न नगरीची वाट पाहत होतो, ती प्रत्यक्ष दृष्टीक्षेपात आली होती. ऐन दिवेलागनीची वेळ असल्याने कृत्रीम दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण आसमंत झगमगून गेला होता. पथ-दिव्यांच्या रांगेतून शहर किती आखीव-रेखीव आहे याची कल्पना आली. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचत चालली होती. तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानाने पावन झालेल्या या भूमीला आपण साक्षात स्पर्श कधी करतो असे प्रत्येकाला वाटत होते. आता दिव्यांची रचना अधिक स्पष्ट झाली होती, एका हलक्या धक्क्यासरशी विमान बँकॉकच्या ‘सुवर्ण नगरी’ विमानतळावर उतरले. आणि अगदी नावातूनच भारतीयतेचा सुगंध दरवळला.
काँफेरन्सच्या दुसऱ्या दिवशी हॉल मध्ये येतानाच रूमचे चेक-आउट करुन घ्यावे आणि आपले सामान खाली उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये ठेवावे असे सांगितले होते. आज बॅग्स गाडीत ठेवताना कुणालाही, चोरीची साधी शंका सुद्धा आली नाही. अगदी दोनच दिवसात थाई लोकांनी एवढा विश्वास संपादन केला होता. ‘आपल्या देशात आयुष्य गेले तरी शेजाऱ्याचा विश्वास मिळविता येत नाही’. कदाचित तथागतांच्या ‘प्रज्ञा-शील-करुणा’ या तत्वांना अव्हेरल्याने तर आपली ही दयनीय अवस्था झाली नसेल! असो.
बाकी आर्टिकल ची वाट पाहत आहोत