बाबासाहेबांचा आर्थिक विचार अंमलात आणण्याची आवश्यकता

जयसिंह चव्हाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान प्रामुख्याने राजकीय,सामाजिक व आर्थिक या तीन विचारप्रवाहांवर अधिष्ठित आहे. बाबासाहेबांचे राजकीय, सामाजिक विचारांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना दिसते. परंतु त्यांचा आर्थिक विचार सशक्तपणे पुढे आलेला नाही. काही मोजक्या विचारवंतांनी बाबासाहेबांच्या आर्थिक विषयांवर जरूर चिंतन, लेखन,संशोधन केले आहे. पण तरीही आर्थिक विषयांवर फारशी चर्चा होतांना दिसत नाही. वस्तुतः बाबासाहेब मुळात जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या अभ्यासाची व संशोधनाची सुरवात ही अर्थशास्त्रापासून सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येईल. 1913-14 ला कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतांना त्यांनी अर्थशास्त्रांतर्गत ‘मार्क्स ऍन्ड पोस्ट मार्क्सीयन सोशालिज्म’ हा विषय घेतलेला होता. “ईस्ट इंडिया कंपनी :- प्रशासन आणि वित्त प्रणाली” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला ग्रंथ एम.ए च्या पदवीसाठी कोलंबिया विद्यापीठात सादर केला. पुढे ‘Ancient Indian Commerce’ या शोधप्रबंधावर अर्थशास्त्रात एम.ए ची डिग्री त्यांनी मिळवली. सिडने वेब यांच्यासारख्या फेबीयन सोसायटीशी संबंधित असलेल्या प्रकांड पंडितांचे स्नेही आणि कोलंबिया विद्यापीठातील नामवंत अर्थशास्त्रज्ञ ऍडविड सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची संधी बाबासाहेबांना मिळाली होती.

बाबासाहेबांनी पीएच.डी. साठी कोलंबिया विद्यापीठात सादर केलेला प्रबंध म्हणजे ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची क्रांती’. या प्रबंधाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सार्वजनिक वित्ताच्या क्षेत्रात अग्रेसरत्वाचा मान मिळाला. 1918 साली संशोधनाला वाहिलेल्या ‘जर्नल ऑफ दि इंडियन इकॉनॉमिक्स सोसायटी’ या ख्यातनाम नियतकालिकात ‘भारतीय लहान जमीनधारणेची समस्या आणि त्यावर उपाय’ हा बाबासाहेबांचा लेख प्रसिद्ध झाला जो भारतातील कृषीविषयक समस्येवर मूलगामी संशोधन व चिंतन आहे. ‘लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये ‘डॉक्टर ऑफ सायंस’ या अत्युच्च पदवीसाठी लिहिलेल्या ‘रुपयाचा प्रश्न:-उद्गम आणि उपाय’ या प्रबंधाने बाबासाहेबांनी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात मोलाची भर घातली. 1947 साली दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत ते लिहितात,”राजकारणाच्या धकाधकीत पडल्यामुळे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती वेळेअभावी मी काढू शकलो नाही म्हणून मी एक वेगळी योजना आखली आहे, ती म्हणजे ‘भारतीय चलन व अधिकोष’ चा अद्यावत इतिहास दोन खंडात प्रसिद्ध करायचा आहे. त्यापैकी ‘रुपयाचा प्रश्न’ हा प्रथम खंड असेल तर दुसऱ्या खंडात 1923 पासून पुढचा भारतीय चलन व अधिकोषाचा इतिहास सादर करण्यात येणार आहे”. मात्र वेळेअभावी बाबासाहेब दुसरा खंड पूर्ण करू शकले नाहीत.

‘रुपयाचा प्रश्न’ हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ‘भारतासाठी योग्य चलनपद्धती कोणती असावी’ या त्याकाळात बहुचर्चित प्रश्नावर झालेल्या चलनविषयक वादविवादात त्यांनी प्रा.जॉन मेनार्ड केन्स यासारख्या जगद्विख्यात अर्थतज्ज्ञांशी दोन हात करावे लागले हे फारच थोड्या अभ्यासकांना ठाऊक असेल.

एक अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सूत्रबद्ध आणि सुस्पष्टपणे आपले आर्थिक तत्वज्ञान मांडले आहे. स्वतंत्र भारतात नियोजन खात्याची जबाबदारी पार पाडण्याची बाबासाहेबांची तीव्र इच्छा होती,मात्र ती प्रतिगाम्यांच्या छुप्या समाजवादाला विरोधातून पुर्णत्वास येऊ शकली नाही, हे या देशाचे व देशातील बहुजनांचे दुर्दैवच आहे!

भारताच्या स्वतंत्रता प्राप्तीनंतर देशाला आर्थिक नियोजनाद्वारे अधिक शक्तिशाली करण्यासाठी त्यांच्या मनात राज्य समाजवादाचे विचार घोळत होते व त्यासाठी राज्यघटनेमध्ये समाजवादी तत्त्वांचा अतिशय जाणीवपूर्वक अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केला, प्रसंगी विरोध पत्करला. भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन्ही परस्परविरोधी आणि टोकाच्या तत्वज्ञानाच्या रक्तरंजित इतिहासाचे परिणाम जगाला भोगावे लागले. या दोन्ही तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त एक तिसरे तत्वज्ञान म्हणजे समाजवाद. या समाजवादी तत्वज्ञानाने समताधिष्ठित समाजनिर्मिती रक्तविरहीत मार्गाने करता येते व त्यासाठी लोकशाही व घटनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल,असे बाबासाहेबांना वाटायचे. त्यांनी स्वतंत्रपणे या विषयावर प्रदीर्घ चिंतन करून राज्य समाजवादाचा सिध्दांत मांडला.*

90 च्या दशकात नव-उदारीकरण या धोरणाचा स्वीकार करताना समाजवाद बाजूला सारण्यात आल्याचे दिसून येईल. परंतु 2021 च्या वर्तमान कालखंडात जागतिक महामारीच्या दुष्ट कालचक्रात समाजवाद ही संकल्पना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसून येईल. जगातील खाजगीकरण स्वीकारणाऱ्या देशाची सर्व सरकारे, त्यांची आरोग्य मॉडेल्स व राजकीय विचारप्रणाली यांची धूळधाण होतांना आपण बघितले आहे.जवळपास सर्वच आघाडय़ांवर अपयश त्यांना पचवावे लागत आहे.

त्याचवेळी ज्या देशांनी समाजवादी संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणा उभ्या केल्यात ते देश इतर राष्ट्रांच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात यात यशस्वी होताना दिसले. अमेरिका सारख्या बलाढ्य भांडवलशाही देश या लढ्यात माघारताना दिसला, त्यांची पिछेहाट होतानाचा अनुभव येतोच आहे. या उलट न्यूझीलंड, पोर्तुगाल, अर्जेन्टिना,स्वित्झर्लंड सारखे देश यशस्वीपणे लढताना दिसले व त्यात या राष्ट्रांनी विस्मयकारक यश मिळविले. हे केवळ आणि केवळ समाजवादी संकल्पनेचे यश आहे.

आधुनिक काळातील या घडामोडींचा वेध घेत असताना बाबासाहेबांच्या परिश्रमपूर्वक सखोल अभ्यासातून त्यांच्या विलक्षण दूरदृष्टीची वारंवार प्रचिती येते. आगामी काळात भारताचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग  सुद्धा स्पष्ट केला आहे.

केवळ आर्थिक सुबत्ता असणे म्हणजे सर्व सामाजिक आलबेल आहे असे ग्राह्य धरणे शुध्द मूर्खपणा आहे. सुदृढ समाजवादच एका निरोगी, स्वस्थ आणि विकसनशील राष्ट्राची निर्मिती करण्यात यशस्वी होऊ शकतो, हे बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक ग्रंथातून, वर्तमानपत्रे व नियतकालिकातील लेखांमध्ये  आणि वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या भाषणांमधून स्पष्ट केले आहे.

बाबासाहेबांच्या अर्थव्यवस्थेविषयक विचारधारेला अंमलात आणणे  ही काळाची गरज तर आहेच शिवाय त्यामुळे भविष्यकालीन गरजांची पायाभरणी करणे सहज आणि सुलभ होईल.

(लेखक यवतमाळ येथील नामवंत विधिज्ञ व सामजिक कार्यकर्ते आहेत)

94221 65787

Previous articleस्वप्ननगरी पटाया
Next article‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन’ सह अनुभवलेला काश्मीर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.