गाईंमागची गाढवे

सौजन्य -लोकसत्ता

इतर धर्मीय गोमांसादी अन्न का खातात याचा इतिहास पाहताना हिंदू धर्मातही कोणकोणत्या पशूंना भोजनयोग्य ठरवले गेले आहे याचा धांडोळा धर्म हितरक्षणकर्त्यांनी एकदा घेतलेला बरा.. आपल्या सहिष्णू प्रतिमावर्धनासाठी ते नितांत गरजेचे आहे.
………………………………………………………………………………………….

कायदा हाती घेऊ पाहणारे गट सर्वकाल असतातच. मग ते सरकार काँग्रेसचे असो वा भाजपचे. त्या त्या सरकारचे मूल्यमापन होते ते अशा मोकाटांना आवर घालण्यात किती यश येते त्यावरून. १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंग्यात अशा मोकाटांना रोखण्यात आलेले अपयश काँग्रेस अद्यापही पुसून टाकू शकलेला नाही. याची आठवण भाजप सरकारला करून द्यावयाचे कारण म्हणजे राजधानी नवी दिल्लीपासून अवघ्या ४५ किमीवरील बिसारा गावात घडलेला प्रसंग. या गावातील महंमद अखलाख याची दोन दिवसांपूर्वी एका क्षुल्लक कारणावरून गावकऱ्यांकडून हत्या झाली. हे क्षुल्लक कारण होते एका अफवेचे. हा महंमद गोमांस खातो अशी वदंता पसरली, पसरवली गेली आणि िहदुहितरक्षणाचा दावा करणाऱ्या गटांनी महंमदच्या घरावर चाल करून त्यास ठार केले. हा महंमद जेथे राहतो ती िहदुबहुल वस्ती आहे आणि गेली कित्येक वष्रे त्याचे तेथे वास्तव्य आहे. तेव्हा अर्थातच तो आणि त्याचे कुटुंबीय िहदू रीतिरिवाजांशी परिचित आहेत. इतके की बकरी ईदच्या मुहूर्तावरही महंमदने कधी बकऱ्यांची कुर्बानी दिलेली नाही. आपल्या आसपासच्यांना ते आवडणार नाही, याची जाणीव असल्याने त्याने तसे करणे कायम टाळले. परंतु तरीही तो घरात गोमांस खातो, ही बाब पसरवली गेली आणि भडकलेल्या जमावाने त्याच्या घरावर चाल केली. त्या आधी सदर गावाच्या परिसरात वातावरण इतके बिघडवले गेले होते की जाहीररीत्या मारले जात असताना महंमदच्या मदतीस कोणीही आले नाही. इतकेच काय, त्याला मारले ते योग्यच झाले, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया स्थानिक िहदुहितरक्षकांनी दिली. या जमावाने केवळ महंमदला लक्ष्य केले असे नाही, महंमदच्या मुलासही जीवघेणी मारहाण झाली. तो कसाबसा वाचला इतकेच. या बापलेकांना ज्या वेळी मारले जात होते त्यावेळी महंमदची मुलगी गयावया करून मारेकऱ्यांना सांगत होती, घरात जा, तपासा, गोमांस आहे का याची निदान खात्री तरी करून घ्या. परंतु धर्मरक्षणाचा उन्माद चढलेल्या जमावास याची गरज वाटली नाही. आमच्या घरात गोमांस नव्हते हे आता सगळ्यांना कळले, आम्ही गोमांस खात असल्याची केवळ अफवा होती हेही आता सर्वाना लक्षात आले..तेव्हा माझ्या वडिलांना मारणारे त्यांना परत जिवंत करतील का, इतकाच साधा प्रश्न महंमदच्या तरुण मुलीने विचारलेला आहे. त्याचे उत्तर देण्याची िहमत सरकारने दाखवावी.
पण ते शक्य नाही. कारण तसे करायचे तर नरेंद्र मोदी यांना आपल्या मंत्रिमंडळातून महेश शर्मा यासारख्या उच्च दर्जाच्या ना-लायकास डच्चू द्यावा लागेल. हे महेश शर्मा सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत. परंतु त्यांच्याइतकी असांस्कृतिक व्यक्ती समग्र पंचक्रोशीत शोधूनही सापडणार नाही. भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या निधनावर या सांस्कृतिक मंत्र्याची प्रतिक्रिया त्यांची सांस्कृतिक उंची दाखवणारी आहे. मुसलमान असूनही कलाम राष्ट्रीय विचारांचे होते, असे हे शर्मा म्हणाले. यावरून त्यांना इतिहासवर्गास पाठवण्याची कशी आणि किती गरज आहे, हे कळून येईल. महिलांनी दिवेलागणीनंतर घराबाहेर पडणे ही भारतीय संस्कृती नाही, असेही मत याच शर्मा यांनी व्यक्त करून आपला सांस्कृतिक अंधार दाखवून दिला आहे. तरीही केवळ कार्यक्षमतेस महत्त्व देणाऱ्या मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते आहेत. तेव्हा महंमद यांच्या मुलीच्या प्रश्नाचे उत्तर सरकार का देऊ शकणार नाही, याची कारणे मोदी यांच्या मंत्रिमंडळ आणि पक्षातच ठासून भरलेली आहेत. गिरिराज सिंग हे याच माळेतील मणी. सोनिया गांधी यांच्या त्वचारंगापासून ते मोदी विरोधकांनी पाकिस्तानात जावे असे सांगण्यापर्यंत कितीही बेजबाबदार वक्तव्ये ते करू शकतात. ते बिहारचे. त्या राज्यातील निवडणुकोत्तर समीकरणांत ते मोठी भूमिका बजावू इच्छितात. त्यांना आवरण्याचा वा निदान त्यांच्या जिभेस लगाम घालण्याचा कोणताही प्रयत्न मोदी यांनी केल्याचे या भारतवर्षांने पाहिलेले नाही. तसेच ते योगी आदित्यनाथ. अन्य धर्मीयांविरोधात शक्य तितके अधिक विखारी बोलणे हीच त्यांची योगक्रिया. ते उत्तर प्रदेशातील. आगामी दोन वर्षांत त्यांच्या या अशा योगक्रीडांना गती येण्याचीच शक्यता अधिक. कारण त्या राज्यातही पुढील दोन वर्षांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. मोदी यांच्या आसपास असे अनेक साधू आणि साध्वी मुबलक प्रमाणावर आहेत. तेव्हा महंमदच्या मुलीच्या प्रश्नाचे उत्तर न मिळण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे प्रश्न बदलावयास हवा.
तो म्हणजे, असल्या गणंगांना न रोखून मोदी जगास कोणता संदेश देऊ इच्छितात? आपण किती आधुनिक आहोत वा होत आहोत हे मिरवत भारतात गुंतवणुकीसाठी प्रयत्न करीत िहडत राहायचे आणि त्याचवेळी घरातील या मागासांना मोकाट सोडायचे, यातून जगास भारताचे कोणते दर्शन होते? मोदी माध्यमस्नेही आहेत. तेव्हा गेले दोन दिवस जगातील आघाडीची वर्तमानपत्रे वा खासगी दूरचित्रवाणी माध्यमांतून भारताची कोणती बातमी ठसठशीतपणे प्रसृत केली जात आहे, हे मोदी आणि कंपनीस ठाऊक असेलच. गोमांस खाल्ल्याच्या केवळ अफवेतून एकाची हत्या कशी झाली आणि भारत हा अधिकाधिक असहिष्णू कसा होत चालला आहे याची सविस्तर चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमांतून सध्या होत आहे. जागतिक गुंतवणूक मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अशा प्रकरणांमुळे बळ मिळेल, असे सरकारला वाटते काय? हे असले हल्ले करणारे स्वघोषित िहदू हितरक्षक आहेत. त्यांना िहदू इतिहासाचे तरी पूर्ण आकलन आहे काय? ते असेल तर खऱ्या इतिहासास भिडण्याची बौद्धिक क्षमता आणि प्रामाणिकपणा या टिनपाटी मंडळींकडे आहे काय? इस्लाम धर्मीयांनी आवड म्हणून किंवा गरज म्हणून गोमांस खाण्यास सुरुवात केली. परंतु अनेक िहदूदेखील गोमांस खातात, त्यांचे हे िहदुहितरक्षक काय करणार? इतकेच काय, इतिहासात डोकावल्यास या िहदुहितरक्षकांना हेदेखील लक्षात येईल की ज्या आर्याचा वारसा हे अभिमानाने मिरवतात त्या आर्यात मांसभक्षण ही रीतसर प्रथा होती.Donkey-and-a-cow यज्ञयागातदेखील सर्रास प्राण्यांचे बळी दिले जात, हे या अर्धवटरावांना माहीत आहे काय? ज्या वेदपरंपरेचा यांना अभिमान आहे त्याच वेदांत केवळ खाण्यासाठी म्हणून जवळपास पन्नासेक पशूंचा उल्लेख आहे, हे यांना माहीत आहे काय? ज्याच्यामुळे हे दंगली भडकवतात त्या पशूंचादेखील त्या भोजनयोग्य पशूंत समावेश आहे याची यांना कल्पना आहे काय? देवाधिदेव म्हणून ओळखला जाणारा इंद्र यासदेखील मांसभक्षण वज्र्य नव्हते.. किंबहुना ते त्याच्या आवडीचे होते. हे ही मंडळी कधी जाणून घेणार? खुद्द चरकसंहितेत मांस, गाईची चरबी औषधी असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. तेव्हा चरकाची परंपरा ही मंडळी नाकारणार काय? असो. असे अनेक प्रश्न विचारता येतील. इतक्या अभ्यासाची त्यांच्याकडून अपेक्षा करणे हे अतिच होईल, हे मान्य. परंतु सांप्रत काळी शेकडो गोमाता देशभरातील रस्तोरस्ती प्लॅस्टिक खाल्ले गेल्याने पोट फुटून मरतात, हे या गोप्रतिपालकांना ठाऊक आहे काय? त्यांच्यासाठी हे गोरक्षवीर काय करतात? याच सांप्रत काळाचा विचार करावयाचा झाल्यास भारतातून गोमांस निर्यात करणाऱ्या सहा उद्योजकांतील चार जण िहदू आहेत, याकडे या गोरक्षकांचे कधी लक्ष जाणार? ते गेल्यावर बिसारा गावातील महंमदाप्रमाणेच हे गोरक्षक या िहदू गोमांस निर्यातदारांवरही चाल करून जाणार काय?
या सगळ्याचा अर्थ इतकाच की गोमांसाचा संबंध फक्त इस्लामशी लावणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. इस्लामचे पाऊल भारतभूमीवर पडण्याआधीच येथे गोमांस भक्षणाची परंपरा होती हे या गोमाताभक्त गाढवांना सांगणे गरजेचे आहे. कारण या विचारशून्य गाढवांपासून फक्त गाईलाच धोका नाही, तर तो भारताच्या सहिष्णू प्रतिमेसदेखील आहे. निदान याकडे दुर्लक्ष करणे मोदी यांना.. आणि त्याहूनही अधिक देशाला..परवडणारे नाही.

सौजन्य -लोकसत्ता

Previous articleसनातनला आता तरी चाप लावा!
Next articleएका नालायकीचं उत्तर दुसरी नालायकी असू शकते?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here