स्वप्ननगरी पटाया

-प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत

बँकॉक ते पटाया हे दोनशे किमीचे  अंतर. बसने बाहेर निघेपर्यंत जवळपास सर्व बँकॉक शहराचा फेरफटका मारला. चकचकीत रस्ते,  उंच टॉवर्स, फ्लायओव्हर्स, मेट्रो, एस्केलेटर्स, आणि गावातून वाहणाऱ्या नदीने तर अर्धे शहर जणू ‘माल्टा’ करून टाकलेले. एक छोटासा देश आपल्या मोजक्या संसाधनांच्या भरवशावर जागतिक पर्यटन स्थळ बनू शकतो, थायालंडने दाखवून दिले आहे.

आम्ही सायंकाळी पटायाला पोचल्यावर सरळ जगप्रसिध्द ‘अल्काझर-शो’ साठी आम्हांला नेण्यात आले. एका भव्य इनडोअर थिएटरमध्ये प्रवेश केल्यावर लेझरच्या सप्तरंगी आकृत्यांनी वातावरण ‘चकाचौंध’ करून टाकले होते. त्यानंतर हळुवारपणे मयूराच्या पदन्यासाने पिवळ्या-गुलाबी प्रकाशझोतात अगोदर ‘असंख्य पऱ्या’ और आखिरमे “स्वर्गपरी” मंच्याच्या मधोमध अवतरली. …आणि मंडळींच्या हृदयाचा ठोका चुकला. संगीताच्या नाद माधुर्यात कोकीळ स्वर-लहरींवर नृत्याचा साज चढला व अख्खा ऑडिअन्स ‘मदहोश’ झाला.

पुढे दोन तास, थाई संस्कृतीच्या विविधांगी पैलूंना नृत्याविष्कारातून साकार होताना पाहून आमची मंडळी बेफाम झाली. शेवटी भारताच्या ‘आजा नच ले’ ने तर ‘त्सुनामीच’ आणली. अख्ख्या शोची गुंफण इतक्या चपखलपणे केली होती की, कुणालाच क्षणभरही तंद्रीतून बाहेर येणे जमले नाही. आरसपानी सौंदर्याच्या पऱ्यांनी आमच्या मंडळींवर अशी काही ‘मोहिनी’  घातली की, इच्यारता सोय नाई ! मध्येच आपल्याकडील सर्कशीत जोकर येतात तश्या दोन कमालीच्या ‘लठ्ठ पऱ्या’ धुमकेतूसारख्या मंचावर आल्या. आणि आपल्या अजस्त्र वक्ष-स्थळांच्या विक्षेपांनी असा काही धुमाकूळ घातला की, मंडळी गुदमरुन अर्धमेलीच झाली. पुढे प्रवासभर कॉन्फरन्समधील लठ्ठ-देहधाऱ्यांना ‘अल्काझर’ या ‘टोपण’ नावानेच संबोधले जायचे.

अल्काझर-शो संपल्यावर  मंडळी  भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडली, तर शो-मधल्या सर्व पऱ्या बाहेर ‘मौजुद’! ज्यांना आताच मंचावर बघितले. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी वारेमाप गर्दी झाली होती. प्रत्येकाला बिनधास्तपणे आलिंगन देत त्या फोटोसाठी ‘पोज’ देत होत्या.

मग काय! आमची मंडळी सुद्धा इप्सित साध्य करण्यासाठी पुढे सरसावली. हळूच कानात कोणीतरी कुजबुजले “हे सर्व ‘पुरुष’ आहेत!”

त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. पण शेवटी सत्य मान्य करावेच लागले. जेनेटिक्सची किमया, प्लास्टिक सर्जरीची कमाल आणि नियतीचा खेळ बघून या तृतीयपंथीयांबद्दल शेवटी मन करुणेने भरून आले.

एका मार्मिकतेची झालर असलेल्या अल्काझर-शोच्या स्मृती मनाच्या कुपीत साठवून  काफीला वीस किलोमीटर अंतरावरील विस्तीर्ण समुद्रकिनारी मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या फाइव्ह स्टार  हॉटेल ‘एम्बेसेडर’ मध्ये येऊन विसावला.

रात्री अकरा वाजता, चंद्रांच्या उजेड व नीरव शांततेत समुद्रकिनारी शतपावली करताना दिवसभरातील घटना नजरेसमोर तरळून गेल्या आणि मन नि:शब्द झाले!

तेरा जून, सकाळी नाश्त्याच्या वेळेसच कॉन्फरन्सची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तेव्हा परत ‘झुंबड’ उडाली.

हम नही सुधरेंगे!

नऊच्या सुमारास गाड्या ‘कोरल आयलंड’ करिता निघाल्या. समुद्रकिनारी काफिल्याला सोडल्यानंतर वीस-वीसच्या गटाने मंडळीस बोटीतून ‘पॅरासेलिंग’ प्लॅटफॉर्म असलेल्या भक्कम बोटीवर उतरविल्या गेले. पॅरासेलिंग करताना  ‘उंच आकाशातून झपकन समुद्राच्या पाण्यात आणि तेवढ्याच वेगाने वर जाणे’ हा अनुभव खूपच रोमांचकारी होता. काही ‘रणछोडदास’ मंडळींनी  पॅरासेलिंगला तिकीट काढूनही दुरूनच राम राम केला. दोन तासानंतर बोटी आल्या आणि मंडळीला घेऊन निघाल्या. मागे वळून शहराच्या उंच उंच इमारती, समुद्रात नारळाची झाडे उगवल्यागत खूपच आकर्षक दिसत होती. बोटींनी जसा वेग धरला तसे समोर बसलेल्यांची तारांबळ उडत होती. बोट लाटेवरून वर जायची आणि पुढल्या क्षणी पाण्यावर आपटायची त्यामुळे बऱ्याच जणांचे ‘पार्श्वभाग’ चेपले गेले. अशातच एकाने समयसूचकता दाखवून “मूळव्याधीवरील रामबाण उपाय” अशी कोटी केली, त्यावर पार्श्वभागाचे दुखणे विसरून मंडळी खळाळून हसली. कोरल आयलंडच्या किनाऱ्या समीप ‘सी-वॉक’ साठी बनविलेल्या बोटीवर मंडळी उतरली.’सी-वॉक’ म्हणजे प्रत्यक्ष समुद्रतळाची सफर. तेथील प्राणी व वनस्पती जगतात मुक्त विहार! या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभा झाला.

मात्र येथे एक अट अशी होती की, ‘उच्च रक्तदाब’ व ‘हृदयरोग’ असेल तर संधी नाही. त्यामुळे काही मंडळी हिरमुसली. मात्र अनायसे एक ‘अल्काझर’ जोडी बोटीवर असल्याने त्यांना बघत ते काहीअंशी सुखावले. मात्र ज्यांना ‘सी-वॉक’ची संधी मिळाली त्यांनी याचे सोने केले. प्रथम ‘सी-वॉक’ दरम्यान वापरावयाची सांकेतिक भाषा जाणून घेतली, मापाचे बूट पायात चढविले, ऑक्सिजन पुरवठा करणारे सात किलो वजनाचे हेल्मेट धारण केले, आणि चार-सहा जणांचा गट करून एका ‘डायव्हर कम गाईड’ सोबत समुद्रतळ गाठला. निर्देशानुसार गटातील सर्वजण एक दुसऱ्याचे हात पकडून होते. तेथील ‘नजारा’ अदभूत होता.

सोबतीला असलेल्या गड्याने मोठमोठ्या खडकांच्या कपारीतून समुद्रीजीव सी-ऍनिमून, सी-अर्चीन, सी-कुकूम्बर, रंगीबेरंगी मासे, कोरल्स, नानाविध वनस्पती आमच्या  हातावर ठेऊन वेगळीच अनुभूती दिली. एवढ्यात त्याच गड्याने प्रत्येकाच्या हातात ब्रेडचा तुकडा दिला, तर क्षणार्धात माशांची झुंबड प्रत्येक हाताभोवती गोळा झाली. दुसऱ्याच क्षणी “ब्रेड गायब और मासे भी गायब”!  अगदी ‘अनिमल प्लॅनेट’ आणि ‘डिस्कव्हरी’ चॅनेल्स डोळ्यासमोर तरळून गेले. समुद्रतळाशी गट्टी जमल्याने काहींनी प्रत्यक्ष कपारीतून प्राणी काढन्याचा प्रयत्न केला पण त्यांना फार कमी यश मिळाले. अशातच वर जाण्याचा संकेत आला आणि इच्छा नसतानाही वर जाणे भाग पडले. वर पोचल्यावर समुद्राच्या गाभाऱ्यातील त्या अफाट-अगम्य विश्वाला आपोआप हात जोडले गेले. खरच, ‘सब कुछ जादुई था!”

सकाळपासून एकापेक्षा एक रोमांचकारी अनुभवांची शृंखला खंडीत करून किनाऱ्यावरील शुभ्र मुलायम वाळूत निवांत शरीर झोकून देण्याचा आनंद काही औरच!

काहीजण हातात कोल्ड्रिंक्स घेऊन आरामखुर्चीमधून ‘फॉरेनर’ असल्याच्या अविर्भावात पहुडले. तर काहींनी मस्त समुद्रात पोहण्याचा आनंद लुटला.

अल्पशा विश्रांती नंतर मंडळी ताजेतवाने होऊन ‘बीच’ वरील दुकानात जाऊन गावाकडच्या  मित्रांसाठी  की-चेन, टी-शर्ट इत्यादी गिफ्ट खरेदी करते झाले.

एवढ्यात सूचना आली की, ‘चलो हमे निकलना है’!

पटायात परतल्यावर प्रथम जेवण आटोपले.

नंतर खाणीतील मौल्यवान दगड रत्न-जवाहिरात परिवर्तित करण्याचे कौशल्य परीलक्षित करणारी ‘जेम फॅक्ट्री’ पहिली.

मन प्रसन्न झाले.

येथे ऐपतीप्रमाणे मंडळींनी खरेदी केली. पुढे रस्त्यावरून जाताना मसाज पार्लर, त्याबाहेर आव्हानात्मक पोज घेऊन उभ्या असलेल्या मोहक ललनां यांनी कित्येकांच्या भावना चेकाळणे स्वाभाविक होते.

आज पटायातील मुक्कामाची शेवटची रात्र.

सायंकाळी एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर काही जणांनी सहेतुक ‘गुंगारा’ दिला. भारतीय परिवेशातील आध्यत्मिक चौकटी तकलादू ठरल्या.

वारकरी म्हणविणाऱ्यांच्या कपाळावरील टिळा दुधाळ अंधारात आपोआप पुसला गेला. असो. “मधुशाला और कोठा साधू और शैतांन मे फ़र्क नही करता मेरे भाई क्योकी, ‘हमाम मे तो सारे नंगे होते है।”

“येथील समाजाने देह व्यवसाय ‘नियती’ म्हणून अंगिकारल्याचे जाणवते. मात्र बदललेल्या जीवनमूल्यांशी प्रामाणिक राहून मोठ्या सचोटीने त्यांनी तथागतांची शिकवण, स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, संस्कृती, कुटूंब व्यवस्था टिकवून ठेवली आहे. आमच्यासारखे दोन चेहरे घेऊन वागत नसल्याने त्यांचे जीवन सहज सुंदर झाले आहे. ‘स्वच्छ विचार आनंदी जीवन’!

पंधरा जूनला, चेकआऊट करून आम्हाला ‘रॉबिन्सन मॉल’ मध्ये सोडण्यात आले. येथे परत मंडळीत खरेदीचा जोश संचारला. खिसा काहीसा शांत झाल्यावर ‘वर्किंग लंच’ घेऊन बँकॉककडे आम्ही प्रस्थान केले.

बँकॉकमध्ये प्रवेश घेताच मंडळी दोन दिवसापूर्वीच्या खाणा-खुणा शोधू लागली. हॉटेल ‘हॉर्वर्ड’ मध्ये चेक इन झाल्यावर काहींनी ‘जॉन्सन मॉल’ चा रस्ता धरला! तर बहुतांशी मंडळी थायलंडचे आराध्य दैवत ‘स्लीपिंग बुद्ध’ आणि ‘राजमहाल’ दर्शनासाठी निघाले.

अतिशय भव्य, नीटनेटके, आकर्षक आणि ‘प्रशांत’ शांतता असलेले स्लीपिंग बुद्ध मंदिर म्हणजे तपोभूमी! मुख्य दारातून प्रवेश घेताच तथागत रोमारोमात भिनायला लागले. दर्शनासाठी आपसूकच वारीत शामिल होऊन देह पुढे सरकत गेला. कुणीतरी दहा रुपयाच्या बदल्यात जुन्या एक पैशाच्या आकाराची गोल तांब्या-पितळची नाणी हातावर ठेवली. पिवळ्या जर्द सोनेरी कायेत निरव शांततेत निद्राधीन बुद्ध मूर्ती दिसली आणि भान विसरून तथागतांच्या पायाला स्पर्श केला. पूर्ण प्रदक्षिणा घालून अंतरंगात तिला साठविण्याचा प्रयत्न केला. गर्दी देहाला पुढे ढकलत गेली आणि बुद्ध मूर्ती डोळ्याआड होइपर्यंत मान मागे वळत राहिली. नंतर परिसरातीलच आकाराने लहान मोठी मंदिरे पाहिली. स्मृती जपून ठेवण्यासाठी फोटो सेशन झाले. लगतचा राजवाडा वेळेअभावी धावतच बघितला आणि तृप्त मनाने हॉटेलवर पोचलो.

सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरण अधिक आल्हाददायक बनले होते.

काही मंडळी डिनर हॉलमधून परत गायब झाली आणि उशीरा परतली ती जिवाची  बँकॉक करूनच!

सोळा जूनला रस्त्यावरची गर्दी वाढून ‘ट्रॅफिक जॅम’ लागायच्या अगोदर निघायची सूचना मिळाली होती. त्यामुळे मंडळीने सकाळीच नाश्ता आटोपला!

सामानाची वारंवार तपासणी करुन रात्रीच बॅग्ज तयार केल्या होत्या. सूचना मिळताच गाडीत यंत्रवत सामान चढविल्या गेले आणि काफील्याने एअरपोर्टकडे परतीचा प्रवास सुरु केला.

शहरातील रस्ते, फ्लायओव्हर, ओळखीच्या जागा मागे पडायला लागल्या, तसतशी मंडळींची संवेदनशीलता कमी-अधिक फरकाने  ‘विरहदग्ध’ होत गेली. या अवस्थेत नव्याने जवळीक झालेल्यांच्या निरोपा-निरोपीचे प्रसंग अधिक तीव्रतेने फोटोबद्ध होऊ लागले. गप्पांनाही उधाण आले होते. अशातच बस एअरपोर्टमध्ये वळून गंतव्य ठिकाणी थांबली. यावेळी घाई न करता प्रत्येकाने ‘मॅच्युरिटी’ दाखवत सामान घेतले. “फिर मिलेंगे” म्हणत एक आठवड्यापासून सोबत असलेल्या थाई बांधवांचा निरोप घेतला.

एअरपोर्टवरील औपचारिकता सराईतपणे पूर्ण करून, ठरल्या वेळेवर मंडळीने बुंग मध्ये प्रवेश केला. ‘टेक-ऑफ’ झाल्यासरशी, जमेल त्या झरोख्यातून तथागतांच्या तत्वज्ञानाने पावन झालेल्या थाई भूमीला वंदन करून स्वप्ननगरीचा निरोप घेतला!

हेही वाचायला विसरू नका -गमती जमती पहिल्या विदेशवारीच्या!-https://bit.ly/3hDUimW

(प्राचार्य  राजपूत हे रसायनशास्त्राचे अभ्यासक व विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखले जातात)

9325352121

 

Previous articleगमती जमती पहिल्या विदेशवारीच्या!
Next articleबाबासाहेबांचा आर्थिक विचार अंमलात आणण्याची आवश्यकता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here