गांधी: लेखकांना वेड लावणारा महात्मा

 

अविनाश दुधे

महात्मा गांधी ७८ वर्ष जगले. त्यांची हत्या होवूनही आता ७५  वर्ष झालीत. तरीही त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांचा, सामान्य भारतीयांवर असलेल्या त्यांच्या गारुडाचा, त्यांच्या आतील आवाजाचा जगभर अभ्यास होतोय. त्यातून गांधी कळतो खरा; पण खूप काही कळायचा बाकी राहतो. हीच त्या व्यक्तित्वाची जादू आहे .
……………………………………..
जगाच्या इतिहासात फारच कमी माणसं अशी होवून गेलीत जी त्यांच्या हयातीत आणि नंतरही औत्सुक्य, कुतूहल आणि कथा-दंतकथेचा विषय झाली आहेत. महात्मा गांधींचे नाव यात अग्रणी. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या विश्व पुस्तक मेळ्यात गांधींच्या चिरंतन अस्तित्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली. विश्व पुस्तकं मेळ्याची यावर्षीची थिम होती – ‘गांधी :लेखकांचा लेखक’. ही थिम वाचून काहीसे चमकायला झाले . कारण गांधीजी रूढार्थाने ग्रंथकार वा लेखक नव्हते. गांधींच्या नावावर ‘माझी आत्मकथा’, ‘हिंदस्वराज्य’ या गाजलेल्या पुस्तकांसह ‘दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह’, ‘सर्वोदय’, ‘अनासक्ती योग’, ‘येरवडा मंदिरातून’, ‘रचनात्मक कार्यक्रम’, ‘आरोग्याची किल्ली’ अशा काही छोटया पुस्तिका आहेत. मात्र गांधींनी नामांकित भारतीय वा पाश्चात्य तत्ववेत्यांप्रमाणे आपला विचार असा कुठल्या ग्रंथात शब्दबद्ध करून ठेवला नाही. ‘मला माझा विचार लिहायला वेळच मिळाला नाही’, असे ते म्हणत असे. नंतरच्या गांधींच्या अनुयायांनी फारच आग्रह धरला तेव्हा ‘ माझे जीवन हाच माझा संदेश’ असे म्हणून ते मोकळे झालेत.


गांधींनी आपल्या आयुष्यात लेखन मात्र भरपूर केलं. एका नोंदीनुसार तब्बल ९६ हजार पत्र गांधींनी लिहिलीत. ते दोन्ही हातांनी लिहित. ‘इंडियन ओपिनियन’, ‘नवजीवन’, ‘हरिजन’ या आपल्या साप्ताहिक पत्रांमध्येही त्यांनी विपुल लेखन केलंय. त्यांनी ठिकठिकाणी लिहिलेला मजकूर, त्यांचा पत्रव्यवहार, टिपणं, त्यांची भाषणं, प्रार्थना सभेतील मनोगतं हे सगळं एकत्रित करून Collective Works of Mahatma Gandhi या मथळ्याखाली तब्बल ९० खंड प्रसिद्ध झाले आहेत. ज्यांना गांधी मुळातून समजून घ्यायचा आहे, त्यांनी हे खंड वाचले पाहिजेत. गांधींनी किती लेखन केलं यापेक्षा गांधींवर किती लिहिलं गेलं, हे जाणून घेणं हा मोठा इंटरेस्टिंग विषय आहे. विश्व पुस्तक मेळ्यात फिरताना या विषयातील काही उत्तरं मिळालीत. पुस्तक मेळ्याचे आयोजक नॅशनल बुक ट्रस्ट आणि काही आघाडीच्या प्रकाशकांनी गांधींवर आजपर्यंत ८२ भाषांमध्ये १.१० लाख पुस्तके प्रसिध्द झाल्याचे सांगितले. दरवर्षी यात किमान १०० पुस्तकांची भर पडते. आजपर्यंत कोण्या एका माणसावर एवढी पुस्तकं प्रसिध्द झाली नाहीत. गांधीनंतर नेपोलियन व हिटलरवर सर्वाधिक पुस्तकं आली आहेत. गांधी नावाच्या वरकरणी सर्वसामान्य दिसणाऱ्या माणसावर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची विविध भाषांतील पुस्तकं आहेत हे पाहून चकित व्हायला होतं.


गांधींवरील गाजलेली पुस्तकं आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. दिल्लीच्या पुस्तक मेळ्यात गांधींवरील अनेक माहीत नसलेली पण वाचायलाच हवी अशी पुस्तकं पाहायला मिळालीत. Christine Jordis, Jacques Attali, Gene Sharp, David Hardimen या फ्रेंच व इंग्लिश लेखकांची पुस्तके गांधी अभ्यासक खरेदी करताना दिसलेत. Gandhijis lost jewel-Harilal Gandhi हे गांधी आणि त्यांचे पुत्र हरीलाल यांच्या संबंधावर गांधींची नात नीलम पारीख यांनी लिहिलेलं पुस्तकं , महात्मा गांधी आणि रेल्वे (वाय. पी.आनंद) महाराष्ट्रातील औंध राजघराण्यावर गांधींचा जो प्रभाव पडला त्यावर राजघराण्यातील आप्पा पंत यांनी लिहिलेले An Unsual Raja, केंद्र सरकारच्या प्रसिद्धी विभागाने प्रसिध्द केलेले Mahatma Gandhi life in Pictures, गांधीगिरी , कवियो के बापू, व्यंगचित्रातील गांधी, Gandhi in Mirror of foreigner, The Epic Fast, गांधीनी मीराबेन असे नामकरण केलेल्या मेडलिन स्लेड यांचे Spirits Pilgrimage, अशी शेकडो दुर्मीळ व महत्वाची पुस्तकं प्रदर्शनात होती. ती मराठीत यायला हवीत असे प्रकर्षाने वाटले.
गांधी ७८ वर्ष जगलेत. त्यांची हत्या होवूनही आता ७२ वर्ष झालीत. तरीही त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांचा, त्यांच्या संवाद शैलीचा, सामान्य भारतीयांवर असलेल्या त्यांच्या गारुडाचा, त्यांच्या आतील आवाजाचा आणि त्यांचेशी निगडीत हजारो विषयांचा वेगवेगळ्या अंगाने जगभरात अभ्यास सुरु आहे. त्यातून नवनवीन पुस्तकं येताहेत. ही सगळी पुस्तकं वाचून गांधी बऱ्यापैकी कळतो पण खूप काही कळायचा बाकी राहतो. त्याच्या अद्भुत व्यक्तिवाचं गूढ काही उलगडत नाही. गांधी मात्र त्यांच्या चष्म्यातून आपल्याकडे पाहत मिस्कीलपणे हसत असतो.

(दैनिक ‘दिव्य मराठी’ त ऑक्टोबर २०२० मध्ये प्रसिध्द झालेला लेख)

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक, दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

8888744796

………………………………………….

अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

 

Previous articleकवितेशी एकात्म चित्रेही…
Next articleमुसलमानांच्या मुसक्या बांधताना !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here