गमती जमती पहिल्या विदेशवारीच्या!

-प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत

साधारणतः तीन महिन्यांपूर्वी कळले की, जागतिक रसायनशास्त्र वर्षांच्या निमित्ताने ‘इंडियन कौंसिल ऑफ केमिस्ट’ द्वारे एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन बँकॉक(थायलंड) येथे करण्यात येणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी इच्छूक, आचार्य पदवीसाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी पासपोर्ट नाही, म्हणून इच्छा असूनही वंचित राहणार होते. त्यासाठी एका एजंटला गाठून अर्जंट पासपोर्ट मिळविण्यात आले. तोपर्यंत आवश्यक त्या शुल्कासह रिसर्च आर्टिकल्स आयोजन समितीकडे पाठविल्या गेले.

दिनांक नऊ जून दोन हजार अकरा रोजी अमरावती पासून थायलंडची सफर सुरू झाली. बहुतांश विद्यार्थ्यांची ही पहिलीच विदेशवारी असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील कुतूहल स्पष्टपणे जाणवत होते. अमरावती ते दिल्ली प्रवासादरम्यान परिषदेचा हेतू, विमान यात्रा, थाई भाषा-संस्कृती, प्रेक्षणीय स्थळे, शॉपिंग इत्यादी बद्दल चर्चा झाली. तरुण संशोधकांचा उत्साह वेगळ्याच अर्थाने ओसंडून वाहत होता. त्यांच्या चर्चेत थायलंडची आधुनिक जीवनशैली, मुक्त सोमरसपान, एंटरटेन्मेंट स्ट्रीट, मसाज पार्लर, इत्यादी मुद्दे केंद्रस्थानी होते.

दिनांक दहा जून रोजी सकाळी दिल्लीला पोचलो. वैयक्तिक स्वच्छता आटोपून ‘मादाम कामा’ पॅलेस येथील क्लब महेंद्रा कार्यालयात आलो. तेथे व्हिसा, पासपोर्ट, ई-तिकीट, काँफेरन्स किट इत्यादी संकलित केले. येथे टूर एस्कॉर्ट ‘जीवनानंद’ व ‘इंदरप्रित’ यांचा परिचय करून देण्यात आला. यात्रे दरम्यान सोबत राहणार असल्याने त्यांच्याशी काहींनी सलगी सुरू केली.

अकरा जून रोजी दुपारी बारा वाजता ‘बिमान बांगला’ फ्लाईट क्र 088 मधून प्रवास आरंभ होणार म्हणून सकाळी पाच पासूनच लगबग सुरु झाली. ठीक सात वाजता टॅक्सीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालो व आठ वाजता पोचलो सुद्धा. ठरलेल्या जागी एस्कॉर्टची शोधाशोध सुरू झाली. मात्र विदेशवारीत सराईत असल्याने त्यांचे टाईम मॅनेजमेंट चोख होते. ते बरोबर नऊ वाजता येणार असे कळले. तो पर्यंत एक तास टिवल्या बावल्या करीत एअरपोर्टचे बाहेरून अवलोकन सुरू झाले. सोबतच एन्ट्री गेट्सची सरळ व उलट गिणती, विदेशी प्रवाश्यांची हालचाल,  ट्रॉलीवर लगेज ठेवून ढकलण्याची प्रॅक्टिस, फोटो सेशन, इंटरनॅशनल रोमिंग सीमची गळ घालणारे एजन्ट्स, इत्यादी! नेहमी विदेश यात्रा करणारे मात्र आपल्याच देशाच्या या नवख्या यात्रेकरूंकडे  हिणकस दृष्टीने बघत होते. हळूहळू परिषदेत सहभागी होणाऱ्या सह-यात्रेकरूंची आवक वाढत गेली. जुन्या-नव्या ओळखीतून संवाद साधल्या जाऊ लागला. फोटो, चहा-नाश्ता इत्यादी मधून वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रत्येकाची ‘कोशीश जारी’ राहिली.

एवढ्यात एस्कॉर्ट्स पोचले. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत मंडळी गेट न ४ कडे शिस्तीत वळली. गेटवर प्राथमिक तपासणी व पुढे सामानाचे स्कॅनिंग सुरळीत झाले. मात्र बोर्डिंग पासच्या काऊंटरवर बसलेल्या मोहक मुलीने लगेज बॅग वेगळी करून रोलिंग बेल्टवर ठेवण्यास सांगितले तेव्हा ‘मेडन’ हवाई यात्रा करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह अवतरले. महत्त्वाचे समान असलेली ही बॅग जर चोरीला गेली तर ? या भीतीने त्यांनी बेल्टवरून  पुढे सरकत जाणाऱ्या बॅग कडे असे काही बघितले की, ‘हम तो लूट गये सनम’! जेथे ओळखीच्या माहौल मध्ये चोरी ‘आम बात’ असेल तेथे अशा अनोळख्या ठिकाणी भारतीय मानसिकता गोंधळून जाणे स्वाभाविकच आहे.

बोर्डिंग पास घेऊन, पुढील टप्पावरील ‘चेक इन’ समयी भौतिक शरीर तपासणी व कॅबिन बॅग स्कॅनिंग झाले. या ठिकाणी असे घडले की, विमानात सोबत ठेवायच्या बॅगेत कैची, दाढीचे फावडे, क्रीम, नेलकटर, सुई,  कानकोरणी, ब्लेड, चाकू, शाम्पू, सिगरेट, माचीस, लायटर, पाणी बॉटल असे कुठलेही ‘आयटेम’ ‘नही चलेगा’ ही एस्कॉर्टची सूचना ‘सिरियसली’ न घेणाऱ्यांना या सर्व वस्तू नाईलाजाने स्वहस्ते काढून बेवारस ट्रे मध्ये ठेवाव्या लागल्या. असे नाहक गमावलेल्या सामानाचे शल्य कित्येकांना मग बरेच दिवस बोचत राहिले. या प्रकाराने काहीसा  ‘खजिलानंदी’ भाव घेऊन मंडळीने लौंज मध्ये प्रवेशाला व सभोवतीचे अवलोकन करू लागली. भल्यामोठ्या शो-केसेस, सजावट करून ठेवलेल्या वस्तू, देशी विदेशी मद्याच्या रंगीबेरंगी बॉटल्स, वगैरे! किंमतीचे लेबल पाहून खिश्याचा अंदाज घेणे सुरु असतानाच एस्कॉर्टकडून सूचना आल्याने काफीला गेट न १४ कडे आजूबाजूचे दृश्य नजरेत कैद करीत पुढे सरकू लागला. तब्बल अर्धा तासानंतर एकदाचे हिरव्या पट्टयाचे बरेच ‘डागडुजी’ केलेले  ‘बिमान बांगला’ दृष्टीक्षेपात आले. परत रांग लावून तपासणी आणि मग ‘बुंग’ प्रवेश!

दारातच मोहक हास्यवदनाने स्वागत झाले!

उत्तरदाखल ‘थँकू’ ऐवजी काहींनी पेहेराव व देहावलोकनास प्राधान्य दिले. बुंग मध्ये जागेचा शोध घेताना कळले की सोबत्यांची ताटातूट झाली आहे. मिळालेल्या सीटवर आसनस्थ होण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्यासारखीच सीट हुकलेल्या शेजाऱ्यासोबत ‘बोलू की नको’ अशी पाळी आली. आपला ‘गडी’ कुठे आहे या साठी सकल देहांची अर्धबाणाकृती ऊठबस सुरु झाली. मान ‘दाये-बाये’ फिरवून शोध घेतल्या जाऊ लागला. त्यामुळे बुंगातील वातावरण कधी ‘जिराफमय’ तर कधी ‘डॉल्फिनमय’ भासू लागले. अशात खिडकीची सीट भेटलेल्यांचा अविर्भाव तर ‘डाव’ जिंकल्यासारखा झाला होता.

 अशी  ‘चाबूक-डुबूक’ सुरू असतानाच एअर होस्टेसने पट्टा बांधायचे लडिवाळ पणे सांगितले. मात्र इथे ही बराच घोर झाला, काहींचे बेल्ट दिसत नव्हते, काहींनी बाजूवाल्याचा एक पदर लपेटून घेतला होता. एका मॅडमचा ‘उदरघेर’ पट्टयात  बसत नव्हता तर काहींच्या ‘क्लीपा’ लॉक होत नव्हत्या. शेवटी एकदाची ‘जुळवा-जुळव’ करून बजेट बसविण्यात आला. लगेच एअर होस्टेस आपत्कालीन सेवांची माहिती बॅकग्राऊंड कॉमेंट्रीशी आपली अदाकारी ‘शिंक्रोनाईझ’ करीत देऊ लागली. त्यावेळेस वृद्धत्वाकडे झुकलेल्या शेजारील देहाची ‘चुळबूळ’ ‘अब भी मै जवान हूं’  याचा असफल देखावा करू लागली. निवेदन संपल्यावर परिचाकेवर रोखलेली नजर हटविणे भाग पडल्याने तो जीव काहीसा हिरमुसल्याचे सुद्धा जाणवले. असो.

प्रचंड घरघर करून विमान एकदाचे हलले आणि धावपट्टीवर मंद गतीने सरपटायला लागले. हळू हळू गतिमान होत शेवटी सुसाट वेगाने धावत एकदम आकाशात झेपावले. तेव्हा विमानाने घेतलेल्या ‘आचक्यात’ दिंडीतील प्रत्येकाला देव आठवला. मनोमन ‘प्रवास सुखाचा होऊ दे रे बाप्पा’ असा धावा केल्या गेला. हा शेवटचा प्रवास ठरतो की काय म्हणून, आमच्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याने तर हृदयाजवळ कवटाळून ठेवलेल्या गजाननाच्या प्रतिमेला ‘कपाळ ते कंठ’ याच्या अनगिनत वाऱ्या घडविल्या. काही वेळात विमान स्थिरस्थावर झाले. पट्टे सैल करायची आज्ञा मिळाल्याने कोंबलेल्या उदरांनी सुटकेचा श्वास घेतला.

खिडकीची सीट मिळालेल्यांनी विहंगम दृश्याचा आनंद लुटण्यास सुरुवात केली. तेव्हा वंचितांच्या आशाळभूत नजरेची आर्जवं स्पष्टपणे दिसून येत होती. हा ‘अनुशेष’ भरून काढण्यासाठी काहींनी ओळखीचा ‘जॅक’ लावून खिडकीतून बघण्याची किमया साधलीच.

येवढ्यात परिचरिका कोल्ड्रिंक्स घेऊन आली. त्याने माहौल थोडा हलका झाला. पाठोपाठ जेवण सुद्धा  आले. एव्हाना भूक पण साद घालायला लागली होतीच. जेवण पुढ्यात आल्यावर शेजाऱ्याची पद्धत चोरट्या नजरेने अभ्यासत आपण सराईत असल्याचा उसना आव आणून अन्न ग्रहण करण्याची कसरत सुरू झाली. बऱ्याच जणांच्या ‘स्पून’ मधून पदार्थांनी खाली उड्या घेतल्या. तेव्हा ‘पितळ उघडे पडले’ म्हणून, ते शेजाऱ्याकडे खजील भाव व्यक्त करते झाले. एकदाचे जेवण आटोपले. हात धुणे स्टेटसला शोभणारे नव्हते त्यामुळे टिशू पेपरद्वारे कसातरी कार्यभार आटोपला. या मालिकेत पुढे सफरचंद आले आणि चहाने समारोप झाला.

यथेच्च ‘पेटपूजा’ झाल्याने काहींना गुंगी आली तर काहींचे ‘प्रेशर’ वाढले. त्यामुळे टॉयलेटचा शोध घेण्यात आला. हलके होऊन आलेले एक गृहस्थ मनोमन हसत होते. खोदून विचरल्यावर ते व्यक्त झाले, “राजेहो, तेथे  पाणी टंचाई आहे, कागदाची मदत घेणे भाग पडले. आणि शेवटी तर फ्लशचे बटन दाबल्यावर इतका मोठा आवाज झाला की, छाती अजून धडधडत आहे”. या आपबीतीची अनुभूती ‘प्रेशर’ नसताना बऱ्याच जणांनी घेतली व आपला बायोडाटा समृद्ध केला.

थोड्याच वेळात विमान ढाक्याच्या विमानतळावर उतरण्याची उदघोषणा झाली. बेल्ट कमरेभोवती आवळताना मनात विचार आला,

“आपण काही क्षणातच ‘बंग बंधू’ मुजीबुर रहमान यांच्या भूमीवर उतरणार! बांगला देशाच्या निर्मितीसाठी बंग बंधूंच्या नेतृत्वात मुक्ती सेनेचा लढा, मुक्ती सेनेला इंदिराजींच्या खंबीर नेतृत्वाची मिळालेली साथ, पाकिस्तानच्या जुलमी जोखडातून मुक्त झालेला ‘आमार सोनार बांगला’, मानवी मूल्यांसाठी लढणारी ‘तस्लिमा नसरीन’, नोबेल पारितोषिक विजेते ‘मोहम्मद युनूस’…अशा कित्येक आठवणींनी भराभर स्मृती चाळल्या गेली. भारताची फाळणी झाली नसती तर आज आमचे सार्वभौमीत्व ‘लाहोर’ पासून ‘ढाक्या’ पर्यंत  अबाधीत राहिले असते. इंग्रजांच्या कुटील नीतीने भारतभूमीवरच दोन मुस्लिम राष्ट्रे उभी झाली. कधीकाळी एकत्र नांदनाऱ्या भावंडामध्ये स्वार्थी राज्यकर्त्यांनी धार्मिक कट्टरता पेरून त्यांना कायमचे वैरी करून टाकले. या खेळीतून राजकारणी आणि धर्ममार्तंड गब्बर झाले आणि जनता कायमची गरीब!

 विचारांचे काहूर मनात दाटले असतानाच विमान खाली यायला लागले. परत एक आचका देऊन धावपट्टीवर रेंगाळत नियोजित स्थानकावर येऊन थांबले. बंग बंधूंच्या भूमीला स्पर्श करताना एक वेगळीच अनुभूती आली… “कधीकाळी आपलाच असणारा हा भूभाग आज आपल्यापासून कीती दुरावलेला!

ढाका एअरपोर्टवर सर्वत्र पुनर्निर्मितीचे काम असल्याने बरीच अव्यवस्था दिसली. दिल्ली आणि ढाका कुठेच तुलना होऊ शकत नाही. भारतीयांनी एक अब्ज जनसंख्येचा भार सांभाळत, राजकीय व प्रशासकीय भ्रष्ट्राचार पचवीत केलेली प्रगती तशी असाधारणच म्हणावी लागेल.

एअरपोर्टवर इमिग्रेशन आणि पुढील प्रवासाची बोर्डिंग पास मिळवून औपचारिकता पूर्ण केली. तरी अजूनही एक तास शिल्लक होता. वेळेचा सदुपयोग म्हणून एअरपोर्टवर फेरफटका मारला. मोठमोठ्या शो-केसेस मधून बांगला संस्कृती, प्रसिद्ध शिल्पकार, कलावंत, क्रिकेटपटू, निसर्ग सौंदर्य, जंगल, पट्टेदार बंगाल टायगर इत्यादींची चित्र दिव्यांच्या झगमगाटात लावली होती.  एका शो-केस मध्ये पारंपरिक वेशात कपाळावर मोठ्ठ कुंकू लावलेली बंगाली स्त्री पाहताच मन सुखावले. कारण मुस्लिम राष्ट्रात आता हे चित्र दुर्मीळ झाले आहे.

खरं तर ‘शृंगार’ हा जगातील कुठल्याही स्त्रीचा निहित भाव! तिच्याच पोटी जल्म घेतला. तिनेच आपल्याला चालायला, बोलायला, खायला, प्यायला, कपडे नेसायला, नेटकेपणाने वागायला, शृंगार करायला शिकवले. म्हणजे खऱ्या अर्थाने तिनेच मानवी सभ्यता शिकविली. तीच आमची आद्य शिक्षिका! मात्र आज धर्मांध होऊन आम्ही तिलाच तिचा पेहराव कसा असावा? तिने शृंगार कसा करावा हे शिकविण्याचा कारंटेपणा करीत आहोत.

बंग बंधूंच्या देशाची आठवण राहावी म्हणून या शो-केस समोर उभे राहून फोटो काढले.

एवढ्यात टूर एस्कॉर्टने सूचित केल्याप्रमाणे आमचा काफीला विमानकडे कूच करू लागला. प्रवेश फाटकावर स्वागत स्वीकारत असतानाच, एकाने बारीक मध्ये शंका काढलीच “आपली बॅग बरोबर येइन्न भाऊ! आता बेज्या झाली की नई! विमानात परत आसनव्यवस्था बदलली नवीन जोड्या लागल्या. मात्र यावेळेस जास्त कुजबुज न होता मिळाली त्या खुर्चीत मंडळी विसावली. पुढील घटनाक्रम तंतोतंत सारखाच रिपीट झाला. बेल्ट बांधणे, आपत्कालीन सुविधांचा ‘डेमो’ वगैरे! अगदी अडीच तासाच्या अवकाश्यानंतर परत कोल्ड्रिंक्स, जेवण, सफरचंद, चहा, प्रेशर, टॉयलेट इत्यादी सर्व शृंखला साग्रसंगीत पार पडली. आणि हो यावेळेस मंडळीने ही कामे खूप सराईतपणे केली.

वेळ पुढे सरकत गेला आणि विमान सायंकाळच्या सुमारास थायलँडची राजधानी बँकॉकच्या आकाशात शिरले. कित्येक दिवसापासून ज्या स्वप्न नगरीची वाट पाहत होतो, ती प्रत्यक्ष दृष्टीक्षेपात आली होती. ऐन दिवेलागनीची वेळ असल्याने कृत्रीम दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण आसमंत झगमगून गेला होता. पथ-दिव्यांच्या रांगेतून शहर किती  आखीव-रेखीव आहे याची कल्पना आली. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचत चालली होती. तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानाने पावन झालेल्या या भूमीला आपण साक्षात स्पर्श कधी  करतो असे प्रत्येकाला वाटत होते. आता दिव्यांची रचना अधिक स्पष्ट झाली होती, एका हलक्या धक्क्यासरशी विमान बँकॉकच्या ‘सुवर्ण नगरी’ विमानतळावर उतरले. आणि अगदी नावातूनच भारतीयतेचा सुगंध दरवळला.

विमातळावर पोचल्यावर रुखरुख होती ती, दिल्लीत दृष्टीआड झालेल्या सामानाची. एस्कॉर्टला ‘फॉलो’ करीत मंडळी एका भल्यामोठ्या फिरत्या पट्टयाजवळ येऊन उभी राहिली. ‘येथे तुमच्या बॅग्स येतील’, असे सांगून गडी काही ‘हुकलेल्या डेलिगेट्सच्या ‘ऑन अरायव्हल’ व्हिसा करिता निघून गेला. फिरत्या पट्टयावर ओळखीच्या बॅग्स येऊ लागल्या, तशी एकदम ‘झुंबड’ उडाली!  जो-तो आपली बॅग शोधायची धावपळ करायला लागला. “ये मेरी आ गयी’, “ये तेरी उठा रे”, “अरे पकड न बे,” अबे ओ…..असा सर्व गोंधळ करून आम्ही आमचा खरा परिचय दिलाच. या भाऊगर्दीत एका मॅडमची बॅग सारखी दिसत असल्याने दुसऱ्या मॅडमने उचलून घेतली. बॅग्ज उघडल्यावर झालेला ‘घोर’ कळला! मोठ्या आकांत-तांडवानंतर हे वादळ शमले! ज्याना अनुभव होता ते शांतपणे उभे राहून आपली बॅग येण्याची वाट पाहत होते. असो शेवटी आपापल्या बॅग्स मिळाल्याने सर्व मंडळी आनंदली.  इमिग्रेशन वगैरेची औपचारिकता  आटोपून चारशे डेलीगेट्सचा ताफा ‘एक्झिट डोअर’ मधून बाहेर पडला तेव्हा अगदी समोरच दहा कोऱ्या कंच्यांग ‘लग्झरी वोल्वो गाड्या’ आमची वाट पाहात होत्या. कोणत्या नंबरच्या गाडीत कोणत्या ‘चाळीस’ लोकांनी बसायचे याची यादी पण ‘रेडी’ होती!..घे रे बाबू याले म्हणतात नियोजन!

अत्यंत शिस्तबद्ध, संयमी मात्र तेवढीच वेधक नजर असलेल्या ‘थाई’ कर्मचार्यांनी काफील्याच्या गोंगाटावर अंकुश लावून सर्वांना गाडीत बसविले. “सामानाची चिंता नको, हा तथागतांचा देश आहे हे आवर्जून सांगितले गेले”. आणि ताफा निघाला ‘विंडसर सुईट्स’ या फाईव्ह स्टार हॉटेलकडे. थाई लोक कष्ट करून स्वाभिमानाने जगणारी आहेत याचा प्रत्यय आला.

संपूर्ण रस्त्यावर वाहनांची गर्दी होती मात्र एकही हॉर्न वाजला नाही. सर्व कसे शिस्तीत ‘पिन ड्रॉप सायलेन्स’!

हॉटेलमध्ये आल्यावर असे निदर्शनास आले की, ‘सुईट्स’ चे वाटप स्वतंत्रपणे महिला, पुरुष, परिवार, यांचा अभ्यास करून अगोदरच केलेले होते. मग प्रत्येकाला एक ‘स्मार्ट कार्ड’ मिळाले. ‘किल्लीने कुलूप उघडण्यात पटाईत मंडळी’ कार्ड दाखवून लिफ्ट आणि रम ‘अटोमॅटिक’ उघडते  पाहून प्रथमतः गोंधळली. पण लवकरच त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि अश्या तोऱ्यात फिरायला लागली की, “ये तो अपुन को, पैलेसेयी मालूम था भई”!

बाविसाव्व्या मजल्यावरील आमच्या खोलीतील खिडकीचा पडदा बाजूला करताच, बँकॉक शहराचे एकतर्फी पण अत्यंत विलोभनीय दर्शन घडले. गगनचुंबी स्काय स्क्रॅपर्स, फ्लाय ओव्हर्सचे कमनीय जाळे, शहराच्या मधोमध वाहणारी ‘चापकी’ नदी, डोंग्यातून भरणारा बाजार…”एक झरोकेसे इतना, तो बाकी कितना होगा जनाब!”

प्राप्त वेळापत्रकानुसार भराभर तयारी करून दहाव्या मजल्यावर ‘डिनर’ साठी मंडळी गोळा झाली. टेबलावरील  व्यंजने व त्यांची मांडणी पाहून जेवणापेक्षा फोटोग्राफीच जास्त योग्य वाटली.

कालच्या रात्रीभोज स्थळी आज सकाळचा नाश्ता पार पडला.  तयारी करून अकरा जून रोजी हॉटेलच्या अकराव्या मजल्यावरील भव्यदिव्य काँफरन्स हॉल मध्ये ‘आंतरराष्ट्रीय परिषदेचा’ उदघाटन सोहळा संपन्न झाला. तद्नंतर प्लॅनरी लेक्चर्स, ईनव्हायटेड टॉक्स, ओरल प्रेझेंटेशन्स, पोस्टर प्रेझेंटेशन्स कामाच्या-बिनकामाच्या गट चर्चा, परीक्षण, निरीक्षण, सन्मान सोहळा, पारितोषिक वितरण, नवीन ओळख्या, लंच, डिनर, टी-ब्रेक, हाय-टी, विझिटिंग कार्ड्सची देवाण-घेवाण, फोटो, ग्रुप फोटो, सेल्फी, आना-भाका, वगैरे वगैरे मध्ये दोन दिवस कसे निघून गेले कळले सुद्धा नाही.

आयोजकांनी पहिल्या दिवशी सायंकाळी शीण घालविण्यासाठी मंडळीला मोकळे सोडले होते. उत्साही मंडळीने एंटरटेन्मेंट-स्ट्रीट, मसाज पार्लर, मधुशाला, वगैरे वगैरे चा आनंद लपून-छपून तर काहींनी बिधास्तपणे लुटला. पारिवारिक मंडळीला मात्र बँकॉक मधील सर्वात ऊंच बिल्डिंगच्या ‘इंद्रा मार्केट’ मध्ये नेऊन सोडण्यात आले. गाड्या इमारतीला खेटून पार्क केल्याने बिल्डिंगचे वरचे टोक काही केल्या दिसले नाही. मात्र येथे जमेल तशी झेपेल तशी, स्वस्त-महाग खरेदीची हौस भागवून लवकरच निघालो. मग  परतीला एका अस्सल इंडियन रेस्टॉरंट मध्ये डिनर देऊन मंडळीला तृप्त करण्यात आले. रात्री झोपताना ‘झिंग’ कमी झाली म्हणून की काय काही तरुण तुर्कांनी खोलीतील  फ्रिज मध्ये ठेवलेले मद्य ‘कॉप्लिमेंटरी’ समजून प्राशन केले. मात्र चलाख हॉटेल प्रशासनाने चेक आऊट च्या वेळेस याची दामदुपटिने वसुली सम्बधिताकडून केली.

भाई ‘रुल सो रुल’ क्या करे!

काँफेरन्सच्या दुसऱ्या दिवशी हॉल मध्ये येतानाच रूमचे चेक-आउट करुन घ्यावे आणि आपले सामान खाली उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये ठेवावे असे सांगितले होते. आज बॅग्स गाडीत ठेवताना कुणालाही, चोरीची साधी शंका सुद्धा आली नाही. अगदी दोनच दिवसात थाई लोकांनी एवढा विश्वास संपादन केला होता. ‘आपल्या देशात आयुष्य गेले तरी शेजाऱ्याचा विश्वास मिळविता येत नाही’. कदाचित तथागतांच्या  ‘प्रज्ञा-शील-करुणा’ या तत्वांना अव्हेरल्याने तर आपली ही दयनीय अवस्था झाली नसेल! असो.

काँफेरन्स समाप्ती नंतर बारा जूनला ठरल्याप्रमाणे दहा गाड्यांमधून ‘काफीला’ थायलंडचे दुसरे प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘पटाया’ कडे निघाला.

आमची गाडी सर्वात अगोदर निघाली, म्हणून ती शेवटच्या गाडीच्या एक तास अगोदर पोचणार होती. असे ‘गाईड ने तरुण मंडळीस खाजगीत सांगितले’. “एक तास जास्तीचा मिळत आहे याचा उपयोग घ्यायचा असेल तर डोळा मारून कोणती  संधी आहे याचा अंदाज दिला’. इतकी ‘डायरेक्ट ऑफर’ मिळाल्याने उत्साही मंडळी गोंधळली. आतून तीव्र इच्छा असतानाही वरून नकार देताना त्यांची अवस्था फार केविलवाणी झाली होती.

मात्र एकाने सूर काढला की “अथीसा येऊनई हे नई कराचं त मंग कईसा कराचं भाऊ!”

आणि गाईडशी संगनमत करून त्याने पटायात एक तास सार्थकी लावला. असे ऐकिवातआहे बरं !

( क्रमशः)

 ( प्राचार्य राजपूत हे रसायनशास्त्राचे अभ्यासक व विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखले जातात)

9325352121

Previous articleतिरुअनंतपूरम -सर्वांत श्रीमंत पद्मनाभस्वामी मंदिराचे शहर
Next articleस्वप्ननगरी पटाया
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.